भाग ३ अंतिम भाग
आता मृगांशीची पाळी होती. सुमितने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले.तो चेहरा पाहून मृगांशी त्याच्याशी बोलू लागली.
"आज हे सत्य मला तुला सांगावेच लागणार आहे"
"कुठले सत्य आणि ती मुलगी कोण होती?" सूमितने तिला विचारले.
"ती माझी सहकारी होती, मला येथे नेण्यासाठी आली होती" मृगांशीने उत्तर दिले.
"नेण्यासाठी कुठे? कुठली सहकारी आणि इतक्या रात्री तुम्ही कुठे जाणार होतात" सुमित
"आपण घरात जाऊया, मग मी तुला सगळे सांगते" मृगांशी
दोघेजण घरात गेल्यावर मृगांशी पुढे बोलू लागली.
"सुमित तू डोके शांत ठेव,आधी पूर्ण ऐकून घे आणि मग त्यावरून प्रतिक्रिया दे. माझे नाव मृगांशी नाही मी "मृगाली" ,येथून सव्वाचार प्रकाश वर्षे दूर असलेल्या अल्फा सेंटरी तारका समूहातून आलेली आहे. मला आणि माझ्यासारख्या अजून काही मुलींना येथील जीवसृष्टी, संस्कृती आणि खूप काही गोष्टींचे ज्ञान घेण्यासाठी पृथ्वीवर पाठवले गेले होते. ज्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो तोच माझा या पृथ्वीवरील पहिला दिवस, कदाचित पहिला तास होता. आम्ही काही वेळा पूर्वीच पृथ्वीवर पोहोचलो होतो आणि आम्हाला कुठेतरी ठाव ठिकाणा किंवा राहण्यासाठी जागा हवी होती.
मला तुझ्या रूपात ती मिळाली. खरे सांगायचे तर मी तुला त्यावेळी फसवतच होते. पण हळूहळू मी कधी तुझ्या प्रेमात पडले, हे मला देखील कळले नाही. तुझ्या आईकडून मला होणारा त्रास बघून तू तुझ्या मनात नसताना देखील वेगळा झालास आणि मला त्या त्रासापासून वाचवले आणि त्यामुळेच मला इथल्या गोष्टींचा अभ्यास करता आला. आता तुला कळले असेल मी आई होण्यासाठी का टाळाटाळ करत होते. डॉक्टरांकडे देखील जात नव्हते, कारण वरून जरी आम्ही तुम्हा मानवासारखे दिसत असलो तरी आमची शरीरसृष्टी थोडीशी वेगळी आहे. आमचे रक्त लाल नसून थोडेसे पांढरे आहेत आणि त्यामुळेच आम्हाला हा रंग प्राप्त झाला आहे.
आता माझी वेळ संपत आलेली आहे आणि आम्हाला परत आमच्या ग्रहावर जावे लागणार आहे. हे सगळे मी तुला उद्या सकाळी सांगणारच होते. पण तुला ते आजच कळले. उद्या मी पुन्हा राजस्थान साठी निघणार आहे, तेथे आमचे अंतराळयान येईल आम्हाला घ्यायला. मी आता कायमची जाईन येथून, मी प्रयत्न करत होते की तुला देखील इथून येता येईल का? पण ते शक्य झाले नाही. अगर पुन्हा संधी मिळाली तर मी नक्की तुला भेटायला येईन.
सुमित तिच्याकडे पाहतच राहिला. काय घडत आहे हे त्याला काहीच कळत नव्हते. त्याच्यासमोर जणू काही स्वप्न चालले आहे असे वाटत होते. दुसऱ्या दिवशी दोघेजण राजस्थानला पोहोचले. अश्रूपूर्ण निरोप घेताना सुमितने मृगांशीला अंतराळ यानात चढताना पाहिले. एक दिवस पुन्हा येईन असे वचन देऊन ती आत चढलीच होती की अचानक काय झाले कोणास ठाऊक, तिने सुमितला हात केला आणि त्याला देखील आत येण्यास सांगितले. सुमित मागचा पुढचा काहीही विचार न करता वेड्यासारखा तिच्या मागे पळाला आणि यानात शिरला.
ब्रह्मांडाच्या सौंदर्याने भरलेल्या या विश्वात एकमेकांच्या हातात हात धरून सुमित आणि मृगांशी एकत्र अल्फा सेंटरीला निघाले होते. त्या दोघांना माहीत नव्हते की त्यांचे प्रेम कदाचित ताऱ्यांमध्ये लिहिलेले आहे. जे अनंत काळासाठी चमकदारपणे चमकणार आहे. त्यांनी त्यांच्या पुढील महान साहसाला एकत्र सुरुवात केली. आता त्यांना कोणीही कधीही तोडू शकणार नव्हते.
समाप्त
भालचंद्र नरेंद्र देव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा