"होय, लीगल टीमला येउदेत..मग ठरवूया.."
लीगल टीम केबिनमध्ये हजर होते. इनाया मॅम ला बघून सर्वजण आनंदी होतात. इनाया त्यांना सांगते,
"तनिषा मॅमने तुम्हाला काय सूचना दिल्या होत्या ते सांगा.."
त्यातील एक वकील सांगतो..
"तनिषा मॅम ने कंपनीची जबाबदारी आर्या मॅडम ला देतांना काही महत्वाचे अधिकार इनाया मॅम ला दिले होते. CEO पासून कुणाला कंपनीत ठेवायचं आणि कुणाला नाही हे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना दिले आहेत."
हे ऐकून आर्याला धक्काच बसतो..आईने असं का केलं असेल? तिला तिच्या मुलीवर विश्वास नाही का? आईबद्दल तिच्या मनात रोष निर्माण होतो..
"ऐकलंस?"
आर्या निरुत्तर होते. इनाया मॅम सर्वांना तिथून जायला सांगतात. केबिनमध्ये फक्त आर्या आणि इनाया असतात. इनाया शांत होऊन आर्याला सांगते.
"हे बघ बेटा, तुझ्या आईने हे सगळं निर्माण केलंय.. त्याला एका उंचीवर नेलं आहे, तेव्हा ते सुरक्षित असणं याचाही विचार तिने केला होता. खूप दूरदृष्टी होती तुझ्या आईला. कितीतरी वर्षांपुढचा विचार तिने खुप आधीच करून ठेवला होता. तू तिची मुलगी असलीस तरी शब्दांतर तिचा आत्मा आहे. तुझ्यात तिचं रक्त आहे या विश्वासाने तिने तुला हे सांभाळायला दिलं, याचा विपर्यास करू नकोस.."
"मला तुम्ही पायउतार करणार?"
संतापलेली आर्या बाकीचं काहीही न ऐकता फक्त एवढंच विचारते.
"नाही, तुला एक महिन्याचा अवधी देते. त्यात जर मला कंपनीच्या प्रॉफिटमध्ये वाढ झालेली दिसली तर माझा विचार बदलेन मी"
एवढं सांगून इनाया निघून गेली. आर्या मनातल्या मनात चरडफडत होती. ऑफिसमध्ये तिच्याशी असं वागायची कुणाची हिम्मत नव्हती. कंपनी माझी, केबिन माझं, स्टाफ माझा..आणि मलाच येऊन सांगतात की मला काढून टाकणार? बघतेच कुणाची एवढी हिम्मत आहे ते.
इनाया जाता जाता शब्दांतर कडे नजर टाकते. तिला जुने दिवस आठवतात. तनिषा आणि तिच्या चर्चा, कंपनीसाठी आखलेल्या स्ट्रॅटेजीज, कंपनीच्या डिजिटल सिक्युरिटीसाठी केलेलं काम, वीर भोसलेला दिलेली मात आणि चायनामधील त्या माफियाला धडा शिकवून वाचवलेला देश..सगळं अद्भुत होतं.. तो काळच वेगळा होता..भारावलेला होता..त्यात विलक्षण चैतन्य होतं. आज मात्र ते दिसत नाहीये.
इनाया सर्व डिपार्टमेंट मध्ये एक चक्कर मारून घेते. सर्वात शेवटी प्रिंटिंग डिपार्टमेंटमध्ये जाते. तिथे प्रिंटिंग मशिन्स खराब झालेली असतात आणि दुरुस्त करणारा माणूस आलेला असतो. इनाया प्रिंटिंग हेडला विचारते,
"Latest सेट कुठे आहे? पुढील महिन्यार प्रकाशित होणारी सॉफ्ट कॉपी दाखवा मला.."
प्रिंटिंग हेड लॅपटॉपवर pdf फाईल सुरू करून देतो. इनाया सर्वांवर एक नजर फिरवते..सगळं वाचून झाल्यावर ती ओरडून उठते..
"याला कुणी अप्रुव्हल दिलं??"
आवाजाने सर्वजण घाबरतात..
"काय झालं मॅडम?"
"न तपासता ही कॉपी प्रिंटिंगला आलीच कशी?"
"मॅडम सर्वात शेवटचं अप्रुव्हल आर्या मॅडम देतात..त्यांनी सही केली आणि प्रिंटिंगला आणलं.."
भैरव सर धावत येतात..
"काय झालं मॅडम?"
"हे आर्टिकल्स वाचले? जातीयवादी, प्रांतवादी.. धर्मात, जातीत तेढ निर्माण करणारे आर्टिकल्स यात कुणी टाकले? समाजातील आदरणीय व्यक्तींवर टीका करणारे आर्टिकल्स कसेकाय आले यात? कुणाचंच लक्ष नव्हतं का?"
"कसं शक्य आहे? ज्या सेटला मी अप्रुव्हल दिलेलं त्यात हे काहीच नव्हतं.."
"आर्याने वाचलं होतं का हे?"
सर्वजण शांत होतात. आर्याही तिथे धावत येते..इनाया तिच्या तोंडावर ती कॉपी फेकून मारते..
"हेच दिवस दाखवायचे बाकी होते, किती मोठा अनर्थ झाला असता कळतंय का तुला?"
"पण झालं तरी काय?"
"हे बघ, पुढील महिन्याच्या मासिकाची सॉफ्ट कॉपी, अशीच्या अशी प्रिंटिंगला जाणार होती. यात अत्यंत संवेदनशील आणि समाजात तेढ निर्माण करणारे लेख होते, हे जर समाजात पसरले असते तर लोकांनी येऊन शब्दांतर जाळलं असतं. आर्या तुझ्याकडे फायनल अप्रुव्हल साठी कॉपी येते त्यावर न वाचता सह्या कश्या केल्यास तू? आणि पहिली प्रिंट हातात पडते त्यालाही एकदा चेक करून मग बाकीच्या प्रिंटिंग ला परवानगी द्यावी लागते, ती प्रिंट तरी चेक करतेस का तू?"
आर्या ते लेख बघते, तिची धडधड वाढते, हे काय आहे? कुणी लिहिलं हे? मावशी अगं असं कुणी लिहीत नाही गं इथे.
"आर्या शब्दांतरला शत्रूही भरपूर आहेत, लक्ष कुठे होतं तुझं?"
"मावशी, थँक्स, खरंच तू आज नसतीस तर अनर्थ झाला असता.."
"बस झालं, शब्दांतरला मी अजून धोक्यात नाही टाकू शकत.आर्याला तिच्या पदावरून तातडीने हटवण्यात यावं, आणि नवीन व्यक्ती तातडीने शोधण्यात यावी"
एवढं सगळं झाल्यावर आर्याला हेच अपेक्षित होतं. कंपनीत वातावरण तापलं होतं, सगळीकडे हीच चर्चा सुरू होती.ऑफिसचा लंच ब्रेक झाला, निकिता आणि अनुष्का पुन्हा एका टेबलवर..
"म्हणजे आता आर्या मॅडमला काढून टाकणार?"
"हो, तेच ऐकू आलंय सध्या तरी.."
"बापरे, कुठे आई अन कुठे मुलगी.."
"तनिषा मॅडम अश्या नव्हत्या, प्रत्येक गोष्टीत त्या जातीने लक्ष घालत. वीर भोसलेच्या मासिकाचा असा फज्जा उडवला होता की काय सांगू..(अनुष्का तो प्रसंग पुन्हा एकदा सांगते)
"बापरे! मग या आर्या मॅडम अश्या का असाव्यात?"
"माणसाला परिस्थिती घडवत असते, तनिषा मॅमला संघर्षाने घडवले..आर्या मॅडमच्या वाट्याला काही संघर्ष आलाच नाही, काय करणार त्या तरी?"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा