बींदणी- 2

रघुवीर आणि कौमुदी
कौमुदीचं दाबून धरलेलं तोंड त्याने मोकळं केलं आणि तिने दीर्घ श्वास घेतला. मटकन खाली बसून घेतलं. तिचं डोकं चालेना. रघुवीरतिच्या समोर आला आणि म्हणाला,

"आपल्याकडे दोनच पर्याय आहेत, काही दिवस यांच्यासमोर नवरा बायको म्हणून वावरायचं, किंवा बाहेर जाऊन त्यांना सगळं सरळ सरळ खरं सांगून टाकायचं...पण त्यांना जर खरं सांगितलं तर आम्हाला समाजाबाहेर टाकणार एवढं खरं.."

रघुवीरच्या बोलण्यात खरेपणा होता, एक दुःखं होतं. कौमुदीने शांतपणे डोळे मिटले आणि म्हणाली,

"ठीक आहे..."

(फ्लॅशबॅक)

इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाचा वर्ग सुरू होता. मांगले सर सर्वांना प्रोजेक्टची माहिती देत होते.

"आता तुमचं इंजिनिअरिंग शेवटच्या टप्प्यात आलं आहे. हे शेवटच्या वर्षाचं दुसरं सेमिस्टर. आतापर्यंत तुम्ही सगळी थेअरी शिकलात, आता प्रॅक्टिकल म्हणून हा प्रोजेक्ट असतो. शेवटच्या वर्षाचे गुण या प्रोजेक्टवर अवलंबून असतील तेव्हा काळजीपूर्वक यामध्ये सर्वांनी लक्ष घाला..मी तुमचे काही ग्रुप्स पाडून देईन त्यानुसार सर्वांनी एकत्र काम करायचं आहे"

वर्गातील मुलं चुळबूळ करायला लागली. त्यांचे ग्रुप्स आधीच ठरलेले होते, आपापले मित्र जमा करून त्यांनी आधीच ग्रुप बनवले होते.

"मास्तरने हे काय नवीन काढलं? आपला ग्रुप तर फिक्स होता ना?" - विरेन

"हो ना बे, आता तुझ्या ग्रुपमध्ये जर किश्या आला तर.." - वरुण

"शुभ बोल रे नाऱ्या.." - विरेन

वरुण किशनकडे हात करून..

"ए किश्या..."

किशन त्याच्या भिंगाच्या चष्म्यातून घाबरून वर बघतो, नाकावरचा चष्मा मध्ये ढकलत - "काय रे..."

विरेन वरुणला थांबवून.."गप रे..आधीच कायम फाटलेली असते त्याची.."

दोघेही हसायला लागतात...किशन वाकडं तोंड करत पुन्हा पुस्तकात डोकं घालतो. तेवढ्यात रघुवीर वर्गात शिरतो..

"मे आय कमीन सर.."

"या या साहेब, या...ए सर्वांनी स्वागत करा रे महाशयांचं.."

रघुवीर डोकं खाजवत आत शिरतो..

"मग आज काय कारण? गाडी पंक्चर झाली, ट्राफिक होती, चुलतआजोबा गेले सगळी कारणं झालीये.."

"आजोबांचं तेरावं होतं.."

सगळा वर्ग हसायला लागतो...

इकडे मुलींच्या ग्रुपमध्ये निशा आणि कौमुदी एका बाकावर बसून त्याही हसण्यात सामील होतात. निशा म्हणते,

"काही म्हण, पण हा रघू काय दिसतो यार...मारवाडी आहे पण अस्खलित मराठी बोलतो...त्याची उंची, रंग..यार याने मॉडेल व्हायला हवं होतं.."

"तुला आवडतो का तो? विचारू का त्याला?"

"ए गप...खरं तर मला आवडलं असतं, पण घरच्यांना आवडणार नाही.."

"हे भगवान, कुठच्या कुठे विचार करता मॅडम तुम्ही.."

रघुवीर बाकावर येऊन बसतो आणि संपूर्ण वर्गाकडे नजर फिरवतो.. हळूच एका कटाक्षाने कौमुदी आलीये का बघतो..


🎭 Series Post

View all