Login

पुसटलेल्या वाटा..

ती निघाली. स्टेशनच्या दिशेने.हातात ती डायरी होती, आणि पोस्टकार्ड आत ठेवलेलं.बसमध्ये बसल्यानंतर खिडकीतून बाहेर पाहत तिने शेवटचं वाक्य लिहिलं .."पुसटलेली वाट फक्त रस्त्यावरून हरवली… पण मनातली वाट अजून चालूच आहे."


      ईशा रेल्वेतून खाली उतरत होती तेव्हा तिच्या हातात एक मध्यम आकाराची सुटकेस, खांद्यावर एक छोटीशी बॅग आणि त्यात तिचे महत्वाचे साहित्य ठेवलेले आणि तिची प्रिय डायरी.. जपून ठेवलेली हिरवी डायरी.

      ती डायरी तिच्यासाठी फक्त शब्द नव्हते तर ती एक अख्खं आयुष्य होतं, जे विसरणं तिला जमलं नव्हतं… आणि स्वीकारणं अजून झालं नव्हतं.

      ईशाने स्टेशनवर पाऊल ठेवताच काळ जणू मागे फिरल्यासारखं वाटलं..रेल्वे स्टेशन काहीच बदललं नव्हतं.सिनेमाच्या जुन्या पोस्टर्ससारख्या भिंती, बोर्डावर अजूनही ‘स्वागतम्’ लिहिलं होतं, आणि समोर फडफडणारा एक पताका... सगळं काही तसंच. ईशाला एक क्षण वाटलं, जणू ती तीच २० वर्षांपूर्वीची कॉलेजमधली मुलगी आहे, एका स्वप्नामध्ये वावरणारी.

   ती आता गावात आली होती कारण तिला साहित्य संमेलनचं एक निमंत्रण आलं होतं,  ‘मराठी नवलेखनाच्या संदर्भात विशेष परिसंवाद’.
पण ती खरंच त्या निमित्ताने आली होती का?
की त्या गावाच्या गाभ्यात लपलेल्या अधुऱ्या आठवणीला पुन्हा उजाळा देत समजून घेण्यासाठी..

ती विसावण्यासाठी विश्रांतीगृहात गेली.
खोली नं. १०. अजूनही तशीच होती..थोडफार रंग बदललेला होता पण ठेवण मात्र तशीच आणि खिडकीबाहेरचं ओळखीचं झाड अजूनही होतं..

खिडकी उघडताच दूरवर नजर गेली… आणि अचानक तिचा श्वास थोडा थांबला.
टेकडीच्या उतारावरून जाणारी ती जुनी धूसर पायवाट दिसत होती.

तिची आणि समीरची पायवाट..

शब्दाशिवाय झालेली कितीतरी बोलकी भेटी त्या वाटेवरून घडल्या होत्या.
ती वाट फार काही विशेष नव्हती म्हणजे पावसात थोडी चिखलट, उन्हात थोडी रुक्ष, पण दोघांच्या पावलांनी कोरलेली ती एक वाट होती.

आज तीच वाट गवताने झाकलेली होती.
कुठे पाऊलवाट, कुठे मोडकी कुंपणं, आणि कुठे विसरलेली वळणं... नकळत पुसटलेल्या वाटा.

तिने खिडकी बंद केली, एक दीर्घ श्वास घेतला आणि डायरी उघडली.

ती पानं अजूनही आठवणीने ओलसर होती.
एका पानावर लिहिलं होतं, "आज त्याच्या डोळ्यात काही वेगळं होतं... थांबेल असं वाटत होतं... पण तो गेला."

तिने एक शेवटचं वाक्य लिहायचं ठरवलं होतं, पण बोटे वळत नव्हती..आज इतक्या वर्षांनी, तीच वाट, तेच गाव, आणि अजूनही अधुरं वाक्य.

ती डायरी मिटली. ईशा उठली. आणि पाय त्या वाटेकडे निघाले..

       ती जरा अडखळली. झुडपं वाढली होती, मोकळी जागा नव्हती. पण एक जुना बाक अजूनही होता. मोडकळीस आलेला, थोडासा वाकलेला, पण शपथ घेऊन सांगावा असा.

ती बसली. खूप वेळ डोळे मिटले.तिच्या मनात तोच आवाज घुमत होता..
"ईशा... एक दिवस आपण पुन्हा इथे भेटू का गं?"

दुसऱ्या क्षणी ती डोळे उघडते..अन् मनाशीच म्हणते, आज मी इथे आहे. पण तो?

      ती संध्याकाळ वेगळी होती. आभाळाला जरा जास्तच संकोच होत होता आज मावळताना. ईशा त्या बाकावरून उठली. ती पायवाट तिच्या नजरेतून हरवलेली होती, पण मनातून ती अजूनही अधुरी होती, जिथून एकदा समीरने तिचा हात धरून थांबवलेलं आणि पुढच्या वाक्याआधी ती लाजून निघून गेलेली...

दुसऱ्या दिवशी..
       साहित्य संमेलनात बोलकं काही नव्हतं, सगळं औपचारिक होतं. ती एका कोपऱ्यात बसून दुसऱ्याच जगात हरवली होती. तेव्हाच, गर्दीतून एखादा आवाज नाही, पण नजर जाणवली.

तो समीर होता.

      ती काही क्षण काहीच बोलली नाही. त्याने तिच्या कडे पाहत हलकेच मान हलवली.तिने केवळ डोळ्यांनी उत्तर दिलं न भूतकाळाचं स्पष्टीकरण, न वर्तमानाचा भार..

रात्रीचे नऊ वाजले होते.
      साहित्य संमेलनातलं शेवटचं सत्र नुकतंच संपलं होतं. सगळीकडे शांतता होती. विश्रांतीगृहात परतताना ईशा एक वेगळीच जडत्व घेऊन चालत होती थकवा नव्हता, पण एक आतला ओलसरपणा. शब्द खूप ऐकले होते दिवसभर, पण मनातलं एक वाक्य मात्र अजूनही अधुरं होतं…

     ती खोलीत गेली. खिडकी उघडली. आजचा चंद्र पूर्ण दिसत नव्हता.पलीकडच्या झाडामागे कुणीतरी थांबलेलं आहे असं एक क्षण वाटून गेलं. पण ती भावना होती, समीर नव्हता.

तिने तिची हिरवी डायरी उघडली.
ते जुनं पान अजूनही धूसर दिसत होतं.
"तो थांबेल... असं वाटत होतं."

खाली एक मोठी रिकामी जागा होती.
तिने त्या वेळेला काही लिहिलं नव्हतं. कारण तो गेला होता… आणि ती थांबली होती. पण आज, त्या पानाला तिने हात लावला. आणि एक ओळ लिहिली:

"थांबला नाहीस तू, पण माझं वाट पाहणंही चालत राहिलं... त्याच वाटेवर."

सहज त्या डायरीतून एक फोटो खाली पडला. कॉलेजमधला. एका ग्रूप फोटोमधून दूर बसलेले दोन चेहरे ..एक तीचा, एक समीरचा. नजर जरी कॅमेराकडे नसेल, तरी एकमेकांकडेच स्थिरावलेली.

तिला त्यांच्या शेवटच्या भेटीची आठवण यायला लागली…
त्या दिवशी महाविद्यालयाच्या शेवटच्या सत्रानंतर त्यांची शेवटची भेट झाली होती..

एका पावसाळी संध्याकाळी, कॉलेजच्या मागच्या वाटेवर ती बघत राहिली होती, त्याने थांबावं म्हणून… पण त्याने काहीच न बोलता तिच्याकडे न पाहताच पुढे चालत राहिला.
ती मागून म्हणत होती, “समीर... थांब ना…”तो थांबला नाही. जोरदार वाऱ्याने तिचं वाक्यही गिळलं..तिने डोळे मिटले.

आजच्या भेटीत त्या मौनात खूप काही उमटलं होतं. त्याचे डोळे आज 'माफ कर' म्हणत होते, पण तिला माफी हवी नव्हती. तिला समजून घ्यायचं होतं आणि ते झालं होतं.

पहाट होत आली होती. ईशाने डायरी बंद केली. पण पेन तसाच हातात होता..तिने शेवटी लिहिलं, "शब्द न बोलले गेले तरी काही वाक्य पूर्ण होतात... कधीकधी मौनाने."

आता तिला शांत झोप लागणार होती.

सकाळी आकाश निरभ्र होतं.
      ईशा नेहमीसारखीच शांतपणे तयार झाली. आज संमेलनाचा शेवटचा दिवस होता. प्रमुख पाहुण्यांमध्ये तिचं नाव होतं. तिच्या "शब्दांच्या पायवाटा" या कविता संग्रहासाठी विशेष सन्मान जाहीर झाला होता.

      पांढरंसं साडीवर राखाडी जाकीट, साध्या चपला, आणि केस मोकळे..ती मंचावर गेली तेव्हा टाळ्यांचा आवाज नव्हता तितकासा ..पण काही मोजक्या डोळ्यांत एक वेगळंच कौतुक होतं. त्या पाहुण्यांपैकीच एक होता समीर.

     तो टाळ्या वाजवत नव्हता, पण डोळ्यांतून खूप काही बोलत होता..ती खाली उतरली, आणि बाजूच्या चहाच्या स्टॉलकडे वळली.

त्याने विचारलं, "एका चहासाठी वेळ आहे का?"

ती हसली. “एक वाट चालल्यावर थांबायलाच हवं ना कधी कधी.”

एका झाडाखाली दोघं पुन्हा एकदा समोरासमोर..मागे थोडीशी वाऱ्याची सळसळ, कपातून उसळणारी वाफ, आणि मध्ये एक जुनं, पण आता स्पष्ट होत चाललेलं नातं.

“कधीच मागे वळून पाहिलं नाहीस?” तो विचारतो.

ईशा हलक्या स्वरात म्हणाली,
“नेहमीच. पण जेव्हा वाट दिसली नाही, तेव्हा चालणंच थांबवलं... पण मन मात्र चालत राहिलं.”

तो थोडा वेळ गप्प राहिला.

मग खिशातून एक पांढरे पोस्टकार्ड तिच्या हातात देताना तो म्हणाला...“तू ती वाट जपली, पण मी तिला हरवलो.”

ईशा काहीच बोलली नाही. फक्त एका शांत नजरेने त्याच्याकडे पाहिलं..तेवढंच पुरेसं होतं. कोणताही हिशेब बाकी राहिला नव्हता.

ती निघाली. स्टेशनच्या दिशेने.
हातात ती डायरी होती, आणि पोस्टकार्ड आत ठेवलेलं.

बसमध्ये बसल्यानंतर खिडकीतून बाहेर पाहत तिने शेवटचं वाक्य लिहिलं .."पुसटलेली वाट फक्त रस्त्यावरून हरवली… पण मनातली वाट अजून चालूच आहे."

चहा संपला, पाऊस कुठेच नव्हता, आणि ती पायवाट आता खूप स्वच्छ, स्पष्ट आणि न चालताही संपूर्ण वाटत होती..