बींदणी 5

रघुवीर आणि कौमुदी एकाच प्रोजेक्टमध्ये
प्रांजल, आविष्कार आणि रघुवीर एकमेकांशी चर्चा करायला रिसेस मध्ये एकत्र जमले. तिघांमध्ये तशी फारशी ओळख नव्हती पण प्रोजेक्टमुळे त्यांना ओळख करून घेणं भाग होतं. पार्किंग मधील एका झाडाखाली उभे राहून तिघेजण चर्चा करत होते. रघुवीर एक पाय गाडीच्या पेडलवर आणि एक हात हँडलवर ठेऊन दिमाखात बोलत होता, आणि बाकी दोघे समोर हाताची घडी घालून उभे होते. निशा आणि कौमुदी कॉलेजच्या मुख्य दरवाजाशेजारी असलेल्या खिडकीतून गजांवर हात ठेवून बघत होत्या. निशा म्हणाली,

"कौमुदी जा...बुडत्याला काठीचा आधार.."

"ही म्हण कशी आठवली तुला.."

"एकेक म्हणी आठवू लागल्या आहेत..अडला हरी..गाढवाचे पाय धरी.."

"बस गं ए.."

"आलिया भोगासी..."

"आता बस करते का.."

दुसरीकडे विरेन, वरुण, किशन आणि रुपाली यांचा एक ग्रुप बनवला गेलेला. विरेनसोबत उभ्या आयुष्यात कोणत्याही मुलीने मैत्री केली नव्हती, ग्रुपमध्ये रुपाली आलीये म्हटल्यावर त्याच्या मनात उकळ्या फुटत होत्या. विरेन, वरुण आणि रुपाली एकत्र जमले आणि कॉलेजच्या गेटपाशी उभे राहून बोलू लागले.

"Hii.. मी रुपाली.."

"तुला ओळखतो आम्ही...मागच्या वर्षी नाही का वर्गात शिरताना कशी धपकन पडली होती.." विरेन

वरुणने डोक्यावर हात मारून घेतला आणि हळूच त्याच्या कानाजवळ पुटपुटला..

"म्हणून तुला आजवर एकही मैत्रीण नाही.."

रुपालीला कसंतरी झालं, तिचा चेहरा पडला..वरुणला ते दिसताच त्याने सावरून घेतलं..

"त्यात काय इतकं..आपण कधी पडत नाही का? आणि मला तर आठवतही नाही..ते जाऊद्या, आपण प्रोजेक्टबद्दल बोलूयात.."

त्यांचं बोलणं किशन लांबून बघत होता. तोही त्यांच्या ग्रुपमध्ये होता पण एकतर आधीच तो घाबरट, त्यात विरेन आणि वरुण त्याला नको नको करून सोडायचे.

वरुणचं त्याच्याकडे लक्ष जाताच तो म्हणाला,

"तो बघ..पनौती.."

"ए असं काय बोलताय त्याला.. लाजाळू असला तरी हुशार आहे तो.."- रुपाली

"बोलव रे त्याला.."- वरुण

विरेनने जोरात शिट्टी मारली आणि त्याला हातवारे करून जवळ बोलावलं. ते बघताच किशन खुश झाला, लहान मुलासारखा उड्या मारत त्यांच्याजवळ गेला.

"किश्या भाऊ...सांगा काय प्रोजेक्ट करायचा.."

मला एक विषय सुचलाय.." secret behind the construction of ancient Indian temples on the basis of mathematics, astrology and engineering"

तिघेही चाट पडले..

किशनने डोळ्यावरचा चष्मा वर करत घाबरत तिघांकडे पाहिले..

"विषय आवडला नाही का..?" - किशन

विरेन त्याच्याजवळ गेला आणि त्याला खोटं खोटं रडत मिठीच मारली,

"तूच रे...तूच तारणहार आमचा..."

किशन कसाही असला तरी त्याच्या हुशारीचा फायदा सर्वांना होणार होता. ते चौघे हा विषय घेऊन मांगले सरांकडे गेले.

"विषय चांगला आहे, पण तुम्हाला पूर्ण रिसर्च करावी लागेल. Temples म्हटले की भारतात अगणित मंदिरे आहेत. कुठलेही एक निवडून त्यावर केस स्टडी सुरू करा"

रघुवीर आणि आविष्कार मांगले सरांकडे असाईनमेंट वर सह्या घेण्यासाठी आले होते. त्यांनी ते सगळं ऐकलं. सही झाल्यावर दोघेही बाजूला आले आणि बोलू लागले,

"च्यायला यांचा तर विषय पण फायनल झाला..आपण काय करायचं? आपला तर ग्रुप अजून एकत्र आलेला नाही.." आविष्कार

"सगळे आलेत सोबत, पण कोण ती एक मुलगी..ती बाकिये.."- रघुवीर

"ती कौमुदी?"

"हा तीच."

"चल मग, शोधू तिला.."

आविष्कार आणि प्रांजलची एकाच कलासमध्ये असल्याने ओळख होती, त्याने तिला फोन लावून बोलावून घेतलं. तिघेही कौमुदीला भेटायला निघाले. कौमुदी वर्गातच जात होती. मागून आविष्कार, रघुवीर आणि प्रांजल येत होते. त्यांच्याही मागे विरेन आणि वरुणची मस्ती चालत होती. वरुणने विरेनला जोरात ढकललं, तो रघुवीर वर जाऊन आदळला..आणि पुढे कौमुदीने असल्याने रघुवीर कौमुदीवर जाऊन धडकला. कौमुदी पडणार तेवढ्यात रघुवीरने तिला सावरून घेतले. आज पहिल्यांदा इतक्या जवळून दोघांची नजरानजर झाली होती. कौमुदी कितीतरी वेळ त्याचे बोलके डोळे, त्याच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर पुढे आलेले दाट काळभोर केस आणि त्याचं भारदस्त शरीर..ती त्याच्यात हरवून जात होती..अगदी 2 सेकंद हे सगळं घडलं आणि दोघेही भानावर आले. कौमुदी ओरडली,

"काय मूर्खपणा आहे हा?"

"मी नाही...हा विरेन.."

"कळलं.." असं म्हणत कौमुदी तिच्या जागेवर येऊन बसणार तोच रघुवीरने तिला आवाज दिला..

"Excuse me.."

कौमुदीने परत मागे वळून पाहिलं..

"आपण एका प्रोजेक्टमध्ये आहोत तर आपल्याला पुढील प्लॅन ठरवावा लागेल..संध्याकाळी आपण सगळे भेटूया, कॅन्टीन मध्ये..मिस...काय नाव तुमचं??"

कौमुदीचा संताप झाला, आपण इतके टाकाऊ आहोत का की याला माझं नावही माहीत नाही??

"कौमुदी..." ती रागारागानेच बोलली....

कॉलेज सुटलं आणि तिघेजण कँटीनमध्ये येऊन बसले. कौमुदी कँटीनजवळ आली तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की तिची फाईल वर्गातच राहिली आहे. ती परत दोन जिने चढून वर गेली. फाईल आणत तिला वेळ झाला. धाप टाकतच ती कँटीनमध्ये आली. तिथे तिघेजण हिची वाटच बघत होते. रघुवीर तिच्याकडे रोखून बघत होता. ती बसताच त्याने पाण्याची बॉटल तिच्या पुढ्यात ठेवली. तिला मनात वेगळीच पण गोड अशी चलबिचल झाली.

"प्रोजेक्ट पूर्ण करायचा तर सर्वांनी वेळेची शिस्त पाळली पाहिजे"

रघुवीर म्हणाला तसं तिच्या पाण्याचा घोट घशातच अडकला. एका क्षणी गोड वागणारा दुसऱ्याच क्षणी आपला पाणउतारा करतोय हे बघून तिला चीड आली.

"सॉरी..." ती रागातच बोलली. प्रांजलने तिच्याकडे कटाक्ष टाकत "it's ok" असं म्हणत धीर दिला..

क्रमशः


(ईरा स्नेहसंमेलन मागील आठवड्यात पार पडले, त्याच गडबडीत पुढील भागाला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. यापुढे रोज एक भाग येत जाईल, हा भाग कसा वाटला नक्की कळवा.)

🎭 Series Post

View all