भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 7
मागील भागात आपण पाहिले अवंतिका शशी आणि समुद्रवीर दोघांनाही अपहरण करून घेऊन गेली.त्याचवेळी गजगमिनीदेवी आणि नंदिनी देविनी सगळा डाव ओळखला आणि लढायची तयारी केली.पण पुढे काय झाले हेच शिलालेखात नव्हते.पुढची गोष्ट गायब होती.अवंतीकाचे पुढे काय झाले? ह्या सगळ्यांचा प्रियाशी काय संबंध असेल?
प्रिया थांबली.सगळेजण अवाक झाले.ह्या गोष्टीत पुढे काय झाले असेल? मंदिरावरील सगळे फोटो आपण काढून आणलेत.मग पुढे काय घडले कसे कळणार?
असे विचार सगळ्यांचा डोक्यात घोंगावत असताना रखमा आली.
विनय म्हणाला,"जेवणाची तयारी झाली का?"
तसे तिने होकारार्थी मान डोलावली.
उमा म्हणाली,"चला,जेवून घेऊ."
सगळेजण जेवायला उठले.अचानक प्रियाच्या कानात कुजबुज झाली,"आज रात्री उत्तर मिळेल फक्त जागी रहा."
प्रियाला आजूबाजूला कोणी दिसत नव्हते.पण आवाज स्पष्ट ऐकू आला होता.प्रियाने ठरवले आज रात्री ह्या सगळ्याचा शोध घ्यायचा.
सगळेजण जेवण करत असताना गप्प होते.जेवण झाले.विनय म्हणाला,"चला,आता निवांत शेतावर फिरू. काल आपल्याला वेळच मिळाला नव्हता."
दूरवर पसरलेले बागायती शेती. विविध प्रकारची पिके गायी, गुरे आणि सुंदर हिरवा रंग.मन निसर्गाच्या सान्निध्यात सगळे विसरून जाते.फिरताना उमा आणि विनय शेताची माहिती देत होते.
इतक्यात निशाची नजर एका विशिष्ट शिळेवर पडली.त्या आजूबाजूला भरपूर शेंदूर लावलेले देव दिसत होते.
निशा विनयला म्हणाली,"हे कसले देव आहेत?"
त्यावर उमा म्हणाली,"अग हे बांधावर म्हसोबा म्हणून पुजले जातात."
त्यावर निशा म्हणाली,"मला हे आकार वेगळे वाटतात."
प्रियाने जवळ जाऊन पाहिले तिलाही वेगळे जाणवले.परंतु शेंदुराचे थर असल्याने नक्की आकार कळत नव्हता.
भरपूर फिरून झाल्यावर चारच्या सुमारास सगळे परत आले.
उमा म्हणाली,"मस्त भजी आणि चहा घेऊ ग."
तेवढ्यात स्वातीने कॅमेरा काढला,"ये आपण जरा फोटो काढुया."
अरुणा लगेच म्हणाली,"रखमा,तुझा एक फोटो काढू का?"
त्यावर रखमा म्हणाली,"नग,तुमचं चालून द्या."
स्वाती वेगवेगळ्या अँगलने फोटो घेत होती.प्रियाच्या डोक्यात मात्र आज रात्री काहीही झाले तरी झोपायचे नाही. हाच विचार सतत घोळत होता.
संध्याकाळी सगळे वाड्यावर आले.आता निशा सावध झाली तिने प्रियाला बाजूला घेतले,"आज रात्री आपल्याला जागे रहावे लागेल.तरच आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील."
जेवण झाल्यावर सगळे झोपायला निघाले.प्रिया आणि निशाने कानात हेडफोन लावून गाणी ऐकायला घेतली.बरोबर रात्री दहा वाजता ते मंत्र वाड्यात घुमू लागले.हळूहळू झोपेचा अंमल सगळ्यांवर चढू लागला.
प्रिया आणि निशा दोघीही सावध होत्या. रखमााने दिलेले दूध त्यांनी न पिता ओतून दिले होते.निशाने खुणावताच दोघी खोलीतून बाहेर पडल्या.मंत्र ध्वनी चालूच होते.
इतक्यात प्रियाला आवाज आला,"स्वयंपाकघरात तळघराच दार आहे."
प्रिया दचकली.तिने निशाला मागे यायला सांगितले.दोघी हळूच स्वयंपाकघरात आल्या.प्रिया काळजीपूर्वक सगळीकडे पहात होती.अत्याधुनिक सोयी असल्या तरी पाटा आणि वरवंटा जागेवरच होते.
प्रियाने ओळखले.तिने जाऊन पाटा.उचलताच भिंतीतील दार उघडले.
प्रिया आणि निशा आत पाऊल ठेवणार इतक्यात,"थांबा,आत जाऊ नका."
दोघीनी मागे पाहिले.हिराबाई समोर उभ्या होत्या.त्यांनी इशारा करताच दोघी मागे चालू लागल्या.हिराबाई त्यांना एका गुप्त दालनात घेऊन गेल्या.
निशा आणि प्रिया मनातून घाबरल्या होत्या.नक्की कोणावर विश्वास ठेवायचा?
हिराबाई म्हणाल्या,"आता तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे.आजवर मंदिरावर कोरलेली गोष्ट कोणीही वाचू शकले नाही.कारण ती लिपी वाचता येणारे कोणीच इथवर पोहोचले नव्हते.विनयने प्रयत्न करूनही त्याला फोटो बाहेर नेता आले नाहीत.प्रिया,तू पुरातत्व शास्त्रज्ञ आहेस.त्यामुळे मंदिर कोणाचे आहे याची कल्पना तुला आली असेलच."
प्रिया म्हणाली,"हो,हे मंदिर कोणत्याही देवतेचे नाही.ते साधनेचे ठिकाण होते.त्या मूर्ती गजगामिनी, नंदिनीदेवी आणि राज परिवरातील आहेत."
त्यानंतर निशाकडे वळून त्या बोलू लागल्या,"तू योद्धा आहेस हे पहिल्याच दिवशी ओळखले होते.परंतु तुझ्या शक्ती पूर्ण जागृत नाहीत.त्यामुळे मी निश्चिंत होते."
निशा म्हणाली,"पण असे काय रहस्य आहे?नक्की काय लपवले जात आहे?"
हिराबाई बोलू लागल्या,"तुम्ही जिथंवर कथा वाचली त्यापुढे काय झाले?ह्याचा शोध आमचे घराणे गेली अनेक शतके घेत आहे.फक्त त्या घटनेनंतर राणी अवंतिका आणि तिच्या दासी कोणालाही दिसल्या नाहीत. समुद्रविर आणि शशीवर्मन दोघेही वाचले.परंतु त्यानंतर गजगामिनी देवीनी हे मंदिर उभारले.त्यांचेच आम्ही वंशज आहोत.माझ्याकडे अनेक शक्ती असूनही मी हे रहस्य सोडवू शकले नाही.कारण तळघरात उत्तराच्या शोधात गेलेले आजवर कधीच परत आले नाहीत.जे परत आले त्यांना काहीही सांगता आले नाही."
प्रिया म्हणाली,"आजी,तुमच्याकडे काही पारंपरिक ग्रंथ, अस्त्र काहीतरी नक्की असणार.जे तुम्हाला आठवत नाहीय."
त्यावर हिराबाई म्हणाल्या,"प्रिया,हे ग्रंथ लिहिलेली लिपी.दुर्दैवाने आज आम्हाला वाचता येत नाही.आमच्या घराण्यातील प्रत्येक पिढीत एका कर्तबगार सुनेला ह्या शक्ती प्राप्त होतात.आम्ही त्याच्या जोरावर थोपवून धरतो अनिष्ट शक्तींना."
त्यावर निशा म्हणाली,"मग गावाबाहेर असलेली ती गढी,पार्वती.हे सगळे काय आहे?"
हिराबाई उदास हसत म्हणाल्या,"पार्वती चेटकीण आहे.परंतु त्या पंथात सुद्धा काही परोपकारी स्त्रिया असतात.त्यातील ती एक आहे. गढीचे गूढ मात्र मला सांगता येणार नाही."
प्रिया म्हणाली,"ह्या ग्रंथांत नक्की काहीतरी उत्तर असेलच.फक्त ते आपल्याला शोधावे लागेल."
प्रिया बोलत असताना अचानक वाड्याभोवती काळया सावल्या घोंघावू लागल्या.प्रचंड उदास आणि नकारात्मक वातावरण निर्माण झाले.
हिराबाई म्हणाल्या,"हे सगळ कोणाच्या दृष्टीस पडू नये म्हणून रोज रात्री दूध आणि ते मंत्र ऐकवले जातात.त्यानंतर आमचे राखणदार ह्या सावल्याना रोखून धरतात."
प्रियाने ते प्राचीन ग्रंथ भांडार शोधायला सुरुवात केली.भूर्जपत्र आणि ताम्रपट यावर लिहिलेल्या प्राचीन तंत्रसाधना त्यात लिहिलेल्या होत्या.काही ग्रंथांत तत्कालीन जीवन,राज्य पद्धती याबाबत माहिती होती.असे ग्रंथ शोधत असताना अचानक निशाची नजर एका गाठोड्यावर गेली.
तिने हिराबाईंना विचारले,"यात काय आहे?"
हिराबाई म्हणाल्या,"नाही सांगता येणार.कितीतरी वर्ष हे बंदिस्त आहे."
प्रियाने पुढे होऊन गाठोडे सोडले.त्यामध्ये एक पेटी होती.पेटीवर लिहिलेला मंत्र वाचताच पेटी उघडली.त्यामध्ये एक विशिष्ट चिन्ह असलेली चावी होती.प्रियाने चावी हिराबाईना दाखवली.इतक्यात बाहेरच्या सावल्या अधिक गडद होऊ लागल्या.
हिराबाई म्हणाल्या,"आता मला ध्यान लावले पाहिजे.ही चावी घेऊन बाहेर पडा.आपण उद्या बोलू."
प्रिया आणि निशा खोलीत येऊन झोपी गेल्या.
कशाची चावी असेल ती? तळघरात नक्की काय असेल? राणी अवंतिका कुठे गायब झाली असेल.
वाचत रहा
भय इथले संपत नाही
भय इथले संपत नाही
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा