Login

भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 8

एका नव्या थरारक पाठलागाची सुरुवात.



भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 8

मागील भागात आपण पाहिले.अपुरी असलेली गोष्ट शोधायची म्हणून बाहेर पडलेल्या निशा आणि प्रियाला एक वेगळे सत्य समजले.सापडलेली चावी नेमकी कशाची असेल?अवंतिका कुठे गायब झाली असेल?


निशा आणि प्रिया रात्रीच्या शोधाशोधीत दमून बराच वेळ झोपल्या होत्या. इकडे स्वातीने लॅपटॉप उघडला. कॅमेऱ्याची डाटा केबल जोडली.कालचे फोटो उघडले आणि स्वाती किंचाळली.इतक्या जोरात की निशा आणि प्रिया खडबडून जाग्या झाल्या. उमाने स्वातीच्या तोंडावर हात ठेवला.

प्रियाने विचारले,"काय झाले?कशाला ओरडली?"

स्वाती घामाघूम होऊन फक्त लॅपटॉपकडे बोट दाखवत होती.स्वाती शांत झाल्याची खात्री झाल्यावर उमाने हात बाजूला केला.प्रियाने स्क्रीनवर पाहिले.प्रत्येक फोटोत मागे एक सावली दिसत होती.अगदी स्पष्ट.सावलीत सुद्धा तिचा कमनीय बांधा,रुळणारे केस जाणवत होते.

स्वाती म्हणाली,"समजले,मी का?"

अरुणा म्हणाली,"उमा,आम्ही परत जातोय.आजच.मला नाही थांबायचे."

निशा शांतपणे म्हणाली,"आपण आता इथून उत्सव झाल्याशिवाय जाऊ शकत नाही.आपल्याला जाऊ दिले जाणार नाही."

स्वाती म्हणाली,"गप निशा.आम्ही जाणार.इकडे उद्या काही झाले तरी."

इतक्यात हिराबाई आत आल्या.त्यांना बघून सगळ्या गप्प झाल्या.


हिराबाई आत आल्या,"मुलींनो आता तुम्हाला सगळे सांगायची वेळ आली आहे.ह्या वाड्याभोवती एक पाश आहे.जो काही साध्य करायला आसुसला आहे.आजवर ह्या सावल्या कधीही कोणाला दिसल्या नाहीत.तुम्ही त्यांना पाहू शकलात.त्यामुळे आता तुम्हाला इथून बाहेर पडणे धोक्याचे आहे."

निशा पुढे बोलू लागली,"काल आम्ही एक संदुक शोधली.त्यात ही चावी सापडली आहे."

निशाने.चावी दाखवताच उमा ओरडली,"आजी,असेच सेम चित्र देवघरात भिंतीवर आहे."

उमाचे वाक्य ऐकून हिराबाई चमकल्या,"अगदी बरोबर.पण आता लगेच आपण तिथे जायला नको.दुपारी घरात कोणी नसताना जाऊ."



त्यानंतर सगळे उत्सवाची तयारी करायला गेले.घरात फक्त ह्या पाच मुली आणि हिराबाई होत्या.मुलींना घेऊन हिराबाई देवघरात आल्या.त्यांनी तो खांब दाखवला.त्यावर चावीचे चित्र कोरलेले होते.निशाने चावी घेतली आणि चित्रावर ठेवली.त्याबरोबर चावी आत गेली आणि देव्हाऱ्या मागे असलेल्या भिंतीतला गुप्त दरवाजा उघडला.

प्रिया म्हणाली,"आपल्या प्रश्नांची उत्तरे इथे असू शकतील."

निशा पुढे झाली,"चला,आत जाऊन पाहूया."

हिराबाई म्हणाल्या,"थांबा,हे रक्षा कवच सगळ्यांनी जवळ ठेवा.आत काय आहे आपल्याला माहीत नाही."

सगळेजण आत असले.तिथे काही प्राचीन मूर्ती,सोने नाणे होते.सगळ्याजणी हे पहात असताना अचानक उमा ओरडली,"प्रिया,तिकडे बघ, चावीचे चित्र."

सगळ्यांनी तिकडे पाहिले.एका सुंदर पुरुष मूर्तीच्या छातीवर हे चित्र कोरलेले होते.प्रियाने ती चावी मूर्तीच्या छातीवर ठेवली.त्याबरोबर मूर्तीचा पोटाचा भाग उघडला गेला.आत भूर्जपत्रे सापडली.प्रियाने काळजीपूर्वक ती बाहेर काढली.पुन्हा दरवाजा बंद करून सगळ्या बाहेर आल्या.


प्रियाने थरथरत्या हाताने ते भूर्जपत्र उघडले आणि आनंदाने उडी मारली,"आजी,गोष्टीचा पुढचा भाग इथे आहे.आता आपल्याला सगळी उत्तरे मिळतील."

स्वाती म्हणाली,"अग वाच ना.काय झाले आहे पुढे?"

प्रिया वाचू लागली,"गजगमिनिदेवी आणि त्यांच्या शिष्य मंडळींनी तो भयानक विधी थांबवला. समुद्रावीर आणि शशीवर्मन बेशुद्ध होते.इकडे एका ठिकाणचा विधी थांबतच बाकी अकरा ठिकाणी चाललेले विधी थांबले.त्या अकरा चेटकीणी आणि स्वतः महामाया तिथे प्रकट झाली.

महामाया चिडली,"आता कोणीही आम्हाला रोखू शकणार नाही.आम्ही अमर होणार."

परंतु नंदिनिदेवी आणि गजगमिनी पूर्ण तयारीने आल्या होत्या. बारा सिद्ध पुरुषांनी सिद्ध केलेले मंत्र जपायला सुरुवात झाली.एकेक चेटकीण मूर्तीत कैद होऊ लागली.परंतु जाताना महामाया आणि अवंतिका शापवाणी उच्चारून गेल्या.आम्ही परत येऊ.तोपर्यंत काळया सावल्या तुम्हाला सुखाने जगू देणार नाहीत कधीच.


इकडे शशी आणि समुद्र नंतर शुद्धीवर आले.त्यानंतर त्या सर्व मूर्ती सुरक्षित ठिकाणी लपवल्या गेल्या.आजही अवंतिका धडपडत आहे पुन्हा ह्या जगात येण्यासाठी."

प्रिया हे वाचून थांबणार इतक्यात तिला खाली आणखी एक भर्जपत्र दिसले.त्यावर काही चिन्हे कोरलेली होती.खाली एक संदेश लिहिलेला होता.

अरुणा हसली,"चला,एक बरे झाले राणी अवंतिका कैद आहे.म्हणजे आपल्याला घाबरायचे कारण नाही."

तेव्हा हिराबाई म्हणाल्या,"तसे नाही मुलींनो,आजही चेटकीण समुदायातील स्त्रिया महामाया आणि अवंतिकेला सोडवायचा प्रयत्न करत आहेत.अनेकदा त्यापायी निष्पाप तरुणींचे बळी गेले आहेत.आमच्या घराण्यातील प्रत्येक पिढीत एक अधुरी प्रेम कहाणी आहे.ज्यात नायिका क्रूर पद्धतीने मारली गेली."


इतके बोलून हिराबाई थांबल्या.तेवढ्यात निशा म्हणाली,"स्वाती ह्या सगळ्यांचे फोटो काढून घे."


स्वाती फोटो काढत असताना रखमा आली,"आईसाब,जेवण तयार हाय."

सगळ्याजणी आता भुकेल्या होत्या.रखमा म्हणाली,"चला लवकर,गरम गरम वाडते म्या."

हिराबाई जेवायला बसल्या.सगळ्याजणी ते चविष्ट जेवण खात होत्या.थोड्या वेळाने आपापल्या खोलीत जाऊन पडताच सगळ्याजणी गाढ झोपी गेल्या.इकडे संध्याकाळी बाहेर गेलेली मंडळी परत आली.वाड्यावर अंधार पाहून विनय साशंक झाला.


आजी ह्यावेळी कुठे गेली असेल? वाड्यावरचे सेवक कुठे आहेत? विनय गाडीतून उतरल्यावर पळतच वाड्याच्या प्रवेशद्वारावर गेला.तिथे कोणीही नव्हते.इतक्यात त्याचे लक्ष वॉचमनच्या केबिनमध्ये गेले.

तिथे वॉचमन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.त्याची मान पिरगळून मोडलेली होती. विनयने धावत जाऊन तिथले स्वयंचलित बटन दाबले.दरवाजा उघडला.

विनय धावत आत शिरला,"आजी,उमा!कुठे आहात तुम्ही?रखमा,धोंडीबा लवकर या."


त्याच्या आवाजाला कोणीही प्रतिसाद दिला नाही.विनय धावत आजीच्या खोलीत गेला.हिराबाई गाढ झोपल्या होत्या.

त्याने आजीला हलवले,"आजी,उठ लवकर.काय झाले तुला?"


हिराबाई हळूहळू जाग्या झाल्या.विनयला समोर पाहताच त्या म्हणाल्या,"विनय अरे तू संध्याकाळी येणार होतास ना?दुपारीच कसा आलास?"

विनयने घड्याळाकडे बोट दाखवले.संध्याकाळचे सात वाजले होते.

हिराबाई ताडकन उठल्या,"विनय,तू रखमाला शोध.मी मुलींना पाहते."


ओरडतच त्या खोलीबाहेर पडल्या.अक्षरशः धावत त्यांनी मुलींची खोली गाठली.सर्व मुली झोपलेल्या पाहून त्या थोड्या शांत झाल्या.


विनय वाड्याच्या मागे आला.त्याने पाहिले तर तिथले दोन पहारेकरी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.तो धावत रखमाच्या खोलीजवळ आला.दरवाजा बाहेरून बंद होता. विनयने दरवाजा उघडला.


आत फक्त एक मोठी पेटी होती.संपूर्ण रिकामी खोली पाहून तो हबकला.इतक्यात कोणीतरी कण्हत असल्याचा आवाज येऊ लागला.विनयने कानोसा घेतला.आवाज पेटीतून येत होता.त्याने रि्हॉल्व्हर काढले. कुलुपावर गोळी झाडताच ती पेटी खटकन उघडली.आत रक्तबंबाळ धोंडीबा होता.



इकडे गावाबाहेरच्या पडक्या गढीबाहेर ती थांबली.कंबरेपर्यंत रुळणारी वेणी असलेली ती युवती आत जाताच गढी अगदी नवी दिसू लागली.

हातातली भूर्जपत्र पहात ती ओरडली,"आता राणी अवंतिका परत येईल. चेटकीण समुदायातील स्त्रिया अमर होतील."

ती हसत राहिली आणि तो भयानक आवाज घुमत राहिला.


रखमा कुठे गेली? ती युवती कोण असेल?काय होईल पुढे.
वाचत रहा
भय इथले संपत नाही
0

🎭 Series Post

View all