बींदणी-6

त्या मंदिराचं रहस्य..

#बींदणी 6

रघुवीरने असा टोमणा मारल्यापासून कौमुदीला त्याचा अजूनच राग आलेला. त्यातल्या त्यात ग्रुपमध्ये प्रांजल असल्याने तिला एक दिलासा होता. प्रांजल मुळात अबोल, शांत आणि गोड मुलगी. कौमुदी आणि ती वेगवेगळ्या ग्रुपसोबत असायचे त्यामुळे दोघींचं फारसं बोलणं व्हायचं नाही, पण प्रोजेक्टच्या निमित्ताने दोघी एकत्र आल्या. रघुवीर कौमुदीला उशिरा येण्याबद्दल बोलला तेव्हा प्रांजलने सावरून घेतलं,

"अरे रघुवीर, इतकं काही लेट नाही झालेलं, आपण आता मुद्द्याचं बोलूया.."

"तर प्रोजेक्ट कुठला घ्यायचा ते.." कौमुदी आणि रघुवीर एकत्रच बोलले आणि एकदम शांत झाले. प्रांजल आणि आविष्कार एकमेकांकडे बघून हसू लागले. कौमुदी म्हणाली,

"ठीक आहे तू बोल.."

"नको, लेडीज फर्स्ट, तू बोल.."

कौमुदीने पुन्हा एकदा त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली,

"तर आपण प्रोजेक्ट कुठला निवडवयचा, म्हणजे विषय कोणता घ्यायचा यावर थोडी चर्चा करूयात..कारण विषयावर सगळं काही अवलंबून असेल"

"बरोबर, हा विषय कसा शोधायचा? लास्ट year च्या सिनियर्स कडून माहिती घ्यायची का?"- प्रांजल

"त्यापेक्षा आपण मांगले सरांशी याबद्दल बोलूयात का?"- आविष्कार

तेवढ्यात मांगले सर मागून आले, त्यांना बघताच सर्वजण उठून उभे राहिले.

"गुड इविनिंग सर."

"गुड इविनिंग.. बसा.."

असं म्हणत मांगले सर त्यांच्याशेजारी खुर्ची टाकून बसले आणि सदूला आवाज दिला.."सदूभाऊ पाच चहा आणा प्लिज.."

मांगले सर असे निवांत आपल्यासोबत बसले याचा त्या चौघांना फायदाच झाला.

"तर तुम्ही प्रोजेक्टबद्दल विचारत होतात ना?"- मांगले सर

"हो सर, शेवटच्या वर्षाचा हा शेवटचा प्रोजेक्ट, त्यामुळे काहीतरी अफलातून रिसर्च झाला पाहिजे असा आमचा विचार आहे.."- रघुवीर

"चांगला विचार आहे..तू रघुवीर ना? खूप ऐकलं आहे तुझ्याबद्दल.. वर्गात टॉप, स्पोर्ट्स मध्ये टॉप..student of the year अवॉर्ड..मस्त.."

रघुवीरच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं, कौमुदी त्याचं कौतुक ऐकत होती...पण मुद्दाम ऐकून न ऐकल्यासारखं दाखवत होती. असा attitude असणारा मुलगा कितीही हुशार असला तरी काय फायदा?

"Thank you सर.." - रघुवीर

"बरं प्रोजेक्टबद्दल म्हणाल तर भरपूर विषय आहेत..जसे की आधुनिक ब्रिज, पाण्याखालील सरंचना, डोंगरावरील स्थापत्य.."

बोलता बोलता सरांचं लक्ष कौमुदीच्या नाकावर असलेल्या तीळकडे गेलं...

"कौमुदी बाळ नाकाला काहीतरी लागलंय तुझ्या.."

"नाही सर, तीळ आहे जन्मतः.."

मांगले सरांनी चहाचा कप खाली ठेवला..कितीतरी वेळ काही विचारात ते बुडाले...

"सर हे विषय नेहमीचेच झालेत..काहीतरी वेगळं सांगा.."- आविष्कार

"माझ्याकडे एक विषय आहे पण तुम्हीच काय, कुणीही त्या प्रोजेक्टवर काम करणार नाही"

"सर सांगा तर खरं!"

"राजस्थानमधील एका जिल्ह्यात अकराव्या शतकातील एक मंदिर आहे. त्या गावात कुणीही रहात नाही. पर्यटक त्या मंदिरात फक्त भेट द्यायला येतात आणि निघून जातात..ते मंदिर अश्या पद्धतीने बनवलं आहे की ते स्ट्रक्चर आपल्यावर कोरलेली शिल्प कसं पेलून धरतं हा सांशोधनाचा विषय आहे.."

"राजस्थान म्हणजे आपल्या रघुवीरचं मूळ...काय रघुवीर?"- प्रांजल

"हो पण कित्येक वर्षांपासून आम्ही तिकडे गेलेलो नाही"- रघुवीर

"पण हा प्रोजेक्ट खरंच इंटरेस्टिंग वाटतोय.. मला वाटतं हाच विषय आपण घ्यावा.."- कौमुदी

मांगले सरांनी आशेने कौमुदीकडे पाहिलं आणि तिच्या नाकावरची तीळ पुन्हा एकदा न्याहाळली..

"हो खरंच.. थ्रिलिंग आहे हे..आणि एक राजस्थान ट्रिप पण होईल आपली.."- आविष्कार

"थांबा थांबा..इतकं सोपं नाहीये ते..त्या गावात एकही माणूस रहात नाही. त्यामागे एक पुरातन गोष्ट सांगितली जाते.."

चौघेही कान देऊन ऐकू लागतात..

"त्या गावात खूप लोकं होती. एकदा काही साधू आणि त्यांचे शिष्य तिथे मंदिराला भेट द्यायला आले होते. रात्री त्यांनी मंदिरातच मुक्काम केला. पण रात्रीतून अचानक त्या साधूंची तब्येत बिघडली. त्यांचे शिष्य सर्वांकडे मदत मागू लागले पण गावात कुणीच तयार होईना..तेव्हा एक तरुण जोडपं त्यांच्या मदतीला धावून आलं. त्यांनी साधूंची मदत केली आणि साधूंना बरं वाटू लागलं. साधूंनी त्यांना आशीर्वाद दिला की तुम्हाला जगातली सगळी सुखं प्राप्त होतील. तेवढ्यात तिथे गावातील एक असुर आला..तो विचारू लागला की माझ्या परवानगीशिवाय या साधूंची मदत केलीच कशी? असं म्हणत त्याने एकेकाला तिथेच मारलं. असुर निघून जात होता, पण त्या साधूंमध्ये अजूनही प्राण होते..त्यांना लक्षात आलं की आपण या जोडप्याला जगातील सर्व सुखं मिळतील असा आशीर्वाद दिलाय, तो पूर्ण होण्यासाठी हे जोडपं जन्म मरण आणि पुनर्जन्माच्या फेऱ्यात अडकून राहील...साधूंनी तात्काळ उपाययोजना केली, त्यांनी त्या दोन्ही जोडप्यांच्या मृतदेहाला मूर्तीत बदललं आणि अजून एक वरदान दिलं..की निस्वार्थपणे एकमेकांवर प्रेम करणाऱ्या जोडप्याच्या रुपात तुम्ही पुनर्जन्म घ्याल, पुन्हा इथेच याल आणि या मूर्त्याना स्पर्श करताच याच जन्मात तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल..असं म्हणत त्या साधूंनी प्राण सोडला..पण त्यानंतर गावाची दुर्दशा सुरू झाली, साधू आणि त्यांच्या शिष्यांचे आक्रोश गावात रात्री अपरात्री ऐकू येऊ लागले. एकेक करून सर्वांनी गाव सोडलं आणि त्या गावात आज एकही मनुष्य राहत नाही"

कौमुदी, रघुवीर, प्रांजल आणि आविष्कार श्वास रोखून सगळं ऐकत होते...त्यांना भीतीही वाटत होती, असल्या होंटेड जागेवर जाऊन आपण रिसर्च करायचा?

चौघेही विचारात पडले. एक तर ही कहाणी ऐकून आधीच त्यांची भीतीने गाळण उडाली होती. मांगले सरांच्या ते लक्षात आलं, ते हसले आणि म्हणाले,

"जुनी गोष्ट आहे ही, आणि तुम्हाला तिथे काही मुक्काम नाही करायचा..दिवसातील काही तास जाऊन फक्त रिसर्च करायचा..तेव्हा मंदिरात इतर पर्यटकही असणारच.."

"सर यावर पुन्हा एकदा विचार करतो.."- प्रांजल

क्रमशः


🎭 Series Post

View all