बिकट वाट
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
“ए चिकने.. चल पैसा निकाल… नही तो ऐसी गाली देगी ना.” दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर आपटत त्याने मोठ्याने टाळी वाजवली आणि त्याचे लक्ष ऑटोमध्ये बसलेल्या माणसाकडे गेले. त्या माणसाला बघताच त्याने तिथून पोबारा केला.
‘मंगेश! नक्की मंगेशच होता ना तो? पण तो अशा अवतारात? नक्की तोच होता ना?’ श्रीपतीच्या डोक्यात प्रश्नांचा भुंगा घर करत होता.
“ओ रिक्षावाले भाऊ, सिग्नल सुटला. चला की. मागच्या गाड्या हॉर्न देत आहेत. लक्ष कुठंय तुमचं?” ऑटोरिक्षातले प्रवासी म्हणाले आणि श्रीपतीने रिक्षा सुरू केली. डोक्यात मात्र मंगेशचेच विचार सुरू होते.
श्रीपती ऑटोरिक्षा चालक होता. एका प्रवासी वाहन कंपनीच्या मालकाकडे ऑटोरिक्षासहित बऱ्याच गाड्या होत्या. त्या गाड्यांवर ड्रायव्हर ठेवून भाडे तत्त्वावर तो गाड्या द्यायचा. श्रीपती त्याच्याकडेच रिक्षा चालवायचा. श्रीपतीच्या घरात त्याची बायको, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार होता. कामाच्या शोधात श्रीपती गावावरून शहरात आला होता. कसेबसे दोन वेळचे अन्न पोटात जाईल एवढी कमाई तो करत होता.
विचारातच तो प्रवाशांनी सांगितलेल्या स्थळी पोहोचला.
“आम्ही अर्ध्या तासात देवीचं दर्शन घेऊन येतो. इथंच उभे राहा म्हणजे शोधाशोध करायची गरज पडणार नाही.” त्याच्या रिक्षातले प्रवासी म्हणाले आणि दर्शनासाठी निघून गेले. श्रीपती तिथेच उभा होता. बाजूच्या चहाच्या टपरीवरून त्याने एक बिडी विकत घेतली आणि तो बिडी ओढू लागला. मघाचा प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोर परत उभा राहू लागला.
‘तो मंगेशच असेल का?’ ह्या विचाराने त्याच्या हृदयाची स्पंदने अजूनच वाढायला लागली. कपाळावर घामाचे थेंब जमा होऊ लागले, हातापायांना कंप सुटू लागला.
अर्ध्या तासात येतो म्हणून गेलेले ऑटोमधले प्रवासी तासाभरात परत आले. हा एक तास श्रीपतीसाठी एखाद्या युगाप्रमाणे गेला.
परतीच्या वाटेवर असताना परत त्याच चौकात सिग्नलवर रिक्षा थांबली. श्रीपतीची नजर परत मंगेशला शोधायला लागली; पण त्याला तिथे कुणी दिसले नाही.
रिक्षेतल्या प्रवाशांना त्यांच्या ईप्सित स्थळी सोडून श्रीपतीने घर गाठले. घर कसले ते, एका झोपडपट्टीत चार टिनाचे पत्रे ठोकून तयार केलेली झोपडी!
श्रीपती घरी पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. त्याने घरापासून थोड्या दूर अंतरावर रिक्षा उभी केली आणि तो चालतच घराकडे निघाला. अंगणातल्या चुलीवर त्याची बायको रखमा भाकरी करत होती.
“आज उशीर झाला यायला?” श्रीपती दिसल्या दिसल्या रखमाने विचारले.
“हो, आज शहराबाहेरच्या देवीच्या मंदिरात जायचं-यायचं भाडं भेटलं होतं. जत्रा भरली आहे ना त्या मंदिरात.” श्रीपती
“हो का? म्हणजे आजच्या फेरीचे जास्तीचे पैसे मिळतील म्हणायचे.” रखमा लगेच अंदाज लावू लागली.
“रखमे, मंग्या कुठंय?” श्रीपतीने तिला विचारले.
“कुठंय म्हणजे? कारखान्यात गेलाय. रोज जातो की. येईल थोड्यावेळात.” रखमा म्हणाली.
“खरंच का? कारखान्यातच जातो की अजून कुठं जातो? तू विचारलंस का कधी?” श्रीपती रखमाला म्हणाला आणि झोपडीतल्या खाटेवर जाऊन बसला.
“असं का हो म्हणालात? काय झालं? महिना झालाय, पोरगं कारखान्यात जातंय कामाला. चार पैसे कमावून पण आणतंय. आधी काही करत नव्हता तर तुम्हीच बोलत होते ना त्याला.” रखमा त्याला पाणी देत म्हणाली.
“हो, पण पोरगं ह्या थराला जाईल वाटलं नव्हतं.” श्रीपती म्हणाला.
“म्हणजे?” रखमाला प्रश्न पडला.
“काही नाही. मुलींना जेवू घाल आणि झोपी घाल.” श्रीपती म्हणाला आणि झोपडीच्या बाहेर अंगणात अस्वथपणे फेऱ्या मारू लागला. रखमाने स्वयंपाक आटोपला आणि मुलींना जेवू घातले.
“तुम्ही पण दोन घास खाऊन घ्या.” रखमा श्रीपतीला म्हणाली.
“माझी इच्छा नाहीये. आणि आता परत खाऊन घ्या म्हणालीस ना तर लक्षात ठेव.” श्रीपती रागातच म्हणाला.
मध्यरात्र उलटून गेली होती. मंगेशचा अजून पत्ताच नव्हता. रखमाचाही बसल्या जागी डोळा लागला. श्रीपती मात्र जागा होता. रात्री बऱ्याच उशिरा झोपडीचा दरवाजा वाजला. रखमाने उठून दरवाजा उघडला.
“मंग्या, कुठं गेला होतास?” श्रीपती त्याच्यावर ओरडलाच.
“कारखान्यात.” मंगेशने चाचरतच उत्तर दिले.
“कोणत्या?” श्रीपतीचा आवाज वरच होता.
“काचेच्या कारखान्यात. तुम्हाला सांगितलं होतं ना.” खांद्यावरची बॅग सावरत मंगेश म्हणाला. श्रीपतीने त्याच्या कानशिलात जोरदार झापड मारली.
“ती बॅग बघू.” श्रीपती ओरडला.
“काहीच नाही या बॅगेत.” मंगेशच्या आवाजाला कंप सुटला होता.
“अहो,” रखमा पुढे बोलायला जाणार तोच श्रीपती तिच्यावर गरजला,
“तू गप्प बस. मी बोलतोय ना.”
श्रीपतीने ओरडतच मंगेशच्या खांद्यावरची बॅग ओढली. तिची चैन उघडली आणि ती बॅग जमिनीवर झटकली. त्या बॅगेतून साडी, ब्लाऊज, पावडर, टिकल्या, लिपस्टिक असे बरेच सामान बाहेर पडले. ते बघून रखमा पुरती हादरून गेली.
“मंग्या, अरे कोणत्या जन्माच्या पापाची शिक्षा देतोय आम्हाला. तू असा असशील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.” श्रीपती त्याच्यावर ओरडला. त्याच्या आवाजाने मुलीही झोपेतून उठल्या. भेदरलेल्या नजरेने त्या इकडे तिकडे पाहू लागल्या.
“नाही बापू, मी तसा नाहीये. आये, तू तरी सांग गं.” मंगेश रडू लागला.
“काय सांगणार, घरातला तरणाताठा मुलगा, मुलगाच नाही हे कळल्यावर मी काय सांगणार.” रखमाला खूप मोठ्ठा धक्का बसला होता.
“बापू, खरंच. माझ्या तिन्ही बहिणींची शप्पथ घेऊन सांगतो, मी असा नाहीये.” मंगेश धाय मोकलून रडत होता.
“हे बघ, पोरींच्या खोट्या शपथा घेऊ नकोस आणि क्षणभरही इथं थांबू नकोस. ” श्रीपतीने रागातच त्याच्या मुठी आवळल्या.
“आये, तू तरी ऐक माझं. मी तसा नाहीये.” मंगेश
“अरे, असा जन्माला येण्यापेक्षा तू मेलेला कधीही परवडला असता.’ रखमा डोळे पुसत म्हणाली.
“आये, बापू माझं फक्त एकदा ऐकून घ्या. त्याच्यानंतर मी क्षणभरही इथं थांबणार नाही.” मंगेश
“बोल लवकर. अन् लवकर इथून निघ.” श्रीपती गरजला.
“बापू, आई मी तुमचे कष्ट लहानपणापासून बघत आलोय की. दरिद्री आपली पाठ सोडायला तयार नव्हती. आय.टी. आय. झाल्यावर मला बरी का होईना नोकरी लागेल याची तुम्हा सगळ्यांना आस होतीच ना? मला चांगली नोकरी लागल्यावर माझ्या बहिणींच्या शिक्षणाचा, लग्नाचा भार मी उचलू शकेल असं मलाही वाटायचं; पण नकोरी लागलीच नाही. वणवण भटकलो त्या नोकरीसाठी; पण नेहमी निराशाच वाट्याला आली.
शेवटी काचेच्या कारखान्यात नोकरी मिळाली; पण पगार तुटपुंजा! त्यात सगळा खर्च भागणं शक्यच नव्हतं. एक दिवस मी आणि माझा कारखान्यातला मित्र हाय-वेवर गेलो होतो. तिकडं असे काही लोकं गाड्या थांबवून बरेच पैसे गोळा करत होते. दोन तीन तासांत त्यांनी बरीच रक्कम गोळा केली होती.
आम्ही पण गंमती गंमतीमध्ये असे पैसे कमवायचे असं ठरवलं. आणि एका दिवसात रस्त्यावर उभं राहून बरेच पैसे कामावलेही. नंतर मग आम्ही रोजच कारखान्यातलं काम संपलं की साड्या नेसून रस्त्यावर जायचो. पैसे गोळा करायचो.
तेव्हा माहीत नव्हतं की अशा लोकांची एकमेकांना खबर असते, त्यांचाही म्होरक्या असतो. आमचं बिंग फुटू नये म्हणून आम्हाला त्याच्यासोबतही खोटं बोलावं लागलं.
या दलदलीत फसलोय मी, आता बाहेर पडणं शक्य नाहीये.” मंगेश रडत होता. श्रीपती रखमाला काय बोलावे, काहीच सुचत नव्हते.
मंगेश तिथून जाऊ लागला तितक्यात श्रीपतीने त्याला थांबवले.
“बापू, आता ह्या चक्रातून माझी सुटका नाही. मी जर रोज तिकडं गेलो नाही तर ते लोकं मला शोधत इथं येतील.” मंगेश
“एक उपाय आहे.” श्रीपती
“कसला उपाय?” रखमा
“आपण पहाटेच हे शहर सोडून जातोय. गावी जाऊ. तिथं शेतात मजुरी करू. दोन घास कमी खाऊ पण समाधानाचे खाऊ. वाट अवघड असली तरी चालते; पण ती चुकीची नसावी.
तुम्ही पहिल्याच बसने पुढे जा. मी रिक्षा परत करून पैशाचा हिशोब करून पाठीमागून येतोच. कुणाला काही न सांगता हे शहर सोडा.” श्रीपती म्हणाला. रखमाने ताबडतोब सामानाची बांधाबांध केली. उजाडायच्या आत सर्वांनी ती झोपडपट्टी सोडली. पहिल्या बसने मंगेश, रखमा आणि त्याच्या तिघी बहिणी गावी निघाल्या. श्रीपतीही रिक्षा परत देऊन आणि पैशाचा हिशोब करून दुपारच्या गाडीने गावी पोहोचला.
गावातल्या शेतात सर्वजण कष्ट करून सुखासमाधानाने जीवन जगू लागले.
प्रस्तुत कथा ही संपूर्णपणे काल्पनिक आहे.
समाप्त
©® डॉ. किमया संतोष मुळावकर
©® डॉ. किमया संतोष मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा