Login

भेट तुझी माझी पावसाळी

एकमेकांकडे आकर्षित तरुण आणि तरुणीची पहिली भेट
लघुकथा _
भेट तुझी माझी पावसाळी

संध्याकाळचे साडेपाच वाजले आणि ऑफिसमधील सर्वांचीच सर्व आवराआवर करून घरी परतण्याची लगबग सुरू झाली. नुकताच ऑफिसमधील महेश बाहेरून आला होता. तो सर्वांना उद्देशून म्हणाला,

"सर्वांनी अगदी लगेचच निघा कोणीही रेंगाळत बसू नका. बाहेर खूपच अंधारून आलं आहे. कधीही पाऊस कोसळायला सुरुवात होईल."

हे ऐकून मनालीला एकदम टेन्शन आले. आज नेमकी तिची सखी सुनीता तिच्या सोबतीला नव्हती आणि तिने छत्री पण बरोबर घेतली नव्हती. तिचा एक फंडा होता पावसाळ्यात घरून निघताना पाऊस असेल तरच ती छत्री घ्यायची. तिचं तत्व होतं उगाचच छत्रीचं जोखड सांभाळत बसायचं नाही. तसं पण तिचं पावसाशी जिव्हाळ्याचं नातं होतं. रिमझिम पावसात भिजायला तिला खूप आवडायचं. छत्री असली तरी ती उघडायची नाही. आज एकटीच असल्यामुळे पर्स उचलून ती पटकन बाहेर पडली. तिने विचार केला भरभर चालत गेलं तर पाऊस सुरू व्हायच्या आधी चर्चगेट स्टेशन गाठता येईल. अशा वेळी टॅक्सी मिळणं मुश्किल असतं. सहाच्या सुमारास इतका अंधार आणि सोसाट्याचा वारा सुटला होता.

ती निघाली जेमतेम फाऊंटन पर्यंत आली आणि जोराचा पाऊस आला. अक्षरशः कोसळायला लागला. ती पटकन एका दुकानाच्या आडोशाला थांबली. टपोरे थेंब बरसत होते. हळूहळू रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली. अरे बापरे हा असाच कोसळत राहिला तर सर्व वाहतूक ठप्प व्हायला वेळ लागणार नाही. घरचे काळजी करतील. त्यावेळी मोबाईल नव्हते. लँडलाइन फोन पण घरोघरी नवीनच होते. घरी फोन करायचा म्हटलं तरी सगळीकडे रांगा लागल्या होत्या. नोकरदार महिला ज्यांची लहान मुलं पाळणाघरात असतात त्या तर खूपच हवालदिल झाल्या. त्यांच्या चिमण्या पाखरांचे चेहरे डोळ्यासमोर येऊन त्यांचे डोळे भरून येत होते. अर्थात पाळणाघरातल्या मावशी अशा वेळी खूप काळजी घेतात मुलांची. त्यामुळेच नोकरी करणाऱ्या स्त्रिया बिनधास्त नोकरी करू शकतात. इतक्यात सगळीकडे मिट्ट अंधार झाला. सर्व लाइट्स बंद झाले आणि तिच्या कानावर बातमी आली की पूर्ण महाराष्ट्राचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. पूर्ववत होण्यास किती वेळ लागेल कोणास ठाऊक. कोसळणारा पाऊस, अंधार आणि तिच्या सोबतीला कोणीच नव्हते. ती एकटीच अनोळखी लोकांबरोबर उभी होती.

नाही म्हटलं तरी मनालीच्या मनात धाकधुक सुरू झाली होती. पावसामुळे वाहतूक विलंब अथवा पूर्ण ठप्प होणे मुंबईकरांसाठी नवीन नव्हतं. परंतु पूर्ण महाराष्ट्राचा वीजपुरवठा खंडित होणं पहिल्यांदाच घडत होतं. तिच्या पासून काही अंतरावर तो उभा होता. अचानक एक वीज चमकली आणि त्या प्रकाशात त्याने मनालीला पाहिलं. त्या एका क्षणात त्याने तिच्या चेहऱ्यावरील बावरलेले भाव टिपले. तो होता शेखर सबनीस. गेले दोन महिने शेखर आणि मनाली एकाच बसमधून जाता येता एकमेकांना पाहत होते. खरं तर दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले होते पण शेखरला वाटायचं तिच्याशी बोलायला गेलेलं तिला आवडेल की नाही म्हणून अजून तो तिच्याशी बोलला नव्हता. मनालीचा फंडा होता की अशा वेळी मुलाने पुढाकार घेऊन मुलीशी बोलावं.

शेखरने पाहिलं की मनाली एकटीच उभी आहे. म्हणून तो गर्दीतून छत्री सावरत तिच्याजवळ गेला आणि त्याने ' शुक शुक ' केलं. बावरलेल्या मनालीने त्याच्याकडे पाहिलं आणि कोणीतरी ओळखीचा चेहरा दिसला म्हणून तिला खूप बरं वाटलं. ती त्याच्याजवळ आली आणि त्याच्या छत्रीत गेली. त्याने तिला विचारले,

" तुम्हीं एकट्याच आहात का? मी तुमच्याबरोबर थांबलेले तुम्हाला चालेल ना?"

तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा तिला तिथे एक विश्वास आणि तुला घरी सुखरूप पोहोचवण्याची माझी जबाबदारी आहे एवढंच दिसलं. ती लगेच म्हणाली,

" ह्या प्रचंड गर्दीत तुम्हीच एक ओळखीचे दिसलात. माझी काही हरकत नाही."

मुंबईत एरव्ही किती जरी रोजची भांडणं, मारामाऱ्या झाल्या तरी अशा संकटसमयी सर्व मुंबईकर एक होतात. एकमेकांना मदत करतात. शेखरच्या मनात आलं इतके दिवस आपण जिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होतो ती संधी आज ह्या आस्मानी संकटाने दिली. शेखरला पहिल्याच भेटीत मनाली आवडली होती. निमगोरा वर्ण, कमनीय बांधा, बदामी डोळे, उजव्या गालावर पडणारी मोहक कळी. सगळ्यात सुंदर तिचे रेशमी सरळ मुलायम केस. शेखरचं व्यक्तिमत्व पण एकदम प्रभावी होतं. पावणेसहा फूट उंची, सावळा वर्ण, कोरीव दाढी, बोलके डोळे, भव्य कपाळावर भांग पाडलेले नागमोडी वळणाचे केस. एकंदरीत दोघेही एकमेकांना पाहत होते. शेखर म्हणाला,

" तुमचं नाव नाही सांगितलं अजून"

"तुम्ही विचारलं नाही अजून"

दोघेही हसायला लागले. दोघांनी एकमेकांचा परिचय करून घेतला.

"मला वाटतं आपण हळूहळू चालायला सुरूवात करूया. हा पाऊस थांबणार नाही. चालता चालता एखादी टॅक्सी मिळाली तर बघूया."

"हो काहीच हरकत नाही."

त्यावेळी ओला, उबरचा जमाना नव्हता. दोघेही नखशिखांत भिजले होते. मनाली तर कुडकुडत होती. एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जायचं म्हटलं तर मुंगी शिरायला जागा नव्हती. दोघे गर्दीतून वाट काढत छत्री सांभाळत चालले होते. मनाली त्याला म्हणाली,

"छत्री बंद करा. आपण ऑलरेडी भिजलो आहोत. मनसोक्त भिजत जाऊ."

"इथे थोडा पुढे एक कॉफीचा स्टॉल आहे. तिथे आपली काही वर्णी लागते का पाहू."

दोघे स्टॉल जवळ आले. तिथेही प्रचंड गर्दी होती. पण ह्या क्षणाला कॉफीची नितांत गरज होती.

"तुम्ही इथेच थांबा. मी गर्दीत घुसून कॉफी घेऊन येतो."

त्याने कशीबशी दोन कप कॉफी घेतली आणि हात उंच धरत ते दोन कागदी ग्लास सांभाळत तो तिच्याकडे येत होता. त्यातली थोडी कॉफी हिंदकळताना सांडत होती. तिच्यापर्यंत येईस्तो अर्धी कॉफी सांडली होती. दोघांनी काळोखातच एकमेकांकडे बघत कॉफीचा आस्वाद घेतला. खरं तर त्या कॉफीत थोडं तरी पावसाचे पाणी गेलं होतं तरीही त्या कॉफीची लज्जत आजपर्यंत अनेक वेळा प्यायलेल्या कॉफीपेक्षा कितीतरी पटीने जास्त होती. ही कॉफी दोघांनाही अमृततुल्य होती. इतर लोक विलक्षण तणावात असताना ते मात्र एकमेकांमध्ये रमून गेले होते. दोघांनाही एकमेकांना समजून, जाणून घेण्यात अस्मानी संकटाची फिकीर नव्हती. बरंच पुढे आल्यानंतर त्यांना कशीबशी एक टॅक्सी मिळाली. टॅक्सीत तो पुढे बसला. त्याच्या या कृतीने तिचा त्याच्याबद्दलचा आदर वाढला. पुढे अवघडलेल्या स्थितीत बसून तो पूर्ण वेळ तिच्याशी गप्पा मारत होता. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. त्यातून मार्गक्रमण करीत टॅक्सी चालली होती. दोघांनाही असं वाटत होतं अजून जास्त वेळ लागला तरी चालेल. तिच्या बिल्डिंगपाशी खरं तर तिला खाली सोडून तो जाऊ शकत होता. परंतु तिच्याबद्दल आजुबाजूच्या लोकांच्या मनात संशय निर्माण होऊ नये म्हणून तो टॅक्सी खाली थांबवून तिला घरी सोडायला गेला. तिला बघून तिच्या काळजीने ग्रासलेले आई बाबांचे चेहरे उजळले. तिने रीतसर त्याची ओळख करून दिली आणि आईबाबांना खात्री पटली की हाच आपला भावी जावई होणार.

तो दिवस होता ५ जुलै. त्या नंतरच्या वर्षी ५ जुलैला दोघं लग्नबंधनात बांधले गेले. गेली दहा वर्ष ह्याच दिवशी दोघं सुट्टी घेतात. दिवसभर मनसोक्त फिरतात परंतु संध्याकाळी त्याच वेळी त्या कॉफी स्टॉलवर कॉफी पितात. इतरांना त्या दिवसाच्या आठवणीने अंगावर शहारे येतात आणि असा दिवस पुन्हा येऊ नये म्हणून प्रार्थना करतात. मनाली आणि शेखरच्या जीवनात हा दिवस खूपच संस्मरणीय ठरला. त्या पाणीमिश्रित अर्ध्या कप कॉफीने त्यांच्या जीवनात पूर्णत्व आणलं. ह्या दिवसाच्या आठवणीने त्यांच्या प्रेमाला आजही कॉफीच्या सुगंधासारखे ताजेतवानं ठेवलं आहे.


©️®️सीमा गंगाधरे