बोललं तर काय झालं??
"नरेन, मला थोडं बोलायचं होतं." ऑफिसमध्ये निघालेल्या नरेनला सावी म्हणाली.
"जे बोलायचं आहे ते पटकन बोल. माझ्याकडे वेळ नाही." ऑफिसची तयारी करत असलेला नरेन म्हणाला.
"ते आई..." सावीने बोलायला सुरुवात करताच नरेनने तिला थांबवले.
"सावी.. प्लीजच.. तू आणि आई यांच्यामध्ये मला ओढतच जाऊ नको." नरेन सकाळी सकाळी वैतागला होता.
"तुला नको ओढू, तर कोणाला ओढू? लग्न केलं आहे ना?" सावीचा पारा पण चढायला लागला होता.
"हे बघ.. मला ना ऑफिसला जाताना कटकटी नको आहेत. सगळा दिवस खराब जातो." रागारागात नरेन तिथून निघून गेला. ते बघून सावीच्या डोळ्यात पाणी आले.
"आई, डबा झाला का?" लेकाच्या हाकेने तिने डोळ्यातले पाणी पुसले. ती वळली तर तो समोरच होता.
"तू रडते आहेस?" कपाळाला आठ्या घालत त्याने विचारले.
"नाही रे.. डोळ्यात कचरा गेला. तुझा डबा भरून ठेवला आहे."
"तो घे.. शाळेतून आल्यावर पोटभर जेव. आजीला त्रास देऊ नकोस. न विसरता खाली खेळायला जा. मला पाठ आहे सगळं." हसतच रिशान म्हणाला.
"शहाणं ग माझं बाळ ते. चल आवर मग लवकर. तू गेलास की मी ही निघते." सावी रिशानच्या गालावरून हात फिरवत म्हणाली.
रिशान शाळेत गेल्यावर सावीने पटापट स्वतःचं आवरलं. निघायच्या आधी स्वयंपाकघरात डोकावली. पोळीभाजी तयार होती. कोशिंबीर करून ठेवली होती. कुकर तयार होता.
"आई, मी निघते. कुकर तयार ठेवला आहे. फक्त गॅस चालू करायचा आहे." जाताना तिने नेहमीप्रमाणे सांगितले आणि ती बाहेर पडली. आज तिला नशिबाने पटकन बस मिळाली. बसमध्ये बसल्यावर तिचे विचारांचे चक्र सुरू झाले. लग्नाला पंधरा वर्षे झाली होती तिच्या. पण अजूनही तिच्या सासूबाईंशी तिचे जमले नव्हते. सासरे, नणंद सासरच्या बाकी सगळ्या नातेवाईकांशी तिचे छान पटायचे. पण सासूबाईंशी? नावच नको. तिच्या लग्नात मानपानावरून उडालेली ठिणगी अजूनही शमली नव्हती. वरवर दोघीही जरी एकमेकींशी जेवढ्यास तेवढे बोलत असल्या तरी कधीतरी वाजायचेच. ते वाजले की तिचे आणि नरेनचे भांडण ठरलेलेच. त्याचा कंटाळा येऊन तिने सासूबाईंना प्रत्युत्तर करणे बंद केले होते. त्यामुळे दोन्ही आघाडय़ांवर म्हटलं तर शांती असायची. पण कधी कधी टोमण्यांचा भडिमार असायचाच. तेच तिला नरेनला सांगायचे होते. पण त्याला कधी वेळच नसायचा. त्यातूनही या गोष्टींसाठी तर नाहीच नाही. मनात तरी किती ठेवणार?
"मॅडम, आला की तुमचा स्टॉप. किती वेळा आवाज दिला." नेहमीच्या कंडक्टरने आवाज दिला म्हणून ती लगबगीने त्यांचे आभार मानून खाली उतरली. मग मात्र घर हा विषय सावीने मनातून पूर्णपणे पुसला. आणि तिने ऑफिसचे काम सुरू केले.
समजवू शकेल का सावी नरेनला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा