Login

भातुकलीचा खेळ. अंतिम भाग

About Marriage

काही महिन्यांनंतर...


"आई व बाबा, मला पुन्हा लग्न नाही करायचे.माझ्या आयुष्यात असा दुर्दैवी प्रसंग झाल्यावर .. आता माझी लग्न करण्याची इच्छाच राहीली नाही. जी मला आवडली होती,जिच्यावर मी मनापासून प्रेम केले होते; ती अशी माझ्या प्रेमाचा,मी केलेल्या विश्वासाचा असा घात करून निघून जाईल. असे मला वाटलेही नाही.

नवरा व सासरचे लोक सुनेला त्रास देतात, तिचा छळ करतात. अशा अनेक घटना ऐकायला मिळतात; पण माझ्या बाबतीत जे घडले, तसे अजून कोणासोबत घडले असेल किंवा यापुढे घडेलही ...तेव्हा काय करायचे? दोष कोणाला द्यायचा? आमच्या सारख्या लोकांनी दुसरे लग्न करायचे? म्हणजे लग्नसंस्थेला काही अर्थ आहे की नाही?
आणि असे आमच्यासोबत झाल्यावर आम्हांला लग्नासाठी मुलगी मिळेल का? ती पण काही विचार करेल ना?"

दु:खातून सावरत असलेला रोहित आपल्या आईवडिलांना म्हणाला.

"अरे बेटा, जे झालं ते खूपचं धक्कादायक होतं, आपण सर्व चांगले असताना, आपली काहीही चूक नसताना... आपल्यावर असा प्रसंग आला. याचे आम्हांलाही खूप वाईट वाटते आहे;पण आता जे झाले, त्याचा विचार करून आपले आयुष्य तिच्यासाठी का वाया घालवायचे? यामुळे तिला काही फरक पडणार आहे का?

आयुष्यात आपल्याला भेटणारे
सर्वच लोक चांगले असतील असे नाही. तिच्यासारखे लोकही भेटत असतात. म्हणून आपण जगायचे , आनंदी राहायचे सोडून द्यायचे का? चांगलेही लोक भेटत राहतात. आपण फक्त अनुभवातून शिकून शहाणे व्हायचे व सुखाच्या दिशेने वाटचाल करायची.
झालेली घटना लवकर विसरणे शक्य नाही; पण यातून बाहेर पडण्यासाठी तुला कुठेतरी मन गुंतवावे लागेल.तू लोकांच्या वाईट बोलण्याकडे लक्ष न देता आपले काम व्यवस्थित करीत रहा.
आणि एक सांगायचे आहे,

माझे एक मित्र आहे. तू ही ओळखतो त्यांना. त्यांच्या नात्यात एक मुलगी आहे. तुझ्याविषयी त्यांनी तिला व तिच्या घरातील मंडळींना सांगितले आहे. मुलगी दिसायला चांगली आहे,शिकलेली आहे. फक्त आर्थिक परिस्थिती चांगली नाही. पण माणसे स्वभावाने चांगली आहेत . तुला मुलगी आवडली तर आपण पुढचे ठरवू या. ते लोक तयार आहेत. "

विकासरावांनी रोहितला छान समजावून सांगत पुन्हा लग्न करण्यासाठी तयार केले.

रोहितला मुलगी आवडली. तिलाही रोहित आवडला होता. जे झाले ते तिला व तिच्या घरातील मंडळींना कुठलाही आडपडदा न ठेवता सर्व सांगितले होते. त्यांनी पण इतर ठिकाणी चौकशी करून खात्री करून घेतली होती. त्यामुळे रोहितचे पुन्हा एकदा लग्न झाले.
पहिल्या लग्नामुळे आनंदी व नंतर दु:खी झालेला रोहित दुसर्‍या लग्नानंतर पुन्हा आनंदी झाला व संसारात रमू लागला.

समाप्त
नलिनी बहाळकर


सदर कथा एका सत्य घटनेवर आधारित लिहीली आहे.
अशा घटना जेव्हा समाजात ऐकायला, पाहायला मिळतात, तेव्हा लग्नसंस्था यापुढे टिकेल का? असा प्रश्न मनात नक्कीच येतो.
0

🎭 Series Post

View all