भाग - पंचावन्न
"ये थांब." तिने त्याचा हात पकडून त्याला ओढले, तो ओढला तर गेला नाही, तिचं आपसुकचं त्याच्या अंगावर ओढल्या गेली. नकळत तिच्या नाजुक मुलायम ओठांचा स्पर्श त्याच्या कॉलरबोन वर झाला आणि त्याच्या शरीरावर शहारे आले. त्याच्या मनात वेगळीच भावना निर्माण झाली.कधी कोणत्याच मुलीला पाहून त्याला असे वाटले नव्हते. तो आपसुकचं भक्तीकडे खेचला जात होता. ती नजर झुकवून पटकन उठण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्याकडून उठल्या जात नव्हते.
"कशाला ओढलं मी या चोमड्याला, मीच ओढल्या गेले, त्याच्या अंगावर आणि थंडगार स्पर्श झाला माझ्या ओठांना, किती ऑकवर्ड वाटतयं तो काय विचार करेल माझ्याबद्दल." मनातच ती त्याला आणि स्वतःलाच शिव्या देत होती. मग विश्वानेच तिला उठवले.
"या संधीचा अडवांटेज घेतलास तू माझा." तो तिच्याकडे पाहत म्हणाला.
"मी तुझा अडवांटेज हड्ऽऽ,इतके वाईट दिवस नाही आलेत माझ्यावर." ती त्याला धुडकावत म्हणाली.
"मग हे काय होतं, तू माझ्या इथे किस केलस ते? जर तुला किस घ्यायचा होता तर कुठं घेतात आणि कसं करतात,मी तुला सांगतो?" अस म्हणत तो तिच्याजवळ आला तशी ती मागे सरकली.
"ये चल हडऽ हडऽ. " विश्वाला एखाद्या कुत्र्याप्रमाणे हात हलवून ती मागे मागे जात होती. तो मनातच तिच्यावर हसत होता..
"दूर राहा माझ्यापासून, असं जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि थोबाड पाहिलं का आरशात?" ती त्याच्यासमोर एक बोट नाचवत म्हणाली.
"का काय झालं? या सुंदर चेहऱ्याच्या मागे कित्येक मुली आजही फिदा होतात. रिया तर आजही माझ्या मागे लागलेली आहे. तुझा नवरा इतका हॅण्डसम आहेस, त्याची तुला कदरच नाहिये." विश्वराज बिचारा चेहरा करत म्हणाला.
"चेहरा सुंदर असून काय? त्या चेहर्यावर हसू ही पाहिजे असतं नेहमीच त्याच्यावर राग आणि जिभेवर कडू कारलं, हसून खेळून कधी बोलता येत नाही मग काय कामाचा असा चेहरा." ती म्हणाली आणि तो विचारात पडला. खरंच तर होत तिचे तो असा कधी राहिलाच नाही. जेव्हा पासून कळायला लागले तेव्हापासून तर तो हसनच विसरलेला, सतत काम काम आणि चेहर्यावर राग.
"आणि कोण आहे ती? हा रिया बिया ती ही तुझ्यासारखीच असणार एक नंबर खडूऽऽस." भक्ती नाक मुरडून म्हणाली.
"मी खडूऽऽस काय?" विश्वराज तिच्यावर डोळे वटारत म्हणाला.
"हो मग, नेहमी त्या सडलेल्या कारल्यासारखा चेहरा केलेला असतो." ते इमॅजिन करुनच तिने चेहरा वेडावाकडा केला. तिचे एक्सप्रेशन पाहून त्याला खूप हसायला आले आणि तो जोरात हसायला लागला.
"त्या 'झू' मध्ये जर ठेवले ना तुला, तर तुला पाहिल्यावर कोणताच प्राणी पाहायची गरज पडणार नाही." विश्वराज तिची खेचत म्हणाला.
"नाही हो असं कसं एक प्राणी पाहतील न ते?" ती सिरियस चेहरा करत म्हणाली.
"कोणता?" विश्वराजने न कळून म्हणाला.
"माझा नवरा तो एकदम गोरीला सारखाच दिसतो?" असं बोलून ती खी खी करत दात दाखवून हसायला लागली.
"मी गोरीलाऽ तर तू गोरीलीऽऽ." त्याला तिला चिडवायला फार मजा येत होती, त्याने हसत पुन्हा चिडवले तर ती तणतण करत बेडवर एका बाजूने जाऊन अंगावर पांघरुन घेऊन झोपली.
"हिच्या नादाला लागणे म्हणजे आ बैल सॉरी सॉरी आ म्हैस मुझे मार असं आहे." तो पुटपुटला आणि बेडच्या दुसऱ्या बाजूने जाऊन झोपला.
सकाळी नाश्ता करुन लवकरच ते फार्महाऊस साठी निघाले. गाडीतही तिची चटरपटर चालूच होती.
"हिची गाडी बंद पडत नाही का?" विश्वाने प्रश्नानर्थक नजरेने सत्यनला विचारले. त्याने हसून मान डोलावून नाही म्हटले.
बाहेर छान गार वारा सुटला होता. डोळ्यांना छान हिरवी वनराई दिसत होती, त्यामुळे मन प्रसन्न होत होते. दोन तीन तासांच्या प्रवासानंतर ते फार्महाऊसवर पोहचले. गेटमधून आत गेल्यावर मोठे घर, घर कसले बंगलाच होता. बाहेरच एक पांढऱ्या संगमरवर दगडाचा केलेला वॉटर फाऊंटन, आजूबाजूला मोठमोठी झाडे,आत गेल्यावर जुन्या आणि आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आलेला होता. बंगला खूपच सुंदर दिसत होता. भक्ती तर भलतीच खुश झाली होती. ते सर्व गाडीतून खाली उतरले तसे कमला आणि मंगल धावत अंजलीजवळ आले.
"कशा हाय ताईसाहेब?" मंगल,कमला तिला नमस्कार करत म्हणाले.
"मी ठीक आहे दादा, तुम्ही दोघं कसे आहात?" अंजली त्या दोघांना म्हणाली.
"ही भक्ती विशूची बायको, लग्न जरा घाईगडबडीत झालं म्हणून कळवता नाही आलं." अंजली त्यांची भक्तीशी ओळख करुन देत म्हणाली.
"भक्ती हे माझे मंगल दादा आणि कमला वहिनी, आपल्या फार्महाऊसची देखरेख करतात. जेव्हा आपल्याकडे काहीच नव्हते, तेव्हाही यांनी आपली साथ सोडली नव्हती. आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत हे दोघंही." तशी भक्ती त्या दोघांच्या पाया पडायला खाली वाकली.
"हे काय कराताय बेटाजी." मंगल भक्तीला अडवत म्हणाला.
"आशिर्वाद घेतेय काकाजी." भक्ती म्हणाली आणि त्या दोघांच्या पाया पडली. मग विश्वानेही त्या दोघांच्या पाया पडल्या. आपल्याप्रती इतके प्रेम, आदर पाहून मंगल आणि कमलाचे डोळे भरुन आले.
"आई, किती सुंदर आहे हे. " ती इकडे तिकडे फिरत बघून म्हणाली.
"तुला आवडल न?" अंजली.
"भयंकर आवडलं आपल्याला." ती खुश होत म्हणाली.
आत आल्यावर फ्रेश होऊन सर्व बाहेर आले. तर कमलाने आज पंचपक्वान्न बनवले होते. जेवण झाले, तसे भक्तीने अंजलीला गोळ्या औषधी देऊन आराम करायला भाग पाडले आणि अंजली लगेच तयार झाली. भक्ती अंजलीचे पाय चेपून देत होती, त्यातच तिला झोप लागली. दुरुनच विश्वा त्यांच्याकडे पाहत होता. स्पेशली भक्ती आल्यापासून आईला किती जपतेय हे तो पाहत होता. विश्वा बाहेर निघून गेला. अंजली ही गाढ झोपली मग भक्ती तिच्या रुममध्ये निघून गेली. रुममध्ये येऊन तिने फोन लावला.
"हॅलो संजू काम कसं चालू आहे. सर्व डन ना, ती एलिना फर्नांडिसचं काम झालं का?"
"नाही,असं कसं म्हणता, लवकरात लवकर मला काम झालेल पाहिजे. मी येईल लवकरच ओके. बाय." म्हणून ती मागे वळली तर मागे विश्वा दरवाजाला टेकून तिच्याकडेच बघत होता. ती गोंधळली.
"काय मग?" त्याने भुवया वरती करत विचारले.
"कुठे काय,काहीच नाही." ती भोळा चेहरा करत म्हणाली अन् लगेच बाहेर निघून गेली.तो रुममध्ये येऊन त्याचे काम करत बसला.
"बरं झालं त्याला संशय आला नाही." ती मनातच म्हणाली.
"कोणाशी बोलत होती ही, हा संजू कोण आहे?" ती गेल्यावर विश्वा विचारात पडला होता. ती बाहेर गेली आणि कमला सोबत बाहेरचा मागचा परिसर सगळीकडे फिरुन आली. कमला तिला आजूबाजूची माहिती देत होती. मध्येच विश्वाच्या लहानपणीचे किस्से सांगत होती. भक्ती मन लावून सर्व ऐकत होती. त्यांना मूलबाळ नव्हते विश्वाला ते पोटच्या पोरापेक्षा जास्त माया लावत होते.अंजलीने किती प्रेमाने माणसांना जवळ केले होते. अंजलीचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि तिला भरुन आलं आणि घळाघळा तिच्या डोळ्यांतून अश्रू बाहेर पडले.
"तू अशी रडलीस,कमजोर पडलीस तर विशूला आणि ताईला कोण सांभळणार?"
"खरयं तुमचं काकी मला स्ट्राँग रहायला हवं." ती डोळे पुसत म्हणाली आणि उठून अंजलीच्या रुममध्ये चहा घेऊन आली. अंजलीने चहा घेतला. मग ती विश्वाच्या रुममध्ये त्याला उठवायला गेली, तर तो झोपलेला होता. ती त्याच्याजवळ उभी राहिली .
"झोपलाय तर किती शांत वाटतोय न हा, नाहीतर नुसती मै मै चालू असते याची." ती हळूच म्हणाली.
"माझी मै मै चालू असते का तुझी ?" विश्वा डोळे उघडून तिच्याकडे पाहत म्हणाला.
"तू जागा होता म्हणजे?" भक्ती एक हात कंबरेवर ठेऊन म्हणाली.
" हो." तो हसत म्हणाला.
"चहा पिण्यासाठी बाहेर येतो नं, तुझ्यासाठी सरप्राईज आहे." म्हणून ती निघून गेली
क्रमश..
