भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 9
मागील भागात आपण पाहिले,रखमा गायब झाली.धोंडीबा पेटीत सापडला.पहारेकरी मारले गेले.हे सगळे काय असेल?
आता हिराबाई जरा चिंतेत पडल्या.जयवंतरावाना अपघात झाला तेव्हाच त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती.त्यांनी धावत पळत मुलींची खोली गाठली.मुली शांत झोपलेल्या व सुरक्षित होत्या.त्यांनी घाईने सगळ्या मुलींना जागे केले.आपण संपूर्ण दुपार झोपून होतो.हेच मुलींना धक्कादायक वाटत होते.
तेवढ्यात उमा म्हणाली,"आजी,तू सुद्धा झोपून होतीस?कसे शक्य आहे?"
हिराबाई बोलणार इतक्यात खालून विनय ओरडला,"आजी,लवकर खाली ये.दादाला आणि वहिनीला फोन कर."
सगळ्यांनी जवळपास धावतच खाली आल्या.अर्धवट ग्लानीत आणि जखमी असलेल्या धोंडीबाला विनयने खाली झोपवले.
उमाकडे वळत म्हणाला,"दादाला फोन करून सांग.आहे तिथेच थांब.अजिबात बाहेर पडू नकोस."
उमाने फोन लावला तोवर उशीर झाला होता.भाऊ आणि वहिनी घराबाहेर पडले होते.
हे ऐकताच हिराबाई म्हणाल्या,"विनय,इथे थांबा.निशा माझ्याबरोबर चल.धोंडीबा शुद्धीवर आल्यावर आपल्याला कळेल."
इतके बोलून त्या वेगाने निशाला घेऊन बाहेर पडल्या.
प्रिया आता सावध झाली.ती ताबडतोब धावत खोलीत गेली. प्रियाचा अंदाज बरोबर होता.शेवटचे भूर्जपत्र गायब होते.त्यातील चिन्हे आणि मजकूर नंतर वाचू असे म्हणून ठेवून दिला होता.
इकडे हिराबाई बाहेर आल्यावर निशाला म्हणाल्या,"आता योद्धा रूप घ्यायची वेळ आली आहे. चेटकीणी जयवंत आणि विनायक पर्यंत पोहोचायच्या आत आपल्याला त्यांना इथे घेऊन यावे लागेल."
निशाने लगेच मंत्र म्हणायला सुरुवात केली.सर्व आयुधे घेऊन दोघी निघाल्या.तरीही निशाच्या मनात काही प्रश्न होते.इतक्यात गाडीसमोर एक स्त्री आल्याने हिराबाई थांबल्या.निशाने पाहिले तर पार्वती समोर उभी होती.हिराबाई काही बोलणार तेवढ्यात तिने जुन्या गढीकडे बोट दाखवले.हिराबाई शांत बसल्या.पार्वती गाडीत बसल्यावर गाडी सुरू झाली.
निशा काही बोलायच्या आत पार्वती म्हणाली,"ही गढी म्हणजे सरदेसाई वाड्यातून चेटकीण पंथाला मिळालेलं पाठबळ.शंभर वर्षांपूर्वी एक चेटकीण सरदेसाई घरात प्रवेश करण्यात यशस्वी झाली."
हिराबाई शांतपणे म्हणाल्या,"आधी जयवंत आणि विनायक दोघांना वाचवायला हवे."
पार्वती म्हणाली,"जयवंत भोवती सुरक्षा कवच आहे.तुम्ही नाकारलं तरी मी माझे प्रेम विसरले नाहीय."
निशा म्हणाली,"मग विनायक आणि वहिनींना आधी वाचवायला हवे."
गाडी वेगात धावत होती.इकडे रखमा आपल्या मूळ रूपात आली होती.समोरच्या आरशात एक अत्यंत सुंदर परंतु क्रूर युवती होती.लाल डोळे तिचे रूप भयानक बनवत होते.
ती क्रूर हास्य करत ओरडली,"राणी अवंतिका,मी तुमची सेविका तीक्षिता.तुम्हाला परत ह्या जगात घेऊन येईल लवकरच.त्या आधी जयवंतचे आयुष्य संपविणार."
ती बाहेर पडली.आता तिचे रूपांतर एका सामान्य स्त्रीमध्ये झाले होते.तिने वायुगमन मंत्र म्हंटला.जयवंत दाखल असलेल्या दवाखान्यात ती आली.परंतु तिला वार करता येईना.कोणीतरी अदृश्य कवच तिथे तिला थांबवत होते.तीक्षिता ध्यान लावून बसली.कोणीतरी शक्तिशाली चेटकीण जयवंतची रक्षा करत होती.जयवंत नसेल तर विनायक बाहेर आहे.त्याला संपवू. तीक्षीता आता विनायक कडे झेपावत होती.
इकडे पार्वती आणि हिराबाई सुद्धा तयार होत्या.त्यांनी वायुगमन मंत्र जपला.त्याक्षणी त्या विनायक जवळ येऊन पोहचल्या.
तीक्षीता समोर उभी असलेली पाहून विनायकने गाडी थांबवली.तो गाडीतून उतरणार इतक्यात त्याला विनयने केलेला मॅसेज आठवला,"काहीही झाले तरी गाडीतून उतरू नकोस."
विनायक हॉर्न वाजवू लागला.इतक्यात तीक्षिताने तिथूनच मंत्र म्हंटला आणि गाडी हवेत उचलली गेली.
तीक्षिता क्रूर आवाजात म्हणाली,"आज तुला कोणीच वाचवू शकत नाही.तुला मारून तुझ्या शरीरावर असलेली पहिली चावी मला मिळेल."
असे म्हणून तीक्षिता वार करू लागली.परंतु तिचा वार रोखला गेला.
हिराबाई तिच्या समोर उभ्या होत्या,"काळया शक्ती कधीच जिंकणार नाहीत.तू परत जा.नाहीतर तुझी अवस्था."
त्यावर ती क्रूर हसत म्हणाली,"विभावरी आणि मी यात मोठा फरक आहे हिरा."
इतक्यात पार्वती आणि निशाने बंधन मंत्र जपला.परंतु त्यातून तीक्षिता सहज बाहेर आली.तिने एका झटक्यात विनायकला बाहेर काढले.
आता विनायकचा जीव धोक्यात होता.पार्वतीने काळया जादुतील मंत्र म्हंटला त्याबरोबर तीक्षिता दूर फेकली गेली.हीच संधी साधून हिराबाई पुढे झाल्या.त्यांनी पवित्र जल बाहेर काढले.ते पाहताच तीक्षिता अदृश्य झाली.
क्रूर हास्य करत म्हणाली,"काहीही झाले तरी राणी अवंतिका बाहेर येणार.विभावरीचे राहीलेले काम मी पुरे करणार.पार्वती तुला सोडणार नाही.चेटकीण वंशाची गुन्हेगार आहेस तू."
एवढे बोलून ती गायब झाली.हिराबाई लगेच विनायक आणि सूनबाई यांना घेऊन निघाल्या.जयवंत शुद्धीवर आला.त्याला आपण हॉस्पिटलमध्ये आहोत हे पाहून धक्का बसला.
त्याने नर्सकडे चौकशी केली,"मला इथे कोणी आणले?माझ्या घरचे कुठे आहेत?"
नर्स म्हणाली,"तुम्हाला एक मुलगा हॉस्पिटलच्या दारात सोडून गेला.तुमच्या गाडीचा अपघात झाला होता.गेले चार दिवस तुम्ही बेशुद्ध होतात."
आता जयवंतला आठवले ऑफिसची मीटिंग आटोपून घरी येताना रस्त्यात अचानक त्याची गाडी बंद पडली.त्यानंतर एक थंड वाऱ्याची झुळूक आणि गाडी परत सुरू झाली.त्यानंतर मात्र काहीच आठवत नव्हते.
हिराबाई डॉक्टर बरोबर बोलल्या.सुदैवाने काहीही झाले नव्हते.त्यांना इथे कोणी आणले हे मात्र समजले नाही.तेवढ्यात पार्वती जयवंतच्या खोलीत गेली.
तिला पाहताच जयवंत उठू लागला.ती जवळ गेली,"शांत पडून रहा.काही होणार नाही तुम्हाला."
एवढे बोलून ती डोळ्यातले पाणी लपवत बाहेर आली.हिराबाई डॉक्टरांना सगळ्या सूचना देऊन घरी निघाल्या.धोंडीबा आता शुद्धीत आला.
सगळ्यांना पाहून तो ओरडू लागला,"मालक,मला वाचवा.चेटकीण,मालक मला वाचवा."
विनयने त्याला शांत केले.तेवढ्यात हिराबाई आणि निशा पोहचल्या.पार्वती आजही देसाई वाड्यात आली नाही.
धोंडिबा बोलू लागला,"माझी रखमा मेली साहेब.त्या चेटकीण बाईने मारलं तिला."
हिराबाई म्हणाल्या,"धोंडीबा शांत हो.मलासुद्धा ओळखता आले नाही."
प्रिया म्हणाली,"धोंडीबा तिने तुम्हाला काही सांगितले का?"
धोंडीबा म्हणाला,"न्हाय, पर ती सारखी चावी सापडलं आस म्हणायची.विनय साहेब पायजे आस पण बोलायची. माझं रगात घिऊन कायबाय मंत्र म्हणायची."
हिराबाई म्हणाल्या,"प्रिया,शेवटी सापडलेले भूर्जपत्र आहे ना?त्यात मिळेल काहीतरी."
उमा म्हणाली,"आजी,ते पान गायब आहे."
तेवढ्यात अरुणा ओरडली,"अरे ,आपण फोटो काढलेत की त्याचे."
हे आठवताच स्वाती पळत जाऊन कॅमेरा,लॅपटॉप सगळे घेऊन आली.
प्रिया वाचू लागली,"गजगामिनी देवीच्या प्रत्येक पिढीतील एका पुरुषाच्या अंगावर एक जन्मखूण असेल.त्या पुरुषाचा बळी दिला की एक चावी त्याच्या शरीरापासून बनेल.अशा तीन चाव्या तीन पिढीत असतील.एकावेळी तिन्ही पिढीतील पुरुष मारावे लागतील."
प्रिया थांबली.हिराबाई म्हणाल्या,"पुढची चिन्हे कशाची आहेत?"
प्रिया म्हणाली,"राणी अवंतिका कुठे आहे त्याचा नकाशा आहे."
मग हिराबाई बोलू लागल्या,"आजवर फक्त विभावरी आमच्या घरातील दोन पुरुष मारू शकली.पण तिलाही कैद केले."
निशा म्हणाली,"विभावरी,हेच नाव त्या चेटकीनीने घेतले.कोण आहे विभावरी?"
कोण असेल विभावरी? तीक्षिता आणि तिचा काय संबंध असेल?हे संकट आताही कोणाचे प्राण घेईल का?
वाचत रहा
भय इथले संपत नाही
भय इथले संपत नाही
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा