Login

बॉर्डरलेस

तुम्ही १९४७ साली काही कागदांवर सह्या करून हा भाग वेगळा तो भाग वेगळा करून टाकून दोन भागांमध्ये बॉर्डर आखलीत.

बॉर्डरलेस

तिला काश्मीर विषयी डॉक्युमेंटरी फिल्म बनवायची होती. त्यासाठी तिला काश्मीर फिरायचं होतं. ह्या लोकांची संस्कृती , राहणीमान सगळं काही तिला जाणून घ्यायचं होतं आणि.. याला निमित्त होतं हनीमून. बऱ्याच महिन्यांनंतर तिला नवऱ्याचा सहवास लाभला होता. नवरा टूरिझम कंपनीचा मालक आणि ही एक फिल्म मेकर . मागचे काही महिने शूटिंगच्या निमित्ताने ती चेन्नईत होती त्यामुळे नवऱ्याला वेळही देता येत नव्हता. तो तिला समजूतदारपणे सांभाळून घेत होता आणि तिच्या कामात वेळ मिळेल तसा मदतही करत होता. काश्मीर विषयी जाणून घेण्यासाठी आणि हनीमूनसाठी दोघं काश्मीर मध्ये आले. श्रीनगरच्या एअरपोर्टवरून दोघे जवळच्याच हॉटेलवर आले. प्रवासामुळे थकलेले ते फ्रेश झाले आणि पुढचे पंधरा दिवस काश्मीरमध्ये कुठे कुठे फिरायला जायचं , शॉपिंग काय करायचं सगळ्याची एक लिस्ट बनवली. त्या लिस्टमध्ये सर्वात टॉपवर एक नाव होतं – श्रीनगर. काश्मीर ची राजधानी.

    दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे नाश्ता करून श्रीनगर फिरायला हॉटेलमधून बाहेर पडले. श्रीनगरच्या हरि नगराचं प्रतिरूप त्याला काश्मीरमध्ये बाल म्हणतात ते पाहायला ती दोघं हातात हात घालून गेले. आसपासच्या आक्रोडच्या बागा आणि जवळच महाराजा अवंती यांनी बांधलेल्या नागबल अशा सर्वत्र ते फिरले. भोवताली हिंदू , मुसलमान , शीख लोकांची वर्दळ होती. फेरन ह्या काश्मीरी पेहरावातले लोक अधूनमधून दिसत होते. मोठ्या संख्येने जवान इथल्या जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी डोळ्यात तेल घालून आतंक , दहशतवाद थांबवण्यासाठी सज्ज होते.

    श्रीनगर मधून गल्लीबोळातून फिरताना अनेक दरवाजे बंद दिसत होते. काही घरं जाळलेली वाटत होती. त्या दोघांच्या अंगावर हेच दृश्य पाहून काटा आला. तिच्या डोळ्यांसमोरून एका सेकंदात निर्वासित काश्मीरी पंडीतांच्या बघितलेल्या मुलाखती निघून गेल्या. शीखांना दिलेला तो त्रास सगळं काही असह्य. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला.

“ काय झालं ? ”

“ न.. नाही काही नाही ! जाऊया पुढे ? ” तिने स्वतःला सावरलं. जळून कोळसा झालेल्या त्या घरांचे फोटो तिने मोबाईलमध्ये काढले आणि दोघे पुढे निघाले. श्रीनगर मधल्या बाजारपेठेत ते फिरू लागले. इथे काय पिकतं आणि काय विकलं जातं ह्या गोष्टी देखील तिने जाणून घेतल्या. बाजारपेठेत फिरताना काश्मीर चा संपूर्ण सांस्कृतिक इतिहास सांगणारं नीलमत पुराण पुस्तक तिने खरेदी केलं.

   एव्हाना सूर्य माथ्यावर आला होता. तिथल्याच एका हॉटेलमध्ये जेवल्यावर दोघांनी कुपवाडा जिल्ह्या मधल्या टिटवळ गावी जायचं ठरवलं. त्यांना भारत – पाकीस्तानाची बॉर्डर पाहायची होती. श्रीनगर मधून कुपवाडा २ तासांच्या अंतरावर होतं तिथून पुढे मग टिटवळ. जाईपर्यंत संध्याकाळ होईल. बॅगा घेऊन तिकडेच हॉटेलमध्ये राहायचं ठरवलं. दोघांनी श्रीनगर घ्या हॉटेलमधून चेक आऊट केलं आणि कुपवाडाला जाणाऱ्या ट्रेनमध्ये दोघं बसले. ट्रेनमध्ये फार गर्दी नव्हती. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांतपणे निजून गेली होती. तिला जाग आली ती थेट कुपवाडाच्या रेल्वे स्टेशनवर. दोघं स्टेशनवर उतरून बाहेर पडले आणि टॅक्सीत बसले.

“ टिटवल ला जायला किती वेळ लागेल ? ” त्याने ड्रायव्हरला विचारलं.

“ २ तास. ”

“ म्हणजे संध्याकाळ होणार.. “ तो कंटाळून म्हणाला.

“ चेकिंग जास्त असेल तर २ तासांपेक्षा जास्त वेळ लागेल. ” ड्रायव्हर म्हणाला.

“ म्हणजे ? ” तिने विचारलं.

“ टिटवलला परवा ३ आतंकवादी मारले गेलेत. एक फरार आहे. त्यामुळे चेकिंग जोरात सुरू आहे. ” ड्रायव्हर अगदी सहजपणे बोलून गेला.

त्या दोघांना ह्याचं फार काही वाटलं नाही. टिटवल बॉर्डर वरच येत असल्याने असं नक्कीच घडू शकतं याची कल्पना त्यांना होती.

     काही मिनिटांनी टॅक्सी एका चौकीपाशी थांबली. पोलिसांची संख्या इथे जास्त होती. टॅक्सीच्या पुढे ५-६ गाड्या होत्या. पोलिस प्रत्येक गाडी नीट चेक करत होते. पाच सहा गाड्यांचं चेकिंग झाल्यावर आता ह्यांचा गाडीचं चेकिंग सुरू झालं. पोलिसांनी त्या दोघांची चौकशी केली. कुठून आलात ? का ? कशासाठी ? कुठे जाताय ? सर्व काही त्यांनी विचारलं. त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊन ती दोघं मोकळे झाले. गाडी चेकिंग वरून निघाली ती थेट टिटवळमध्ये पोहचली.

    दोघं टॅक्सीतून उतरले. टॅक्सीवाला पैसे घेऊन निघून गेला. गावात शांतता होती. थंड वातावरण. नदीचा खळखळाट अस्पष्टपणे त्यांना ऐकू येत होता. दोघं गावात चालत राहीले. त्यांच्या उजवीकडे किशनगंगा नदी वाहत पाकीस्तानात जात होती. किशनगंगा नदी म्हणजेच नीलम नदी. पाणी अगदी स्वच्छ. नदीच्या पलिकडे पाकिस्तानची हद्द स्पष्टपणे दिसत होती. ते चिलियाना नावाचं गाव होतं. हिरवा रंग दिलेली घरं सुध्दा काही प्रमाणात दिसत होती. त्या घरांचे देखील तिने फोटो काढले. “ लवकरच ह्या पाकिस्तान ला आपण संपवू. ” असं ती म्हणाली.. थोडं अजून पुढे चालत गेल्यावर त्यांना ढोलताशांचे आवाज ऐकू येत होते. बॉर्डर वर गोळीबार होतानाचे आवाज ऐकू येतील असं त्यांना वाटलं होतं पण ढोलताशांचे आवाज ऐकू आल्याने त्यांना नवल वाटलं.

     जिथे ढोलताशे वाजत होते त्या ठिकाणी दोघं येऊन पोहोचले. एका घरासमोर मांडव होता. साधारण ७५ वर्षांची म्हातारी त्या मांडवात होती आणि आजूबाजूच्या घरातील लोकं ढोलताशे वाजवत आनंद साजरा करत असल्याचं दोघांनी बघितलं. जवळपास २० जणं नक्कीच असतील. न राहवून ती त्या म्हातारीजवळ गेली.

“ आज्जी हे कसलं सेलिब्रेशन चाललंय ? ”

“ मुलीचा निकाह आहे. ” हे ऐकून दोघांना आनंद झाला. मुलीचं अभिनंदन करून पुढे फिरायला जाऊया असं त्यांनी ठरवलच.

“ आज्जी मी भेटू शकते का तिला ? Congratulations बोलायचं होतं. ” तिने हसऱ्या चेहऱ्याने आज्जी कडे परवानगी मागितली. त्या सुरकुत्या चेहऱ्याने त्या दोघांकडे एक क्षण बघितलं. आज्जी उभी राहीली आणि नदीकडे तिने बोट दाखवलं.

“ पोरगी तिकडे आहे ! ” थंडगार पण आनंदी स्वरात आज्जी म्हणाली. दोघं पुन्हा चक्रावून गेले.

“ ती पा.. पाकीस्तान ला आहे ? ” त्याने थरथरत्या आवाजात विचारलं.

त्या ढोल ताशांच्या आवाजात आज्जीने होकारार्थी मान हलवली.

“ ती तिकडे मेहंदी काढतीये. ” आज्जी म्हणाली.

“ नवरा कुठचा आहे ? ” तिने विचारलं.

“ तिथलाच ! ”

“ लग्न जर पाकिस्तान ला म्हणजे आपल्या शत्रूच्या घरात आहे तर तुम्ही का सेलिब्रेशन करताय ? ” तिने चिडक्या आवाजात विचारलं.

आज्जी शांत आवाजातच बोलू लागली , “ असेलही आपला तो शत्रू.. पण खरंच विचार करा की तिथला प्रत्येक जण आपला शत्रू आहे ? तिथे शिकणारी लहान मुलं असतील आपले शत्रू ? तिथल्या प्रत्येकाला आपण नको आहोत का ? आजही दहशतवाद , आतंकवाद संपवून आमच्यासह तिथल्या अनेक लोकांना एकत्रीकरण हवंय. दोन भागांमध्ये असलेली रेघ नष्ट झालेली हवीये. आज त्या तीरावर असलेली लोकं आमच्या सुखात दु:खात सहभागी होतात. आम्ही देखील त्यांच्या सुखात – दु:खात सामील होतो. बघा ना , आज तिकडे निकाह आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही देखील इथे साजरा करतोय. हे करण्यावाचून आम्हाला कोणीच रोखू शकत नाही. कारण १९४७ च्या पूर्वीपासून आमचे एकमेकांशी संबंध आहेत. आमचे बरेचसे नातेवाईक तिकडे विभागले गेलेत. तुम्ही १९४७ साली काही सह्या करून हा भाग वेगळा तो भाग वेगळा करून दोन भागांमध्ये एक बॉर्डर आखलीत पण तुम्ही बॉर्डर आमच्या मनावर आखू शकला नाहीत. आमच्या सुखात दुःखात कुठलीही बॉर्डर नाहीये.. का माहीतीये ? आम्ही रोज इथे आतंक , दहशतवाद उघड्या डोळ्यांनी सोसतो.. पण शांतता आणि माणूसकी ह्यावर आमचा अजूनही विश्वास आहे.. म्हणून आमची मनं बॉर्डर लेस आहेत. ” एवढं बोलून आज्जी थांबली. आवंढा गिळून ती त्या लोकांच्यात पुन्हा सामील झाली.

     तिचे आणि त्याचे डोळे पाणावले. राग कधीच गळून पडला. आपण स्वतः वर अशी अनेक बंधनं घालून घेतलीयेत , ह्या बंधनांमुळे आपण यशस्वी होऊ शकत नाही हे दोघांना कळलं. तिने त्या सर्व माणसांचा एक व्हिडिओ बनवला. ते दोघं गावात पुढे चालत राहीले. ढोलताशांचा आवाज गगनाला भिडला होता. आज आपण जातीधर्माची , लिंगभेदाची अशा कितीतरी गोष्टींची बॉर्डर मनावर आखून घेतलीये. ही बॉर्डर नष्ट झालीच पाहीजे.. आपल्यासह ह्या देशाने बॉर्डर लेस झालं पाहीजे.. असं दोघांचं एकमत झालं. ते हॉटेलवर जाण्यासाठी वळाले. तिला निसर्गाने नटलेल्या पण धार्मिक , आर्थिक , राजकीय, शासकीय गुंतागुंतीची शिकार बनलेल्या काश्मीर विषयी डॉक्युमेंटरी फिल्म बनवायची होती.. पण तिला आता दोन भागांमध्ये विभाजित झालेल्या अखंड हिंदुस्थानावर डॉक्युमेंटरी बनवायची होती.. कदाचित बॉर्डर लेस होण्यासाठी !

समाप्त

लेखक – पूर्णानंद प्रमोद मेहेंदळे

SWA membership no 51440 

Contact no 7507734527