एका गावात एक छोटा मुलगा राहत होता, त्याचं नाव होतं बंटी. त्याला अभ्यासात फारसा रस नव्हता, अभ्यास म्हटलं की त्याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी करण्याच्या कल्पना येत असायच्या, अभ्यास सोडून इतर गोष्टीत त्याला खूप रस होता. त्याला खुप काही गोष्टी शिकायच्या होत्या. एके दिवशी त्याच्या शाळेत विज्ञानाची स्पर्धा जाहीर झाली. शिक्षकांनी सांगितलं, "जो सर्वांत चांगलं प्रकल्प तयार करेल, त्याला बक्षीस मिळेल!"
बंटीला स्पर्धेत भाग घ्यायचा होता, पण त्याच्याकडे काही कल्पना नव्हती. त्याने आपल्या आजोबांकडे जाऊन विचारलं, "आजोबा, मी काय करू?" आजोबांनी हसून उत्तर दिलं, "बाळ, तुला जे आवडतं, त्यावरच प्रकल्प बनव." बंटीला आजोबांचे ते बोलणे पटले आणि आपल्याला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींचा तो विचार करू लागला मग त्याच्या डोक्यात एक कल्पना सुचली मग तो तिच कल्पना त्याच्या आजोबांना सांगायला गेला.
"आजोबा, मला एक कल्पना सुचली आहे." बंटी खुश होऊन आजोबांना बोलतो.
"अरे व्वा मग सांग तरी काय आहे तुझी कल्पना!!!" आजोबाही कौतुकाने त्याला विचारतात.
"आजोबा, हल्ली शहरीकरणामुळे आणि कंपन्यांमुळे झाडे कमी होत चालली आहे, त्यात पाण्याचा अपव्यय पण होतोय मग मी जर लोकांना झाडांचे महत्व आणि पाण्याची बचत करण्यासंदर्भात काहीतरी प्रकल्प केला तर?" बंटी गंभीरपणे विचारतो. तसं आजोबा त्याच्याकडे आश्चर्य चकित होऊन बघू लागतात.
"अरे व्वा बंटी, तुझ्या डोक्यात आलेली ही कल्पना तर खुप चांगली आहे, तू एवढा छान विचार करतोय हे बघून मला खुप आनंद झाला आहे. तू आता याच विषयावर प्रकल्प कर." आजोबा बोलताच बंटी खुश होतो आणि लगेच प्रकल्प कसा करायचा याचा एक आराखडा तयार करतो.
बंटीला निसर्ग खूप आवडायचा, त्याने निसर्ग संवर्धनाचा एक सुंदर प्रकल्प तयार केला. त्याच्या प्रकल्पात झाडांचे महत्त्व, पाण्याची बचत, आणि पक्ष्यांचे रक्षण याविषयी माहिती दिली होती. शिक्षकांनी त्याचा प्रकल्प पाहून खूप कौतुक केलं आणि त्याला पहिलं बक्षीस दिलं!
बक्षीस मिळाल्याने बंटीला खुप आनंद झाला. तो त्याचं बक्षीस घेऊन पहिलं त्याच्या आजोबांना दाखवायला त्यांच्याकडे येतो आणि आजोबा सुद्धा ते बक्षीस बघून खुश होतात.
"बंटी, तू हा प्रकल्प खुप मनापासून केला म्हणून तुला यश मिळाले आहे. असंच जर तू नियमितपणे अभ्यास केला तर त्याचे सुद्धा तुला यश मिळेल." आजोबा बोलताच बंटी त्यांच्या बोलण्याचा विचार करतो त्याला त्यांचे बोलणे पटले होते, मग त्याने ठरवलं की आता इथून पुढे आपण नेहमी अभ्यास करायचा आणि प्रत्येक गोष्टीत असेच यश मिळवायचे.