भाग १
"माझे आणि माझ्या बायकोचे कधी कधी भांडण होत नाही" सुमित त्याच्या मित्रांबरोबर फुशारकी मारत होता.
खूप दिवसांनी सगळे एकत्र भेटले होते आणि विषय चालू होता की प्रत्येकाच्या बायका कशा आहेत याचा, प्रत्येक जण त्याच्या त्याच्या बायकोची कटकट पिर पिर करण्याची सवय रंगवून रंगवून सांगत होता. तेथे फक्त एक सुमितच होता, जो आपल्या बायकोचे मृगांशीचे न थकता कौतुक करत होता.
ती होतीदेखील तशीच, कधी कोणाशी भांडायची नाही. सुमित तर इतका शीघ्रकोपी होता, सदानकदा त्याच्या कपाळावर आठ्या असायच्या. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्याला राग येई. रस्त्यात चालत असेल तर कोणाचा धक्का जरी लागला तरी तो त्याच्याशी भांडायला जायचा, मग तो पुरुष असो किंवा स्त्री त्याच्यासाठी दोघेही एकच असायचे.
पण मृगांशी त्याला खूप छान सांभाळून घ्यायची. त्याला राग येईल तेव्हा ती खूप शांत बसायची आणि राग ओसरल्यावर एखादा वेगळाच विषय काढून त्यातून त्याला दाखवून द्यायची की तू ज्यामुळे रागवत होतास त्या गोष्टीला एवढे महत्त्व देण्याची गरजच नव्हती आणि मग सुमितला देखील कळे की तो त्यावेळी खूप चुकीचा वागत होता. मग गुपचूपपणे मृगांशीची माफी मागे.
त्यांचा संसार असाच सुरू झाला नव्हता. त्याला देखील मोठी पार्श्वभूमी होती. सुमित एका कर्मठ घराण्यातील एकुलता एक मुलगा होता. सगळे काही व्यवस्थित चालले होते. एकदा तो राजस्थानला फिरायला म्हणून गेला आणि येताना चक्क लग्न करूनच आला. त्या राजस्थानच्या दहा दिवसात नक्की काय झाले ते अजून पर्यंत कोणालाच कळले नव्हते.
सुरुवातीला त्यांच्या घराकडून मृगांशीला थोडा त्रास झाला, पण तिने निमूटपणे सगळे सहन केले. शेवटी सुमितनेच वेगळे राहायचा निर्णय घेतला आणि तो घराच्या बाजूलाच असणाऱ्या दुसऱ्या इमारतीमध्ये राहू लागला. आता सगळे व्यवस्थित झाले असले तरी त्याला पुन्हा त्या आगीमध्ये मृगांशीला न्यायचे नव्हते. तिने जो पहिल्या दोन महिन्यात सासुरवास सहन केला होता, तो त्याने जवळून पाहिला होता. धड आईची बाजू घेता यायची नाही आणि बायको तर कधीच काही बोलायची नाही, त्यामुळे त्याला अजून जास्त अपराधी वाटत राहायचे.
त्यापेक्षा वेगळे राहून एकत्र असलेले बरे या विचाराने तो आहे त्याच पद्धतीत वेगळा राहत होता. मृगांशी देखील त्याचे खूप लाड लाड करायची. आजारी पडल्यावर आईसारखी माया करायची, वडिलांसारखी त्याला गोष्टी व्यवस्थित समजावून सांगायची. एखाद्या मित्रांप्रमाणे त्याच्या प्रत्येक गोष्टी सांभाळून घ्यायची आणि बायको म्हणून तर विचारूच नका. दर दोन दिवसांनी त्याच्या शरीराबरोबर मनाला देखील ती सुगंधित करून टाकायची.
सुमित स्वतःला खरेच नशीबवान समजायचा. काहीही न करता त्याला इतकी सुंदर बायको मिळाली होती. त्याला ती रात्र अजूनही आठवत होती, जेव्हा त्याला ती राजस्थानात भेटली होती. सुमित त्याच्या समूहापासून वेगळा झाला होता आणि तेथील वाळवंटात त्या सगळ्यांना शोधण्यासाठी भटकत होता. त्याचवेळी ती त्याला दिसली होती. चमकदार कपडे आणि डोक्यावर एक वेगळीच टोपी तिने अडकवली होती.
धारदार नाक, निळेनिळे डोळे, गौरवर्णीय पांढरी म्हणता येईल अशी त्वचा, लाल चुटुक ओठ, थोडेसे लहान आत गेलेले कान, भरदार वक्षस्थळ, एखाद्या सिनेतारकेला देखील लाजवेल अशी शरीर यष्टी अशी तिची ओळख दिसायची.
आधी ती घाबरली आणि सुमितला मारायलाच आली होती, पण सुमितचा तिच्यापेक्षा जास्त घाबरलेला चेहरा पाहून तिला कळून चुकले की तो देखील या वाळवंटात हरवला आहे. ती एक पूर्ण रात्र ते आपल्या आपल्या समूहाला शोधण्यासाठी फिरत होते. शेवटी तिच्या मदतीने सुमितचे सगळे मित्र सापडले.
क्रमशः
भालचंद्र नरेंद्र देव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा