Login

बोललं तर काय झालं? अंतिम भाग

बोललं तर काय झालं
बोललं तर काय झालं?? भाग ३


मागील भागात आपण पाहिले की नरेन सावीच्या घरातल्यांसोबत दोन दिवस बाहेर जायला होकार देतो. आता बघू पुढे काय होते ते.


"जिंदगी इक सफर है सुहाना.." नरेनने गाणं म्हणायला सुरुवात केली.

"सुहाना सफर और ये मौसम हंसी.." नरेनचे गाणं मध्येच थांबवून सानवीच्या बाबांनी विपुलरावांनी सुरुवात केली. सगळ्यांसमोर असं थांबवलेलं नरेनला आवडलं नाही. पण आता बोलणंही बरोबर नाही हे समजून तो गप्प बसला. त्याने सावीकडे बघितले. ती तर काहीच झाले नाही असे दाखवत बाबांना कोरस देत होती. वैतागून मग नरेनही मिनीबसच्या पाठच्या सीटवर जाऊन बसला. बाकी सगळ्यांची अंताक्षरी सुरूच होती.

सगळेजण नाश्ता करायला थांबले. सकाळी लवकर निघाल्यामुळे सगळ्यांनाच भूक लागली होती.

"मला इडली सांग.." ऑर्डर देत असलेल्या साहिलला नरेन म्हणाला.

"इडली?? इथे येऊन तू इडली खाणार? अरे इकडची मिसळ खाऊन बघ. बोटं चाटत राहशील." विपुलराव म्हणाले.

"नको.. सकाळी सकाळी एवढं मसालेदार खाल्लं की मला जळजळतं." कसनुसं हसत नरेन म्हणाला.

"काय तो नाजूकपणा.." विपुलराव म्हणाले. यानंतर सुद्धा जेव्हा समोर मिसळ आली तेव्हा नरेन वैतागला.

"मला मिसळ नको होती."

"भाऊजी.. त्यांच्याकडे इडली नाही म्हणून." साहिल खांदे उडवत म्हणाला. बळजबरीने नरेनने मिसळ संपवली. खरंतर सासरी नेहमी मनासारखे होत असताना याचवेळेस असं का होतं आहे त्याला समजेना. त्याला सावीला काहीतरी बोलायचे होते. पण ती आज त्याच्यापासून लांबच रहात होती. शेवटी सगळे घरी पोहोचले. मुलं लगेच अंगणात खेळू लागली. तर बायका फोटो काढण्यात मग्न झाल्या. स्वयंपाक वगैरे न करता बाजूच्याच हॉटेलमध्ये जेवायचे ठरले होते. सगळेच रिलॅक्स होते. पुरूषांची ही मग गप्पांची मैफल जमली. विषय होता राजकारण.. एकजण सत्ताधारी पक्षाच्या बाजूने तर एकजण विरोधी. चर्चेचे रूपांतर हळूहळू वादात होऊ लागले.

"तुला काय समजतंय राजकारणातले? घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर. एवढंच तुमचं जग. कोणी काही बोललं की चालले मेंढरासारखे त्याच्या पाठी. अरे डोक्याचा भाग वापराल की नाही." विपुलराव बोलले. त्यांचे बोलणे ऐकून साहिल हसला. ते हसणं नरेनला लागलं. ताडकन उठून तो सावीजवळ गेला.

"आपण आत्ताच्या आत्ता परत निघतो आहोत."

"का? काय झाले?" सावीने आश्चर्याने विचारले.

"तुझे बाबा आज मला वाटेल तसे बोलत आहेत. जावयाचा काही मान वगैरे असतो की नाही?"

"बोललेच ना.. मारलं तर नाही ना? आणि तसंही बोललं तर काय फरक पडतो. जावयाचा असतो तो मान.. आणि सुनेचा असतो तो अपमान?" सावीने संधी सोडली नाही.

"तू मुद्दाम करायला सांगितलेस हे?" नरेन वैतागला होता.

"नाही.. सावीने आम्हाला काहीच सांगितलं नाही.. पण त्यादिवशी तिच्या आईने तुमचे सगळे बोलणे ऐकले होते." सावीचे बाबा दोघांजवळ येत म्हणाले.

"म्हणजे?" सावी आणि नरेनला काहीच समजले नाही.

"त्यादिवशी तू आईचा फोन ठेवते म्हणालीस आणि फोन कट झालाच नाही. नरेनचा वाढलेला आवाज हिने ऐकला. त्याचे बोलणे ऐकून तिला रात्रभर झोप लागली नाही. मग बायकोची झोप आणि लेकीचा मान परत मिळवून देण्यासाठी मला हे करावं लागलं. नरेनराव सॉरी बरं का त्यासाठी.." विपुलराव हात जोडत म्हणाले. ते बघून नरेन ओशाळला.

"काहीही काय हे बाबा. मी खरंच लहान आहे तुमच्यापेक्षा. तुम्ही नका हात जोडू. उलट माझी चूक समजावून सांगण्यासाठी धन्यवाद. पण तरीही मी आईला उलट बोलू शकत नाही." नरेन बोलत होता.

"उलट बोलायला सांगतं कोण? पण माझं ऐकून तर घेऊ शकतोस ना?" सावीने फटकारले.

"म्हणजे?"

"मी काही तुला तुझ्या आईशी भांडायला सांगत नाही. पण माझे बाबा तुला बोलल्यावर तुला जसे वाईट वाटले तसेच मलाही वाईट वाटते. जेव्हा तू ते समजून घेत नाहीस तेव्हा दुप्पट वाईट वाटते." सावी बोलत होती.

"नवरा बायकोच्या मध्ये शहाण्या माणसाने बोलायचे नसते. पण मला आता मोह आवरत नाही. नरेन, बायको आणि आईच्यामध्ये पुरूषाची अवस्था नेहमीच वाईट असते. दोन्ही बाजू त्याला तेवढ्याच प्रिय असतात. पण एक सांगायला आवडेल. आई त्या घरात जुनी असते, तुलनेने बायको नवीन. अश्यावेळेस तिला थोडं समजून घेतलं तरी आयुष्य सुखकर होते बरं.. आणि हे फक्त मी तुलाच सांगतोय असं नाही बरं का.. साहिललाही तेच सांगतो." मिश्किलपणे हसत विपुलराव म्हणाले.



ती माझ्याशी बोलतच नाही, या कथेवर आलेल्या कमेंट्सला उत्तर म्हणून ही कथा. बर्‍याच पुरूषांचे म्हणणे असते की सासू बोलते मग सुनेने ऐकलं तर काय फरक पडतो? आपली आई बोलते तेव्हा वाईट वाटते का? पण हिच वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा मग सगळं तत्त्वज्ञान गुंडाळून ठेवण्यात येते. मी कोणाच्याही विरोधात नाही. ना सासूच्या ना सुनेच्या. आजूबाजूला दिसत असलेल्या गोष्टी मी कथेच्या रूपात मांडते एवढंच. कसं असतं कोणतीही स्त्री जेव्हा सासू होते, तेव्हा तिचे वय पन्नास ते साठच्या आसपास असते. शरीर सुदृढ असते. त्यात काहीजणी सुनांवर सासूपण गाजवू पाहतात. काही वर्षांनंतर जेव्हा शरीर साथ देत नाही तेव्हा मात्र सुनेने आधीचे विसरून आपलं सगळं करावं हा अट्टाहास असतो. तोच मांडायचा मी प्रयत्न केला होता. असो.. कथा कशी वाटली हे तुम्ही सांगालच.. अभिप्रायच्या प्रतिक्षेत.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

ता.क. माझ्या कथांवर माझे कॉपीराईट आहेत. याचा कोणत्याही प्रकारे उपयोग करण्याआधी लेखिकेची परवानगी आवश्यक आहे.
0

🎭 Series Post

View all