Login

भविष्य नात्याचं भाग 1

गोष्ट नात्याची
"वहिनी, हे काय ऐकते मी! आपली विभा इतकी बदलली? लग्नाआधी कशी होती अन् लग्नानंतर एकदम वेगळीच वागायला लागली म्हणे!" सुषमा आत्या कधी नव्हे ते आपल्या वहिनीशी बोलत होती.

"वन्स, मलाही काळजी वाटत होती. पोर सासरी जाऊन कशी वागते, कोणास ठाऊक? पण जे ऐकलं, पाहिलं त्याने धक्काच बसलाय." वल्लरी काकू काहीशा तुटकपणे म्हणाल्या.

"विभाच्या घराजवळ आज माझी भिशी आहे. दुपारी मी येते. आपण तिच्या घरी जाऊन येऊ. बघूया तरी सासरी लेक कशी वावरते ते."

म्हंटल्याप्रमाणे आत्या दुपारी घरी आली.
"वहिनी, चल लवकर. आज भिशीचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे मलाच पैसे मिळणार आहेत. वेळेवर जायला हवं."

"दोघी आत्ता कुठं निघालाय?" वरदराव निवांत पडून टिव्ही बघत होते. नणंद -भावजयीची न जमणारी जोडी एकत्र बघून त्यांना आश्चर्य वाटलं.
"तुम्हाला सांगायचं राहिलं. आम्ही विभाकडे जाऊन येतोय." नणंद कधी नव्हे ते नीट वागते म्हंटल्यावर मनात नसतानाही वल्लरी काकू आपल्या नणंदेसोबत निघाल्या.

'हे काय पाहतोय मी!' वरदराव दोघींना बघतच राहिले.
' इतकी वर्षे यांचं फारसं जमलं नाही. दोघी एकमेकींना पाण्यात बघत होत्या. कधी मूकपणे तर कधी सामोरा समोर भांडत होत्या. बऱ्याचदा एकमेकींशी बोलत सुद्धा नव्हत्या आणि आता विभाने अशी काय जादू केली?'

नाही म्हंटलं तरी वेळ झालाच. भिशी फुटली होती. पैसे घेऊन दोघी विभाच्या घरी आल्या. आई आणि आत्याला एकत्र आलेलं पाहून वल्लरीला धक्काच बसला.

"आत्ता कशा आलात?" तिच्या चेहऱ्यावर आनंद, आश्चर्य नाचत होतं.

"आठवण आली म्हणून आलो. आत घेशील की नाही?" सुषमा आत्या हसून म्हणाली.

"या ना आत. लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच आलात." विभाच्या सासुबाईंनी स्वागत केलं. विभा आतून पाणी घेऊन आली. तिच्या अंगावर साधासा कुडता अन् पायजमा होता. केस नीट बांधलेले होते. हातात सोन्याच्या बांगड्या अन् पायाच्या बोटात जोडवी दिसत होती. आत्याने वहिनीला डोळ्यांनीच इशारा केला.

"विभे, काय हे? आधी घरात अर्ध्या कपड्यात फिरत होतीस. आता एकदम लूक चेंज?" आत्या डोळ्यांची उघडझाप करत हळूच म्हणाली. तशी विभा गोड हसली.

"अगं, नुसतीच बोलत बसणार का? जा सरबत घेऊन ये." सासुबाई गोड आवाजात म्हणाल्या. पाच एक मिनिटांत सरबत आलं. "वन्स, स्पीडही वाढलाय." आई न राहवून कानात बोलली.

"छान झालंय सरबत." सासुबाई म्हणाल्या. "तुमची लेक दोन महिन्यांत तयार झाली बघा. फार काही सांगावं लागलं नाही. आता सगळं घर सांभाळते." हे ऐकून वल्लरी काकूंना ठसका लागला.

"काय? घरी एकाही कामाला हात लावत नव्हती. मलाच टेन्शन यायचं. हिचं सासरी कसं होईल म्हणून."

"मुलींचं असंच असतं. वहिनी, आता सून येईल तेव्हा तुलाही कळेल." आत्या घर निरखत म्हणाली.

विभा मात्र आई आणि आत्याच्या या नव्या मैत्रीपूर्ण नात्याकडे बघत होती. 'अचानक या दोघी एकत्र कशा काय आल्या? यांचं सूत कधीच जुळलं नाही.' पण दोघींना पाहून तिला बरं वाटलं. 'आपलीही नणंद अशीच आहे. दूर असली तरी नेहमी फोन करते, मनातलं बोलते. काहीही लागलं तरी हक्काने फोन कर म्हणते.'
0

🎭 Series Post

View all