Login

बोरन्हाणं

माझी सासू तुमच्या कडे ठेवायला नको म्हणते.
बोरन्हाण


बोरन्हाणं

आदिती– येतो ग! म्हणत शेखर ऑफिसला निघाला. आदिती बाहेर गॅलरितूनत्याला जाताना पहात बराच वेळ उभी होती.
घरात येऊन तिने घड्याळ पाहिलं. दहा वाजले सर्व काम झाले होते. खरं तर इनमिन दोघजण असा कितीसा स्वयंपाक असणार ?
भांडी ,लादी करायला रखमा येत असे, पण ती जरा उशिराच सर्व घर करून शेवटी !
आदिती कधी चहा तर कधी तिला खायला देई.

रखमाची तान्ही मुलगी,सोना दूध पिती होती तिला घरी ठेवून येई. रखमाची सासू होती घरात सांभाळायला.
आदिती सुया व लोकर घेऊन बसली शेखर साठी स्वेटर विणत होती, मागचा भाग प्लेन तर समोर डिझाईन घालायचे होते! डिझाईन कोणते घालावे म्हणून मोबाईल वर डिझाईन शोधत असताना लहान बाळांच्या स्वेटराची कितीतरी छान छान डिझाईन आणि ती स्वेटर घातलेल्या बाळांचे फोटो दिसले .किती गोड बाळ होती. ते पाहून ती हिरमुसली ,स्वेटर विणायचा तिचा मूड गेला लोकर सुया उचलून तिने ठेवून दिल्या.

आज रखमा आली ती जरा काळजीत दिसली, नेहमीसारखी बडबड न करता शांत शांत वाटत होती.
“ कां ग- आज काय बिनसलयतुझं ?”

“ताई सासूबाई गावाला जायचं म्हणतात हाय!”

‘बर मग?’

“सोनूला कोना पाशी ठिवू? ते समजत नाय,आता मला तिला घिऊनच कामावर यावं लागल” म्हणत रखमा काम आटपू लागली.

दोन चार दिवस झाले एक दिवस रखमा आली तिच्याबरोबर सोनू तिची तान्ही होती, गोड बाळसेदार .रखमाने तिला खाली गोधडी घालून ठेवलं व कामाला लागली.
“ अग रखमा! हिला आपल्याबरोबर किती फिरवतेस ?”
“काय करू ताई ?त्या 15 नंबर वाल्याताईची पोर फार मस्तीखोर तिला त्रास देतात काही बोललं तर बाई म्हणतात हिला आणू नको काय करू समजत नाय”

“अग माझ्या घरी ठेवून जात जा इथे कोणी आरडाओरडा करणार नाही आणि मी घरीच असते लक्ष ठेवीन तू येईस्तोवर .”

रखमा सोनूला ठेवून जायला लागली एक दोन घर झाली की येऊन दूध पाजून जायची सोनू शांत खेळकर होती अदिती ला लवकरच तिचा लळा लागला असेच काही महिने गेले सोनू आता रांगू लागली.
एक दिवस सोनू लवकर उठली व रडू लागली रखमा अजून आली नव्हती अदिती ने तिला भाताची पेज पाजली ती मजेत प्यायली.
रखमा आल्यावर अदितिने सांगितले.

“ताई, तुमचे लय उपकार हाय “म्हणत रखमा घरी गेली .
एक दिवस रखमा एकटीच आली सोनू बरोबर नव्हती. “अगं सोनू कुठे आदितीने विचारले?”

“सासू परत आली ती सांभाळिन म्हणतेय.”

त्यादिवशी अदिती ला घर सुनसुन वाटत होतं

“रखमा कशी आहे सोनू? दोन एक दिवसांनी अदितीने विचारले ?
“ताई खूप रडते सासूच्या नेआवरत नाय तिला तुमची सवय झाली ना!”
“ अग मग आणत जा, मलाही तिच्याशिवाय करमत नाही.”
‘खरं आहे ताई, पण माझी सासू तुमच्या कडे नको म्हणते’

. संध्याकाळी बाहेर फिरताना दहा नंबर वाली शालन अदिती ला भेटली, रखमाची तक्रार करत म्हणाली “अगं या बाया जुन्या मताच्या अंधविश्वासी असतात, तिची सासू म्हणत होती तुला मूलबाळ नाही म्हणून- - बोलता बोलता शालन गप्प झाली.
आदित्य समजायचं ते समजली.

शेखर नी अदिती ला काकू कडे एका कार्यक्रमात पाहिलं होतं आदिती हळदी कुंकवाचे डेकोरेशन करत होती. विणकाम भरत काम पेंटिंगची आवड असलेल्या अदिती ला शेखर नी मागणीच घातली. शेखरला नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं. लग्न झालं


लग्न झाल आणि अदिती पुण्याला आली. तिने घर छान सजवलं नोकरीची तिला फार आवड नसल्याने व शेखरचे काम छान चालत असल्याने तिने घरीच राहायचं ठरवलं .
तिचा वेळ कलाकुसरीच्या कामात छान जात असे. तसेही पुणे नवीन शहर असल्याने दोघ सुट्टीच्या दिवशी मस्त फिरत एकूण आदितीला कशाचीच कमी नव्हती अगदी सुखात होती.

सुरुवातीला दोन एक वर्ष प्लॅनिंग केलं होतं.
घरी दारी सर्व चिडवत “लव बर्ड्स “पण आता हळूहळू चौकशी करू लागले. मैत्रिणी हीम्हणत पुरे आता प्लॅनिंग.
आदिती व शेखरलाही आता एक कमतरता सतत जाणवू लागली. डॉक्टरांना दाखवून झाले डॉक्टरच्या मते दोघात काहीही कमी नाही. होईल ग शेखरने तिला दिलासा दिला. आपण दोघेच असलो तरी मजेत आहोत तू नको मनाला लावून घेऊ.

पण असे काही काही प्रसंग येत गेले आणि तिचे मन दुखावले जात होते.
मागच्याच आठवड्यात आठ नं वाल्या प्रधानां कडे डोहाळे जेवण होते अदिती ला तिथे ही आता केव्हा नंबर लावणार म्हणून तिच्या सासुने विचारले अदिती ला काय बोलावे कळेना तेव्हा पासून तिने अश्या कार्यक्रमांना जायचे नाही असं ठरवून टाकले.

आताशा रखमा सोनाला घेऊन कधी कधी सोसायटीत आलेली तिला दिसत असे,पण अदिती कडे ती एकटीच येई. सोनाला दूरून पाहिलं कि अदिती ला तिची ओढ वाटत असे. मग मग रखमाने अदिती चे काम ही सोडून दिले.

असेच दिवस चालले होते.बघता बघता चार महिने झाले, अदिती ने आशा सोडून दिली.

एकदिवस अदिती ला मळमळायला लागले ती उठून बेसिन कडे पळाली, आली ती गळून गेली होती. शेखरने तिला थोड्या वेळ पडून रहा मी पाहतो काय करायचे असे सांगून झोपायला लावले .
पुढे असे दोन-चारदा झाल्यावर मात्र शेखर तिला म्हणाला डॉक्टर कडे दाखवून देऊ पण अदिती ने पित्त असेल म्हणून दुर्लक्ष केले पण् मग ती डाक्टर कडे गेली आणि आली ति सुखाच्या हिंदोळ्यावर बसूनच.
शेखर घरीच होता घरात शिरत ती धावत शेखरला बिलगली. “शेखर मी,- मला बाळ होणार डॉक्टरने तपासले!”
“काय ?आनंदाने शेखर ने तिला घट्ट मिठीत घेत प्रेमाने तिचे चुंबन घेतले. दोघ सुखाच्या त्या क्षणाला अनुभवत कितीतरी वेळ तसेच उभे होते.
चैत्र येताच जसे साऱ्यासृष्टीला नवीन चैतन्य येते झाडांना नवी पालवी येते त्या सम आदिती ची काया दिसामासी फुलायला लागली .
यथावकाश सासर,माहेर दोन्ही कडेअदिती चे सर्व लाड पुरवले गेले, दिवस भरताच माहेरी जाऊन एका छोट्या परी ला घेऊन अदिती परत आली.
नवीन बाळंतीण तिची काळजी म्हणून बरोबर अदिती च्या सासूबाई ही आल्या.
एक दिवस संध्याकाळी अदिती शेखरची वाट पाहत परीला घेऊन बाहेर उभी होती

“आदिती अगं संध्याकाळ झाली, परीला घेऊन तिन्ही सांजेला बाहेर नको फिरू आज अमावस्या आहे आत ये, कोणाची दृष्ट लागेल”
सासुबाईंनी तिला आत बोलावलं.
एरवी तिने हे सर्व मानलंही नसतं पण परीसाठी म्हणतात आहे तेव्हा, मनाशी विचार करत ती आत आली! आणि त्याच क्षणी तिला रखमा आठवली, तिची आगतिकता जाणवली मनाला पटत नसलं तरी आपल्या बाळाच्या काळजीपोटी तिनेही सासूचे ऐकले असावे.
आता तिचा रखमावरचा राग निवळला

अदिती ने संक्रांतीचा हळदीकुंकू करायचं ठरवलं बरोबर परीचे बोर न्हाणं असा कार्यक्रम ठरला सोसायटीत सर्वांना बोलावण गेलं.
दुसऱ्या दिवशी दुपारी आदिती सासूबाईंना सांगून बाहेर निघाली ती सरळ रखमाच्या घरी.

तिला पाहून रखमा किंचित वरमली पण तिकडे लक्ष न देता आदिती ने रखमाच्या सासूला आपल्या घरी हळदीकुंका साठी निमंत्रण दिले. बरोबर रखमा आणि सोनालाही आणायची विनंती केली.
रखमाची सासू म्हणाली” ताई माफ करा म्या तुम्हाला लय दुखावलं तुम्हां मोठ्या लोकांमध्ये आम्हा गरिबांनी कसे यायचं?
ते मी नाही मनात ठेवलं ,तुम्ही नाती वरच्या प्रेमापोटी वागल्या असाल !मी विसरले आता, तुम्ही ही विसरा आणि सोनूला घेऊन या.

रखमा सोनूला घेऊन आदितीच्या घरी पोहोचली तिला घरात शिरताना पाहून सोसायटीच्या बायका कुजबूज करू लागल्या त्यामुळे तिला शरमल्या सारखे होत होते, आपण ताईंशी फार वाईट वागलो आता थांबावे की परतावे असा विचार करून जात असतानाच आदिती बाहेर आली , रखमा चा हात धरून तिला खोलीत आणले, खोलीत दोन चौरंग सजवून ठेवले होते एकावर परीला घेऊन आदिती बसली व दुसऱ्या चौरंगाकडे बोट करत आदिती म्हणाली रखमा येथे बस.

“मी इथे? नको नको ताई मी बसते दारात!”

अगअसं नाही आज बोर न्हाणं आहे आपल्या लेकींचं तेव्हा तु इथे चौरंगावर बस “, सोनू च बोर न्हाणं करायचं आहे न तुझ्या मनात?”
“व्हय ताई पण–”
अदितीने रखमा ला हात धरून बसवले , सोनू ला परी सारखा काळा फ्राक व हलव्याचे दागिने घातले.सासूबाईंनी दोघींच्या बाळांवर लुटीची बोरं, उसाची पेर बिस्कीट, काजू, किशमिश,चाकलेट मटारच्या शेंगा हरभरे असे उधळून बोर न्हाणं केलं. आजूबाजूला बसलेल्या लहान मुलांनी मनसोक्त लुटलं मग हळदीकुंकू समारंभ झाला सर्व बायका कौतुक करत परतल्या.
रखमा अजूनही सावरली नव्हती ती म्हणाली “ताई मी तुमच मन दुखावलं, तुमचं घर सोडून दिलं तरीहीतुम्ही माझ्या लेकीचे इतकं कौतुक केलं?

“अगं ती फक्त तुझी लेक नाही, माझीही कोणी आहे! सोनूला तू माझ्याकडे ठेवून जात असे तिचं करता करता माझ्या मनातही मातृत्व भाव हळूहळू जागृत व्हायला लागला बहुत करून तिच्या पायगुणामुळेच माझी कूस उजवली आणि आज हा सुखाचा दिवस माझ्या आयुष्यात आला.
बरं आता उद्यापासून कामाला ये आणि हो सोनूला पण घेऊन ये.
हो ताई नक्कीच आता तिला एक नाही दोन आईचं प्रेम मिळेल.
—-----------------------------------------------