Login

भेटली तू पुन्हा ! भाग - सत्तेचाळीस

भक्ती विश्वराज


भाग - 47


विश्वराज रूममधून बाहेर येऊन विचार करतच बाहेरच्या बाकावर बसला.

“काय ठरवलसं ?” सत्यन त्याच्या जवळ बसला.

“ मला मान्य नाही. सत्यन तुला सर्वच माहिती आहे .”

“ हम्म .. पण विचार कर .” त्याच्या खांद्यावर थोपटत सत्यन बाहेर गेला.

आतातर ओळखलतं तुम्ही यांना मिस्टर विश्वराज अंजली अभ्यंकर. खडूस असलेला विश्वराज किती भांडला तिच्यासोबत हो .. तीच ती आपली भक्ती पहिल्या भेटीतच भांडणाला सुरवात झाली. बरं झाले सत्यन मध्ये आला नाहीतर खर नव्हतं विश्वराजचे..


विश्वराजने कमी वयात असतांनाच बिझनेस हाती घेऊन अंजली इंडस्ट्रियलला नंबर वन वर आणली होती. त्यासाठी त्याने रात्रंदिवस मेहनत घेतली होती आणि या मेहनतीत साथ दिली होती त्याच्या जीवाभावाच्या मित्राने सत्यन. जो त्याच्या प्रत्येक सुख दुःखाचा साथी होता.. अंजली यांना गंभीर आजार झाला हे त्यांनी विश्वराजपासून लपवून ठेवले होते... त्या थोड्याच दिवसांच्या सोबती होत्या आणि हे त्यांनाही माहिती होते. पुढचे जितकें आयुष्य मिळेल ते त्यांनी मनमुराद जगायचे ठरवले होते.
विश्वराजसमोर त्यांनी लग्नाची अट ठेवली होती, कारण त्यांना विश्वराजची काळजी होती. आपल्यानंतर विश्वराज एकटा राहू नये, त्याच्यावर भरपूर प्रेम करणारी,त्याला सांभाळणारी अशी एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यात असावी, असे त्यांना मनोमन वाटत होते. सत्यन,आईशिवाय या जगात त्याचे कुणीही नव्हते. विश्वराजचे लग्न होऊन त्याला सुखी संसारात पाहून त्या डोळे मिटायला मोकळ्या होणार होत्या. त्यांच्यासमोर खूप संकटे आले पण त्यांनी कधी हार मानली नव्हती. विश्वराजच्या बाबांनी त्यांचा विश्वासघात केला आणि ते वेगळे झाले. विश्वराजने लहानपणापासूनच आईचा संघर्ष, होणारा त्रास आणि एकट्यात रडतांना पाहिले होते, म्हणून तो कोणालाच लग्नाची कमिटमेंट द्यायला तयार होत नव्हता. त्याच्यामागे मुलींची रांग होती,पण त्याने कोणालाच भाव दिला नाही. त्याची क्लासमेट रिया त्याच्यावर फुल्ल फिदा होती. तिने त्याला प्रपोज केले, पण त्याने स्पष्ट नकार दिला होता.तो तिला फक्त मैत्रीण म्हणूनच पाहत होता. त्याने तिच्यासोबत बोलणेही कमी केले होते.

काही दिवसानंतर आईला डिस्चार्च मिळाला पण ती त्या दिवसांपासून विश्वराज सोबत एक शब्द ही बोलली नव्हती. तो बोलायचा प्रयत्न करायचा पण ती बधली नव्हती. ही अट पूर्ण केल्याशिवाय आई स्वस्थ बसणार नव्हती.. आईच्या न बोलल्याने तो देखील अस्वस्थ होत होता.


"सत्या, बघ ना आई कशी वागतेय, ती समजून घेत नाहीये. मला त्या भानगडीत पडायचचं नाहीये यार. तू समजव ना तिला ?" विश्वराज सत्यनला समजवण्याची विनवणी करत होता.

" विश्वा यावेळी ती माझही ऐकणार नाही. ती तिच्या निर्णयावर ठाम आहे.” सत्यन

“ पण .. मला त्या खोटे फसवेगिरी मध्ये नाही जायचं. ज्यात पुढे जाऊन विश्वास घात केल जातो. अशा नात्यांवर माझा विश्वास नाही.” तो तडक म्हणाला.

“मग ठीक आहे, जे चालतयं ते चालूदे, जिवंत असेपर्यंत मावशी तुझ्याशी बोलणार नाही आणि खोटे आणि फसवेगिरी तर प्रत्येक ठिकाणी केली जाते आणि हे तू आधीच कसं सांगू शकतो? प्रत्येक माणूस स्त्री पुरुष विश्वास घात करणारा नसतो.. काही जण मला माहिती आहे तुला काय वाटतयं असा विचार कर ना की योग्य व्यक्ती तुझ्या आयुष्यात आली तर सोनं होईल आयुष्याच. ”


“ चुकीची व्यक्ती आली तर आयुष्याची राखरांगोळी झालीच समजा.” विश्वराज त्याला बोलू न देता पटकन म्हणाला .”

“ बी पॉझिटिव्ह यार.” सत्यन त्यांचे खांद्यावर दाब देत चिअरप करत.

“ मावशीला खुश ठेवायचं असेल तर तुला अट पूर्ण करावीच लागणार आहे..” इतकं बोलून सत्यन बाहेर निघून गेला.. कितीतरी वेळ विश्वराज एकटाच विचार करत होता.. विचार करतच तो एका निर्णयावर आला.. त्याने लगेच सत्यनला बोलावून घेतले. दोघं खूप त्या विषयावर चर्चा करतं होते.. शेवटी दोघांचे एक मत झाले.


ती रस्त्याच्या कडेला उभी असतांना एक गाडी तिच्याजवळ येऊन थांबली. आतून सत्यन बाहेर आला.

"हायऽऽ भक्ती." सत्यनने तिला हसून ग्रीट केले.

"हायऽऽ. पण तुम्हाला माझं नावं कस कळलं?" ती हलके हसत म्हणाली.

“ नाव माहिती करून घेणं खूप मोठी गोष्ट नाहीये.” सत्यन

" पण तुम्ही त्या माकडतोंड्या सोबत होते ना?" सत्यन गालात हसला.

“ तुला आठवतोय तो.” सत्यन तिच्याकडे भूवई उंचवत पाहिले .

“ आठवायला कशाला पाहिजे त्या डुक्करला.” ती हळूच पुटपुटली.

'बरं झाले त्याला आणले नाही.' तो मनातच म्हणाला.

“काय म्हणालीस ?” तो तरीही विचारत

“ काय नाही.”

"मला थोडं बोलायचं आहे?" सत्यन

"बोला." भक्ती.

"इथे नको, रेस्टॉरंटमध्ये जाऊया."

"ओके." ती त्याच्या सोबत गाडीत बसली आणि ते एका रेस्टॉरंट मध्ये गेले. तिथे ते एका प्रायव्हेट कॅबिनमध्ये गेले. त्याने ते आधीच बुक केले होते.

"हंऽऽ बोला. काय बोलायचे आहे." ती चेअरवर बसत म्हणाली.

तितक्यात वेटर ऑर्डर घेण्यासाठी आला.

"काय घेणार तू?" सत्यनने तिला विचारले.

"काहीच नाही." भक्ती.

"प्लिज काहीतरी ऑर्डर कर." सत्यन तिला आग्रह करत म्हणाला.

तिने एक आले घातलेला कडक चहा आणि खारी ऑर्डर केली. तो वेटर सत्यन कडे पाहू लागला अन् सत्यन वेटरकडे. सत्यनने त्याला कोल्ड कॉफी आणि चहा खारीची ऑर्डर दिली. पोटात तर कावळे, उंदीर सर्वच मारामारी करत होते, पण सध्या तिने चहा खारी मागवली. सकाळ पासून फिरुन फिरुन जाम वैतागली होती. सकाळच्या चहावर तिने तो दिवस कसाबसा काढला होता. चहा खारी खाऊन ती त्याच्याकडेच पाहत होती. त्याने लांब श्वास भरला आणि बोलायला सुरवात केली.

"भक्ती, तू प्रॉब्लेम मध्ये आहेस हे मला माहिती आहे, घर नाही की नोकरी नाही. सध्या तू कुठे राहते ते ही मला माहितीये. नोकरी व घर शोधतेय आणि इतक्या मोठ्या शहरात घर सहजासहजी मिळत नाही. माझ्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे."

"कोणती?"

"तुला माझ्या मित्रासोबत लग्न करावं लागेल."

"कायऽऽ?"

"हो, तेही करार पद्धतीने."

"क्कायऽ!" ती मोठ्याने ओरडली. प्रायव्हेट कॅबिनमध्ये असल्यामुळे तिचा आवाज बाहेर गेला नव्हता, पण त्याच्या कानाच्या पडद्यांना त्रास झाला असणार, कारण तो कानावर हात ठेवून त्रासिक चेहर्‍याने तिच्याकडेच पाहत होता.

"डोकंबिकं फिरलंय का तुमचंऽऽ? की घेऊन आलात?काहीही बडबड करताय, मी काय तसली मुलगी वाटली का? वर्षभर ठेवा नंतर द्या हाकलून. तसंही तुमच्या सारख्या मोठ्या लोकांना नात्याची किंमत कशी कळणार? स्वार्थासाठी नात्याला पणाला लावणारे तुम्ही लोक काहीही करु शकता. तुम्हाला नात्यांची किंमत काय कळणार? ते तर आमच्या सारख्या अनाथांना कळते.ज्याच या जगात कुणीच नाही आई ,बाबा,भाऊ, बहिण, कुणीच नाही." बोलतांना तिचा कंठ दाटून आला होता. महतप्रयासाने तिने डोळ्यांतील अश्रू डोळ्यातच लपवले.

"स्वार्थच आहे आमचा, पण त्या बदल्यात मरणाऱ्या माणसाची इच्छा पूर्ण करुन त्यांना काहीवेळ आनंद देऊ शकतो. माझ्या मावशीची शेवटची इच्छा आहे की, तिच्या मुलाने लग्न करावं, पण त्याला लग्न करायचं नाही आणि आईला दुखवायचे ही नाही."


"का नाही करायचे लग्न?" भक्तीने विचारले.


"आहे पर्सनल." सत्यन.


" तसा वगैरे आहे की काय तुमचा मित्र?" भक्ती रोखून पाहत म्हणाली.

"तसा म्हणजे कसा?" तो न समजून म्हणाला.

"इम्पोर्टेड, गे वगैरे आहे की काय? म्हणून लग्नाला नाही म्हणतोय." भक्ती बोलून मोकळी झाली.

"ये माझी आई तसं काही नाहीये. तो तसा नाही."

'काय विचार केला हिने.' .

तिचं ऐकून तर त्याने मनातच कपाळावर हात मारला.


"आणि आईला हे कराराचे माहिती पडले तर?" तिने मनात आलेला प्रश्न विचारला.

"आम्ही काहीच सांगणार नाही तिला आणि कोणालाही सांगू देणार नाही." तो रोखून पाहत म्हणाला.

"पण तुम्ही मलाच का सांगताय? हे तर कुणीही करु शकते? एखादी नाटकातील मुलगी द्वारे तुम्ही हे नाटक करु शकता. मीच का?" भक्ती.

"कारण तू नाटक करणार नाही. जर अनोळखी आजींसाठी तुझ्या डोळ्यांत पाणी येऊन तू त्यांना तुझ्या कॉलेजची फी देऊ शकते, तर इथे तर तुला एक आई मिळेल." तो तिचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होता.

क्रमश ..