Login

भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 16

जयवंत पकडला गेला तर काय होईल?



भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 16
मागील भागात आपण पाहिले की हिराबाई दिव्य अस्त्र घेऊन येण्यासाठी निघाल्या. जाताना त्यांनी प्रियाला एक ग्रंथ दिला. इकडे विभावरी आणि तिक्षिता दोघींनी पुन्हा एकदा चावी मिळवायचे प्रयत्न चालू केले. आता पाहूया पुढे.

हिराबाई आणि निशा दिव्य अस्त्र शोधायला निघाल्या. इकडे विभावरी आणि तिक्षिता त्यांची योजना बनवत होत्या. सर्वात कमकुवत असणारा जयवंत. पण हे करताना त्या एका व्यक्तीला विसरल्या होत्या.


त्यांनी योजना आखायला सुरुवात केली. विभावरी अतिशय शक्तिशाली होती. तिने जखीन बंधन मंत्र जपला.

एक हिंस्त्र जखिन खदाखदा हसत म्हणाली,"कोण तू? मला काय गुलाम समजली का?"

त्यावर विभावरी चिडली तिच्या डोळ्यात रक्त उतरले.

तिने आपल्या मायावी वेणीने जखिनीचा गळा पकडला,"विभावरी म्हणतात मला. माझे काम करायला नकार देशील तर कायमची गुलाम बनवेल तुला."


जखिन सावध झाली. विभावरी अतिशय शक्तिशाली आहे. तिचे काम करावेच लागणार.


विभावरी म्हणाली,"जयवंत सरदेसाई हवाय मला. तोही जिवंत."


जयवंतचे नाव ऐकताच जखिन हादरली. ह्यापूर्वी अशीच एक जखिन बळी गेली होती. आजही महादेव नावाच्या दिव्य पुरुषाला शोधत फिरत होती.


त्यामुळे आता काम करण्यात धोका पाहून जखिन म्हणाली,"सरदेसाई? त्यांच्याकडे शक्ती आहे. माझ्याहून जास्त."

तसे तिक्षिता चिडली,"तुला हिराबाई नाही मागितली. जयवंत हवाय आम्हाला..नाही दिलास तर मग."


जखिन कामगिरीवर निघाली.


इकडे हिराबाई आणि निशा नर्मदा नदी ओलांडून एका गुप्त ठिकाणाच्या शोधात निघाल्या.

आजही गूढ भासणारा तो प्रदेश पाहून निशा म्हणाली,"गजगामिनीदेवी किती पुढचा विचार करत होत्या."

हिराबाई म्हणाल्या,"त्यांच्या शक्ती तेवढ्या विकसित होत्या."

दोघी असे बोलत आकाशमार्गे जात असताना अचानक धुके दाटून आले. सगळीकडे धुके पसरल्याने पुढे काहीच दिसेना.

हिराबाई सावध झाल्या,"निशा,आपल्याला जमिनीवर उतरावे लागेल. सावध रहा."


निशा आणि हिराबाई जमिनीवर उतरल्या. निबीड जंगल असलेल्या त्या भागात काही भग्न अवशेष अजूनही दिसत होते. चालताना सतत एखादी नजर पाठलाग करत आहे असा भास होत होता.

दोघी सावध राहून चालत होत्या.अचानक चालत असताना दोघींचाही पाय घसरला आणि खोल खोल एका अज्ञात भुयारात त्या जाऊ लागल्या.



वाड्यात आता प्रियावर सगळी जबाबदारी आली होती. विनायक आणि त्याच्या कुटुंबावर झालेला हल्ला पाहून वाड्याचे राखणदार सावध झाले होते. उमा,स्वाती आणि अरुणा मात्र घाबरल्या होत्या.


अरुणा म्हणाली,"प्रिया,कधी जाणार आपण इथून."


स्वाती म्हणाली,"हो,मला आता खूप भीती वाटू लागली आहे."


प्रिया त्यांना धीर देत म्हणाली,"एक लक्षात ठेवा,आपण सध्या तरी ह्या युद्धाचा भाग नाही. जोवर आपण हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच होणार नाही. तुम्ही तिघी आता काहीही झाले तरी मला मदत करायची नाही."


उमा म्हणाली,"मी तुम्हाला इथे आणयलाच नको होते.आता कोणाला काही झाले तर?"


प्रिया शांतपणे म्हणाली,"उमा,सगळे विधिलिखित असते. तू फक्त निमित्त होतीस."


स्वाती म्हणाली,"प्रिया आता आजी इथे नाही. पुढे काय होईल? कारण एकदा हल्ला झालाय म्हणजे तो परत होऊ शकतो."


प्रिया म्हणाली,"अगदी बरोबर. त्यासाठीच मला आजीने दिलेला हा ग्रंथ वाचावा लागेल. तुम्ही तिघी मात्र सावध रहा. कवच कायम जवळ ठेवा."


तेवढ्यात विनय आत आला,"प्रिया,जयवंत काकाला दवाखान्यात न्यावे लागेल."


