Login

भेटल तू पुन्हा ! भाग - अठ्ठेचाळीस

भक्ती विश्वराज
भाग - 48


"तसं तर तुझं यात  नुकसान काहीच नाहीये. तुझी सर्व जबाबदारी माझी . तुझ्या कॉलेजची फी मी भरणार आणि तुला आईचं प्रेम ही मिळेल." ती विचार करत होती. सत्यनने तिला बरोबर इमोशनल करत विचारले ..

"कोण आहे तो मित्र?" तिने विचारले.

"तू चांगलेच ओळखतेस त्याला." सत्यन हसत म्हणाला त्याच्या चेहऱ्यावरून तिच्या लक्षात आले.

"तो रागीट बोका !" तिने डोळे मोठे करत विचारले. सत्यनने मान हलवून होकार दिला. 

"त्या खडूस, रागीट रेड्यासोबत लग्न. मी नाही हा, सॉरी हं मी माझा निर्णय बदलते मला खरचं जमणार नाही. "
तिने तिची पर्स उचलली आणि निघायला लागली.

"त्याच्या आईची शेवटची इच्छा." सत्यन चेहरा पाडत म्हणाला आणि ती जागीच थांबली.

"ओके." आधीच भावूक असणारी भक्ती आई या शब्दानेच  भावूक होऊन हो म्हणाली .

"पण माझ्या काही अटी आहेत." भक्ती.

"बोल न."

"ते म्हणजे आमच्यात नवरा बायकोसारखे संबंध नसणार. तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचे आहे." ती अडखळत म्हणाली.

"हो कळलं मला, यू डोन्ट वरी तो तसा काही करणार नाही. त्यालाही हे नकोय." सत्यन.

"मग ठीक आहे, पण त्या घुबडाला माहिती आहे का?"

"सिरीयसली घुबड?" सत्यन एक भुवई उंचावत म्हणाला.

" मग काय आहेच त्याचे डोळे तसे घुबडासारखे,त्यालाही अंधारात दिसतं ना." ती हसत म्हणाली आणि सत्यनने मनातच भिंतीवर डोकं आपटलं.

"त्याला हे माहिती नाही की, ती मुलगी तू आहेस, पण तो मला नाही म्हणणार नाही याची मला खात्री आहे." सत्यनला त्याच्या मित्रावर जरा जास्तच विश्वास होता.

"उद्या सकाळी नऊला तयार रहा मी येईल." 

"ठीक आहे." म्हणून ती निघून गेली.

  आता वेळ होती त्याला सांगण्याची, तो लगेच विश्वराजकडे निघाला.

"विश्वा, तू म्हटल्याप्रमाणे मी शोधली. हा घे तिचा बायडोटा आणि फोटो." तो एक एनव्हलप विश्वाकडे देत म्हणाला. त्याने तो एनव्हलप घेतला आणि टेबलच्या ड्रॉवर मध्ये ठेवून दिला.

"विश्वा, आधी पाहून तर घे."

"नको तू पाहिली आहेस ना म्हणजे झालं. तुला पसंत मग मलाही पसंत. म्हणून तर तुला म्हटले मी."

"तरी पण तू पाहून घे." त्याने तो एनव्हलप बाहेर काढला. त्याने नाव वाचले.


“नाव - भक्ती रणदिवे.

"रणदिवे कुठे तरी ऐकलयं रे, पण आठवत नाहीये." विश्वराज.

"ऐकलं असेल कुठे तरी." सत्यन.

वय - 22

शिक्षण - बी कॉम.

उंची - पाच फूट सहा इंच. 

रंग -  

रक्तगट - 

आवड - … .

"इतकं मी नाही वाचत रे." विश्वराज.

"ठीक आहे पण फोटो तर एकदा बघून घे."

त्याने फोटो हातात घेऊन पाहिला .


"हि मारकुटी म्हैस  .." तो चिडून म्हणाला.

" अजिबात नाही हा .., पाहिलंस नं तू त्यादिवशी कशी अंगावर धावून येत होती ती." तो त्या दिवशीचा प्रसंग आठवत म्हणाला.

'ती म्हैस हा रेडा दोघांची जोडी मस्तच आहे.' तो ओठातच पुटपुटला.

"काही म्हणालास का?" विश्वराजने भुवया उंचावून विचारले.

"नाही काहीच नाही." सत्यन हलकं हसत म्हणाला.

“बघ पुन्हा विचार कर विश्वा.. रिया ला बोलवं पण ती मावशीला काळजी आणि प्रेम करू शकणार नाही .” 

“ नको रे बाबा रिया नको.” 

“मग भक्ती शिवाय दुसरा पर्याय तुझ्याकडे नाही.” 

“ ठिक आहे. .” विश्वराज एकदाचा म्हणाला. 

सत्यनने एकदाचा विश्वराज कडून होकार वदवून घेतला .

सत्यनने विश्वराज कडून होकार वदवून घेतला आणि दुसऱ्या दिवशी सत्यन भक्तीला घेऊन आला. आधीच त्यांनी जावळे अंकलला बोलावून सर्व पेपर्स रेडी करुन ठेवले होते. त्यात फक्त दोघांची सही बाकी होती. थोड्यावेळात विश्वा ही आला, जावळे अंकलने तिला सही करायला सांगितले. तिने हातात पेन घेतला, तिचा हात थरथरत होता. हलकेच  डोळ्यांत पाणी तरळलं. पापण्यांची फडफड करून तिने परतवलं तिने सही केली.त्यानंतर त्यानेही लगेच सही केली. थोड्याच वेळात त्यांचे मॅरेज सर्टिफिकेटही तयार होऊन आले. त्याने तिला घरी आणले. सत्यनही सोबत होता. विश्वराज आईच्या रुममध्ये गेला.

“आई, मी तुझी अट मान्य केली. ही बघ माझी बायको भक्ती, तुझी सून." आईने दाराकडे बघितले. भक्ती दारात उभी होती. पिंक कलरचा टॉप आणि जिन्स घालून ती उभी होती. तिला पाहून तिच्या चेहर्‍यावर हसू पसरले. अंजलीने भक्तीकडे हसून पाहिले. तिला हाताने जवळ बोलावले. ती जवळ आल्यावर तिच्या हाताला पकडून बाजूला बसवून तिच्या गालावर हात ठेवला. तसे भक्तीच्या डोळ्यांत टचकन पाणी आले. त्यांनी तिच्या गालावरचे अश्रू हाताने पुसले आणि भक्ती त्यांच्या गळ्यात पडली.

“आई, आता तुला .. म्हणजे तुम्हाला बरं वाटतयं नं." ती कचरत म्हणाली.

"तुलाच म्हणं हे आपलेपणाच वाटतं. मी आता बरी आहे. तू कशी आहेस?" अंजलीने मायेने विचारले. भक्तीने होकारार्थी मान डोलावली.

"विश्वा, हिच्या डोळ्यात मला कधीच अश्रू दिसता कामा नये, याची सर्वस्वी जबाबदारी तुझी.कळलं?" अंजली धारधार आवाजात म्हणाली .

"हो." विश्वराज म्हणाला.

विश्वराज तर तिच्याकडे आवासून पाहतच राहिला. 

"आल्या आल्या काय जादूटोणा केली हिने. काय जादूगर आहे की काय? आईला लगेच आपलसं केलं." तो सत्यनच्या कानात फुसफूसला.

याला प्रेम म्हणतात. तिला आईच प्रेम मिळाले नाही. तिला मावशीत आई दिसली. कसं आहे ना? ज्यांना आई असते.आईच प्रेम मिळते त्यांना तिची, तिच्या प्रेमाची कदर नसते. ज्यांना आई नसते त्यांना विचारावं की, आईची माया, ममता काय असते? किती तळमळता ते त्या स्पर्शासाठी, प्रेमासाठी." सत्यन म्हणाला.

"खरयं रे." विश्वा नकळत म्हणाला.

"आणि म्हणूनच तर मी भक्तीला बोलावून घेतलं ." सत्यन.

"सत्या, हे असं बोलताय जसं काही एकमेकांना आधीपासूनच ओळखता." त्यांना हसतांना पाहून त्याने मनात आलेली शंका बोलून दाखवली.

“तसं नाही रे पण दोघींनी एकमेकांना पसंत केलं हे चांगलेच आहे ना तुझ्यासाठी." सत्यनने हसत विषय बदलवला.

"हे मात्र अगदी खरंय, नाहीतर सासू सुना एकमेकांना पसंत करण्यासाठी पूर्ण आयुष्य वाट पाहावी लागते." विश्वा गालात हसत म्हणाला.

"आई, तू आराम कर, आम्ही जातो." विश्वा बोलून जाण्यासाठी वळला तोच आईने त्याला थांबवले.

"थांब. विश्वा, माझी अशी इच्छा आहे की, आज तुमचं विधिवत लग्न माझ्या डोळ्यांसमोर व्हावं." अंजली त्यांना म्हणाली.

"आई तुला त्रास होऊ नये, म्हणून तर आम्ही कोर्ट मॅरेज केले ना, आता नको आपण नंतर सर्व विधिवत करुया." त्याने कॉन्ट्रॅक्टबद्दल सांगणे टाळले.

"माझी इच्छा आहे. नंतर वेळ मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही. सत्यनचा परिवार आणि घरातील व्यक्ती बस. सत्यन सर्व तयारी झाली पाहिजे."  अंजलीने सर्व ठरवून सांगितले.

"होऊन जाईल मावशी." सत्यन.

"पण आई." अंजलीने हाताचा पंजा दाखवून थांबवले.

"पण नाही बिन नाही. आज संध्याकाळी लग्न होणार म्हणजे होणार." आईचे ऐकण्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच नव्हता. तिघेही बाहेर आले.

" ओ मिस्टर काय आहे हे … तूम्ही कसे तयार झाले लग्न करायला. तेही पूर्ण विधीवत!" ती बाहेर आल्या आल्या त्याच्यावर डाफरली.

"हे बघ तू शांत हो. आई असं काही म्हणेल याचा पुसटसा अंदाज ही मला नव्हता." विश्वराज तिला समजावत म्हणाला.

"पण आता काय?" तिने विचारले .

"आता काय, तुम्हाला दोघांना लग्न करावंच लागेल." सत्यन तिथे येत म्हणाला.

"क्कायऽऽ." दोघेही एकसाथ ओरडले. आश्चर्याने दोघांचे डोळे मोठे झाले..

"हो. एक वर्षांपर्यंत तरी एकत्र राहावं लागेल." सत्यन पुन्हा एक एक बॉम्ब टाकत होता.

"ठीक आहे." दोघांनी सोबतच उत्तर दिले.

चला तुमच्या नात्याची सुरवात इथूनच होतेयं.

"नो नेवर या भांडकुदळ सोबत, शक्य नाही." विश्वराज लगेच उत्तरला.

"येऽऽ दिडशहाण्याऽऽ मलाही हे शक्य नाही काय? जगातील तू एकमेव व्यक्ती नाहिये. तुझ्यासोबत सुरवात करायला. मला काही पागल कुत्र्याने चावलं नाहीये. समजलं?" ती त्याच्या चेहऱ्यासमोर एक बोट नाचवत त्याच्याकडे दोन पाऊल जवळ गेली, तसा तो दोन पाऊल मागे सरकला.