Login

ब्रेकअप!

ब्रेकअपच कारण प्रत्येकाचं वेगळं असतं
            

ब्रेकअप... ब्रेकअप म्हटले की एक मुलगा आणि चवळीच्या शेंगेसारखी बारीक मुलगी डोळ्यासमोर येते, पण माझं अस काही नाहीये. आता तुम्ही म्हणाल ब्रेकअप म्हणजे बरच झालं की डोक्याचा ताप गेला, पण माझ ब्रेकअप एका मुलाशी नाही झालय तर ते खाण्याशी झालय. आता खाण्याशी झालंय म्हणजे कारण सांगायला नको, पण तरी सांगुनच टाकते... कारण सांगायच झाल तर वाढणारे वजन. कारण लग्न होऊन आता दहा पंधरा वर्ष तर सहज झाली... मग नवऱ्याशी ब्रेकअप करून कशाला उगाच पायावर धोंडा पाडून घ्यायचा! छान चाललंय आमचं.

             
तर ब्रेकअप करण्यामागचं पहिलं कारण म्हणजे कपाटातले भरून वाहणारे कपडे! कधी कधी असं वाटतं की आपण बारीक झाल्यावर हे कापाटातले आधीचे कपडे बरोबर होतील आपल्याला. ह्या नादात आपण आपल्या कापाटातला बराच मोठा कप्पा अशा कपड्यांनी भरून टाकतो, पण आपण त्या कपाटातल्या कपड्यांना फक्त बघत राहतो आणि वाट बघत असतो की कधी आपण बारीक होऊ? पण बारीक तर काही होत नाही.


आता दुसरं कारण मैत्रीणी... तर अशा काही मैत्रिणी असतात ज्या खूप फिट आणि फाईन असतात. शॉर्ट ड्रेस, वन पिस, वेस्टर्न असे बरेचसे छान छान ड्रेस घालून मिरवायची ह्यांना भारी हौस असते. स्वतः ला गरजेपेक्षा जास्त मेन्टेन ठेवतात. अशा मैत्रिणींना बघून तर मला खूप वाईट वाटते. आता इथे मला माझ्यासाठी वाईट नाही वाटत तर त्यांच्यासाठी वाईट वाटते. कारण त्या मेन्टेन राहण्याच्या नादात काहीच खात नाही बिचाऱ्या आणि मी मात्र सगळीकडे जाऊन मस्तपैकी हादडून येते.

रोज सकाळी चालायला जायचे ठरवते आणि आठ दिवस गेले की पुन्हा दुसऱ्या आठवड्यात जातच नाही. असे माझे वॉकिंग असते आणि मधेच कोणी मैत्रीण भेटली तर गप्पांची मैफिल रंगते आणि चालणे राहते बाजुलाच. मग गप्पांमध्ये एकमेकींना सल्ले देण सुरु होतं. जसे की... तू हे खात जा ते खाऊ नको, असं कर तसं कर... वगैरे वगैरे. असे बरेच काही बोलणे होते आणि मग आठ दहा दिवसांनी तिच मैत्रीण पुन्हा भेटून बोलते आपल्याला की बारीक झालीस ग! असे ऐकल्यावर तर आपला आनंद गगनात मावत नाही. तसे बघायला गेलं ते एक इंच सुद्धा फरक पडलेला नसतो आपल्यात, पण तरीही आनंद होतो.

रोज सकाळी लिंबू मध गरम पाणी चालूच आहे. चहा घेण तर केव्हाच सोडलय मी, पण कोणी आले तर घोटभर का होईना चहा घेतल्याच जातो. हल्ली मी आता काळा आणि हिरवा चहा घ्यायच सुरु केलेय. टीव्ही वर योगा प्राणायाम आणि इतर व्यायाम प्रकार बघत असते, पण करुन काही होत नाही. घरात आणलेली योगा मॅट कोपऱ्यात उभी राहून हसतेय माझ्यावर असाच भास होतो मला कधी कधी तर.


आता घरात सगळ्या सुख सुविधा आहेत. अगदी पीठ सुध्दा मी मिक्सरमध्ये मळते; त्यामुळे कामं तर करतेय पण आराम जास्त होतोय. फोनचं खुप वेड आहे मला आणि त्यात फेसबुक, व्हॉटस् ऍप आणि असे बरेचसे ऍप डाउनलोड केल्यापासून तर विचारुच नका. आख्खा दिवस त्यातच असते मी; त्यामुळे खाऊन झाले की एकाच ठिकाण चार चार तास बसून बसून अजून जास्त वजन वाढत चाललय.


              उपवास तर करतेच मी आणि त्यावेळी फक्त फळं सोडून काहीच खात नाही. घरातील सगळी काम सुध्दा मीच करते. आजपर्यंत माझ्या घरात कोणत्याच कामाला बाई नाही लावली मी; त्यामुळे काम करताना थोडा फार काय तो व्यायाम होतो. त्याव्यतिरिक्त आणखी काही करून होत नाही. करुन होत नाही म्हणण्यापेक्षा मीच करत नाही. अहो कंटाळा दुसर काय! लोकांना बॅंक बॅलंस वाढावा अस वाटत, पण वजन वाढायला नको. कारण वाढलेलं वजन कमी करताना नाकी नऊ येतात. ते आणखी वाढत तर जाते, पण कमी काही लवकर होत नाही. खूप कष्ट घ्यावे लागतात. खूप त्याग करावा लागतो.


          मी खाण्याच्या बाबतीत आता खुप काळजी घेतेय. जसे की तळलेले पदार्थ खुप कमी करणे. म्हणजे मला खायचे नाही म्हणून मी कोणालाच खाऊ देणार नाही अशातला भाग. तुपकट पदार्थ म्हणजे भरपुर साजूक तुप घालून केलेला शीरा खुप आवडतो मला, पण चार ते पाच चमचेच खाते मी... त्याहून जास्त नाही खात, पण ते सुद्धा आता खुपच कमी झालेय. मैद्याचे पदार्थ म्हणजे केक, ब्रेड, पाव, बिस्किटे असे पदार्थ पण मी आणायचे बंद केलेय आणि घरीच आटा कुकीज बनवून ठेवते. गोड पदार्थ तर मी कधी जास्त खात नाही आणि माझी सगळ्यात आवडती आईसक्रीम! ती तर कित्ती महिने झाले खाल्ली नसेल मी. कोणतीही भाजी करताना त्यात तेलाच प्रमाण कमी करणे, मग भलेही ती भाजी बेचव लागली तरी चालेल. हे म्हणजे माझे पतिदेव म्हणतात,'की आज भाजीला काही चवच नाही. खावीशीच वाटत नाहीये.' मग मी म्हणते की 'तुम्ही जास्त खाऊ नये म्हणून मी बेचवच जेवण बनवते हल्ली. म्हणजे आपोआपच जेवण कमी होऊन वजन कमी होतय दोघांच पण.' मग काय? दोघेही उपाशी.
         

जेवणाच्या ऐवजी आता त्यात काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा, बीट यांचा समावेश जास्त असतो; त्यामुळे जेवण कमी होत. रात्री तर अगदी कमी प्रमाणात जेवण होत. तरीसुद्धा वजन काही कमी होईना. आता जवळ जवळ दोन महिने होत आले असे करून. आता काय कराव बरं! एव्हढ सगळ करून पण वजन काही कमी होत नाही. मग नवराच म्हणतो मला... 'तू आहे तशीच आवडतेस मला, नको जास्त त्रास घेत जाऊ. एव्हढी पण जाड नाहीये तू; त्यामुळे मस्त खा आणि स्वस्थ रहा. बास्स एव्हढ केल तरी खुप झाल.'

मग काय? नवरा म्हणतोय मग मी पण सोडून दिले हे सगळे नखरे आणि पुन्हा आपल तेच नेहेमीच रुटीन सुरु. काय हसताय ना! हसायलाच पाहिजे. इथे कोण कोण आहे बरं माझ्यासारखे ब्रेकअप वाले? त्यांनी कमेंट करायला विसरू नका.