भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 19
मागील भागात आपण पाहिले चार दिशांचे पवित्र वृक्ष नष्ट झाले. विभावरी जयवंतचे बीज मिळवण्यात यशस्वी झाली.
इकडे तिक्षीता तेरा चेटकीणीना संदेश देऊन आली. आता पाहूया पुढे.
हिराबाई जपाला बसल्या. पुढील चोवीस तास साधना पूर्ण करताच त्यांना दिव्य अस्त्र वापरायचे ज्ञान प्राप्त होणार होते.
निशा म्हणाली,"प्रिया,मी इथे थांबते. तुम्ही चारही पवित्र वृक्षांना पुनरुज्जीवित करा."
असे म्हणून निशाने महाराणी गार्गीने दिलेला दिव्य कमंडलू प्रियाच्या हवाली केला. प्रिया,निर्धाराने बाहेर पडली. इकडे अरुणा,उमा आणि स्वाती तिघींना कैद करण्यात विभावरी यशस्वी झाली होती.
प्रिया बाहेर पडताच तिला पार्वती दिसली.
प्रिया धावत पार्वतीकडे गेली,"जयवंत आणि विनय दोघांनाही वाचवायचे आहे."
पार्वती शांत हसली,"घाबरु नकोस काहीही होणार नाही. आपण आधी हिराबाईंनी सांगितलेले काम पूर्ण करू."
इकडे तिक्षिता तेरा चेटकीणीना विभावरीचा निरोप देऊन आली. चेटकीण समुदाय अंधारात जगत होता. कारण गजगामिनी देवी आणि तिच्या शिष्यांनी विणलेले अभेद्य संरक्षण कवच.
त्यामुळे काळया विद्या वापरायला सुरुवात करणारा जास्त पारंगत होऊ शकत नव्हता.
ते सर्व प्राचीन ज्ञान राणी अवंतिका बरोबर कैद होते. राणी अवंतिका परत आली तर पुन्हा ते सगळे सामर्थ्य मिळणार होते. तेरा जणींनी गावाच्या हद्दीत प्रवेश केला.
त्याबरोबर अशुभ संकेत मिळू लागले. गायी हंबरू लागल्या,लहान मुले सतत रडू लागली. झाडांना आलेली फुले कोमेजून गेली. एक उदास काळी सावली परिसर व्यापून उरली.
पार्वती आणि प्रिया पुढे चालू लागल्या इतक्यात समोरून एक सुंदर स्त्री येताना दिसली.
पार्वती सावध झाली. काहीही झाले तरी कोणावर विश्वास ठेवता येणार नव्हता.
ती स्त्री जवळ आली आणि म्हणाली,"पोरी,तो दिव्य कमंडलू घेऊन जाताना अनेक काळया शक्ती सामोऱ्या येतील परंतु तू घाबरु नकोस. तू निरंजनची मुलगी आहेस हे विसरू नकोस."
प्रियाने त्या स्त्रीला नमस्कार केला आणि म्हणाली,"कसे शक्य आहे? माझे बाबा तर? तुम्ही कोण आहात?"
ती स्त्री हसत म्हणाली,"हिराबाई सर्व उत्तरे तुला देईल परंतु लक्षात ठेव मी तुझे रक्षण करायला कायम तुझ्या बरोबर आहे."
ती स्त्री अदृश्य झाली. पार्वती म्हणाली,"प्रिया चल आधी दक्षिण दिशेला जाऊ. तिथून येणाऱ्या शक्ती जास्त प्रबळ असतील."
दोघींनी गावाच्या दक्षिणेला प्रयाण केले.
दक्षिण दिशेला जाताना अनेकदा भास होत होते,विचित्र आवाज ऐकू येत होते.
पार्वती थांबली,"प्रिया मी कितीही शुद्ध आचरण करत असेल तरी चेटकीण वंशातील असल्याने पवित्र वृक्षाच्या परिघात जाऊ शकत नाही. तू पुढे जा."
प्रिया पुढे झाली आणि अचानक एक चेटकीण प्रकट झाली. पुढे आलेले सुळे, भयानक लाल डोळे,खांद्यावर रुळणारे काळे केस आणि बेसूर आवाज यामुळे ती प्रचंड भयानक दिसत होती. प्रिया क्षणभर दचकली.
ती चेटकीण पुढे आली,"तुला सांगते तिथे थांब आणि परत जा. नाहीतर जीव जाईल तुझा."
प्रिया म्हणाली,"माझ्यात निरंजनचा अंश आहे. तू माझे काहीही बिघडवू शकणार नाहीस."
निरंजन हे नाव ऐकताच चेटकीण चवताळली,"असंख्य काळया शक्तीच्या उपासकांना संपवणारा निरंजन संपला तसेच तूसुद्धा संपशील."
असे म्हणून तिने बंधन मंत्र जपला.प्रिया सावध होती. तिने हा वार सहज परतवला. पार्वती पुढे सरसावली आणि तिने मुक्तीमंत्र जपला. चेटकीण जळून भस्म झाली. प्रिया धावत पवित्र वृक्षाजवळ गेली.
तिने दिव्य जल काढले आणि वृक्षाच्या मुळापाशी टाकले. त्याबरोबर तो पवित्र वृक्ष पुनरुज्जीवित झाला.
निशा वाड्यात ठामपणे उभी होती. वाड्याबाहेर असणाऱ्या काळया शक्ती आत जायला पहात होत्या. संरक्षक योद्धे वाड्याभोवती कडे करून उभे होते. इतक्यात तिक्षिता तेरा चेटकीणी बरोबर.वाड्यावर चालून आली.
वाड्याच्या चारही बाजूंनी काळे धुके दाटून आले. बाहेर तुंबळ युद्ध सुरू झाले. निशा महाराणी गार्गीने दिलेले दिव्य ज्ञान आणि मंत्र यासह सज्ज होती. आता काहीही होवो विभावरी संपली पाहिजे. हाच निर्धार तिच्या चेहऱ्यावर होता.
इकडे विनय विवस्त्र उभा होता.
त्याचे पौरूष पाहून विभावरी म्हणाली,"जयवंत बरोबर तुझाही अंश मला हवाय.त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल."
विनय निर्धाराने म्हणाला,"सगुणाबाई आणि तिच्यासारख्या असंख्य पुण्यात्मा स्त्रियांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. तू कधीच जिंकू शकणार नाहीस."
विभावरी त्याच्या जवळ गेली त्याच्या छातीत नखे रोवत म्हणाली,"मी पूर्वी तुझ्या घराण्यातील पुरुष उपभोगला आहे आणि तुझाही उपभोग मी घेईलच."
एवढे बोलून विभावरी बाजूला झाली. तिच्या नखांचे व्रण विनयच्या भरदार छातीवर उमटले होते.
प्रिया आणि पार्वतीने पश्चिम दिशेला जाऊन तिथला वृक्ष पुनरुज्जीवित केला आणि आता त्या पूर्व दिशेला जायला निघाल्या.
पूर्व दिशेला जात असताना अचानक पार्वती वर हल्ला झाला. एका जखिन आणि काळया जादुगाराने हल्ला केला. बेसावध असलेली पार्वती जखमी झाली.
तरीही तिने त्या दोघांना संपवले आणि प्रियाला म्हणाली,"पुढे जाऊन तुझे कार्य पूर्ण कर. मी ठीक आहे."
वाडा आता युद्धक्षेत्र बनला होता. संरक्षण करणारा एकेक योद्धा कोसळत होता.
तिक्षिता म्हणाली,"माझ्या बरोबर सगळ्यांनी एकदाच मंत्राने वार करा."
सगळ्या तेरा चेटकीणी एकत्र आल्या त्यांनी जादुई दंड सज्ज केले आणि विध्वंस मंत्र जपला.
त्याबरोबर संरक्षण कवच भेदले गेले. तिक्षिता म्हणाली,"अखेर काळया शक्ती वाड्यात जाणार आणि आम्ही राणी अवंतिकाचे शरीर घेऊन जाऊ."
निशा सावध झाली.तिने संरक्षण साधना सुरू केली. त्याबरोबर संपूर्ण कक्ष गायब झाला. आता हिराबाई साधना पूर्ण करू शकणार होत्या.
तिक्षिता तंत्र साधनेने लगेच गुप्त दालनात पोहोचली. तिने राणी अवंतिकाला ठेवलेली पेटी घेतली आणि परत फिरली.
राणी अवंतिका परत येईल का? विभावरी तिला संपवून सामर्थ्यवान होईल का? प्रियाच्या जन्माचे रहस्य काय असेल?
वाचत रहा.
भय इथले संपत नाही
©® प्रशांत कुंजीर
भय इथले संपत नाही
©® प्रशांत कुंजीर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा