भाग २
का कोणास ठाऊक पण त्यांचे अचानक जुळले होते. मृगांशी कोण कुठली, कुठल्या जातीची, कुठल्या वंशाची हे अजिबात न विचारता कर्मठ कुटुंबात राहणारा सुमित तिच्या आकर्षक आणि संभ्रमित करणाऱ्या डोळ्यांवर फिदा झाला होता आणि त्यातच त्याने तिला तिसऱ्या दिवशीच लग्नाचा प्रस्ताव मांडला. तिचा होकार आला, पण तिने फक्त एकच विचित्र अट ठेवली की लग्न आताच करायचे नाही तर पुन्हा कधीच भेटायचे नाही, आणि हाच तिचा मदनबाण बरोबर सुमितला लागला आणि तिथेच होणाऱ्या एका सामूहिक विवाहात दोघाजणांनी बसून आपले लग्न उरकून घेतले होते.
सगळे व्यवस्थित चालले तर मग तो संसार कसला.पण येथे मात्र संसार इतका सुरळीत चालला होता की कोणाचीही नजर लागेल असे दोघेजण एकत्र राहत होते. आजूबाजूचे लोक सुद्धा दोघांचा संसार पाहून हुरळून जात. सोसायटीतील टोळकी "लंगूर के मुंह मे अंगूर" असे बोलून सुमितची एकमेकांत टर उडवत. दोघांच्या संसारात शंकेची पाल चुकचुकायला काहीही जागा नव्हती.
फक्त एका गोष्टीवरच त्यांचे घोडे अडले होते. ते म्हणजे सुमितला लवकरच बाबा व्हायचे होते, पण त्याला फक्त याच गोष्टीसाठी मृगांशी नकार द्यायची. सुमितने कितीतरी प्रयत्न केले तरीसुद्धा अजून तो बाबा झाला नव्हता. मृगांशी डॉक्टर कडे जायला देखील तयार नसायची. एकदा सुमितने तिला जबरदस्ती नेले होते, पण तिने त्या डॉक्टरला स्वतःच्या शरीराला हात देखील लावू दिला नव्हता. सुमित त्यावर खो-खो करून हसला होता. ती त्याला नेहमी सांगायची त्याच्याशिवाय मी कोणालाही हात लावू देणार नाही आणि त्याचे सुमितला कौतुक वाटायचे. ती या पाच महिन्यात एकदा देखील आजारी पडली नव्हती.सुमितला तर दर दोन महिन्यांनी डॉक्टर कडे जावेच लागायचे, इतका तो नाजूक होता.
लग्नाच्या सहाव्या महिन्यात सुमितला तिचे वागणे थोडेसे खटकू लागले होते. पण तो अजूनही मृगांशी ला काही बोलला नव्हता. मृगांशीला वेगवेगळे छंद होते.निरनिराळे ग्रंथ पाहत वाचत बसायची, टीव्ही वर वेगवेगळे प्राणी आणि निरनिराळ्या लोकांच्या गोष्टी त्यांची राहणी , त्याचीं लग्ने, मंदिरे यातच तिला रस होता. ती रात्रीच्या वेळी दुर्बिणीतून ग्रह आणि तारे बघत बसायची. ती तासंतास एकाच बाजूला ग्रह पाहत बसायची. तिला कशाची देखील शुद्ध राहायची नाही. अगदी सुमित जवळ आला तरी तिला कळत नसे. मध्येच ती रडवेल्या अवस्थेतही जाई आणि काहीतरी वेगळ्याच शब्दात बोलू लागे.
सकाळी जेव्हा जेव्हा सुमित हा विषय काढायचा. तेव्हा तेव्हा ती काहीतरी वेगळे सांगून त्याचे समाधान करत असे. तिच्या निळ्या डोळ्यात पाहत पाहत सुमित सगळे विसरून जात असे. परंतु एक रात्र अशी उगवली की मृगांशीला तिचे रहस्य सांभाळता आले नाही आणि तिचे पितळ सुमित समोर उघडे पडले.
रात्री मृगांशी गच्चीवर ग्रह तारे पाहण्यास गेली असताना, सुमित देखील तीच्या मागे मागे गेला आणि त्याला गच्चीवर मृगांशी बरोबर एक तिच्याच सारखी दिसणारी दुसरी मुलगी दिसली. तिने तसेच कपडे घातले होते, जसे मृगांशी ने तिच्या पहिल्या भेटीत घातले होते. चमचमता पोशाख आणि डोक्यावर त्याच पद्धतीची टोपी. सुमितने मृगांशी ला आवाज दिला, तशा त्या दोघी दचकल्या. चमचमता पोशाख असलेल्या स्त्रीने त्या गच्चीवरून जी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर होती तिथून उडी मारली आणि तरंगत तरंगत खाली जाऊन पोहोचली. तेथून पळ काढण्यात ती यशस्वी झाली.
क्रमशः
भालचंद्र नरेंद्र देव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा