Login

भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 10

एक सौंदर्य वाड्याभोवती फास ठरेल का?

भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 10

मागील भागात तिक्षीताने विनायकवर हल्ला केला.पार्वती,निशा आणि हिराबाई तिघींनी तो परतवला. जयवंतला भेटून घरी आल्यावर त्यांनी राणी अवंतिका कशी परत येणार हे शोधले.आता पाहूया पुढे.


तिक्षीता गढीवर परत आली.सरदेसाई घराण्यातील कोणत्या पुरुषांच्या अंगावर ह्या खुणा असतील?एकच प्रश्न तिला सतावत होता.

हिराबाईचे जयमान ह्या जगात नव्हते.त्यामुळे त्या पिढीत जयवंत,हिराबाईंचे दोन्ही मुलगे विनायक आणि विनय,पुढच्या पिढीत विनायकचा मुलगा.यातील दोन लक्ष्य स्पष्ट होती.आज विनायक निसटला नसता तर त्या दोघात कोण?हेसुद्धा स्पष्ट झाले असते.


तिक्षिताने नकाशा उघडला.राणी अवंतिका आणि विभावरी एकाच ठिकाणी कैद होत्या.परंतु विभावरीपर्यंत पोहोचायला चाव्यांची गरज नव्हती.आधी विभावरीला परत आणायला हवे.त्यासाठी मंदिराच्या तळघरात प्रवेश मिळवावा लागणार होता.


इकडे हिराबाई सांगू लागल्या,"विभावरी,सौंदर्याचा समान अर्थी शब्द.असेच तिचे वर्णन करावे लागेल.या माझ्या बरोबर."


दिवाणखान्यात आल्यावर तिथून गुप्त तळघरात सगळे पोहोचले.समोर एक झाकलेली भव्य तसबीर होती. हिराबाईंनी
इशारा करताच सेवकांनी कापड हटवले.


सिंहकटी,मृगनयनी,चाफेकळी नाक आणि गूढ निळेशार डोळे.पाहताच स्वाती उत्स्फर्तपणे म्हणाली,"वंडरफुल, व्हॉट अ ब्युटी?"

हिराबाई हसून म्हणाल्या,"हेच ते आरस्पानी सौंदर्य,ज्याच्या जाळ्यात माझ्या आजेसासऱ्यांचे आजोबा चिंतामणराव अडकले.

त्यावेळी इथून शंभर मैलावर असलेल्या देवीच्या जागृत देवस्थानी नवरात्रीत शास्त्रीय संगीत आणि नृत्य महोत्सव राजाकडून भरवला जाई.त्या महोत्सवात कलाकारांना खूप प्रसिद्धी,धन आणि सन्मान मिळत असे.


संपूर्ण देशभरातून कलाकार येत.तर ऐन तारुण्यात असणारे चिंतामणराव म्हणजे पुरुषी सौंदर्याचा मापदंड.एकदा असेच ते महोत्सवाला गेले.त्यावेळी तिथे फक्त आणि फक्त एकाच नावाची चर्चा चालू होती.नृत्य आणि गायनाची अप्रतिम देणगी लाभलेली विभावरी.


शेवटी व्हायचे तेच झाले.चिंतामणराव तिच्या प्रेमात आकंठ बुडाले.आमच्या घराण्यात सून आणताना तिची पत्रिका आणि काही विशिष्ट चाचण्या घेतल्या जात.विभावरीने ह्या सगळ्यांना नकार दिला.शेवटी प्रेम आंधळे असते.चिंतामणराव आणि विभावरी गांधर्व पद्धतीने विवाहबद्ध झाले.


विभावरी वाड्यावर रहायला आली.स्वयंपाक,घरकाम हे सगळ ती अगदी उत्कृष्ट करत असे.सर्वांशी अगदी मिसळून आणि गोड बोलत असे.शेवटी सर्वांना तिच्या प्रेमळ वागण्या बोलण्याची भुरळ पडली.चिंतामणरावांची पाहिली पत्नी द्वारकाबई ह्यासुद्धा तिला अगदी बहिणीप्रमाणे वागवू लागल्या.ह्या सगळ्यात एकच व्यक्ती साशंक होती. चिंतामणरावांची भावजय सगुणाबाई.


घराण्यात एका सुनेला त्या शक्ती प्राप्त होतात.त्या पिढीत सगुणाबाई वाड्याच्या रक्षणकर्ता होत्या.त्यांना विभवारीचे इतके गोड बोलणे,वागणे,कामाचा उरक सगळे खटकत असे.शेवटी त्यांनी तिची परीक्षा घ्यायचे ठरवले.


एके संध्याकाळी त्यांनी जाहीर केले,"आता भाऊजी तुम्ही विवाह केलाच आहे.तर देवकार्य करूया."


हे सांगताना विभावरीच्या कपाळावर सूक्ष्म अठी उमटली.तरीही ती हसून म्हणाली,"धाकट्या बाई,करूया देवकार्य.त्यानिमित्त आशीर्वाद मिळतील."


खरे कारण वेगळेच होते.तिने चिंतामणरावांनी विभावरिशी लग्न केल्यावर सुद्धा त्यांना हे कारण सांगून सगुणाबाईंनी दूर ठेवले होते.पूजेच्या वेळी सगळे पुरुष सोवळ्यात असणार.त्यामुळे तिला एकाच वेळी पाहता येणार होते.


दुसरा दिवस उगवला.सगळ्या वाड्यावर लगबग सुरू होती.चिंतामणराव तयार व्हायला विभावरीच्या खोलीत आले.त्यांच्या अंगावर जन्मखूण नव्हती.म्हणजे सगुणबाईंचे यजमान किंवा धाकटे भाऊजी.


इकडे द्वारकाबाई त्यांच्या लहानग्या कृष्णाला तयार करत होत्या.

तेवढ्यात सगुणाबाई आल्या,"थोरल्या बाई,मुलांना सोवळ्यात नको ठेवायला.त्यांची मुंज झाली नाही.शिवाय तुमच्या कृष्णाच्या अंगावर असलेली खूण गुप्त रहायला हवी."



विभावरी तयार होऊन खाली आली.आता देवघरात जायचे होते.एवढ्यात तिने द्वारकाबाईंना बाजूला घेतले,"थोरल्या बाई,अहो सकाळीच ...आता मला बसता यायचं नाही पूजेला."


द्वारकाबाई लगेच म्हणाल्या,"बर,मी सांगते सासूबाईंना."


सगुणाबाई त्यावेळी स्वयंपाकघरात होत्या.द्वारकाबाईनी सासूबाईंना विचारले.

त्या म्हणाल्या,"तू बस मग पूजेला.आता पूजा रद्द करता येणार नाही."


आता विभावरी निवांत होती.तिने पाहिले सासऱ्यांच्या उजव्या खांद्यावर खूण होती.तशीच खूण धाकट्या दिरांच्या अंगावर होती.


तिथे काम करणाऱ्या एका जाणत्या बाईला तिने सहज विचारले,"सरदेसाई घरात सगळ्या पुरुषांना अशी खूण नाही."


तो प्रश्न ऐकल्यावर ती बाई चपापली.तेवढ्यात विभावरीने आपल्या गळ्यातली सोन्याची मोहनमाळ त्या बाईला दिली.


तशी बाई हळूच म्हणाली,"हित नग, वाईच जरा येळ वकुत बघून सांगतो."


थोड्या वेळाने प्रसादाची तयारी आटोपून सगुणाबाई आत आल्या.विभावरी जरा लांब बसली होती.त्यांना शंका आली.नेमके आजच?हे नक्की खरे असेल ना?पण कार्यात मश्गूल असल्याने त्यांच्या मनातली शंका मनात राहिली.


पूजा संपली.विभावरी चपळाईने तिच्या खोलीत आली.तेवढ्यात तिच्या मागून चिंतामणराव आत आले,"विभा,आता नाही धीर धरवत."


