Login

बोललं तर काय झालं? भाग २

बोललं तर काय झालं
मागील भागात आपण पाहिले की नरेनचे म्हणणे आहे की त्याची आई सावीला जे बोलते ते तिने ऐकावे. आता बघू पुढे काय होते ते.


"बाबा, रिशान आला नाही का शाळेमधून?" घरी एवढी शांतता बघून सावीने मधुकररावांना विचारले.

"अग, त्याचा फोन आला होता. त्यांना शाळेतून काहीतरी प्रोजेक्ट दिलं आहे म्हणून तो मित्राकडे गेला आहे. तुला फोन करायचा प्रयत्न करत होता तो. लागला नाही म्हणे."

"बहुतेक मिटिंगमध्ये असताना केला असेल.." सावी म्हणाली.

"असेल.. बरं शालिनी तिच्या भजनीमंडळात गेली आहे. मी तुला निरोप द्यायला थांबलो होतो. मी सुद्धा जरा पाय मोकळे करून येतो." मधुकरराव घराबाहेर पडले. फ्रेश होऊन सावी स्वयंपाकघरात गेली. बाईंनी येऊन संध्याकाळचा स्वयंपाक केला होता. तिने स्वतःसाठी कॉफी बनवली. बेडरूममध्ये जाऊन पुस्तक वाचत कॉफी प्यावी म्हणून ती उठली तोच तिच्या आईचा फोन आला.

"काय गं सावी.. आहेस कुठे? दोन दोन दिवस फोनही करत नाहीस."

"आई, कामातून वेळच मिळाला नाही बघ. सॉरी ना.." सावी बोलत होती.

"एवढा वेळ न मिळायला काय झालं? सावी तिकडे सगळं व्यवस्थित ना?" आईने काळजीने विचारले. आईने विचारताच सावीचा बांध फुटला. इतके दिवस घरातल्यांपासून लपवून ठेवलेलं ती सगळं सांगू लागली. बोलता बोलता नरेन घरात कधी आला, कधी पाठीमागे येऊन उभा राहिला तिला समजलेच नाही. नरेनने सावी त्याच्या आईबद्दल बोलत असलेलं ऐकलं.

"काय चालू आहे?" नरेनचा आवाज ऐकून सावी दचकली.

"आई, मी नंतर बोलते तुझ्याशी.." असे म्हणत सावीने फोन ठेवला.

"काय सांगत होतीस तुझ्या आईला?" नरेनने रागात विचारले.

"तेच जे तुला ऐकायला वेळ नसतो." सावीला पण कधीतरी नरेनला ऐकवायचेच होते.

"पण मी म्हणतो आई फक्त बोलतेच ना? मग बोललं तर काय झालं? अंगाला भोकं पडतात का? म्हातारं माणूस आहे, बोललं काहीतरी म्हणून लगेच आईला सांगायचं? माझ्या आईच्याजागी तुझी आई बोलली असती तर असाच अर्थ काढला असतास का? तेव्हा ऐकून घेतलं असतंस ना?" नरेन तावातावात बोलू लागला.

"तेच तर म्हणते आहे ना मी.. त्या मला बोलत असतात. तुला माझ्या बाजूने बोलायचं नाही, नको बोलूस.. पण तू तर ऐकायलाही तयार नाहीस. मग मी माझ्या आईला सांगितले तर काय झाले? तसेही तूच म्हणतोस ना, बोलल्याने काय होते? मग सांगितल्याने काय फरक पडतो?" दोघांचा वाद अजूनही वाढला असता पण तोच बेल वाजली. डोळ्यातलं पाणी पुसत सावी दरवाजा उघडायला गेली.

"आई.. आज ना मी नीलकडे गेलो होतो. तिथे आम्ही प्रोजेक्ट करत होतो.तिथे काय धमाल आली.." रिशान आईला बघून शाळेतल्या गमती सांगू लागला. बोलता बोलता त्याचे लक्ष आईच्या चेहर्‍याकडे गेले. तिचा रडलेला चेहरा त्याने लगेच ओळखला.

"तू परत रडलीस ना? तुला माहिती आहे, आता मी नीलकडे होतो तर त्याची आई छान हसत होती. तू मात्र नुसती रडत असतेस. का ते तर सांग मला." रिशान विचारू लागला.

"ते ना मला ऑफिसचं जरा टेन्शन आहे म्हणून. पण तू काळजी नको करूस. सगळं होईल व्यवस्थित. आता तू बाबांसोबत बस. मी तुझ्यासाठी काहीतरी छानसं खायला करते." बेडरूममध्ये बसलेल्या नरेनने रिशानचे बोलणे ऐकले होते. सावीशी आता वाद घालणे म्हणजे रिशानच्या मनावर परिणाम होणार हे नक्की. त्याने स्वतःला आवरले. तो बाहेर येऊन रिशानशी बोलू लागला. तोपर्यंत शालिनीताई आणि मधुकररावही आले होते. जेवणं होऊन, थोड्याश्या गप्पा मारून सगळे झोपायला गेले. नरेन आणि सावीच्या डोक्यातून मात्र आधीचा विचार गेला नव्हता. दिवस जात होते. दोघांमधला वाद अगदीच वाढला नसला तरी तो कमीदेखील झाला नव्हता.

काही दिवसांनंतर सावीच्या वडिलांचा नरेनला फोन आला.

"नरेन, आम्ही सगळे दोन दिवस बदल म्हणून गावी चाललो आहोत. येणार का?"

"गावी? आणि सगळे म्हणजे कोण कोण?"

"सगळे म्हणजे साहिल येतो आहे. तुम्ही येणार असाल तर सांग." नरेन विचार करू लागला. सासरी जाणं म्हणजे एकदम आराम. दोन दिवस मस्त सासूबाईंकडून सगळे लाड पुरवून घ्यायचे. त्यात लाडका मेहुणा असणार म्हणजे नुसता टाईमपास. त्याची बायको कविताही बोलायला छानच आहे. त्यांची मुलं खेळायला असली की रिशानचेही टेन्शन नाही. तशीही इथे सावीची जी रोजची कुरकुर असते तिथे ती तरी नसेल. नरेनने पटकन होकार देऊन टाकला.

मिळेल का नरेनला तिथे गेल्यावर शांती? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
0

🎭 Series Post

View all