बोचणारा पाऊस...पर्व 2 रे भाग 7
आधीच्या भागात आपण पाहिले की,
अभिज्ञा, अभिराज, उर्वी आणि स्वानंद चौघेही अभिराजच्या मित्राच्या फार्महाऊसवर गेले. तिथे फिरून झाल्यानंतर सगळे मंदिरात जायला निघाले. मंदिर पहाडीवर होतं आणि अरुंद वाट होती. अभिराज हळू गाडी चालवत होता आणि समोरून विरुद्ध दिशेने एक गाडी आली. ती गाडी पहाडी वरून खाली पडली. तशी अभिज्ञा जोरात किंचाळली.
आता पुढे,
अभिज्ञा खूप जोरात किंचाळली, तशीच अभिराजने गाडी थांबवली. अभिज्ञाला शांत केलं, तिला पाणी प्यायला दिलं. पण अभिज्ञा खूप घाबरलेली होती, तिला धाप लागत होती, श्वास घ्यायला त्रास होत होता.
“अभि मला खूप त्रास होतोय आपण जाऊया ना.”
“हो ग जाऊया पण आपण अर्ध्या वरती आलोय, मी प्रयत्न करतो इथून गाडी वळवण्याचा, ट्राय करतो. गाडी वळली की आपण निघूया. नाहीतर मंदिरात जाऊन यावं लागेल.”
त्याने दोन-तीनदा गाडी वळवण्याचा प्रयत्न केला पण विरुद्ध दिशेने गाड्या होत्या त्यामुळे गाडी वळवता येत नव्हती. अभिराजने सरळ गाडी मंदिरात नेली. तिथे एका ठिकाणी अभिज्ञाला बसवलं. तिचे हात पाय चोळले, तिला प्यायला पाणी दिलं. तिच्याजवळ थोडा वेळ बसला. काहीवेळाने अभिज्ञाला बरं वाटायला लागलं. चौघांनी तिथे दर्शन घेतले.
आता पुन्हा त्याच वाटेने जायचे या विचाराने अभिज्ञाला पुन्हा भीती वाटायला लागली.
“अभिराज दुसरा कुठलाच मार्ग नाही आहे का? आपल्याला तिथूनच परत जावे लागेल का? मला त्या वाटेने नाही जायचं. तू बघना कुठला दुसरा मार्ग असेल तर.. खराब रस्ता असेल तरी आपण जाऊया, पण मला या रस्त्याने जायचं नाही आहे.” अभिज्ञा घाबरली होती.
“अभिज्ञा दुसरा कुठलाही मार्ग नाही, आपल्याला याच रस्त्याने जावे लागेल.” अभिराजने तिला समजावलं.
“नाही, अजून एक मार्ग आहे पण खूप काट्यातून झाडाझुडपातून जावं लागतं. “ स्वानंद बोलतच होता तसा लगेच अभिराज बोलला.
“तो रस्ता मला ही माहित आहे पण तिथून आपण जाऊच शकणार नाही.”
“अरे असं काय? आपण प्रयत्न करू.” त्यावर स्वानंद बोलला.
“तुम्ही काहीही करा पण मला त्या रस्त्याने यायचे नाही आहे. पायवाट जरी काटेरी असली तरी चालेल तो त्रास तरी मी सहन करेन पण हा त्रास सहन नाही करायचा मला.” अभिज्ञाने स्पष्टच सांगितलं.
“अभिज्ञा तू डोळे बंद करून बस, बघ मी तुला दोन मिनिटात पोहचवतो.”
“तुला गंमत सुचत आहे का?”
“नाही ग खरंच तू बस आणि डोळे बंद कर मी तुला सेफली पोहोचवून देतो.” अभिराजने तिला गाडीत बसवलं.
सगळे गाडीत बसले, अभिज्ञाला रिलॅक्स व्हावं म्हणून गाणी गाऊ लागली. अभिज्ञाने डोळे बंद केले होते, ती शांत बसून होती. वाटेत विरुद्ध दिशेने येणारी एकही गाडी नव्हती त्यामुळे अभिराजने गाडी व्यवस्थित पार करत खाली आणली. गाडीचा रस्ता पार झाला तेव्हा कुठे त्याला बरं वाटायला लागलं.
सगळे पुन्हा फार्महाऊसवर गेले, तिथे फ्रेश झाले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा घरी यायला निघाले.
सगळे आपापल्या घरी पोहोचले. त्यानंतर ऑफिसला जाण्याची तयारी केली. आज गेल्यागेल्या अभिराज रक्षितच्या केबिन मध्ये गेला.
“मे आय कम इन सर.”
“कम..”
“सर मला थोडं बोलायचं होतं.”
“बोल.”
अभिराजच्या तोंडून काही शब्द फुटेना.
‘बोलू कि नाही, बोलू कि नाही’ या विचारात तो शांत उभा होता.
“मिस्टर अभिराज काही बोलायचं ना तुम्हाला मग बोला.”
“सर ऍक्च्युली...” अभिराज बोलता-बोलता थांबला.
“मिस्टर अभिराज एनी प्रॉब्लेम? तुम्हाला काय बोलायचे ते पटकन बोला. कामात व्यत्यय यायला नको.”
“सर ऍक्च्युली कंपनीकडून जे फ्लॅट मिळतात ना, त्यात मला एक मिळेल का? मला हेच तुम्हाला विचारायचं होतं.” अभिराज एका दमात सगळ बोलला.
रक्षित त्याच्याकडे बघतच राहिला.
“यु मिन टू से फ्लॅट?”
“सर, म्हणजे मी रेंट देईल सर पण मला बाहेर कुठे परवडणार नाही म्हणून कंपनीचा फ्लॅटमध्ये काही डिस्काउंट मिळत असेल तर.…. म्हणून मी तुम्हाला विचारणार होतो.” अभिराज अडखळत बोलला.
“ओके आय विल ट्राय, यु मे गो नाऊ. काम झालं की मी तुला कळवतो”
“ओके सर थँक्यू.”
अभिराज केबिनमधून बाहेर गेला. त्याच्या डेस्कवर जाऊन बसला आणि एक दीर्घ श्वास घेतला.
“काय रे अभ्या बोललास का सरांशी? सर काय म्हणाले?”
“बघतो म्हणाले, सांगतो असे म्हणाले.”
“ओके मग वाट बघ.”
“हम्म बघूया काय होतंय ते.”
रक्षितला बोलून दोन-तीन दिवस झाले तरी त्याच्याकडून काहीच रिप्लाय आला नाही. म्हणून अभिराज पुन्हा रक्षितच्या केबिन मध्ये गेला.
“सर ते फ्लॅट बद्दल काही झालंय का?” तो पुन्हा अडखळत बोलला.
“नाही, बोललो मी पण काही पॉझिटिव्ह रिप्लाय आलेला नाही. बघु काय होते ते. तुला एकदम अर्जंट आहे का?”
“नाही सर तसं काही नाही, महिन्याभरात जर मला मिळाला असता तर बर झाल असतं. माझ्या वाईफच्या डिलिव्हरीला काहीच महिने बाकी आहेत आणि ती सध्या माझ्यासोबत राहात नाही मी मित्रा सोबत असतो. माझी अशी इच्छा होती की डिलीवरीच्या आधी तरी तिला आपल्या सोबत आणावं म्हणजे आम्ही एकत्र राहावं अशी आमची इच्छा आहे. म्हणून माझे प्रयत्न सुरु होते बाकी काही नाही.”
“ओके मी आज पुन्हा बोलतो आणि तुला कळवतो, काम होईल असं वाटतं मला.”
“खरचं सर.”
“होप सो..”
अभिराजने लगेच अभिज्ञाला सांगितलं. एक दोन दिवसात आपलं काम होऊ शकेल, तिलाही खूप आनंद झाला. कारण आता शेवटचे काही महिने तिला अभिराज सोबत घालवायचे होते. ते क्षण तिला अभिराज सोबत राहून जगायचे होते.
रक्षितने प्रयत्न केले पण कदाचित काम झाले नसेल. त्याने किशोरीलालला केबिन मध्ये बोलावले.
“सर तुम्ही बोलावलं.”
“किशोरी लाल आपल्या बंगल्याच्या आऊटिंगला जे दोन रूम आहेत, त्या साफ करायला सांगा. आज काम व्हायला हवं.”
“सर कोणी गेस्ट येणार आहेत.”
“नाही ते तुम्हाला नंतर कळेलच. आजच्या आज काम होऊन जायला हवं.”
“ओके सर मी आता जातो बंगल्यावर आणि काम करून घेतो.”
“ओके क्विक अँड फास्ट.”
किशोरीलाल तिथून निघाले.
त्यानंतर रक्षितने अभिराजला केबिनमध्ये बोलावलं.
“सर तुम्ही बोलावलं.”
“मिस्टर अभिराज उद्या तुमचं काम होऊन जाईल त्यामुळे तुम्ही तयारीत रहा.”
“थँक यु, थँक यु सो मच सर.”
अभिराज बाहेर गेला, त्याने लगेच अभिज्ञाला कॉल केला.
“हाय अभिज्ञा..”
“हाय..”
“मला तुला काही सांगायचे आहे.”
“हा बोल ना.”
“बहुतेक आपल्याला उद्या फ्लॅट मिळेल. माझं सरांशी बोलण झालयं त्यांनी उद्या तयार रहा असे सांगितले आहे. आता तो क्षण आला आहे ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो. हे बघ तुझी पॅकिंग करून ठेव. कदाचित आपल्याला उद्या जावे लागेल.”
“तू बघितला का?”
“नाही ग, मी नाही बघितला पण सरांनी सांगितले ना मग झालं. परंतु तू तयारीत रहा, सगळ करून ठेव आणि हो धावपळ करू नकोस. जमलं तर उर्वीची मदत घे आणि नाही जमलं तर मला बोलवं मी येतो.”
“इट्स ओके अभि होईल सगळं. तुला तुझी पण कामे असतील ना, तुझी पण पॅकिंग करायची असेल.”
“इट्स ओके यार, तुला जर खरंच गरज वाटली तर मला बोलवं, तू जास्त काळजी करू नकोस.”
दोघांचं बोलणं झालं, अभिज्ञा खिडकी जवळ बसली होती. छान झुळझुळ वारा यायला लागला आणि आता पावसालाही सुरुवात झालेली होती. तिला पाण्यात भिजयची इच्छा झाली, तिने गाणं लावलं आणि ती पाण्यात चिंब भिजायला गेली.
“अधीर मन झाले,
मधुर घन आले..
धुक्यातुनी नभातले,
सख्या.. प्रिया..
सरीतुनी सुरेल
धुंद स्वर हे आले...
अधीर मन झाले
मधुर घन आले..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा