बींदणी 7

अनोखी प्रेमकहाणी
#बींदणी 7

आविष्कार, कौमुदी, प्रांजल आणि रघुवीर.. चौघेही रात्री प्रोजेक्टचा विचार करत होते, तेवढ्यात त्यांच्या फोनची रिंग वाजली आणि त्यांनी बघितलं..आविष्कारने त्यांच्या प्रोजेक्टसाठी व्हाट्सअप्प ग्रुप बनवला होता आणि चौघेही त्यात ऍड झाले होते.

चौघेही ऑनलाइन होते, कौमुदी आणि रघुवीरला एकेमकांचे नंबर मिळाले आणि दोघांनी सेव्ह करून घेतले. कौमुदीने कुतूहल म्हणून रघुवीरचा प्रोफाइल पीक पाहिला आणि ती पाहतच राहिली.. इतका हँडसम दिसत होता ना तो...दाट आणि हवेत उडणारे केस, त्याचा गोरापान रंग आणि काळेभोर डोळे.. एखाद्या चित्रपटातला नायकच जणू! ते पाहून तिच्या मनात काय आलं कोण जाणे, तिने क्रांतीच्या लग्नातील तिचा एक फोटो शोधला आणि पटकन तिचा आधीचा एक साधा dp काढून नवीन ठेवला.

काही वेळाने ग्रुपवर रघुवीरचा मेसेज..

"हम तो है ही हुसन के बादशहा,
पैर फिसला मत लेना..
बदला गर किसिने हुलिया अपना..
तो चौंक मत जाना.."

या मेसजेला आविष्कार आणि प्रांजलने "छान शायरी" म्हणून रिप्लाय दिला पण ती एक कौमुदी होती तिने जिने हे वाचताच तिला गरगरू लागलं..स्वतःवर हसावं की रडावं तिला कळेना..

ही शायरी रघुवीरने मुद्दाम टाकली..आपण आपला डीपी बदलला म्हणून..काय अर्थ काढला असेल त्याने याचा? म्हणजे यानेही माझा डीपी पाहिला आणि मी तो बदलला हे त्याच्या लक्षात आलं आणि...

एक ना हजार प्रश्न तिच्या डोक्यात तयार झाले आणि तिला कसंतरी वाटू लागलं..परत मेसेज टोन वाजली..रघुवीरने कौमुदीला मेंशन केलं आणि विचारलं..

"तुला नाही आवडली का माझी शायरी??"

कौमुदीला आता काय करू अन काय नको असं झालं..हा रघुवीर दिसतो तेवढा साधा नाहीये..कसं बरोबर त्याने आपल्याला एक शब्दही न बोलता झालेल्या गोष्टीला समोर आणलं..

"छान.." एवढाच रिप्लाय तिने दिला..

"अरे प्रोजेक्टचं काय ठरवलं तुम्ही?"- आविष्कार

"माझं तर नाही आहे.."- प्रांजल

"मला करायचा आहे.." - रघुवीर

"मलाही वाटतंय की हे करावं.."- आविष्कार

आता कौमुदीच्या निर्णयावर सगळं अवलंबून होतं.. सर्वांनी कौमुदीला विचारलं..

कौमुदीचा निर्णय अजूनही झाला नव्हता. पण तिच्या मनात एक कल्पना आली, आपण जर या प्रोजेक्टला हो म्हटलो तर त्यानिमित्ताने राजस्थानला जायचा योग येईल. तसं पाहिलं तर तेच तिचं आजोळ होतं. आजवर तिला आजोळ म्हणजे माहीतच नव्हतं. वेळ आली तर आईलाही नेता येईल..आणि आईला तिच्या माहेरी जायची संधी मिळाली तर तिला किती आनंद होईल..

आज आई वडिलांकडून तिने हे ऐकलं त्यावरून तिला एवढं तर कळलं होतं की आईने तिचं माहेर गमावलं. तिने मनाशी विचार केला आणि लगेच ग्रुपवर कळवलं..

"मी तयार आहे.."

तिकडून लगेच रघुवीरचा रिप्लाय..

"ग्रेट.."

तेवढ्यात प्रांजलने तिला पर्सनल मेसेज केला..

"अगं मला फार भीती वाटतेय..एक तर आपण दोन्ही मुलीच.. एवढ्या लांब कसं जाणार.."

"आविष्कार आणि रघुवीर आपल्यासोबत असल्यावर काय टेन्शन?"

या उत्तरावर काय बोलावं प्रांजलला समजत नव्हतं, पण आता ग्रुपमध्ये तिघांची संमती असल्याने तिनेही घाबरतच होकार दिला..

अखेर ठरलं..राजस्थानला जायचं, प्रोजेक्ट पूर्ण करायचा..

वर्गातील इतर ग्रुपही कामाला लागले होते. कौमुदीचा एकटीचा ग्रुप असा होता ज्याने सर्वात अवघड असा प्रोजेक्ट निवडला होता. बाकी संघांनी जवळपास एखाद्या साइटवर प्रोजेक्ट करायचं ठरवलं होतं.

दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये लवकर येऊन चर्चा करायची असं आविष्कारने सांगितलं. चौघेही कॉलेजमध्ये अर्धा तास आधी पोहोचले. योगायोगाने मांगले सरही त्यादिवशी सुपरवायझरच्या कामासाठी लवकर आले होते. ते दिसताच प्रांजलने त्यांना हाक मारली, सरांच्या लक्षात आलं आणि ते म्हणाले,

"काय ठरलं मग?"

"सर आम्ही प्रोजेक्ट करणार आहोत.."

हे ऐकताच मांगले सरांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली. ते खुश झाले..

"अरे वा.. उत्तम केलंत! आता पटापट कामाला लागा..तिथल्या मंदिराची माहिती घ्या, काय काय करायचं आहे..कुठला रिसर्च करायचा आहे हे आधी ठरवून ठेवा..मग एक दिवस ठरवून तिथे दौरा काढा.."

"हो सर.."

चौघेही एकसुरात हो म्हणाले, सर निघून जाताच चौघेही कँटीनमध्ये गेले.

"चला, आता शिवधनुष्य उचललं आहे तर पेलावं लागेलच.."

रघुवीर असं म्हणाला आणि कौमुदीला आश्चर्य वाटलं..रघुवीर मूळ मारवाडी असून अस्खलित मराठी बोलायचा, कुणाला वाटणारच नाही की हा अमराठी आहे म्हणून..

"आपण आधी पॉईंट्स काढून ठेवूया, तिथल्या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे ते.." - आविष्कार

"मांगले सरांनी त्याची काहीतरी स्टोरी सांगितली होती ना?"- प्रांजल

"हो पण त्या किती तथ्य आहे कुणाला माहीत? आपल्या प्रोजेक्टसाठी त्याचा काही उपयोग नाहीच..आपल्याला शास्त्रीय दृष्टिकोन ठेऊन काम करावं लागेल"- रघुवीर

रघुवीरच्या बोलण्यातील "तथ्य", "शास्त्रीय दृष्टिकोन" हे शब्द ऐकून कौमुदी पुन्हा आश्चर्यचकित झाली.

क्रमशः


🎭 Series Post

View all