कॅलक्युलेटेड रिस्क (अंतिम भाग) (भाग-चार)

अगस्त्य-नक्षत्राची प्रेमकथा
आईला निशब्द झालेले पाहून अगस्त्य किंचित व्यंगात्मक हसत म्हणाला, " खरंतर, नवल वाटतंय की तू मला हा सल्ला देत आहेस कारण बाबांना पॅरलिसिस असूनही तू त्यांची काळजीने देखरेख केलीच होतीस ना आणि कमी वयात विधवा होऊनही तुझं बाबांवर प्रेम होतं म्हणून कधी पुनर्विवाहाचा विचार केला नाहीसच ना! प्रामाणिक फक्त स्त्रियांनीच असायला हवे, असा कुठलाही नियम नाही. पुरुषही प्रामाणिक व एकनिष्ठ राहून पौरुषत्व सिद्ध करू शकतात. आई, तुझाच मुलगा आहे गं मी म्हणून गुणही तुझेच आहेत. त्यामुळे मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत फक्त नक्षत्रावरच प्रेम करणार. जर ती नाही तर माझ्या मनात नि आयुष्यात इतर कुणालाही कुठलेही स्थान नाही. "

लेकाचे शब्द ऐकून आईला स्वतःची चूक कळली पण आपण आपल्या लेकरावर योग्य संस्कार केल्याची तिला शाश्वतीही मिळाली. दुसरीकडे अगस्त्यच्या शब्दांनी एक चमत्कार घडला आणि नक्षत्राच्या बोटांची हालचाल सुरू झाली. अगस्त्यच्या आईच्या लक्षात आले व लगेच अगस्त्यला कळवले. अगस्त्यने लगेच डॉक्टरांना घरी बोलावले.

डॉक्टरांनी तपासणी केली व नक्षत्राला लवकरच शुद्ध येणार असल्याची शक्यता वर्तवली. त्या बातमीने अगस्त्य आणि त्याची आई प्रफुल्लित झाले व त्या सुवर्णक्षणाची औत्सुक्याने वाट पाहू लागले. काही दिवसांनी नक्षत्राला कोमातून शुद्ध आली. तिच्या मेंदूवर इतर कुठल्याही प्रकारची इजा वा परिणाम न झाल्याने सुदैवाने तिचा स्मृतिभ्रंश झाला नव्हता परंतु ती शुद्धीवर येताच वडील व तिच्या धाकट्या बहिणीची भेट घेण्यासाठी धडपड करत होती. एक आठवडा मुद्दाम खबरदारी बाळगून कुणीही काही सांगितले नाही पण नंतर तिचा अट्टाहास पाहता डॉक्टरांनीच तिला तिच्या वडिलांच्या व धाकट्या बहिणीच्या निधनाची बातमी दिली.

ती बातमी ऐकून साहाजिकच नक्षत्राला जबर मानसिक धक्का बसला. ती त्यांच्या मृत्यूसाठी स्वतःला जबाबदार ठरवत होती. तिच्या मनात अपराधीपणाची भावना उत्तरोत्तर वाढत होती व ती नैराश्याला अधिकाधिक कवटाळत होती. तथापि, एका विश्वासू मानसोपचार तज्ज्ञाकडे अगस्त्य नक्षत्राला घेऊन गेला. साधारण सहा ते बारा महिने मानसोपचार तज्ज्ञाद्वारे उपचार करवून घेतल्यानंतर तिच्या मनातील अपराधीपणाची भावना नाहीशी झाली. तिने अंततः भूतकाळाला स्वीकारून वर्तमान जगण्यास प्रारंभ केला.

अगस्त्य आणि नक्षत्राची प्रेमगाडी रुळावर येऊ लागताच नक्षत्राच्या मनाचा कल जाणून घेत अगस्त्यच्या आईने लग्नाचा प्रस्ताव तिच्यापुढे मांडला. नक्षत्रानेही हसतमुखाने तो प्रस्ताव स्वीकारला आणि वाजतगाजत अंततः अगस्त्य आणि नक्षत्रा विवाहबंधनात बांधले गेले. दोघेही लग्न करून समाधानी होते. मातोश्रींच्या आशीर्वादाने आपल्या राजा-राणीच्या संसारात रमले होते. नक्षत्रा परत नोकरीवर रुजू झाली होती. घर सांभाळून ती नोकरी करत होती, अर्थातच अगस्त्यची आई नक्षत्राच्या अनुपस्थितीत घराची जपणूक करत असे.

थोडक्यात, त्यांचे त्रिकोणी कुटुंब एकमेकांना सहाय्य करून फार सुखी समाधानी होते. दरम्यान आणखी थोडा काळ लोटला. अगस्त्य आणि नक्षत्राच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेले. अगस्त्यची आई नवस पूर्ण करण्यासाठी चारधामची यात्रा करायला गेली होती. तथापि, एकदा रजेचा दिवस होता. नक्षत्रा आणि अगस्त्य एकत्रच त्यांच्या खोलीत बसून होते. नक्षत्रा अगस्त्यसोबत बोलत होती पण त्याचे तिच्याकडे लक्षच नव्हते.

तो त्याच्या स्केचबुकमध्ये काहीतरी रेखाटत होता. ते पाहून ती म्हणाली, " अगस्त्य, तू काय करतोय त्या स्केचबुकमध्ये? सुट्टीच्या दिवशीही तुला एखाद्या म्युझियमचे ब्लू प्रिन्ट्सच काढायचे आहेत का? माझ्याशी थोडे बोल ना. "

" ह्म्म. " अगस्त्यने नक्षत्राच्या शब्दांकडे कानाडोळा करून त्याच्या हातांची हालचाल सुरू ठेवतच हुंकार भरला.

त्याचा तो हुंकार ऐकून नक्षत्राचा संताप उडाला आणि ती संतापून म्हणाली, " बरोबर म्हणतात सर्वजण की लग्नानंतर सर्व पुरुष अरसिक होतात. तू सुद्धा मला इग्नोर करतोय ना अगस्त्य. फक्त माझ्याशी लग्न करण्यासाठी तू एवढा खटाटोप केलास आणि आता लग्न झाल्यावर मात्र थोडा वेळ काढून बोलतही नाहीस माझ्याशी. तुझं लग्नाआधी प्रेम होतं माझ्यावर पण आता ते काळानुरूप विलुप्त झालंय. "

" तसं नाही गं. " नक्षत्राला न पाहताच स्केचबुकमध्ये लक्ष केंद्रित करूनच अगस्त्य उत्तरला.

नक्षत्रा सातत्याने तक्रारी करत होती पण अगस्त्य एक-दोन शब्द बोलून उत्तर देत होता. अगस्त्य पेशाने वास्तुविद्याविशारद (आर्किटेक्ट) असल्याने नेहमीप्रमाणे तो एखाद्या वास्तुची स्थापत्यशैली लक्षपूर्वक रेखाटत असल्याचा नक्षत्राला एव्हाना अंदाज आला होता म्हणून ती रागातच उठली आणि अगस्त्यजवळ गेली. त्याच्या हातातून तिने दुसऱ्याच क्षणाला त्याची स्केचबुक हिसकावून घेतली. तिने रागीट कटाक्षाने आधी अगस्त्यकडे पाहिले व लगेच त्या स्केचबुकमध्ये डोकावले अन् तिचे डोळे एकाएकी विस्फारले.

अनायासे ती फार भावूक झाली. तिच्या डोळ्यात अश्रू असले तरी ओठांवर स्मितहास्य होते. काहीसे संमिश्र हावभाव तिच्या चेहऱ्यावर त्या क्षणी उमटले होते कारण अगस्त्य कुठल्याही वास्तुची स्थापत्यशैली लक्षपूर्वक रेखाटत नव्हता असून नक्षत्राचे चित्र (स्केच) काढत होता. त्याची कलाकृती आणि त्याच्या मनातील तिच्याप्रती असणारे सदाबहार प्रेम पाहून नक्षत्राला गहिवरून आले कारण अंततः तिला पटले होते की अगस्त्य फक्त नि फक्त तिच्यावरच प्रेम करतो.

दरम्यान ती त्याला लगेच बिलगून म्हणाली, " आय लव्ह यु टू नक्षत्र. आय लव्ह यु सो मच. "

" आय नो ॲन्ड आय लव्ह यु इनफिनिटी. " अगस्त्य गालातल्या गालात हसत उत्तरला आणि त्याने लगेच मिठी घट्ट केली.

समाप्त.

🎭 Series Post

View all