चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा.
लघुकथा.
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
शीर्षक:बिकट परिस्थिती!
सगळेजण जोरजोरात रडत होते, कारण संपूर्ण घरदार आणि सगळ्या गोष्टींचे नुकसान झालं होतं.
दररोज कोणाचे काहीना काही झाले आहे, हे ऐकायला येत होते. विविध गावातून तिथे लोक काही काळासाठी सोडण्यात आली होती.
" आई ss हे काय ? बाबा कुठेच दिसत नाहीत." असे म्हणत ती रडायला लागली होती.
" अगं, असतील ते. तू नीट शोधले नसशील. " त्या लहान मुलीची आई मंदा बोलत होती.
" आई, मी सगळीकडे शोधलं. बाबा, कुठेच सापडत नाहीयेत." ती घाबरून म्हणाली.
आता मंदाला सुद्धा भीती वाटायला लागली होती. या दहा-बारा दिवसांमध्ये घरातील कोणी व्यक्ती गायब झाला, तर त्याचं एकच कारण असायचं आणि ते म्हणजे मरण !
तिने खिडकीजवळ ती वस्तू आहे, का बघितली आणि ती वस्तू जशी गायब झाली आहे, हे समजले तसे घाबरून ती मुलीला घरातच थांबायला सांगून पळत बाहेर आली.
" सुधाकर काका, लवकर बाहेर या. आमचे हे कुठेच सापडत नाहीयेत. " ती बाजूच्याच खोलीत असणाऱ्या एका व्यक्तीला म्हणाली.
" अरे देवा ! कुठे गेला अजय आणि कालच आपले ठरले होते ना की, सगळ्यांनी एकमेकांकडे लक्ष द्यायचं म्हणून?" काका सुद्धा थोडासा आवाज चढवत म्हणाले.
" अहो, मी आणि माझी मुलगी झोपली होती. तेवढ्यातच हे कुठेतरी निघून गेले आणि खिडकीजवळ असणारी दोरी सुद्धा दिसत नाहीये." असे म्हणून तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा सुरू झाल्या.
ती जेव्हा सुधाकर काकांना आवाज देत होती, तेव्हा आजूबाजूच्या खोल्यातील लोकांना सुद्धा समजले होते आणि ते सुद्धा बाहेर आले होते. सर्वांनी मंदाचा नवरा अजय याला शोधायला सुरुवात केली होती.
जेव्हा त्याला थोडे अंतर गेल्यावर जवळच्या एका झाडाखाली हातात दोरी घेऊन बसलेले बघितले, तेव्हा मात्र एका माणसाने येऊन त्याच्या कानाखालीच मारली.
" अरे, तू इथे येऊन बसलायस आणि सगळ्यांच्या जीवाला घोर लावला आहेस. तिकडे तुझी मुलगी आणि बायको किती चिंतेत आहेत. आधीच काही चांगलं चाललेलं नाही, त्यात असं उगाच कोणाच्या जीवाला घोर नको लावूस." सुधाकर काका त्याला म्हणाले.
" आता अजून काय बाकी राहिलं आहे? सगळं तर हातातून निसटून गेले आहे." तो असे म्हणून ओक्साबोक्शी रडायला लागला.
" म्हणून काय तू आता सगळ्यांना त्रास देणार आहेस का? तुला माहितीये ना सगळीकडे काय चालू आहे ते? आतापर्यंत तीन-चार जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि तू जेव्हा ही दोरी घेऊन इथे आलास, तेव्हा सुद्धा हाच विचार करत असशील ना ? तुझ्या माघारी तुझी बायको आणि मुलगी आहे याचा का विचार करत नाहीस?"
" या सगळ्यांमध्ये मी माझ्या आई-वडिलांना वाचवू शकलो नाही, याचे मला खूप दुःख होत आहे." असे म्हणून तो त्यांना आठवून रडायला लागला.
त्याचे आई-वडील त्याच्या डोळ्यांसमोर वाहून गेले होते. स्वतःच्या नातीला वाचवण्यासाठी त्यांनी तिला अजयकडे दिले स्वतःचा जीव मात्र ते वाचवू शकले नव्हते.
" हे बघ, इथे प्रत्येकाने तुझ्यासारखं काही ना काहीतरी गमावले आहे. कुणाचं शेत पाण्याखाली गेले, कोणाचे आई-वडील गेले, तर कोणाची गुरं वाहून गेलीत; परंतु आता आपल्याला यातून हळूहळू बाहेर पडायला लागणार आहे." त्या घोळक्यातील एक काकी होत्या, त्याही आपले अश्रू पुसत त्याला समजावत म्हणाल्या.
" अहो, माझं शेतातील हातातोंडाशी आलेले पीक सुद्धा गेले. आता मी कर्जाचे पैसे कसे फेडणार ? माझ्या आई-वडिलांचे बसून खाण्याचे दिवस आले होते आणि या महापुराने सगळं माझ्याकडून हिसकावून घेतलं हो !"
अजय पुन्हा सर्व आठवून रडत म्हणाला.
अजय पुन्हा सर्व आठवून रडत म्हणाला.
" तू एकटाच नाहीयेस. तुझ्या सगळ्यांचेच काही ना काही तरी गेलं आहे. तुझी मुलगी तुला सकाळपासून शोधत आहे, आता लवकरच आपल्याला आपल्या घरी जायला मिळणार आहे. आपण नव्याने सर्व उभारू, पण असे हताश होऊन काहीच होणार नाहीये." अनुभवाचे बोल सुधाकर काका त्याला सांगत होते.
सगळ्यांना काही दिवसांसाठी तिथे तात्पुरती राहण्याची जागा सरकारने दिली होती. तिथेच सर्वजण होते, अजयला घेऊन आले होते.
जसे त्याला आलेले बघितले, तसे त्याच्या बायकोने येऊन त्याला मिठी मारली. आजूबाजूला कोण आहे, याची पर्वा तिने मुळीच केली नव्हती. कारण तिला सुद्धा वाटलं होतं की, आपल्या नवऱ्याने परिस्थितीला कंटाळून बाकीच्यांसारखी आत्महत्या तर केली नाही ना ? तो येईपर्यंत ती असाच विचार करत होती. मनोमन देवाला आपला नवरा सुखरूप असावा अशी प्रार्थना करत होती.
आपण चुकीचा विचार करत होतो, हे अजयला समजले होते. त्याची मुलगीसुद्धा येऊन त्याला बिलगली होती.
" पोरांनो, कुठला चुकीचा विचार करू नका. आपण सगळं गमावलंय माहीत आहे, परंतु आपल्याला परिस्थितीसमोर हरायचं नाहीये. आपण पुन्हा नव्याने सर्व उभारू, परंतु आत्महत्या करणे; हा त्यावरचा पर्याय नाहीये."
पुन्हा एकदा सुधाकर काका सर्वांना बघून बोलत होते.
पुन्हा एकदा सुधाकर काका सर्वांना बघून बोलत होते.
थोड्याच दिवसांनी त्यांना आपल्या घरी जायला मिळाले, परंतु आपले पडलेले घर बघून पुन्हा सर्वांचे अश्रू अनावर झाले होते.
सरकारने मदत करण्याचं आश्वासन तर दिलेलं होतंच, परंतु ज्याला जशी मदत होईल, तसे करून ज्यांचे घर पाण्यात वाहून गेलेले आहे किंवा मोडलेले आहे, तिथे गावकऱ्यांनी ते दुरुस्त होईपर्यंत थोडे दिवस एकामेकांना राहण्यासाठी जागा दिली होती.
कित्येक गुराढोरांचे मृतदेह समोर पडलेले बघून आपल्या गाई-म्हशींची आठवण येत होती. कारण त्यांच्यासाठी फक्त ते दूध उत्पादनाचे साधन नव्हतं, तर घरातील एक सदस्य होते, असेच ते मानत होते. घरातील एखादी व्यक्ती मरण पावल्यावर, जसे वाईट वाटते तसेच त्यांना सुद्धा वाटत होते.
थोडे दिवस असेच गेले आणि त्याच्यानंतर पूर्ण गावकऱ्यांनी मिळून त्यांच्या गावामध्ये जी नदी आहे, तिच्या पाण्याचे नीट व्यवस्थापन करण्यासाठी शासनाला पत्र लिहिलेले होते. त्यांनी गावातील स्त्रियांना जे जलस्त्रोत आहेत, तिथे कपडे धुणे किंवा कचरा टाकणे; हे सर्व बंद करायला सांगितले होते, कारण ज्यावेळेस आपल्या घरातूनच आपण सुरू करू त्यावेळेसच आपल्याला त्याचा चांगला परिणाम दिसतो. हे त्यांना बिकट परिस्थितीने दाखवून दिले होते.
अजय सुद्धा आता बराच सावरला होता आणि त्याने हळूहळू आपल्या घराची घडी बसवण्याचा विचार केला होता. त्याने पुन्हा आत्महत्या करणार नाही, अशी शपथ आपल्या बायको आणि मुलीला दिली होती.
बिकट परिस्थितीतूनही जो खरा मार्ग काढतो आणि पुन्हा नव्याने उमेदीची साऱ्या जगाला शिकवण देतो, तोच खरा भारताचा शेतकरी!
समाप्त.
© विद्या कुंभार
कथा कशी वाटली हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा