Login

भातुकलीचा खेळ भाग 4

About Marriage

लग्नसंस्था म्हणजे भातुकलीचा खेळ नसतो आणि करमणूक म्हणून नाटक व सिनेमाही नसतो.थोड्या वेळासाठी करायचे आणि नंतर सोडून द्यायचे.
लग्न म्हणजे पती पत्नीने आयुष्यभर सोबत राहण्याचे,एकमेकांना समजून घेण्याचे,एकमेकांच्या भावना जपण्याचे एक पवित्र बंधन असते.

वेदांमध्ये मानवासाठी 16 संस्कार सांगितले आहे. त्यातील लग्न हा एक संस्कार आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीत संस्कारांना खूप महत्त्व आहे आणि लग्नसंस्थेला तर खूप महत्त्व आहे.
लग्नसंस्थेवर तर पुढची कुटुंबव्यवस्था अवलंबून असते. लग्नसंस्था टिकली नाहीतर मग कुटुंबसंस्था,संस्कार व संस्कृती हे सर्व येणार्‍या पिढीला कसे समजणार?"

वंदनाताईंच्या मनातील भावना त्यांच्या बोलण्यातून कळत होत्या.

त्यांचे सर्व बोलणे शांतपणे ऐकून घेत विकासराव म्हणाले,

"तुझे सर्व म्हणणे खरे असले तरी, आता आपण तिला जबरदस्ती आपल्या घरी आणू शकत नाही.तिचे आईवडीलही तिच्यासमोर हतबल झाले आहेत. त्यांनाही आता झालेल्या चुकीचा पश्चाताप होतो आहे. त्यांनी आपली माफीही मागितली आहे.पोलिसांत तक्रार करूनही काही होणार नाही. ती स्वतःहून पळून गेली आहे व ती सज्ञान आहे. असेच कायदा सांगणार आहे. उलट आपल्या सर्वांनाच चौकशी,उलटतपासणी वगैरे या सर्व गोष्टीचा त्रास होईल.
मला तर वाटते... आता एकमेकांना दोष देण्यापेक्षा, तिला रीतसर घटस्फोट देऊन, रोहितसाठी दुसरी मुलगी शोधू. हे सर्व जे झाले त्यात रोहितची काहीच चूक नव्हती; उलट त्याच्याच भावनांचा खेळ झाला.

आता त्याचे दुसर्‍या लग्नाचे ठरवायचे आणि लग्न ठरवताना उगाच कोणाला फसवायचे नाही, अंधारात वगैरे ठेवायचे नाही.झालेले सर्व सांगायचे. आपण चुकीचे नाहीतर घाबरायचे कशाला?"

विकासराव सकारात्मक भावनेने वंदनाताईंना समजावत म्हणाले.

" पण लोकांना आता काय सांगायचे? शेजारीपाजारी, समाजात, नात्यात सर्वजण विचारतील तर? मला तर काहीच सूचत नाही. आपण खरे कारण सांगितले तरी काहींना आपल्यावर विश्वास बसणार नाही. आपल्याला दोष देणारे,आरोप करणारे लोकही भेटतील आपल्याला. अशा लोकांमुळे उगाचच मनस्ताप होईल आपल्याला. "

वंदनाताई विचार करत म्हणाल्या.

"अगं, तू एवढा विचार करू नकोस. पुढे जे होईल, ते पाहू. खरं ते लोकांना सांगू. ज्यांना विश्वास ठेवायचा ते ठेवतील, ज्यांना नाही ठेवायचा त्यांचा विचार नाही करायचा. आपण रोहितच्या मनाचा विचार करून, त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलू. काही दिवस, महिने जाऊ देवू. त्याला या धक्क्यातून सावरू देवू. तोपर्यंत घटस्फोटही होईल आणि मग बघू ठरवू पुढचे."

विकासराव वंदनाताईंना सावरत म्हणाले.

क्रमश:
नलिनी बहाळकर
0

🎭 Series Post

View all