द बॉस पर्व 3: भाग 4

तभैश....!!! एक गूढ
अनकाचा फोन लागत नाही म्हणून इनायाची काळजी अजूनच वाढली. अनका एकच तर होती तिच्या जगण्याचा आधार! हा काळ प्रचंड तणावाचा बनला, इनायाला चक्कर येऊ लागली होती. मनात नको नको ते विचार येऊ लागले.

तेवढ्यात तिच्या फोनवर मेसेज आला,

"अम्मा इथे रेंज नाहीये.. पोचले की फोन करेल.."

हे वाचून इनायाच्या जीवात जीव आला. तिने ओढणीने आपल्या कपाळावरचा घाम टिपला आणि शांतपणे बसून घेतलं.
****
"नमस्कार, आज आपण मुलाखती घेणार आहोत अल्पावधीतच यशाची शिखरं गाठणाऱ्या काही तरुणांच्या. हे आहेत मिस्टर अजय, ज्यांनी केवळ 2 वर्षात त्यांचं फर्निचर ब्रँड जगभरात पोहोचवले..या आहेत मिसेस कीर्ती, ज्यांनी जगभरात आपल्या फॅशन ब्रॅंडला लोकप्रिय केलं. तर आज जाणून घेऊयात यांच्या यशाचं रहस्य.."

इनाया ते बघत होती आणि तिला तनिषाची लगेच आठवण झाली. तो काळ पुन्हा डोळ्यासमोरून गेला. तो काळच वेगळा होता! प्रचंड संघर्ष, कसल्या सुविधा नाही, कुणाचा पाठिंबा नाही. तरीही तनिषाने कसं सर्व एकहाती सांभाळलं होतं.. त्याची सर आजच्या या शॉर्ट टर्म पिढीला येणार नाही. ही आजची पिढी, करोडोंची फंडिंग उचलते..प्रचंड गुंतवणूक करून मोठमोठे ऑफिस, चकाचक केबिन बनवते आणि तिसऱ्याच वर्षी तोट्यात जाऊन बंदही पडते.

एकहाती काम करून कंपनी उभं करणं आणि वर्षानुवर्षे चालवणं हे तनिषाकडून शिकायला हवं..

Tv वर मुलाखती सुरू होत्या. त्यातले काही तरुण आततायी, अहंकारी दिसले. पण काही तरुण अशी होती ज्यांच्या चेहऱ्यावर नम्रता झळकत होती, एक आत्मविश्वास होता आणि एक सात्विक तेज होतं. त्यातलाच एक - अभिराज भांडारकर.

"तर मिस्टर अभिराज, तुम्ही शेतीत वेगवेगळे प्रयोग करून सेंद्रिय आणि स्वास्थ्यवार्धक अश्या पिकांची निर्मिती केली..याला तब्बल 10 वर्ष गेली पण अखेर तुम्ही यशस्वी झालात.. काय सांगाल?"

"यश मिळवण्यासाठी जेवढा कालावधी जातो तेवढाच कालावधी ते पुढे टिकून राहते. माझा व्यवसाय हे माझं स्वप्न नाही तर माझी पूजा आहे, माझा धर्म आहे. तो नीट सांभाळणं हे माझं कर्तव्य आहे..बाकी प्रसिद्धी, पैसा हे side effects आहेत.."

"तुम्हाला या व्यवसायाची प्रेरणा कुठून मिळाली? तुमचा आदर्श कोण?"

"तभैश...हे एकमेव कारण.." अभिराज एका तंद्रीत गेला..

"तभैश?? हे काय आहे? एखादं जापनीज नाव आहे का?"

हे ऐकून अभिराज भानावर आला, त्याची तंद्री सुटली..हे आपण काय बोलून गेलो याचं त्याला भान आलं आणि तो पटकन शांत झाला..

"नाही..एक साधना आहे ती.."

एवढं बोलून अभिराजने विषय बदलला..

इनाया हे सगळं बघत होती आणि तिला नवल वाटलं..

"तभैश?? हे कसलं नाव आणि कसली साधना? काहीतरी गडबड आहे, हा मुलगा वेगळाच दिसतोय.."

****

तिकडे अनका आणि तिच्या मैत्रिणी कारने जात असतात. प्रवास मोठा असल्याने तिघींचा डोळा लागतो. अनकाला जशी जाग येते तसं ती बघते, आजूबाजूला बरीच झाडं असतात, रस्ताही कच्चा असतो. अनका मोबाईलवरचा मॅप सुरू करते..मुख्य रस्ता आणि हा रस्ता यात बरीच तफावत असते. ती आपल्या दोघी मैत्रिणींना उठवते आणि हळूच म्हणते,

"अगं... हे बघ.."

"आपण कुठे जातोय?? हा कोणता रस्ता आहे??"

एक मैत्रीण घाबरतच विचारते

हे विचारताच ड्रायव्हर अजून जोराने गाडी चालवू लागतो. आता मात्र तिघींची भीतीने गाळण उडते..एक जण रडायला लागते..

"प्लिज आम्हाला सोडा..कुठे नेताय आम्हाला?? अहो तुम्हालाही आया बहिणी असतीलच ना? आम्ही त्याच आहे असं समजा.."

"ए चूप..."

ड्रायव्हर ओरडला तसं यांना कन्फर्म झालं की आपण पुरते अडकलो आहे.

पुढे जाऊन ड्रायव्हरने एका ठिकाणी गाडी थांबवली आणि तिघींचा उतरायला सांगितलं. तिघीही घाईघाईने उतरल्या..ड्रायव्हर त्यांच्याकडे पाहून हसला आणि गर्रकन गाडी काढून निघून गेला.

या तिघीही बघतच राहिल्या. याला नक्की काय करायचं होतं? आपल्याला इथे सोडून याला काय मिळालं? काही का असेना, तिघींच्या जीवात जीव आला..मनात असंख्य प्रश्न होते पण तात्पुरती भीती तर निघून गेलेली.

ती गाडी अदृश्य होईपर्यंत तिघी गाडीकडे बघतच राहिल्या. आजूबाजूला घनदाट जंगल होतं. एकीने मागे वळून पाहिलं आणि तिचे डोळे विस्फारले गेले..

डोळ्यांची पापणीही न लवता ती बघतच राहिली..

श्वास रोखून धरला होता..

हिम्मत करून अनकाला तिने हात लावला..अनकानेही मागे वळून पाहिलं..तिसऱ्या मैत्रिणीनेही पाहिलं..

कितीतरी वेळ त्या वस्तीच्या प्रवेशद्वाराकडे त्या बघतच राहिल्या...

क्रमशः


🎭 Series Post

View all