पक्षी विद्या (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
पक्षी विद्या

ठरल्याप्रमाणे रामा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या कलाकाराकडे गेला.

“माझी एक विनंती होती आपण आजचा अभ्यास देवीच्या ओम मात्रे नमः या जपाने सुरू करूया का?” रामाने त्याला विचारलं.

“ठीक आहे. जशी तुमची इच्छा. आता मी सांगतो तसे करा. आधी श्वास घ्या. ध्वनी पोटातून यायला हवा.” तो म्हणाला.

रामा तो सांगत होता त्याप्रमाणे करत होता. आधी त्याला बऱ्याच अडचणी येत होत्या पण तो त्याला नीट शिकवत होता. अजून तरी रामाला ओठ न हलवता बोलता आले नव्हते.

“मी तुम्हाला सर्व काही सांगितले आहे. तुम्ही जर असेच करत राहिलात तर तुम्हाला बरीच वर्ष लागतील ही कला आत्मसात करायला.” तो त्याचे निष्फळ प्रयत्न पाहून म्हणाला.

शेवटी रामा उठून एका देवीच्या देवळात आला.

“हे कृपावत्सल आई! तुला तर सगळं माहीतच आहे. त्या दुष्टाची नजर रजकोषावर आहे आणि मी प्रजेचा पैसा असा वाया जाऊ देणार नाही. महाराजांना कोणीतरी येऊन फसवत आहे तेही मी होऊ देणार नाही. ही विद्या शिकणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि दरवेळी सारखे याही वेळी तूच मला सहाय्य करशील याची मला खात्री आहे. मी वचन देतो जोवर मी ही विद्या आत्मसात करत नाही तोवर अन्न आणि पाणी घेणार नाही.” रामा हात जोडून विनम्रपणे म्हणाला आणि तिथेच तोच जप करत बसला.

त्याला कितीवेळ असा झाला हेही माहीत नव्हते. बऱ्याच प्रयत्नांनी त्याला यश आले आणि त्याने समाधानाने डोळे उघडले.

“खूप खूप धन्यवाद आई. मी कसे आभार मानू मला कळत नाहीये. या क्षणी मी तुला कसे प्रसन्न करू हेही कळत नाहीये पण मला माहित आहे तुला प्रसन्न करण्यासाठी महादेवाचे स्मरण करायचे.” रामा म्हणाला.

लगेचच तो पुन्हा खाली बसला आणि शिवपंचाक्षर स्तोत्र म्हणू लागला. तेही त्याने ओठ न हलवता पक्षी विद्येच्या साहाय्याने म्हणले. इतक्यात त्याच देवळात तो कलाकार आला. त्याने आवाज तर ऐकला पण त्याचा विश्वास बसत नव्हता. त्याने आजूबाजूला पाहिले पण कोणीही नव्हते. त्याच्या लक्षात आले हे रामा बोलतोय. तो त्याच्याजवळ गेला. रामाने त्याला पाहिले आणि उठून उभा राहिला.

“तुम्ही हे पुन्हा करून दाखवाल?” त्याने विचारलं.

लगेचच रामाने त्याला पुन्हा स्तोत्र म्हणून दाखवले.

“माझा विश्वासच बसत नाहीये तुम्ही एवढ्या लवकर ही विद्या आत्मसात केली.” तो म्हणाला.

“सर्वकाही या वत्सल रुपी देवी आईची कृपा.” रामा म्हणाला.

तिथून निघून तो घरी आला. घरी आल्यावर शारदा तिथेच अंगणात होती आणि बकरी बघून रामाला जरा या सगळ्यांची गम्मत करावी असे वाटले म्हणून तो तिथे बाजूला उभा राहून ती विद्या वापरू लागला.

“शारदा…. बे.. बे… शारदा…” बकरी बोलली.

शारदा आधी दचकली. तिला बकरी कशी बोलतेय हेच कळत नव्हतं.

