भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 22 (अंतिम भाग)
मागील भागात आपण पाहिले की विभावरी राणी अवंतिकाच्या शक्ती मिळवण्यात यशस्वी झाली. इकडे प्रियाला तिच्या जन्माचे रहस्य समजले. विभावरी आणि तिक्षिता आता शेवटच्या विधीला सज्ज झाल्या. आता पाहूया पुढे.
विभावरी आता सिद्ध झाली तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. तिला आता सर्व शक्तिमान बनायचे होते. तिने बीज धारण विधी करीता सुरुवात करायची ठरवले.
त्याचवेळी तिक्षिता म्हणाली,"मला काही सांगायचे आहे. ह्या सगळ्या सरदेसाई कुटुंबाला आणि तुला सुद्धा."
विभावरी म्हणाली,"आधी विधी पूर्ण होऊ दे. मग तुला काय सांगायचे ते सांग."
तिक्षिता म्हणाली,"मी जे सांगते ते ऐकून घे. तर सरदेसाई घराण्यातील सगळ्यांनी पहा. आज तुमचा मृत्यू बनून मी उभी आहे. तिक्षिता कोण? हिराबाई हा तुम्हाला छळत असलेला प्रश्न आहे. त्याच उत्तर आज देते. सुवर्णलता सरदेसाई घराण्यातील सर्व शक्तिमान स्त्री. जिला तुम्ही सगळ्यांनी मिळून अपमानित करून हाकलून दिले."
हिराबाई म्हणाल्या,"सुवर्णलता अघोरी साधना करत होती. तिचा आणि तुझा काय संबंध?"
तिक्षिता हसली आणि तिने मंत्राद्वारे मूळ रूप धारण केले. तिला पाहून हिराबाईंना धक्का बसला. हुबेहूब सुवर्णलता. पण कसे शक्य आहे?
तिक्षिता म्हणाली,"एक चेटकीण कधीही आपले मूळ रूप दाखवत नाही. पण आज माझे मूळ रूप मी दाखवले. कारण ह्या सरदेसाई वाड्यावर माझा हक्क आहे. मी तिक्षिता,सरदेसाई वाड्याची वारस,सुवर्णलताची मुलगी."
ती थांबताच हिराबाई स्तब्ध झाल्या. आता त्यांना समजले की तिक्षिता रखमा बनून वाड्यात का राहू शकली. तिला वाड्यातून अवंतिका कशी सापडली.
हिराबाई म्हणाल्या,"तू सुवर्णलताची मुलगी असशील पण ह्या वाड्याची आणि इथल्या दिव्य पवित्र शक्तींची वारसदार कधीही होऊ शकणार नाहीस."
हे बोलणे थांबवून विभावरी म्हणाली,"हिरा,तुम्हाला संपवून सरदेसाई घराण्यातील पुरुषांच्या बिजाने आम्ही चेटकीण वंश वाढवणार."
इतके बोलून विभावरी शांतपणे जयवंत कडे चालू लागली. इतक्यात विभावरिसमोर दोन पिशाच्च प्रकट झाले. त्यांनी विभावरीला रोखून धरले.
विभावरी चिडली,"पार्वती,चेटकीण वंशाला कलंक आहेस तू. तुझे हे गुलाम मला एखादा क्षण रोखू शकतील फक्त."
असे म्हणून तिने पिशाच्च जाळून नष्ट केली. तेवढ्यात अचानक दिव्य प्रकाश पसरला आणि वैदेही प्रकट झाली आणि पाठोपाठ प्रकटला निरंजन.
त्याला पाहताच विभावरी चवताळली,"निरंजन? तू आता इथून जिवंत जाऊ शकणार नाहीस."
सैतानी मंत्र जपून तिने निरंजन आणि वैदेही दोघांना कैद केले. तिक्षिता अजूनही शांत होती. विभावरीने वेणीच्या माध्यमातून सगळी शक्ती एकवटली होती.
आता ती शेवटचा वार करणार होती. एवढ्यात हिराबाई ध्यानस्थ झाल्या. त्यांनी मंत्र पठण चालू केले. प्राचीन मंत्रांच्या मदतीने प्रिया,निशा,हिराबाई,वैदेही आणि निरंजन अशा पाच पवित्र योद्ध्यांच्या शरीरातून दिव्य तेज बाहेर पडू लागले आणि त्यातून प्रकटले दिव्य अस्त्र.
अस्त्र प्रकट झाले. परंतु सगळी शक्ती वापरल्याने सगळेजण क्षीण झाले. आता फक्त विनय त्या अस्त्राचा वापर करू शकत होता.
तिक्षिता म्हणाली,"पुरुष कायमच सौंदर्य आणि स्त्री देह यांच्या मोहात अडकत असतो. आजही तेच होणार. बीज अंकुरण विधी पूर्णत्वास जाणार."
तिक्षिताने आदेश देताच तेरा चेटकीणी रिंगण करून उभ्या राहिल्या. त्यांनी नरकाचे द्वार खोलण्याचे आवाहन सुरू केले. विधी पूर्ण होताच नरकाचे द्वार खोलून सैतानी शक्ती दोघींच्या शरीरात प्रवेश करणार होती.
तिक्षिता विनयकडे गेली. त्याच्या डोळ्यात पाहून संमोहन मंत्र म्हणायला सुरुवात केली. विनयला आता सगळीकडे धुके दिसत होते. त्यामध्ये एक सुंदर स्त्री त्याला बोलावत होती.
विनय तिच्या जवळ गेला. आता कोणत्याही क्षणी नरकद्वार उघडले जाणार होते. इतक्यात त्या दाट धुक्यात विनयला एक शुभ्र प्रकाश दिसू लागला.
एक दिव्य स्त्री त्याच्याकडे चालत येत होती. विनयला एकीकडे तिक्षिताचा कमनीय स्त्री देह ओढत होता आणि दुसरीकडे तो तेजस्वी प्रकाश.
तिक्षिता जवळ आली. विनयच्या सर्वांगावर हात फिरवत ती त्याला विधी करीता तयार करत होती.
इतक्यात विनयला आवाज आला,"सगुणाबाई आणि त्यांच्या सारख्या अनेक साध्वी काळया शक्तींना रोखण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करत आहेत. तुझ्यात त्या सर्व दिव्य स्त्रियांचा अंश आहे. फक्त स्वतः च्या शक्तींवर विश्वास ठेव. स्वतः ला ओळख." आवाज ऐकू यायचा बंद झाला.
तिक्षिता आता विनयशी एकरूप व्हायला तयार झाली. तिकडे विभावरीने विधी सुरूही केला. विनयने डोळे बंद केले. त्याला काही खोल असे जाणवू लागले.
आपोआप काही दिव्य मंत्र त्याच्या मनात उमटू लागले. तसे दिव्य अस्त्र जागृत होऊ लागले. विभावरी आणि तिक्षिता विधी पूर्ण करायच्या अंतिम टप्प्यावर होत्या. अचानक दिव्य अस्त्र सिद्ध झाले.
काही कळायच्या आत विनयने तिक्षिताला बाहुत घेतले आणि एका वारात तिची वेणी कापली आणि अस्त्र जयवंतकडे फेकले. विभावरी तिक्षिताच्या किंचाळीने एक क्षण मागे वळली. त्याच क्षणी जयवंतने वार केला.
विभावरी आणि तिक्षिता त्यांच्या मूळ रूपात आल्या. त्यांची शक्ती संपताच दिव्य अस्त्र गायब झाले.
हिराबाई,निशा,वैदेही,निरंजन आणि प्रियाने मुक्ती मंत्र जपायला सुरुवात केली. एकापाठोपाठ एक चेटकीणी जळून नष्ट होऊ लागल्या.
हिराबाई म्हणाल्या,"विभावरी,हीच ती वेळ आहे. आता तुला कायमचे संपवू आम्ही."
विभावरी कमजोर असली तरी सावध होती. तिने उरलेली सर्व शक्ती पणाला लावून मंत्र जपला आणि सैतानी दार उघडताच विभावरी तिक्षिताला घेऊन समोरच्या अग्नित प्रवेश केला. जाताना ती म्हणाली,"काळया शक्ती कधीच संपत नाहीत. आम्ही परत येऊ."
सगळे काळे ढग बाजूला झाले. सरदेसाई वाडा काळया सावल्यांपासून मुक्त झाला.
हिराबाई म्हणाल्या,"विनय,ह्या दोन्ही मायावी वेण्या पुन्हा एकदा कैद कराव्या लागतील. तो विधी सीमा,प्रिया आणि निरंजन करेल."
प्रियाला आपण एक योद्धा असल्याचे समजले होते. आता ती आणि विनय एकत्रित काळया शक्तींविरुद्ध लढायला सज्ज झाले होते. पार्वती आणि जयवंत एकत्र आले. आज सगळा गाव पुन्हा उत्सव साजरा करायला सज्ज झाला होता.
इकडे गावापासून हजारो मैल दूर विदेशात एका संग्रहालयात प्राचीन वस्तू ठेवलेल्या दालनात एक स्त्री एका संदुकी जवळ थांबली.
तिने संदुकिवर लिहिलेला ब्राम्ही लिपीतील मंत्र वाचला. त्याबरोबर तिथल्या सापटितून एक केसांचा पुंजका येऊन तिच्या केसांना जोडला गेला आणि तिचे लाल डोळे चमकले.
ती हसत बाहेर पडताना म्हणाली,"भय इथले संपत नाही.....मज तुझी आठवण येते....."
कथेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व रसिक वाचकांचे आभार.
©®प्रशांत कुंजीर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा