Login

बूमरॅंग

कर्माची बूमरॅंग सांगणारी कथा

ईरा चॅम्पियन ट्रॉफी:-२०२५

लघुकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- बूमरॅंग

"काय बाई, काय ह्या म्हतारीचे खोकलेणे, रात्रभर नुसती त्यांची ख्याॅंई ख्याॅंई चालू असते. रात्रभर माझ्या डोळास डोळा लागला नाही. माझ्या मेलीचं नशीबचं फुटकं म्हणायचं? असलं घर सासर म्हणून मिळालं. कधी सुख लागलं मला काय माहिती?" सकाळ सकाळ रेवती भांडी आपटत आपल्या सासरचा उध्दार करत होती.

"ए आई, डब्बा दे लवकर." रेवतीचा मुलगा सुजय स्कूल बॅग पाठीला अडकवून शाळेला निघण्याच्या तयारीत म्हणाला.

"हा देते की, थांब जरा." ती थोड चिडूनच म्हणाली.

"अगं, थांब काय म्हणतेस? दे बाई लवकर , मला शाळेला जायला उशीर होतोय." सुजय घाई करत म्हणाला.

तेवढ्यात रेवतीचा नवरा निखिलही ऑफिसला जाण्याच्या तयारीत मनगटातील घड्याळ्याकडे पाहत म्हणाला,"ए रेवू, पटकन नाष्टा दे. आज ऑफिसमध्ये महत्त्वाची मिटिंग असल्याने मला ऑफिसला लवकर जायचे आहे."

"रेवती, तुझ्या सासूला घोटभर चहा असलं दे गं, सोबत खायला काही असेल तर ते पण दे. ती खोकल्याने रात्रभर झोपली नाही. थोडं खाऊन आता हे औषध आणले ते घेऊन झोपेल मग. संध्याकाळी डाॅक्टरांकडे घेऊन जाईन." रेवतीचे सासरे मोहन तिला दबकतच म्हणाले.

"ओ मामा, तुम्ही जरा थांबा की. तुम्हाला आणि आत्याला कुठे जायचे आहे? अगोदर यांच बघू द्या मग देते तुम्हाला. मला काय चार हात नाहीत." ती तुसडेपणाने नाक मुरडत म्हणाली.

मोहन तोंड बारीक करून तेथेच उभे राहिले.

रेवतीने सुजयला डब्बा दिला तसा तो शाळेसाठी निघून गेला आणि नंतर तिने निखिलला नाष्टा आणून दिला. तो खाऊ लागला.

मोहन थोडावेळ निखिल जवळ घुटमळत राहिले.

नंतर थोडं धाडस करत ते म्हणाले,"निखिल, तुझ्या आईला संध्याकाळी डाॅक्टरांकडे घेऊन जायचे आहे."

"हा, मग घेऊन जा की." तो खात खात म्हणाला.

मोहन अजून काय बोलणार याकडे रेवतीने कान टवकारले.

"अरे, पण पैसे पाहिजे होते थोडे. माझी पेन्शन आली की तुला देईन." ते मोठ्या आशेने त्याच्याकडे पाहत म्हणाले.

त्यांनी पैसे मागताच खाणाऱ्या निखिलला जोराचा ठसका लागला. तो जोर जोरात खोकलू लागला.

रेवती पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आली आणि त्याला पाणी प्यायला लावत त्याच्या पाठीवर हात फिरवत रागात पाहत तणतणत त्यांना म्हणाली,"काय ओ मामा, सकाळी सकाळी कशाला यांना त्रास देता? सुखाने दोन घास तरी खाऊ द्या की त्यांना. डाॅक्टर काय कुठे पळून जात नाहीत.‌ आल्यावर बोलला असता ना. लागला ना आता यांना ठसका?"

"अगं, पण रेवती मी काय म्हणालो असं ठसका लागण्यासारखं?" तेही थोडं रागात म्हणाले.

"आता गप्प बसा, मला अजून बोलायला लावू नका. सदानकदा तुमची ही आजारपणाची नाटके सुरू असतात. पैसे काय झाडाला लागतात का, जेव्हा पाहिजे तेव्हा काढून घ्यायला? जेव्हा बघावं तेव्हा तुमचं रडगाणे चालू असते. एवढ्या तेवढ्याला लगेच आले पैसे मागायला." तिने नाक तोंड मुरडत तिच्या तोंडाचा पट्टा सुरू केला.

"अगं, पण मी पैसे नंतर देतो बोललो ना. मी रिटायर्डचा पैसा तुमच्या घशात घातले नसते तर आज तुमच्या समोर अशी हात पसरायची वेळच आली नसती." त्यांनाही तिचे बोलणे सहन झाले नाही तेव्हा त्यांनीही प्रत्युत्तर दिले.

ती अजून काही बोलणार तोच निखिलने हाताचा पंजा दाखवत दोघांकडे रागाने पाहिले. त्याचा ठसका कमी झाला तसा तो चिडत म्हणाला,"बास करा दोघेही तुम्ही. काय लावलिये सकाळी सकाळी कटकट? बाबा, आता महिनाअखेर आहे, त्यामुळे माझ्याकडे पैसे नाहीत आणि हो तुम्ही काही उपकार केले नाहीत रिटायर्डचा पैसा देऊन. ते तुमचं कर्तव्य होतं. हे घर घेण्यासाठी तुमचा फक्त खारीचा वाटा आहे. तुमचे पैसे तर या घराच्या एका कोपऱ्यासाठीच संपले होते. बाकी सगळं तर मी लोन काढून केलं. तेच फेडता नाकी नऊ येत आहे माझ्या. त्यात सुजयचा खर्च, घरखर्च, तुमचे आणि आईचे आजारपण यावर पण पैसे खर्च होतात. असे अधेमधे कोठून देऊ पैसे? तुमचे पेन्शन आल्यावर घेऊन जा आईला डाॅक्टरांकडे. तोपर्यंत घरगुती काढा देऊन पाहा."

त्याच्या अशा रूक्ष बोलण्याने मोहन यांच्या डोळ्यांत पाणी आले. ते सगळे बोलणे आत असलेल्या मोहन यांच्या पत्नी पद्माने ऐकले. ते बोलणे तिच्या जिव्हारी लागले.

ती खोकत कशी बशी तिथे येत म्हणाली,"अहो, जाऊ द्या त्याला सकाळी सकाळी माझ्यामुळे उगीच वाद नको. मी काढा घेईन अजून दोन दिवस. तुमचे पेन्शन आल्यावर जाऊ आपण डाॅक्टरांकडे."

"अगं, पण.." मोहन काही बोलणार तोच तिने भरल्या डोळ्यांनी पाहत नकारार्थी मान डोलावली. त्यामुळे हताश होत मोहन तिला घेऊन त्यांच्या रूममध्ये आले.

"अगं पद्मा, तुला ताप आहे. मला काय तुझी तब्येत काही ठीक वाटत नाही. मी दामूकडून उसने पैसे आणतो. तू तोपर्यंत आराम कर." ते तिच्या कपाळावर हात ठेवत तिच्या काळजीने म्हणाले.

मोहन आणि पद्मा यांचा निखिल हा एकुलता एक मुलगा. ते जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. निखिल एका चांगल्या कंपनीत अभियंता होता. त्याला पगारही चांगला होता. मोहनच्या रिटायर्डचे पैसे मिळेपर्यंत निखिल आणि रेवती त्यांच्याशी नीट वागत होते. पण जेव्हा घर बांधण्यासाठी सर्व जमापुंजी आणि ते रिटायर्डचे पैसे त्याला दिले. त्यानंतर ते दोघे त्यांच्याशी तुटक वागू लागले.

आता तर पद्माच्या तब्येतीच्या सतत कुरबुरी सुरू झाल्या होत्या. आधी त्या घरकामात रेवतीला मदत करायच्या पण आजारपणामुळे तिला काम होईना. त्यावरून रेवती तिला टोमणे मारायची. त्यात निखिलही रेवतीचीच बाजू घ्यायचा.

छोट्या छोट्या कारणांवरून त्यांच्यामध्ये वाद होत राहायचे. ते कारणही रेवती मोठे करून भरपूर तोंडसुख करायची. त्यामुळे पद्माने हाय खाल्ली होती.

मोहन त्यांच्या मित्राकडून उसने पैसे घेऊन पद्माला डाॅक्टराकांडे नेऊन आणले.

उसने पैसे आणले म्हणून रेवती आणि निखिल त्यांना खूप बोलले. वाद विकोपाला गेले.

"खूप झालं आता, एकतर या घरात मी राहिलं नाही तर हे. लवकर काय ते निर्णय घ्या तुम्ही?" रेवती तणतणत म्हणाली.

मोहन आणि पद्मा यांना हे सर्व असहाय्य झाले. त्यांनी ते घर सोडले आणि वृद्धाश्रम गाठले.

रेवतीला मनापासून खूप आनंद झाला.

'बरं झालं, ब्याद गेली घरातून एकदाची. वैताग आला होता नुसता. रोज उठून किरकिर तर नसेल आता.' ती मनातच आनंदाने पुटपुटली.

असेच सात आठ महिने निघून गेले. मोहन आणि पद्मा वृद्धाश्रमात आरामात राहत होते. मुळात दोघांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने आश्रमात सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचे. त्यामुळे सगळ्यांचे ते लाडके बनले.

"रेवू, तुझ्या दादा-वहिनीने आम्हा दोघांना घराबाहेर काढले. आम्ही वृद्धाश्रमात राहतोय." एकदा रेवतीच्या आईने रडत तिला फोन केला.

"अगं पण कसं काय ? ते घर तुमचं आहे ना? " रेवतीला धक्का बसला होता. ती सावरत दाटक्या स्वरात म्हणाली.

"हो, पण तुझ्या दादाने गोड बोलून, फसवून  मागेच ते तुझ्या वहिनाच्या नावावर करून घेतले होते. ते परवा कळले. तुला तर माहिती तुझा दादा तुझ्या वहिनीच्या ताटाखालचं मांजर आहे ते. आमच्यात खूप वाद झाले. त्यातच तिने घराबाहेर काढले." तिच्या आईने सर्व कर्मकहाणी तिला सांगितली.

रेवतीच्या नजरेसमोर तिचे सासू सासरे उभे राहिले. तिचे डोळे पाण्याने डबडबले. तिने जसे तिच्या सासू सासऱ्यांबरोबर केले तसेच तिच्या वहिनीने तिच्या आई वडिलांसोबत केले. जसे बूमरॅंग होते. तसेच तिच्या कर्माचे बूमरॅंग तिच्या आई वडिलांसोबत झाले.

समाप्त -

आपण जसे एखाद्या सोबत वागतो तसेच आपल्या सोबत होते. बूमरॅंग जसे पुन्हा फिरून आपल्याकडे येते तसे आपले कर्माचे बूमरॅंग असते.

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0