भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 15
मागील भागात आपण पाहिले की विभावरिला कैद केले. त्यानंतर सरदेसाई गढी सोडून वाड्यावर रहायला आले. मंदिराच्या पुजाऱ्यांना काही लोकांनी मारले होते.
तिक्षिता साठी काम करणारे हे लोक कोण असतील? तिक्षिता आणि विभवारीचा काय संबंध असेल? प्रियाने सांगितलेल्या ठिकाणी हिराबाई जातील का?
ते चार तरुण बाहेर पडले. त्यातील मुलगी म्हणाली,"विहान मी सांगितले होते की ही सामान्य बाई वाटत नाही."
दुसरा म्हणाला,"हो,आता ती चेटकीण तिचे काम झाल्याशिवाय आपल्याला सोडणार नाही."
ते चर्चा करत असताना पार्वती तिथे आली.
त्यांच्याकडे पाहून म्हणाली,"पैशांचा लोभ आता तुमच्या जीवावर बेतनार."
त्याबरोबर ते चौघे म्हणाले,"आता आमचा नाईलाज आहे. आम्हाला तिचे काम करावेच लागेल."
पार्वती म्हणाली,"हे काम झाल्यावर तुम्ही मुक्त होणार नाही. ती कायम तुम्हाला गुलाम म्हणूनच वापरणार."
विहान म्हणाला,"यावर काही उपाय नाही का? आम्हाला कोण वाचवू शकेल?"
तसे पार्वती म्हणाली,"तुम्ही पुजाऱ्यांना मारायला नको होते. तसे केले नसते तर तुम्हाला मदत मिळाली असती."
चारही जण एकदम म्हणाले,"आम्ही त्यांना मारले नाही. त्यांना फक्त मंदिराच्या हद्दीबाहेर आणले. नंतर त्या राक्षसाने त्यांना मारले."
हे ऐकल्यावर पार्वती म्हणाली,"चला माझ्याबरोबर ,तुम्हाला आता फक्त हिराबाई मदत करू शकतात."
हिराबाई गावकऱ्यांना घेऊन जंगलाच्या दिशेने निघाल्या. बरोबर प्रिया आणि तिच्या मैत्रिणी बरोबर होत्या.
विनय म्हणाला,"आजी,नक्की कोणाचे काम असेल?"
हिराबाई म्हणाल्या,"तिक्षिता ह्यामागे असेल. परंतु आपल्याला आता संरक्षण नाही."
सगळेजण तिथे पोहोचले. संपूर्ण मान पिरगळून मारले होते. प्रियाने नीट पाहिले असता त्यांची मूठ बंद होती. प्रियाने हळूच जाऊन मूठ उघडली. त्यावर ग्रंथांचे नाव लिहिले होते. त्याच चिठ्ठीच्यामागे एक पत्ता लिहिलेला होता.
प्रियाने तो कागद गुपचूप ताब्यात घेतला. सगळेजण वाड्यावर परत आले.
हिराबाई म्हणाल्या,"प्रिया,आपल्याला आता काहीही झाले तरी त्या ठिकाणी जावेच लागेल."
प्रियाने तो कागद काढला,"आजी,आपल्याला सगळी उत्तरे ह्यात मिळतील."
हिराबाई कागद वाचून म्हणाल्या,"हा ग्रंथ आपल्याकडे आहे."
तेवढ्यात नोकर कोणीतरी भेटायला आल्याची वर्दी घेऊन आला.
हिराबाई बाहेर आल्या. चार अनोळखी व्यक्ती पाहून त्या साशंक झाल्या.
तेवढ्यात विहान म्हणाला,"आम्हाला पार्वतीने पाठवले आहे."
मग हिराबाई त्यांना आत घेऊन गेल्या.
त्यांना शांतपणे बसवून त्यांनी विचारले,"ह्या गावात कसे काय आलात तुम्ही? तिक्षिता कुठे भेटली तुम्हाला?"
तो तरुण सांगू लागला. "ती आमच्या कॉलेजचा शिपाई बगाराम बरोबर राहत असे. त्याची भाची आहे असे तो सांगत असे. तिच्याकडे एक आकर्षून घेणारे गूढ होते. आम्ही घरच्या पैशांवर मजा करायचो. हळुहळू घरचे विचारू लागले. पैसे मिळण्यावर बंधने आली. त्याचवेळी ही आम्हाला भेटली.तिने आम्हाला सुरुवातीला काही कामे सांगून त्या बदल्यात पैसे दिले."
विहानला थांबवत ती तरुणी म्हणाली,",मला तेव्हा शंका होतीच इतके पैसे ती कुठून आणत असेल? पण झटपट मिळणाऱ्या पैशांच्या मोहाने आम्ही फसत गेलो."
हिराबाई म्हणाल्या,"घाबरु नका,आम्ही तुम्हाला नक्की वाचवू."
नंतर निशाकडे वळून त्या बोलू लागल्या,"निशा,तू आणि पार्वती ह्या बगारामला शोधा. तिक्षिता कोण आहे याचा शोध घ्या.विनय ह्या मुलांना वाड्यात घेऊन जा."
तिक्षिताने विभवारीला मुक्त करायची तयारी सुरू केली. विभावरीचा आत्मा ह्या गढीतील हद्दीत बंद होता आणि शरीर मंदिरातील पुजाऱ्यांच्या वाड्यात. पुजारी बाबांना तिने संपवले होते. त्यामुळे आता कोणीही आड येणारे नव्हते. तिक्षिताने वायूगमन मंत्र जपला.पुजऱ्यांच्या वाड्यातील लोकांवर संमोहन करून ती आत शिरली.
तिने वाड्यातील मुख्य दालनात रिंगण आखले. आठही दिशांची प्रतीके जादूने प्रकट केली. पंच तत्वात असलेल्या विध्वंसक शक्तींची पूजा करून तिने मुक्ती मंत्र जपायला सुरुवात केली. सगळीकडे काळोख पसरला. मंत्रध्वनी वाढू लागला. काळोखातून एक आकृती साकार होऊ लागली.
जवळपास दोनशे वर्षांनी विभावरी मुक्त झाली. तिच्या क्रूर हास्याने तो वाडा थरारला.
तिक्षिता क्रूर हसत म्हणाली,"चेटकीण जगातील सर्वाधिक शक्तिशाली चेटकीणीपैकी एक असलेल्या तुझे स्वागत आहे."
विभावरी हसली,"तू मला सोडवायला येशील याची खात्री होती. पण खूप वाट पहायला लावलीस."
तिक्षिता म्हणाली,"माझ्या सगळ्या शक्ती निरंजनने हिरावून घेतल्या. तुला कैद केल्यावर मला त्यांनी सामान्य स्त्रीच्या रुपात ह्या जगात सोडून दिले. चल तुझा महाल तुझी वाट पाहतोय."
विभावरीने जादुई दंड प्रकट केला,"ह्यावेळी राणी अवंतिका बाहेर येणार आणि तिच्या सर्व शक्ती आपल्याला प्राप्त होणार."
दोघी गढीत पोहचल्या. विभावरीने गढीत पाऊल ठेवताच तिला आठवला महादेव आणि त्याचा उपभोग घेण्याचा तो क्षण.
सगुणाबाई आणि निरंजनने तिला दोनशे वर्षे कैदेत ठेवले. जादुई आरशासमोर उभे राहून तिने दृष्टीपटल मंत्र जपला. सरदेसाई वाडा बाहेरून दिसत होता. संरक्षक कवच आणखी मजबूत झाले होते.
विभावरीच्या डोळ्यात रक्त उतरले होते.
अत्यंत क्रूर हसत ती म्हणाली,"आता फक्त एक चावी आणि मग राणी अवंतिका मुक्त होईल. त्यानंतर तुमचा सर्वनाश अटल आहे."
इकडे प्रिया आणि हिराबाई दोघींनी तो ग्रंथ शोधून काढला. त्यात बंद असलेले राणी अवंतिका बाहेर आल्यावर तिला मारायचे रहस्य त्यांनी वाचले. गजगामिनीने एक दिव्य हत्यार सिद्ध केले होते. ज्यात त्या काळातील अकरा सर्वश्रेष्ठ योध्यांची शक्ती होती. ते अस्त्र आता उत्तर भारतातील एका गुप्त मंदिरात ठेवले होते.
गजगमिनीदेवींच्या वंशातील नवलक्षणे असणारा पुरुषच ते अस्त्र सिद्ध करू शकत होता.
हिराबाई म्हणाल्या,"प्रिया,विनय हे अस्त्र घेऊन येण्यास योग्य पुरुष आहे. परंतु विभावरी त्याला जाऊ देणार नाही. अस्त्र इथे घेऊन येईल इतकी शक्ती माझ्याकडे आहे. तर मला जावे लागेल."
प्रिया घाबरली,"आजी तुम्ही नसाल तर वाड्याचे रक्षण कोण करेल? विभावरी सहज सगळ्यांना पकडू शकेल."
हिराबाई शांतपणे म्हणाल्या,"प्रिया,तुला चेटकीण जगातील स्त्रिया काहीच का करू शकत नाहीत? तू अनेकदा ग्रंथ शोधायला धोकादायक जागेवर गेली आहेस."
प्रिया म्हणाली,"आजी हे तुम्हाला कसे ठाऊक?"
हिराबाई म्हणाल्या,"सगळी उत्तर तुला मिळतील. परंतु सध्या तुला इथे लढायचे आहे."
असे म्हणून प्रियाच्या हाती एक ग्रंथ देऊन हिराबाई म्हणाल्या,"मी उद्या निघते."
विभावरी बैचेन झाली. तिला तिसरी चावी हवी होती. त्याकरिता वाड्यातील आताच्या पिढीतील लक्षण असलेले पुरुष कोण आहेत? याची माहिती असायला हवी.
तेवढ्यात तिक्षिता आली,"विभावरी तुझ्या प्रश्नांची उत्तरे मी मिळवून ठेवली आहेत. त्या तीन पुरुषातील एकाला मारायचा प्रयत्न मी केला होता. त्यामुळे आता तो बाहेर पडणार नाही. इतर दोघांपैकी एक विनय आहे. तिसरा पुरुष मात्र मला माहित नाही."
विभावरी म्हणाली,"तू ज्याला मारायचा प्रयत्न केलास तोच सर्वाधिक कच्चा आहे. त्यालाच आपण पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न करू."
इकडे निशा आणि पार्वती बगारामचा शोध घेत पोहचल्या होत्या. बगाराम आता एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्ती झाला होता. त्याला गाठून माहिती मिळवणे आवश्यक होते.
हिराबाई अस्त्र आणू शकतील का? तिक्षिता कोण आहे?जयवंतचा बळी विभावरी देऊ शकेल का?
वाचत रहा.
भय इथले संपत नाही.
भय इथले संपत नाही.
