Login

रामकृष्ण परमहंस यांच्या कथा (बोधकथा)

बोधकथा
कथा एक
दोन आण्याचे ज्ञान
रामकृष्ण परमहंस यांना आपण स्वामी विवेकानंद यांचे गुरू म्हणून ओळखतो पण त्यापलीकडे त्यांची एक ओळख आहे. ते माँ कालीचे परम भक्त होते. त्यांना माँ कालीने प्रत्यक्ष दर्शन दिले होते आणि माँ काली त्यांच्या बरोबर हास्य विनोद करत असत. रामकृष्ण परमहंस यांचे अनेक शिष्य होते. त्यावेळी गुरुकडे राहून ज्ञान ग्रहण करण्याची प्रथा होती.

असेच एक दिवस रामकृष्ण परमहंस कोलकात्याच्या नदी घाटावर त्याच्या शिष्यांबरोबर गंगा स्नान करायला गेले होते.सगळ्यांचे स्नान आदी झाले. तिथेच एक हट योगी होता. त्याने गंगेत एक वस्त्र टाकलं आणि त्या वस्त्रावर उभं राहून तो नदी पार करून पलीकडच्या तीरावर गेला. पुन्हा वस्त्र नदीत टाकून नदीच्या या किनाऱ्यावर आला. त्याची सिद्धी सगळे शिष्य आ वासून पाहत होते.ते पाहून तो हट योगी गर्वाने चांगलाच फुगला.रामकृष्ण परमहंस यांच्या एका शिष्याला तो गर्वाने म्हणाला.

“ तुझे गुरू असा चमत्कार करून दाखवू शकतात का? विचार त्यांना?”

शिष्य ते ऐकून रामकृष्ण परमहंस यांच्याजवळ गेला.

“ गुरुजी ते योगी विचारत आहेत की त्यांनी एका वस्त्रावर उभं राहून नदी पार केली कसा चमत्कार दाखवला तसा तुम्ही दाखवू शकता का?” तो नम्रपणे म्हणाला.

“ त्यांचा चमत्कार वगैरे जो आहे तो दोन आण्यांचा आहे म्हणून सांग त्यांना.” रामकृष्ण परमहंस शांतपणे म्हणाले.शिष्य त्या हट योगी जवळ गेला आणि म्हणाला.

“ योगी महाराज आमचे गुरू म्हणाले की तुमचा हा चमत्कार दोन आण्यांचा आहे.” तो म्हणाला आणि तो हट योगी चिडला.

“ त्याला माहित नाही मी कोण आहे? त्याला भस्म करून टाकेन. त्याला म्हणावे की त्याचे शब्द मागे घे.” योगी रागाने म्हणाला तसा शिष्य घाबरून पुन्हा रामकृष्ण परमहंस यांच्याकडं आला.

“ गुरुजी ते योगी खूप चिडले आहेत ते म्हणत आहेत की तुमचे शब्द मागे घ्या नाही तर ते तुम्हाला भस्म करून टाकतील.”

“ मी माझे शब्द मागे घेणार नाही कारण हे सत्य आहे की त्यांनी दाखवलेला चमत्कार दोन आण्यांचा आहे. त्यांना सांग करा म्हणावं मला भस्म!” रामकृष्ण परमहंस पुन्हा त्याच ठामपणे म्हणाले.

“ योगी आमचे गुरू त्यांचे शब्द मागे घेणार नाहीत. ते म्हणत आहेत की त्यांचे बोलणे सत्य आहे तुमचा चमत्कार दोन आण्यांचा आहे. त्यांना जर तुम्हाला भस्म करायचे असेल तर खुशाल करा.” शिष्य म्हणाला आणि तो हट योगी भडकला.

“ एवढे दु:साहस? मी त्याला आता माझ्या योग शक्तीने भस्मच करतो.” असं म्हणून त्यांनी काही मंत्र पुटपुटले आणि त्याचा प्रयोग रामकृष्ण परमहंस यांच्यावर करण्याचा प्रयत्न केला पण साक्षात माँ काली त्यांच्याबरोबर असल्याने त्यांना काहीच झाले नाही.

हट योगी आता वरमला त्याला कळून चुकलं की रामकृष्ण परमहंस हे साधारण व्यक्ती नाहीत. त्यांच्याकडं ही अलौकिक शक्ती आहेत. तो स्वतःच घाटावर बसलेल्या रामकृष्ण परमहंसाजवळ गेला.

“ महोदय मला क्षमा करा मी तुम्हाला ओळखायला चूक केली आहे. पण तुम्ही म्हणता की माझी सिद्धी दोन आण्याची आहे याचा अर्थ मला खरंच कळला नाही. या शब्दांचा अर्थ काय आहे? मला सांगाल का?” त्याने हात जोडून नम्रपणे विचारलं.तसे रामकृष्ण परमहंस हसले.

“ अरे नदीच्या या तिरावरून त्या तीरावर सोडायला नावाडी दोन आणे घेतो. आणि तू इतक्या सध्या गोष्टीसाठी तुझी सिद्धी वापर आहेस म्हणजे झाली ना ही तुझी सिद्धी हे ज्ञान दोन आण्याचे? आणि जर नुसता चमत्कार दाखवून तू किती श्रेष्ठ आहेस हेच तुला सिद्ध करायचं असेल तर मग या तुझ्या ज्ञानाचा आणि वर्षानुवर्षे तप करून प्राप्त केलेल्या या सिद्धीचा समाजाला उपयोग काय? आणि ज्या ज्ञानाचा समाजाला उपयोग होत नाही ते ज्ञान शून्य असते.” रामकृष्ण परमहंस शांतपणे म्हणाले आणि त्या हट योगीचे डोळे उघडले.

तुमच्या ज्ञानाचा समाजाला कोणताही उपयोग होत नसेल तर ते ज्ञान कौडी मोल असते हेच खरे.
★★★★

कथा 2

योग्यता

स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यांचे परम शिष्य होते. विवेकानंदांना माहीत होते की रामकृष्ण परमहंस यांना देवी महाकाली प्रसन्न आहेत.

स्वामी विवेकानंद एकदा असेच स्वतःच्या दारिद्र्याला आणि गरिबीला वैतागून रामकृष्ण परमहंस यांच्याकडे आले.

“ गुरुजी मी ना गरिबीला खूप कंटाळलो आहे.देवी आई तुमच्याशी बोलतात आणि तुमचे ऐकतात देखील कृपया त्यांना सांगा की माझे दैन्य दूर करून मला संपत्ती प्रधान करवी.” स्वामी विवेकानंद म्हणाले.

“ आरे तुझे मागणे मी का सांगू आईला? तूच जा ना ती तिथे उभी आहे जा आणि माग तिला तुला काय हवं ते.” ते गाभाऱ्याकडे बोट दाखवत म्हणाले.

“ हो मीच मागतो आईला.मला सुख समृद्धी, ऐश्वर्या हवे आहे.” स्वामी विवेकानंद हाच विचार करतच गाभाऱ्यात गेले. त्यांनी देवी समोर हात जोडले.

“ आई मला ज्ञान दे. वैराग्य दे.” स्वामी विवेकानंदांच्या तोंडातून हे शब्द बाहेर पडले आणि त्यांचे त्यांनाच आश्चर्य वाटले. रामकृष्ण परमहंस तिथेच उभे होते.

“ आरे वेडा आहेस का तू? तुला तर संमृद्धी आणि ऐश्वर्य मागायचं होतं ना आईकडे. तू हे काय मागत आहेत.” ते म्हणाले.

“ काय माहित पण मी विचार केला होता समृद्धी आणि ऐश्वर्य मागायचा पण मागितलं भलतंच.” स्वामी विवेकानंद म्हणाले.

“ जा मग पुन्हा तुला काय हवं ते मग आई तुला तू जे मागशील ते नक्की देणार.” रामकृष्ण परमहंस पुन्हा म्हणाले.

“ हो … हो मी पुन्हा जातो.” स्वामी विवेकानंद पुन्हा देवीच्या पुढ्यात हात जोडून उभे राहिले.

“ आई मला ज्ञान दे. मला वैराग्य दे.” त्यांच्या तोंडातून पुन्हा शब्द बाहेर पडले.आणि त्यांना कळून चुकलं की आपली योग्यता काय आहे.

“ विवेक तुला जगाचा उद्धार करायचा आहे. सगळ्या जगाला ज्ञानदान करायचे आहे. तुझी योग्यता ती आहे मग तुझे कर्म ते आहे मग तुझ्या तोंडून आई तेच वदवून घेणार ना जी तुझी योग्यता आहे.” रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांना समजावत म्हणाले.

“ गुरुवर्य मला माफ करा काही वेळासाठी मी माझ्या मार्गावरून भटकलो होतो. पण तुम्ही आणि आई कालीने पुन्हा मला माझा मार्ग दाखवला आहे. अशीच आपली कृपादृष्टी राहावी.” स्वामी विवेकानंद नम्रपणे म्हणाले.

स्वामी विवेकानंद यांचे कर्म वेगळे होते आणि ते मागू इच्छित होते ते वेगळंच काही तरी होतं. त्यामुळे त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी रामकृष्ण परमहंस आणि काली आईची ही लीला केली होती.
@स्वामिनी चौगुले