“असं काय बघतेस शारदा बे… बे… मी रामाचा पिता तुझा सासरा… बे… बे..” ती बकरी पुन्हा म्हणाली.

शारदा त्या बकरी जवळ आली आणि निरखून बघू लागली.

“लक्ष्मीला बोलव बे… बे…” ती बकरी म्हणाली.

शारदाने लगेच अम्माला आवाज दिला. ती बाहेर आली. गुंडप्पा देखील तिथे आला. शारदाने जे घडलं ते सांगितलं. रामा हळूच हसत होता.

“त्या दिवशी त्या कावळ्याला मी समजून खायला घातलं. आता मला काही देणार की नाही? बे… बे…” बकरी म्हणाली.

अम्माचा देखील यावर विश्वास बसत नव्हता. ती खुणा करत शारदाला खायला काहीतरी घेऊन ये म्हणून सांगत होती.

“मी जिवंत असताना मौन व्रत घेतलं असतं तर अजून बरे वाटले असते.” बकरी म्हणाली.

अम्मा यावर पुन्हा खुणा करू लागली.

“काय बोलतेय? बे.. बे..” बकरीने विचारलं.

“हे असं बोलण्याची हिम्मत फक्त रामाच्या वडलांची होती. नक्कीच हेच आले आहेत.” शारदा तिच्या वतीने म्हणाली.

“नवरा आला आहे पाया नाही पडणार का?” बकरी म्हणाली.

अम्माने लगेच तिला नमस्कार केला. शारदाला देखील बकरीने नमस्कार करायला लावला आणि गुंडप्पाला देखील.

“या घराला सून मात्र चांगली मिळाली. तू तुझ्या पतीची काळजी घेतेसच पण अजून थोडी काळजी घे त्याची आणि काय रे गुंडप्पे अभ्यास वैगरे करतोस की फक्त घंटी खेळतो? बे.. बे..” बकरीने विचारलं.

ते तिघे हरखून तिला पाहत होते.

“असं काय बघताय? खूप भूक लागली आहे. जेवण आणि मोतीचुरचे लाडू आणा.” बकरी म्हणाली.

“हो. लगेच घेऊन येतो.” शारदा म्हणाली.

ती आत जाऊ लागली तर रामा मोठ्याने हसू लागला.

“काय झालं?” शारदाने विचारलं.

“बकरी नाही तर मी बोलत होतो. काही पिताश्री आलेले नाहीयेत.” रामा म्हणाला.

“पण तुम्ही तर काही बोलतच नव्हता.” शारदा म्हणाली.

“माझे ओठ हलत नव्हते पण मीच बोलत होतो. याला पक्षी विद्या म्हणतात. ही तीच विद्या आहे जी त्या शमशेर खानने वापरली. त्याचा पोपट फक्त चोच हवलत होता आणि शब्द मात्र शमशेर खानचे होते.” रामा म्हणाला.

अम्मा खुणा करू लागली आणि शारदा बोलू लागली; “काहीही. विश्वास नाही बसत.”

रामाने पुन्हा तसा आवाज काढून दाखवला; “लक्ष्मी खूप भूक लागली आहे. आता तरी जेवायला मिळेल का?”

अम्माला लगेच त्याचे कौतुक वाटले. तिने लगेच त्याची दृष्ट काढली.

“चल गुंडप्पे आपल्याला आता त्या शमशेर खानचा योग्य बंदोबस्त करायचा आहे. त्याच्याकडे येणाऱ्या धनाला ग्रहण लावायचे आहे पण त्या आधी जेऊया.” रामा म्हणाला.
*************************
इथे आचार्य च्या घरी शमशेर खान, आचार्य, धनी आणि मणी रात्रीचे जेवण करून निवांत बसले होते.

“सर्व खूप छान झाले फक्त आज ताक मिळाले असते तर अजून मजा आली असती.” तो म्हणाला.

“हो गुरुजी. गुरुमातेला बोलवा ना आणि ताक द्यायला सांगा.” मणी म्हणाला.

“हो आमचीही आज ताक प्यायची इच्छा होतेय.” आचार्य म्हणाला.

इतक्यात स्वतः तीच तिथे आली आणि सोबत ताकाचे पेले देखील होते. तोवर बाहेर रामा आणि गुंडप्पा वेश बदलून दाराआड लपून उभे राहून बघत होते.

“आत्ता यांची ताक प्यायची इच्छा होत होती. तुम्ही कसे ओळखले?” शमशेर खानने विचारले.

“ही सगळी प्रभूंची कृपा. त्यांना भूत, भविष्य, वर्तमान सर्व ज्ञात आहे. त्यांना कळले होते आम्ही आज ताक बनवले आहे आणि म्हणूनच त्यांची इच्छा झाली.” ती बडबडू लागली.

आचार्यने कसेबसे तिला थांबवले आणि बोलू लागला; “तुम्हाला योगायोग समजतो?”

“हो.” ती म्हणाली.

“मग हा तोच आहे. जा तुम्ही तुमचे काम करा.” तो म्हणाला.

“ठीक आहे प्रभू. आम्ही म्हशीला चारा घालून येतो.” ती म्हणाली आणि तिथून निघाली.

रामा आणि गुंडप्पा पटकन तिथून लपले. रामाने गुंडप्पाला तिथेच थांबण्यासाठी सांगितले आणि तो बाहेर गेला. आचार्यची पत्नी गोठ्यात पोहोचायच्या आधी तो तिथे लपला. ती तिथे आल्यावर तिने म्हशीला चारा घातला आणि ती जाऊ लागली.

“वरुणमाला हा कसला चारा आहे? हम्मा…” रामा म्हशीच्या आवाजात म्हणाला.

तो लपला असल्याने त्याला पक्षी विद्या वापरायची गरज नव्हती. तिने चमकून म्हशीकडे पाहिले.

“या चाऱ्याला काही चवच नाहीये.” ती म्हैस पुन्हा म्हणाली.

तिला आश्चर्याचा धक्का बसला. ती पळत आत गेली.

“स्वामी! स्वामी आपली म्हैस बोलतेय चला लवकर.” ती म्हणाली.

“काहीही काय? यांचा पोपट बोलतो म्हणजे जगातले सगळेच जीवजंतू बोलतात का?” आचार्य रागाने म्हणाला.

तिनेही काहीही ऐकून न घेता त्याला हाताला धरून बाहेर नेले. आचार्य त्या म्हशी समोर जाऊन बसला. रामा तिथून हळूच निघून पुन्हा आत गेला.

“तुझ्या काय समस्या आहेत ते स्वामींना सांग. ते नक्कीच त्यावर तोडगा काढतील.” त्याची पत्नी म्हणाली.

म्हैस मात्र चारा खाण्यात गुंग होती. ती काहीच बोलत नव्हती. थोडावेळ असाच गेला आणि ती काहीच बोलत नाही हे पाहून आचार्य रागाने उठून उभा राहिला.

“माझं ऐकाल तर एखाद्या चांगल्या वैद्याला तुमची मानसिक स्थिती दाखवून त्याच्याकडून जडीबुटी वाटून घ्या. गरज आहे तुम्हाला.” तो म्हणाला.

“नाही स्वामी. खरंच मगाशी ही म्हैस माझ्याशी बोलली.” ती सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तो काहीच ऐकून न घेता आत येऊ लागला.

तर तिथे आत रामा त्या शमशेर खानच्या ताकाच्या पेल्यात काहीतरी मिसळत होता. त्याने त्याचे काम केले पण एवढ्यात गुंडप्पाने त्या लोकांना आत येताना पाहिले.

‘लामा तल अजून आत आहे. काय कलु?’ तो स्वतःशीच म्हणाला आणि त्याने शिट्टी वाजवली.

रामाला जे समजायचं ते समजलं.

“नक्कीच इथे कोणीतरी आहे.” आचार्य म्हणाला आणि आत बघायला गेला. आत कोणीच दिसत नव्हतं.

“कोणी नाहीये.” शमशेर खान म्हणाला.

ते लोक बोलता बोलता जिथे बसले होते तिथेच बसले पण यावेळी आचार्य आणि त्याच्या जागेची अदलाबदल झाली होती.

“नक्कीच आहे कोणीतरी. आम्हाला असं वाटतंय तो पंडित रामा आला आहे.” आचार्य म्हणाला.

“तुम्ही उगाच काळजी करताय कोणी नाहीये. घ्या ताक प्या.” तो म्हणाला आणि त्याने त्याला एक पेला दिला.

नेमका औषध घातलेला पेला आचार्यच्या हातात होता आणि रामाने ते पाहिले. शमशेर खानने ते ताक पिणे अपेक्षित होते. पुन्हा काहीतरी झाले म्हणून आचार्यने ताक न पिता तसाच पेला खाली ठेवला आणि शमशेर खानने देखील ठेवला. रामाने हीच संधी साधून पटकन ते पेले बदलले.

“आम्हाला वाटतंय तो पंडित रामा इथेच आमच्या आसपास आहे.” तो म्हणाला.

“काय तुम्ही? कुठे तुम्ही आणि कुठे तो पंडित रामा. जशी काल त्याची दरबारात पंचाईत केली तशीच उद्याही करू. तुम्ही काळजी करू नका घ्या ताक प्या.” तो म्हणाला आणि त्याने त्याला ताक दिले.

रामाने हळूच तिथून काढता पाय घेतला. जाता जाता त्याचा कशाला तरी धक्का लागला आणि काहीतरी पडले. सर्वजण ते पाहायला उठले आणि रामा पटकन बाहेर आला. त्याने खुणेने गुंडप्पाला काम झाल्याचे सांगितले आणि ते दोघे लपून बघू लागले. त्या लोकांनी पूर्ण खोली तपासली तरीही कोणी दिसले नाही म्हणाल्यावर ते पुन्हा ताक पिऊ लागले.

“कोणी काहीही म्हणो पण आम्हाला त्या पंडित रामाचा गंध येतोय. नक्कीच तो इथे येऊन गेला.” आचार्य म्हणाला.

“आचार्य एवढं काय आहे त्या रामामध्ये?” शमशेर खानने विचारलं.

“तो रामा दरवेळी येऊन गुरुजींच्या योजनेला ग्रहण लावतो.” धनी म्हणाला.

“हो आणि दरवेळी आमचे गुरुजी तोंडघशी पडतात.” मणी म्हणाला.

आचार्यने फक्त दोघांकडे रागाने पाहिले आणि शमशेर खानला जाणवू लागले त्याच्या घश्यात काहीतरी गडबड आहे.

“आवाज येत नाही.” तो कसाबसा म्हणाला.

“काय झालं?” आचार्यने न समजल्याने विचारलं.

“आवाज बसला.” तो म्हणाला.

“जाऊदे. यायचा तेव्हा येईल. उद्या तुमचा आवाज नाही तर पोपटाचा आवाज महत्त्वाचा आहे. उद्या दरबारात पोपट बोलला की पाच लाख सुवर्ण मुद्रा आपल्या.” आचार्य म्हणाला.

“पण…” तो बोलू पाहत होता पण त्याचा आवाज फुटत नव्हता.

“सोडा ते सगळं. स्वतःची ताकद वाचवून ठेवा उद्या भरपूर सुवर्ण मुद्रा मोजयच्या आहेत.” आचार्य म्हणाला.

शमशेर खान त्याला काहीतरी सांगू पाहत होता पण आचार्य ऐकून घेत नव्हता तर त्यालाच समजावत होता. बाहेर रामा आणि गुंडप्पाने हे पाहिले आणि एकमेकांना टाळ्या देत तिथून ते निघाले.

क्रमशः….

Credit:- Sony SAB Tenali Rama serial.

🎭 Series Post

View all