सावधान!!! समस्त पृथ्वी ग्रह वासियांना कृष्णविवराचा धोका संभवतोय... अरे बापरे!... अह... घाबरु नका...हे आहे तरी नक्की काय? काय आहे ब्लॅक होल म्हणजेच कृष्ण विवर? त्याची उत्पत्ती कुठून, कशी झाली हे या लेखात सविस्तर जाणून घेऊयात...
कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होल अवकाशातील एक अतिशय रहस्यमय गोष्ट मानली जाते. हे ब्लॅक होल एखाद्या चकाकत्या डिस्क प्रमाणे गडद आणि गोलाकार दिसते. आकाशगंगेतील हजारो वर्षांपूर्वीचे तारे जेव्हा वृध्द होऊन स्वतःच्याच वजनाने तुटू लागतात तेव्हा अश्या असंख्य ताऱ्यांचे मिळून एक ब्लॅक होल तयार होते. ही प्रक्रिया घडत असताना स्फोट होतो त्याला सुपरनोव्हा असे म्हणतात. या ब्लॅक होलची गुरुत्वाकर्षण शक्ती इतकी अफाट असते की, त्याच्या सीमेत गेलेली कोणतीच वस्तू परत येऊ शकत नाही. मग तो एखादा भला मोठा ग्रह असो की अगदीच आपल्या डोळ्यांना दिसणारा सामान्य प्रकाश. आणि चिंतेची बाब अशी की, एक नाही तर अशी बरीच ब्लॅक होल आकाशगंगेत वास्तव करत आहेत.
आकाशगंगेचा राक्षस! होय... या ब्लॅक होल्सना राक्षस म्हणूनही संबोधल जातं. भल्या भल्या ग्रहांना गिळंकृत करणारा राक्षसच नाही का? आता या ब्लॅक होलच्या आत नक्की आहे तरी काय? हे एक रहस्यच आहे. कारण त्यात गेलेली कोणतीच वस्तू परत येऊ शकत नाही. जसजसे कृष्णविवराच्या जवळ जावे तसा वेळ आणि काळ ही मंदावतो. शास्त्रज्ञांच्या मते कृष्णविवरातून कोणतीच वस्तू बाहेर पडू शकत नाही अगदी प्रकाशही परतत नाही पण जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे विचार मात्र याला अपवाद ठरले. स्टीफन हॉकिंग यांच्या मते 'कृष्णविवर हे एक वार्म होल असावे. तिथे जाता येते पण परत येता येतं नाही. कदाचित ब्लॅक होल दुसऱ्या एखाद्या जगाचा/ विश्वाचा आरंभ असावा. त्यात भरपूर माहितीही असावी जी ऊर्जेच्या स्वरूपात साठवलेली आहे. पण ती माहिती मिळण्यासाठी कृष्णविवरातून कोणी बाहेर तरी यायला हवे पण हे कदापि शक्य नाही.' त्यांचे हे वक्तव्य खरोखरचं गूढ आहे...
इतर कोणत्याही अवकाशीय गोष्टीने गूढ निर्माण झाले नाही जितके रहस्यमय कृष्णविवर आहे. कारण भौतिक शास्त्राचे जे काही नियम आहेत ते ब्लॅक होल मद्ये यत्किंचितही लागू होत नाहीत. आता आपण विचार करतो की या ब्लॅक होल पासून इतर अवकाशीय ग्रहांना धोका असेल का? म्हणजेच या ग्रहांना ब्लॅक होल गिळंकृत करेल का? तर... नाही. कारण प्रत्येक ग्रहा प्रमाणेच ब्लॅक होलची देखील एक विशिष्ट कक्षा आहे. ती कक्षा सोडून ते इतरत्र हलत नाही. त्यामुळे हा धोका अजिबात नाही पण जर का त्याच्या कक्षेत जाल तर अंत निश्चित आहे.
एखाद्या काल्पनिक कथेप्रमाणे जसे दुसरे अद्भुत विश्व, जग असते त्याच प्रमाणे ब्लॅक होल च्या आत ही असे नवे विश्व असेल का? की फक्तं एक पोकळी असावी? त्यात माणसाचा मृत्यू कसा असेल? असे बरेच प्रश्न आजही शास्त्रज्ञांना आणि सामान्यांना देखिल भेडसावत आहेत. खगोल शास्त्रज्ञांच्या मते कृष्ण विवरे प्रचंड प्रमाणात क्ष किरणे उत्सर्जित करतात. या उत्सर्जित होणाऱ्या प्रचंड क्ष किरणांची ब्लॅक होल भोवती एक डिस्क तयार होते जिला 'Accleration disk' असे म्हणतात. जॉन मिचेल, अल्बर्ट आईन्स्टाईन, जॉन व्हीलर, स्टिफन हॉकिंग अश्या बऱ्याच शास्त्रज्ञांनी कृष्णविवराचा अभ्यास केला पण त्याचे आंतरिक रहस्य आजही उलगडू शकले नाही.
'फिनिक्स ए' हे विश्वातील सर्वात मोठे सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल असल्याचे ज्ञात आहे. शक्तिशाली ताऱ्याचा मृत्यू म्हणजेच कृष्णविवराचा जन्म अशी संकल्पना आहे. याच्या संशोधनात आजही म्हणावे तितके यश मिळाले नाही म्हणूनचं ब्लॅक होल अंतराळ संशोधकांना नेहमीच आकर्षणाचा आणि गूढतेचा रहस्यमय केंद्र बिंदू ठरला आहे.
©® सौ. प्रणाली चंदनशिवे.