भूत बंगला भाग दोन

विनोदी भयपट
हॉटेलचं बुकिंग झालं आणि बाहेरून आलेलं जेवण उरकून उरलेला पसारा तसाच ठेऊन खुशी नवऱ्यासोबत शॉपिंगला जाते. फिरायला जाणार तेही गोव्याला आणि खरेदी नाही करणार ती खुशी कसली.

तर..गोव्याला जाण्याचा दिवस उजाडतो..रात्रभर झोपेत पण गोव्याची स्वप्न बघणारी खुशी सकाळी लवकर उठून स्वतःची सगळी तयारी करून अशोकला पण उठवते. दोघेही अमेरिकन टुरिस्टच्या चाकांच्या बॅग ओढत ओढत गोव्याला जाण्यासाठी दादर स्टेशन करता बुकिंग केलेल्या कॅब पर्यंत जातात. घामाने निथळणाऱ्या चेहऱ्याला हाताचा पंखा करून जशी आपण हवा देतो तशी हवा घाम न आलेल्या चेहऱ्याला देत खुशी एकदम ऐटीत गाडीत विराजमान होते. दादा..एसी थोडी वाढवो अशी ऑर्डर ड्राइवरला देत हा हु करत खुशी आतल्या साइडला सरकून बसते. अमेरिकन टुरिस्टची चाकं असलेली बॅग डिकी मधे टाकून अशोक पण खुशीचा बाजूला बसतो आणि कॅबचं दार ओढुन घेतो.

ट्रेनचा आठ तासांचा प्रवास करून फायनली दोघे गोव्याला पोचतात.
थिविम वरून पुन्हा एकदा प्राईव्हेट गाडी करून दोघे बाघा बीच पासून दोन तासांवर स्थित त्यांच्या हॉटेल जवळ पोचतात. रात्रीचे साडे नऊ दहा झालेले असतात. गाडीवाला गाडी हॉटेल पासून काही अंतरावर लांब उभी करतो. दोघेही सामान घेऊन चालू लागतात. काही अंतर चालत गेल्यावर खुशी अशोकवर ओरडते..

"अशोक..हे काय? हा तर भूत बंगला दिसतोय.. तू नक्की हेच हॉटेल बुक केलं होत ना? मी या हॉटेलमधे येणार नाही. मला काय मारून टाकायचा प्लॅन आहे का तुझा?" खुशी रागात विचारते.

"अग राणी अस नाही मी चांगलं बघूनच बुक केलं आणि तू पण तर हो बोलली होतीस!"अशोक काकुळतीने बोलत होता.

"राणीला घाल चुलीत..मला इथे राहायचं नाही बास्स..अमेरिकन टूरिस्टची चाकं असलेली बॅग हातात घेत खुशी पाठी वळली..तोच तिच्या समोर डॉ. सुनिता आरतीच ताट घेऊन उभी राहिली. चेहऱ्याचा जवळ धरलेल ताट आणि त्यात असलेली मेणबत्ती यामुळे डॉ. सुनिता वेगळीच भासत होती.

"अय्या..तू इकडे कशी काय..आणि हे काय..घाबरले ना बाई मी.. असं कोणी पटकन पाठी येऊन उभ राहत का?" खुशीची अखंड बडबड सुरु असते..पण त्याला काडीमात्र उत्तर न देता डॉ.सुनीता तिच्या आणि अशोकच्या कपाळाला हळदी कुंकू लावून खुशीच्या हातातली अमेरिकन टुरिस्टची चाकं असलेली बॅग गोव्याच्या वाळूत फरफटत (ओढत) घेऊन बंगल्याच्या दिशेने चालू लागते. अग डॉक्टरीन बाई..थांब अग थांब..अशी काय ही..
खुशी तिच्या पाठी ओरडत ओरडत चालत वजा धावत जाते.

बंगल्याच दार उघडताच लख्ख प्रकाश खुशी आणि अशोकच्या डोळ्यांवर पडतो..दोघेही पटकन त्यांचे हात डोळ्यांवर ठेवतात आणि मग हळूहळू बाजूला करतात.

"आई शपथ.. अशोक..अरे कसल भारी हॉटेल आहे..हा तर एखादा सुंदर असा राजमहाल दिसतोय..उत्साहाच्या भरात खुशी पटकन आत जाते. आतमध्ये जाऊन बंगल्याच्या मधोमध उभी राहून ती गोल गोल फिरून त्या बंगल्याच सौंदर्य डोळ्यात साठवत असते..तोच तिची नजर रिसेप्शन जवळ उभ्या असलेल्या महेश वर पडते..

"ओ...वकील दादा..तुम्ही इकडे कसे?" खुशी विचारते.

"मी इकडेच असतो..आणखी बरेच जण आहेत जे इकडेच आहेत." चेहऱ्यावर निर्विकार भाव आणत वकील महेश बोलतात. त्यांचा विनोदी स्वभाव लक्षात घेता..खुशी जास्त विचार करत नाही. अहो वकील दादा..आमची चावी द्या रूमची..आणि बाकी कोण कोण आहेत ओ?" अस विचारत खुशी चावी घेते.

"सगळे इथेच आहेत..महेश अस बोलत असतानाच खुशीची नजर पायऱ्यांवरून उतरणाऱ्या राखीकडे जाते.

"गो बाय..राखी ताई..तू पण इकडेच आहेस का? ए चल चल आपण एक सेल्फी घेऊ अस म्हणत खुशी पटकन राखीच्या खांद्यावर हात टाकून स्वतःच्या फोन मधे एक सेल्फी घेते..राखी काहीच न बोलता जागेवर थिजल्या सारखी उभी असते.. अग राखी ताई..मी पटकन फ्रेश होऊन येते हा..आपण मस्त फोटो काढू आणि रील्स बनवू हा..खुशी अशोकला आवाज देते आणि पटकन त्यांच्या रूम नंबर ७/१२ मधे प्रवेश करते.

अर्ध्या तासात फ्रेश होऊन तयार होऊन खुशी आणि अशोक रुमच्या बाहेर येतात. डाव्या बाजूने पायऱ्या उतरायला घेणारा तोच समोरच चित्रविचित्र चित्र बघून दोघेही हादरतात..
क्रमशः
©®श्रावणी लोखंडे..