पण तिने त्यांनाही तेच कारण सांगून खोलीबाहेर काढले.आता तिने नग्न होऊन साधना सुरू केली. वाड्याबाहेर असलेल्या काळया शक्ति तिला जाणवत होत्या.तरीही तिला त्यांना. आत घेता येईना.एक अदृश्य कवच तिला थांबवत होते.


दुसऱ्या दिवशी ती म्हातारी कोणी बघत नाही असे पाहून हळूच विभावरीच्या खोलीत आली. विभावरीने खुणेने दार लावुन घ्यायला सांगितले.तिने आता संमोहन मंत्र जपला.एक अभिमंत्रित धागा त्या म्हातारीच्या पायात बांधला.तिचा एक केस तोडून घेतला.


त्यानंतर तिला विचारले,"ती खूण कशाची आहे?"

म्हातारी बोलू लागली,"परतेक पिढीत एका बाप्याच्या अंगाव असा डाग आसतोय."


विभावरीने पुढचा प्रश्न विचारला,"ह्या खुणेचा काही अर्थ आहे का?"

म्हातारी म्हणाली,"ते समद पोथीत लीवल हाय.तिथं देवघरात तळघर हाय.त्यात पोथी हाय."


विभावरी हसली.तिने म्हातारीला जायचा हुकूम दिला.म्हातारी खाली उतरत असताना तिला सगुणाबाईंच्या दासीने पाहिले.पण तिला वाटले असेल काही काम.


विभावरी आता आपल्या मूळ रूपात आली.क्रूर लाल डोळे,बाहेर डोकावणारे सुळे,पायापर्यंत रुळणारे केस.

तिने ध्यान लावले.तिला काळया शक्ती आत का येऊ शकत नाहीत याचे उत्तर मिळाले होते.

सगुणाबाई,तिच्या मार्गातील मोठा अडथळा होता.त्याआधी तो ग्रंथ मिळवायला हवा.त्यासाठी विभावरी योग्य संधी शोधत होती.लवकरच तशी संधी चालून आली.

सगुणाबाईंच्या भाच्याची मुंज होती.सगुणाबाई दोन दिवस माहेरी जाणार होत्या.


जाताना सगुणाबाई कृष्णाला बरोबर घेऊन गेल्या. इकडे त्या जाताच विभावरीने गोड जाळे विणायला सुरुवात केली.

ती द्वारकाबाईंकडे गेली,"थोरल्या बाई,आज स्वयंपाक मी करू का?"

द्वारकाबाई हसल्या,"कर की,तेवढीच वेगळी चव."

त्या रात्री सरदेसाई कुटुंबाने साक्षात अमृताची चव असलेले जेवण खाल्ले. विभावरी आता सावध रीतीने आपले काम करू लागली तिने ज्या म्हातारीला संमोहित केले होते तिला ग्रंथ आणायचा आदेश दिला.


ग्रंथ ताब्यात येताच तिने तो वाचून काढला.राणी अवंतिका बाहेर यायला हवी असेल तर तीन बळी आणि चावी लागणार.


ती उठून बाहेर आली.काळया सावल्या तिच्या भोवती जमा झाल्या.तिला कुजबुज ऐकू आली,"तू त्यांना वाड्यात मारू शकणार नाहीस."

विभावरी हसली,"मी आजवर अजिंक्य राहिले आहे राणी अवंतिका इतकं सामर्थ्य मला हवे आहे.म्हणून मला तिला जागृत करून प्राचीन विधी शिकायचे आहेत.मला कोणीही थांबवू शकणार नाही."


विभावरीने मनात ठरवले.आधी धाकटे भाऊजी,मग सासरे आणि तिसरा कोण आहे?कृष्णा की समशेर.


एक क्रूर योजना आकार घेत होती.विभावरी यशस्वी होईल का? तिक्षिता बरोबर तिचे काय नाते असेल?