प्रिया म्हणाली,"विनय डॉक्टर इथे येऊ शकणार नाहीत का?"

विनय हसला,"मशीन कशा आणणार इथे?"

प्रिया शांत झाली मग म्हणाली,"ठीक आहे. आपण जाऊया."


अरुणा,स्वाती आणि उमा म्हणाल्या,"प्रिया,आम्हीसुद्धा येतोय.आजवर एकत्र आहोत.पुढेही एकत्र लढू."


सगळ्यांनी जयवंत काकाला दवाखान्यात न्यायची तयारी केली.


जयवंत,विनय,ड्रायव्हर विनायक एका गाडीत आणि दुसऱ्या गाडीत प्रिया आणि तिच्या मैत्रिणी अशी व्यवस्था झाली. वाड्यातून सगळे बाहेर पडले. तिक्षिता नजर ठेवून होतीच.


तिने तात्काळ विभावारीला हे सांगितले,"आता ह्या सगळ्यांना मारून जयवंतला घेऊन येते."


विभावरी हसली,"असे करू शकत नाहीस तू. त्यांच्याकडे संरक्षण कवच आहे. ते दूर करावे लागेल आधी."


विभावरी क्रूर हसत म्हणाली,"जयवंत आपल्याला मिळणार काळजी करु नकोस."


इकडे जखिन कायापालट करून दवाखान्यात आली. आता शिकार फक्त पकडुन घेऊन जायची होती. जयवंत अत्यंत सावध होते. हॉस्पिटलमध्ये आल्यावर विनायक आणि विनय पुढच्या प्रक्रिया पुर्ण करत होते. तेवढयात डॉक्टरने बोलवले. संपूर्ण शरीराची तपासणी करायची होती.


डॉक्टर म्हणाले,"शरीरावर असलेले सर्व अलंकार उतरवा."


जयवंतने संरक्षक कवच बाजूला केले. आत जाताच जखिन सावध झाली तिने जयवंतला बेशुध्द केले. परंतु त्याला घेऊन कसे जाणार?


वायुगमन मंत्र सामान्य माणसाला घेऊन जाऊ शकत नव्हता. तिने जयवंतला एका व्हील चेअर वर बसवले आणि तातडीच्या लिफ्टमध्ये टाकले.


इकडे उमा म्हणाली,"प्रिया,अग तासभर झाला तरी काका अजून बाहेर कसे आले नाहीत?"


हे वाक्य ऐकताच विनय आणि विनायक धावले दरवाजा उघडला तर आतला सगळा स्टाफ बेशुध्द होता आणि जयवंत गायब.


तेवढ्यात विनयचे लक्ष लिफ्टकडे गेले. प्रिया आणि विनय अक्षरशः धावत सुटले. इकडे जखिन जयवंतला खाली घेऊन आली..तिने त्याला पुरेसे दूर आणले.


इतक्यात समोरून एक स्त्री येताना दिसली तिला पाहून जखिन गडबडीने जाऊ लागताच ती स्त्री म्हणाली,"थांब! तू त्यांना असे घेऊन जाऊ शकत नाहीस."


ते ऐकून खदाखदा हसत जखिन तिच्या मूळ रुपात आली,"माझा रस्ता सोड. नाहीतर तुला कच्चे खाऊन टाकते."


पार्वती हसली आणि तिने मुक्ती मंत्र जपायला सुरुवात केली. जखिन तळमळू लागली. ती जळून भस्म होणार इतक्यात प्रती मंत्र जपला गेला आणि बंधन तुटले.

विभावरी प्रकट झाली.

पार्वतीकडे पाहून ती म्हणाली,"चेटकीण वंशाला कलंक आहेस तू. आज तुला कैद करून तुझ्या प्रियकराला घेऊन जाणार."


इतक्यात प्रिया आणि विनय येऊन पोहोचले. प्रियाकडे पाहून विभावरी जरा गडबडली पण नंतर तिने बंधन मंत्र म्हणायला सुरुवात केली.

इतक्यात प्रियाने गच्च डोळे मिटले आणि एक प्रचंड मोठा प्रकाशाचा झोत उफाळून आला. दुसऱ्या क्षणी प्रिया,विनय,जयवंत आणि पार्वती तिथे नव्हते.



विभावरीच्या डोळ्यात रक्त उमटले होते.

ती जोरात ओरडली,"शक्य नाही.निरंजन? मानवाला घेऊन असा प्रवास करायचे सामर्थ्य ह्या मुलीकडे कसे?"


दुसऱ्या क्षणी विभावरी म्हणाली,"कितीही पळलात तरी ह्यावेळी वाचणार नाही तुम्ही. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार."


विभावारीचे क्रूर हास्य आसमंत व्यापून उरले होते.

निशा आणि हिराबाई कुठे पोहचल्या असतील? प्रिया आणि निरंजन यांचा काय संबंध असेल? विभावरी जयवंतला पकडू शकेल का?