Login

भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 20

प्रियाच्या जन्माचे रहस्य उलगडणार आणि ह्या संघर्षात विजयाचा मार्ग गवसणार



भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 20

मागील भागात आपण पाहिले की प्रियाने तीन वृक्ष पुनरुज्जीवित केले. तिकडे तिक्षिता राणी अवंतिकाचे शरीर घेऊन गेली. प्रिया पूर्व दिशेला निघाली. आता पाहूया पुढे.


प्रिया पूर्व दिशेला जायला निघाली. वाटेत तिला असंख्य भास होत होते.

एका ठिकाणी एक हडळ छोट्या बाळाला खात होती. तिचे कराकरा वाजणारे दात आणि त्याचा आवाज येत होता.

अचानक ती हडळ वळली.तिचे रक्तबंबाळ तोंड आणि अर्धवट खाल्लेले बाळ पाहून प्रियाने ओरडुन डोळे झाकून घेतले.


इतक्यात तिला आवाज आला,"प्रिया बाळा डोळे उघड."

प्रियाने डोळे उघडले. तिला समोर तीच स्त्री दिसली जिने पहिला वृक्ष पुनरुज्जीवित करताना मार्गदर्शन केले होते.


प्रिया धावत तिच्याजवळ गेली,"तुम्ही कोण आहात? मला हे सगळे जमेल ना?"


त्यावर ती स्त्री शांत राहून म्हणाली,"प्रिया,काळया शक्ती आता तुला भ्रमित करण्याचा,घाबरवण्याचा प्रयत्न करतील.तुझे मनोबल कमी झाले तर त्या तुला संपवू शकतील. तेव्हा स्वतः वर विश्वास ठेवून पुढे जा."


प्रियाचे मन आता शांत झाले. तिने एकदा मनोमन प्रार्थना केली आणि पुढे निघाली.



तिक्षिता राणी अवंतिकाचे शरीर घेऊन गढीवर आली. विभावरी खुश झाली.

तिने सगळ्या तेरा चेटकीणीना सांगितले,"बरोबर दोन प्रहरा नंतर आपण राणी अवंतिकाला परत आणायचा विधी सुरू करु. त्याची सिद्धता करा."


विभावरी तिक्षिताला म्हणाली,"जा,तुझे मनोरथ पूर्ण कर."

तिक्षिताने कायाकल्प मंत्र जपला आणि अत्यंत सुंदर स्त्रीचे रूप धारण केले. त्यानंतर ती विनयला ठेवलेल्या कक्षात गेली. तिने मद्य भरले आणि विनय जवळ गेली.


विनयच्या डोळ्यांवर भ्रम निर्माण करून ती बोलू लागली,तुला तहान लागली आहे का?"


विनय म्हणाला,"हो,खूप तहान लागली आहे. पाणी मिळेल का?"


तिक्षिताने त्याला पाणी पाजले. मद्य प्राशन केल्यावर विनयच्या चितवृत्ती उत्तेजीत झाल्या. तिक्षिता विनयच्या सर्वांगावर हात फिरवू लागली. विनयचे पौरुष त्याच्या नियंत्रणात राहीना.


तिक्षिता त्याच्या जवळ गेली आणि ओठांवर ओठ टेकवत म्हणाली,"तुझा सहवास मला हवा आहे."


लवकरच दोघे धुंद प्रणयात हरवून गेले. परमोच्च बिंदू गाठून विनय शांत झोपला.


आता तिक्षिता सावध झाली. तिने बीजधारण विधी सुरू केला. आता तिला वेध लागले होते ते चेटकीण वंशात सर्व शक्तिशाली होण्याचे.



निशा सर्व शक्तिनिशी हिराबाईंचे रक्षण करत होती. हिराबाई साधनेतून बाहेर येताच विजयाचा मार्ग सापडणार होता. प्रिया आता मन स्थिर करून पुढे निघाली.


इतक्यात तिला आवाज ऐकू आला,"वाचवा! वाचवा!"


तरीही प्रिया दुर्लक्ष करत चालत होती. तेवढ्यात परत आवाज आला,"मला मारू नका,सोडा जाऊ द्या."


प्रिया दचकली,हा तर उमाचा आवाज. प्रिया मागे फिरली पाहते तर समोर एक पिशाच्च उमाला पकडुन घेऊन चालला होता.

प्रिया धावत सुटली आणि अचानक तिला आपण अडकल्याची जाणीव झाली. तो पिशाच्च मागे वळला.


त्याचे लाल उग्र डोळे रोखत म्हणाला,"अखेर फसलीस तू. आता तुला मारून मी सगळी सैतानी ताकद आत आणणार."


असे म्हणून तो मृत्यू मंत्र जपू लागला.प्रियाला तिचा शेवट दिसू लागला.


आता आपले कार्य अपुरे राहणार. विनय मला माफ कर. असे म्हणून प्रियाने डोळे बंद केले.


इतक्यात समोर प्रचंड ज्वाला भडकली आणि पिशाच्च जळून खाक झाला. अज्ञात शक्तींनी प्रियाला पुन्हा एकदा वाचवले होते.


प्रियाने पूर्व दिशेच्या पवित्र वृक्षाला पुनरुज्जीवित केले. आता संरक्षण कवच पूर्ण झाले होते. प्रिया घाईने वाड्याकडे जायला निघाली. आता घाई करायला हवी विनयला वाचवायला हवे.


इतक्यात तिला ती स्त्री पुन्हा दिसली.


प्रिया तिला म्हणाली,"कोण आहात तुम्ही? माझी मदत का करताय?"


ती स्त्री बोलू लागली,"प्रिया,महानंदा देवी आणि गजगमिनीदेवी दोघींनी काळया शक्ती रोखायला काही योद्धे तयार केले. त्यातील आघाडीचे योद्धे होते निरंजन आणि वैदेही."


प्रिया म्हणाली,"हो,वाचले आहे सगळे. पण हजारो वर्षांपूर्वी जन्मलेले निरंजन माझे बाबा कसे काय?"


त्यावर ती स्त्री पुन्हा बोलू लागली,"प्रिया,मी आणि निरंजन अमर आहोत. काही सिद्धी आम्हाला प्राप्त आहेत."


प्रिया आश्चर्याने म्हणाली,"म्हणजे?तुम्ही वैदेही आहात तर?मग निरंजन कुठे आहेत?"


वैदेही बोलू लागली,"मला आणि निरंजनला आमचा आत्मा दुसऱ्या गर्भात प्रवेशित करायची सिद्धी प्राप्त आहे. त्यामुळे आम्ही कायम अमर आहोत.


सगुणाबाई आणि त्यांच्या वाड्यावर विभावरी नावाचे वादळ धडकले तेव्हा आम्ही दोघांनी तिला कैद केले. त्यानंतर आम्ही अनेक शरीरे बदलली. हिराबाई सरदेसाई घराण्यात सून म्हणून आल्या आणि त्याचवेळी त्यांच्या घराण्यावर आणखी एक संकट आले.

तेव्हा आम्ही पुन्हा मदतीला जायला निघालो. ह्यावेळी संकट घरातून होते."


वैदेही गप्प झालेली पाहून प्रिया म्हणाली,"घरातून? कसे काय?"


तेव्हा वैदेही म्हणाली," हिराबाईंच्या सासऱ्यांची बहीण सुवर्णलता हिला घराण्यातील शक्ती प्रत्येक पिढीत फक्त एका सुनेला मिळतात हे मान्य नव्हते.


मुली घरातील रक्ताच्या आहेत तेव्हा हा हक्क घरातील मुलींना हवा असे तिला वाटायचे. त्यातून सुवर्णलताने साधना सुरू केली.


हळूहळू तिला तंत्र साधनेचे आकर्षण वाटू लागले. नकळत तिचे मन काळया शक्तिंकडे ओढले जाऊ लागले. सुवर्णलताची ताकद वाढू लागली. तिला आता सर्व शक्तिमान व्हायचे होते.


त्याकरिता तिने अकरा कुमरिकांचे बळी द्यायचा विधी योजला. दुर्दैवाने तिच्या भावाने तो ओळखला आणि सुवर्णलताला गावाबाहेर हाकलून दिले.


घराण्याचे संरक्षक कवच काढून घेतले. सुवर्णलताने अघोरी साधना केली आणि तिने सरदेसाई घराण्याचा वंश संपवायचे ठरवले.


ह्याच सुवर्णलताचा बंदोबस्त करायला आम्हाला बोलावले गेले.


सुवर्णलताने अघोरी आणि चेटकीण वंश अशी दुहेरी साधना केली.

तिने अनेक विचित्र सिद्धी प्राप्त केल्या. आता तिला वाड्यावर सत्ता हवी होती. हिराबाईंच्या मोठ्या जाऊबाई गरोदर होत्या. त्यांचा आणि गर्भातील बाळाचा बळी द्यायचा आणि त्यानंतर सरदेसाई घराण्यातील प्राचीन शक्ती आपल्याला प्राप्त करून घ्यायच्या अशी अघोरी योजना तिने आखली.


वाड्याच्या भोवती काळया शक्तींचा फास आवळला जाऊ लागला. त्याचवेळी दिव्य शक्ती हिराबाईंना संकेत देऊ लागल्या.


पुढे काय झाले असेल? ह्याचा प्रियाच्या जन्माशी आणि आता चालू असलेल्या संघर्षाशी काय संबंध असेल?

वाचत रहा.
भय इथले संपत नाही.
©® प्रशांत कुंजीर

0

🎭 Series Post

View all