बींदणी -3

रघुवीर आणि कौमुदी
#बींदणी-3

कौमुदी कॉलेजात सर्वांना ओळखीची झालेली. तिचा साधेपणा, तिचे बोलके डोळे..कुणाच्याही नजरेत पटकन भरेल असं तिचं रूप. आजवर अनेक मुलांनी तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता पण साधी मान वर करून न पाहणारी ती, कुणालाही तिने जवळ येऊ दिलं नाही.

याउलट रघुवीर, जवळपास प्रत्येक मुलगी त्याच्या रूपावर भाळलेली. त्याच्याशी मैत्री करण्यासाठी मुली कारणं शोधायची. तेव्हा कॉलेजमध्ये वातावरण असं फारसं मोकळं नव्हतं. मुलांशी बोलायचं, भेटायचं तेही मर्यादित. असं समोरासमोर जाऊन प्रेमाची कबुली देणं, सहजासहजी एकमेकांना भेटणं सोपं नव्हतं. एखाद्याला कुणी आवडलंच तर नजर चुकवून त्याला बघायचं एवढंच काय ते करू शकत.

कौमुदीला कधी जाणवलं नाही की रघुवीर आपल्याकडे कधी बघतोय किंवा बोलायचा प्रयत्न करतोय ते. माझ्या नावाची मुलगी या कॉलेजात आहे याची त्याला भणकही नसावी. आणि खरंच तसं झालं..

कॉलेज सुटल्यावर कौमुदी आणि तिची मैत्रीण पार्किंगकडे येत होते. कौमुदीने स्कुटीची चावी काढली, तेवढ्यात समोरून रघुवीर येताना दिसला, तो एकटाच होता. कौमुदीची नजर काही क्षण त्याच्यावर स्थिरावली. पण त्याने साधं पाहिलंही नाही.. त्याक्षणी कौमुदीचा अहंकार काहीसा दुखावला गेला. ती स्वतःशीच पुटपुटत म्हणाली,

"जाऊदे मला काय..."

तिने गाडीला चावी लावली तोच गाडीच्या पुढच्या डिकीत एक कागद सापडला. ती आणि तिची मैत्रीण एकमेकांकडे बघू लागल्या..

"काय आहे उघड तर खरं.."

कौमुदीने कागद उघडला, त्यात लिहिलं होतं..call me 87********

दोघीही एकमेकींकडे बघून हसू लागल्या...

"अगं काय हे? पण तुझ्यासाठी आहे की माझ्यासाठी?"

"हा पण मोठा प्रश्न आहे.."

"आपण रोज गाडी आणतो, एकदा तुझी एकदा माझी..मग आता काय समजायचं?"

त्या दोघींच्या अजून दोन मैत्रिणी तिथे आल्या. त्यांना हे प्रकरण समजलं आणि त्याही जागेवरच हसायला लागल्या. त्यातल्या एकीने ठरवलं, आपण मोबाईल वरून नको, coin box वरून नंबर लावूयात..

सर्वांनी गाड्या काढल्या आणि त्या निघाल्या.. जाताना कौमुदीने कॉलेजच्या प्रवेशद्वाराकडे एक नजर टाकली, रघुवीर तिथे बसून मोबाईल वर बोटं फिरवत होता. तिने डोळे फिरवले आणि गाडी काढली.

मैत्रिणींनी जवळच्या दुकानापाशी गाडी थांबवली, एकीने चिट्ठीतला नंबर फिरवला..चौघीजणी कान देऊन ऐकू लागल्या, आणि मग तिकडून आवाज आला,

"आपने डायल किया हुआ नंबर गलत है."

"धत तेरे की...परत लाव, नंबर चुकीचा डायल केला वाटतं.."

दोन तीन वेळा नंबर लावून तेच..

"काय मुलगा आहे, मुलीला नंबर देतो तेही चुकीचा??"

चौघींमध्ये हशा पिकला..सर्वजणी तिथून निघाल्या पण ते एक गूढ कायम राहिलं, की चिठ्ठी टाकली कुणी होती??

कौमुदीने आपल्या मैत्रिणीला घरी सोडलं आणि ती घरी जायला निघाली. कौमुदीने आज उपास केला होता.. त्यामुळे तिने डबाही नेला नव्हता. त्यानेच तिला अचानक भोवळ आली..गाडीचा तोल गेला.. तेवढ्यात एका अज्ञात इसमाने तिला सावरलं आणि घरी दाराशी सोडलं. तिने मागे वळून पाहायच्या आत तो इसम अदृश्य झाला. आईने दार उघडलं आणि तिला आत घेतलं..

"चक्कर आली का? बस, पाणी घे..कुणी सोडलं तुला? आणि गाडीवरून पडली असतीस तर?" आई तिला रागवत होती..

कौमुदीने थोडंसं खाल्लं आणि ती खोलीत निघून गेली..

काही वेळाने तिला बरं वाटू लागलेलं, ती पडूनच होती. पडल्या पडल्या अनेक विचार तिच्या मनात येत होते. कोण होता ती माणूस ज्याने मला पकडून घरापर्यंत आणलं? मला नीट आठवतसुद्धा नाही..त्यानंतर तिला कॉलेजच्या नंबर वाल्या किस्स्यावरून हसू आलं...मग अचानक रघुवीर आठवला, त्याने तिच्याकडे पाहिलं नाही याचा तिला राग आलेला खरं तर, कारण आजवर तिला दुर्लक्षून कुणीही समोरून गेलं नव्हतं..ती स्वतःशीच बोलू लागली..

"तो समोरून गेला आणि समजा तुझ्याकडे पाहिलं असतं तर तू काय त्याला स्माईल दिली असतीस का? नाही ना? तू attitude मारत नजर फिरवली असतीस..मग कशाला हे नखरे करतेस?"

तिला हसावं की रडावं कळेना. ती पुस्तक हातात घेऊन बसली, परीक्षा लवकरच येत होती...
क्रमशः

🎭 Series Post

View all