बोलके प्रतिबिंब

लघुकथा
"आज मेकअप नीट होता नव्हता. शी बाई ! काय हे ! किती वेळ लागत आहे आज." सौंदर्या स्वतः शीच पुटपुटत होती.‌ तिकडे सगळेजण तिची वाट बघत होते.‌

अगं चल‌ ना लवकर. कितीवेळ त्या आरशासमोर उभी राहणार आहे. तिचा नवरा निखील बाहेरून ओरडत होता. मुलेही वाट बघत होती.

चेहऱ्यावरच्या सुरुकुत्या बाहेर पडून तिला वाकुल्या दाखवत होत्या. डोळ्यांखाली काळी वर्तुळे फेर धरून नाचत होती. काळेभोर डोळे गरागरा खाली वर फिरत होती आणि चाफेकळी नाक तर तिलाच कुठेतरी नाक मुरडत उभे होते. तर ओठांनी तर वाकुल्या दाखवायला सुरुवात केली. केसांमधून चंदेरी तारा बाहेर डोकावून बघु लागल्या होत्या.

पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे...

"अगं कोण तू? आणि या आरशात तुझं काय काम? "

"कोण बोलतोय ?"

"अग समोर बघ ना जरा . अगं मी तुझ प्रतिबिंब दाखवणारा तुझा मित्र. प्रत्त्येक वेळी तू मला नाक मुरडते. मला स्वच्छ करते. पाणी मारते, नाही तर ते काय लिक्वीड आणते आणि मला फसाफसा ते काय थोपटते. तेव्हा मलाही त्रास होतो ना ! अगं,पण मी जसा आहे तसाच राहणार आहे. कारण मी आहे आरसा. स्वतः च्याच विश्वात रममाण होऊन तुम्ही माझ्याकडे बघूनच सजता, नटता. दहावेळा प्रत्येकाला विचारता. मी कशी दिसते ? मी कशी दिसते? अगं पण हे लेपन लेवून तुम्ही तुमचे जे सौंदर्य वाढवता ना ते तात्पुरते असते. मी असं म्हणत नाही की तुम्ही नटूनथटून रहा. पण आयुष्याची खरी ओळख तुमचा चेहरा दाखवत असतो. चेहऱ्यावर एक आणि मनात एक अशी तुमची भावना असते. एक तर चेहरा कितीदा साफ केला तरीही मन कुठे साफ आहे. त्यात काय काय दडलंय माहित तरी आहे का?

"म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. माझं मन कलुषित आहे का ?"

"मी कुठे काही बोलतोय. तूच आता दाखवून दिले."

"तसं नाही. परिस्थिती नुसार मी तस वागते?"

"ही परिस्थिती कोण निर्माण करते?"

"तूच ना !"

"मला एक सांग, तू सकाळी उठल्यापासून किती‌वेळा चिडचिड करते ?"

"नाही रे कधी लक्षच दिले नाही. पण कदाचित असंख्यात वेळा ..."

"सांग बघू. नाही सांगता येत. मीच सांगतो आणि आरशातले प्रतिबिंब धडाधड बोलतच सुटले.

झोपेतून उठायला उशीर, कारण रात्री मोबाईल वर गेम खेळण, चॅटिंग करणे. त्यानंतर झाडझूड, रांगोळी, मुलांना उठवण, आंघोळीसाठी कुरकुर, त्यांचा नाश्ता, डबा, शाळा ,सासुबाईंचा नाश्ता ,नवऱ्याचा डबा, नाश्ता, कपडे ऑफीस, पुजा अर्चा, भांडे वाली नाही आली तरी चिडचिड. तुम्हाला भुक लागून जाते पण वेळ मिळत नाही ‌म्हणून चिडचिड, रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा यावरून चिडचिड, इस्त्रीवाला‌ नाही आला तरी चिडचिड, पाणी‌वाला नाही आला तरी चिडचिड, नेमकी भाजी घ्यावी तर भाजीवाला नाही. म्हणून चिडचिड, थोडावेळ वामकुक्षी घ्यावी तर सासुबाईंना भुक लागते. कधी शांततेने माझ्या समोर उभं राहून स्वतः ला न्याहाळले तर कोणीतरी आवाज देत. कोणीतरी यावं आणि आपलं काम कराव असं सतत वाटत असतं. पण कोणाचीच मदत नसते. अपेक्षा मात्र सगळ्यांच्या असतात. कसं काम करावं त्याच नियोजन नीट होत नाही. नेमकं कुठे जायचं तर घरी गाडी नसते."

"अरे, थांब किती बोलशील? थांब जरा."

" का ? सत्य बोललं तर मिरच्या झोंबल्या का ? पण मी तुम्हाला वास्तवाचे भान करून देत असतो. हो की नाही. तुझ्या मनात सतत कालवाकालव चालली असते. मनात एक आणि ओठांवर एक असेही कधी कधी वागता तुम्ही. कधी कधी तुम्ही कोणाशी नीट बोलत नाही. इर्षा, हेवेदावे, इगो, स्वाभिमान, मान सन्मान, हव्यास हे सगळं तुमच्या चेहऱ्याच्या मागे दडलेले असते. मग फक्त मेकअप करून कसं भागेल. अग वयोमाननुसार प्रत्येक गोष्ट वेळेवरच होतिल. सत्य तर तुम्ही नाकारू शकतच नाही."

सौंदर्या विचारात पडली.

"काय झालं सौंदर्या ?"

"अग वरवरचे सौंदर्य आरशात दिसते, पण मनाच्या आतले सौंदर्य कोण पारखणार ? अग स्वतः ची पारख स्वतः लाच करावी लागेल."

"पण, हे कसं शक्य आहे ?"

"अग, एकदा बघ माझ्याकडे. तुझ्या प्रतिबिंबांच्या मागे तुझं कुटुंब उभं आहे. हे संपूर्ण जग प्रेम, माया यासाठी आसुसलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे बघत आहे. गरीब असो किंवा श्रीमंत आरशात प्रतिबिंब तुमचच दिसणार."

सौंदर्याच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.‌

"साॅरी खरच साॅरी. मला माफ कर.‌ आतापर्यंत नको त्या गोष्टींवर मी वेळ आणि पैसा खर्च करीत आली. पण आता नाही. जे सत्य आहे त्याचा स्वीकार मी केला.

पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक

अगं तू राजहंसाप्रमाणेच आहे. तूच नव्हे तर जगातील प्रत्येक स्त्री सुंदर असते. तिच्यात आई, बहिण मुलगी , मावशी , सून ,आजी, सासूबाई, काकू ,ताई अशी कितीतरी रुपे दडलेली आहे. तेव्हा स्वतः च्याच प्रतिबिंबात स्वतः अडकून पडू नको‌. हे जग खूप सुंदर आहे. तेव्हा एकदा स्वतः च्या प्रेमात पड."

मागून आवाज आला. निखील गाणे म्हणत होता.

हे मेरी जोहराजबी,तुझे मालूम नहीं
तू अभी तक है हंसी और मैं जवान।

"चला आता उशीर नाही होत आहे का?"

तिने आरशकडे पाहून त्याला बाय बाय केले.

©® अश्विनी मिश्रीकोटकर