बॉर्डर २ - चित्रपट समीक्षण
बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची इच्छा होत होती. 'बॉर्डर २' चित्रपटाच्या निमित्ताने ती पूर्ण झाली. शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाला आणि आम्ही तिघे शनिवारी सकाळी चित्रपट बघायला गेलो. सुनील शेट्टी अभिनीत जुना बॉर्डर चित्रपट मी शाळेत असताना पाहिला होता. गंमत म्हणजे 'बॉर्डर २' येण्यासाठी सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी मोठा होईपर्यंत वाट पहावी लागली. सुनील शेट्टीची जागा आहान शेट्टीने भरून काढली आहे. जुन्या बॉर्डरमध्ये जेव्हा सुनील शेट्टी शहीद होतो तेव्हा रडू कोसळले होते. 'बॉर्डर २' मध्ये देखील आहान शेट्टी शहीद होतो, तेव्हा अश्रू अनावर होतात. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि आत्मविश्वास वाखाण्याजोगा आहे. सुनील शेट्टीचा मुलगा म्हणून त्याच्याकडे पाहताना नकळत त्याचे कौतुक वाटू लागते. सध्या तो सोशल मीडियावर 'कमेंट्स स्टार' म्हणून ओळखला जातोय. "त्याने कमेंट केल्याशिवाय चित्रपट बघायला जाणार नाही," असे लोक गमतीने म्हणताय. तोही कमेंट्स करून लोकांना चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसतोय. कदाचित यामुळेच लोकांच्या त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या असतील, ज्या हा चित्रपट पाहिल्यावर पूर्ण झाल्यासारखे वाटते.
'बॉर्डर १' मधील गाणी आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असताना नवीन पिढीने अभिनय केलेला 'बॉर्डर २' चित्रपट कसा असेल, याची उत्सुकता निर्माण झाली होती. मिलेनियम जनरेशनच्या काळात गाजलेला हा चित्रपट आमच्या घरातील एकमेव 'झेन जी' ला कितपत आवडेल यात शंका होती. त्यात आमच्या घरातल्या 'पापा की परीला' न सांगताच आम्ही तिकीटे बुक करून टाकली होती.
“जुना बॉर्डर पाहिल्याशिवाय नवीन समजेल का?” या तिच्या प्रश्नावर मी तिला समजावून सांगितले की, "बऱ्याच वर्षांनंतर नवीन चित्रपट आल्याने हा त्या चित्रपटावर आधारित नसेल. कदाचित 'नव्या बाटलीत जुने अत्तर' असल्यासारखे वाटू शकते, पण सुगंध तोच राहील. आपण आपली पाटी कोरी ठेवून चित्रपट बघूया. मगच आपल्याला त्याचा पूर्णपणे आस्वाद घेता येईल." समाधानकारक उत्तर मिळाल्याने ती प्रफुल्लीत होऊन चित्रपटगृहात शिरली.
'बॉर्डर २' हा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील काही सत्य घटनांवर आधारित आहे. पंजाबी चित्रपटसृष्टीतील प्रभावशाली दिग्दर्शक अनुराग सिंग यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. ह्या चित्रपटात लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या शौर्याची गाथा मांडली आहे. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि आहान शेट्टी यांच्यासोबत मोना सिंग, सोनम बाजवा, अन्या सिंग आणि मेधा राणा यांनीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. बाकी इतर कलाकारांनी सुद्धा त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका सहजपणे निभावून नेल्या आहेत. त्यामुळे थोड्याफार फरकाने त्यांचाही अभिनय लक्षात राहून जातो. चित्रपटात दाखवलेल्या जवानांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा त्याग पाहून मन हेलावून जाते. आपसूकच आपल्या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांचा विचार मनात येऊन आपला उर अभिमानाने आणि कृतज्ञतेने भरून येतो.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच अचानक प्रकट होणारा सनी देओल आणि शत्रूंना उचलून फेकणारा त्याचा 'ढाई किलोचा हात’ पाहून जल्लोष निर्माण होतो. त्यानंतर शत्रूसमोर ताठ मानेने उभे राहून सॅल्यूट ठोकायला लावणारा वरुण धवन मेजर म्हणून एका प्रसंगात भाव खाऊन जातो. अधूनमधून हसवणारा हवाई दलाचा दिलजीत आणि आत्मविश्वासाने वावरणारा नौदलाचा आहान, त्या तिघांची स्पर्धेपासून मैत्रीपर्यंतची विनोदी वाटचाल पाहून चेहऱ्यावर हसू आणि आसू दोन्ही पसरते. चित्रपटात दिलजीत आणि वरुण यांच्यात लागलेली पैज… “मुझे हारना पसंद नही” व 'जो हारेगा वो सॅल्यूट मारेगा ' असे संवाद म्हणणाऱ्या दिलजीतला वरुण सॅल्यूट मारतो तेव्हा तो प्रसंग मनावर कोरला जातो. मात्र, वरुण आणि त्याची पत्नी मेधा राणा यांच्यात लागलेल्या पैजेचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, हे पाहण्यासाठी कदाचित 'बॉर्डर ३' चीच वाट पाहावी लागेल.
मध्यंतरापूर्वी या चारही नायकांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांचा प्रशिक्षण काळ दाखवला आहे. मध्यंतरानंतर मात्र युद्ध होणार आहे हे माहीत असताना हे चौघे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना कसे खिळवून ठेवतील याची जिज्ञासा निर्माण होते. "कहाँ तक? लाहोर तक." आणि "कुछ राम अभी तक लौटे नहीं..." यांसारखे शब्द काळजाला भिडतात. 'संदेसे आते है' हे गाणे तेव्हाचे आणि आताचे अजूनही तितकेच भावुक करून जाते. चित्रपटात जेव्हा हे गाणे पुन्हा सुरू झाले, तेव्हा मला अश्रू अनावर झाले होते. मी डोळे पुसत मुलीकडे पाहिले, तेव्हा ती देखील आपल्या भावना आवरण्याचा प्रयत्न करताना दिसली. 'झेन जी' जनरेशन जास्त संवेदनशील नसते, असे कोण म्हणते? कदाचित ते वास्तव लवकर स्वीकारतात म्हणून तसे वाटत असावे. देशभक्तीवर आधारित चित्रपट पाहताना हमसून-हमसून रडणाऱ्या माझ्या मुलीचा मला त्यावेळी सार्थ अभिमान वाटला. चित्रपट संपल्यावर ती लगेच म्हणाली, "आता मी 'बॉर्डर १' सुद्धा पाहणार." हे ऐकून मनाला खूप समाधान वाटले.
हा चित्रपट पाहताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. मी 'बॉर्डर १' पाहिलेला असल्यामुळे माझ्या अपेक्षा वाढणे साहजिक होते. याच अपेक्षांमुळे कदाचित काही ठिकाणी युद्धप्रसंगांतील ग्राफिक्स आणि वेगाने फिरणारा कॅमेरा मला थोडा विचलित करत होता. शिवाय काही ठिकाणी काही प्रसंग अजून उत्तम होऊ शकले असते, असे राहून राहून वाटत होते. या किरकोळ त्रुटींकडे दुर्लक्ष केले तर चित्रपट उत्तम आहे.
एकंदरीत मनोरंजन करणारे चित्रपट आपण नेहमीच पाहत असतो. मात्र देशभक्ती, निष्ठा आणि त्यागाची जाणीव करून देणारा ‘बॉर्डर २’ सारखा चित्रपट पालकांनी आपल्या मुलांना आवर्जून दाखवावा, असे मला मनापासून वाटते. कारण आपले जवान सीमेवर आपल्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस पहारा देत आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत, हे आपल्या मुलांना देखील कळायला हवे.
लेखन - सौ. अपर्णा राजेश परदेशी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा