कॅलक्युलेटेड रिस्क (भाग-एक)

प्रेमात पाडणारी प्रेमकथा.
पदवीची परीक्षा संपली होती. कालांतराने सगळ्यांचे मार्ग बदलणार होते. पुढील शिक्षणासाठी अगस्त्य परदेशात जाणार होता पण जाण्यापूर्वी त्याला त्याच्या प्रेमाची कबुली द्यायची होती म्हणून तो एका टेकडीवर नक्षत्राला घेऊन गेला होता. तिथे गेल्यावर गर्दी नाहीशी होताच अगस्त्यने त्याचे प्रेम व्यक्त करण्याचे धाडस केले. एकाएकी त्याने नक्षत्राचे हात हातात घेतले आणि कवितेतून स्वतःच्या प्रेमाची कबुली देण्यासाठी तो सरसावला.

" थेंब पावसाचे ओघळताना
मी तुझ्याच भासात रमतो
रित्या ओंजळीत माझ्या
तुझे स्वप्न सारे जपून ठेवतो

येतेस तू मोरपीस घेऊन हळूच
अन् त्या स्पर्शाने मी बावरतो
तुझ्या मिठीत स्वतःला शोधताना
लगेच स्वप्नातून त्या मी जागतो

तू व्हावीस फक्त माझीच
मी निशीदिन हाच वर मागतो
पण तू नाहीस माझी या वास्तवाने
एकटाच मी एकांतात झुरतो " अगस्त्य नक्षत्राच्या बोलक्या डोळ्यात पाहत होता.

त्याची कविता ऐकल्यावर नक्षत्रा भुवया उंचावत म्हणाली, " काय होतं हे? आज तू चक्क कविता ऐकवतोय मला! काय खास आहे आणि मुळात कुणासाठी लिहिलीस एवढी सुंदर कविता? "

" तुझ्यासाठी. " अगस्त्य एका शब्दात उत्तरला.

" माझ्यासाठी? का? " नक्षत्राने लगेच विचारले.

" मुलींचा सिक्स्थ सेन्स स्ट्रॉंग असतो, असं म्हणतात; त्यामुळे एव्हाना तुलाही अंदाज आला असेल तरीही मी स्पष्टच सगळं सांगतो कारण आज जर मी बोललो नाही तर ही संधी मला परत कधीच मिळणार नाही आणि मला खरंच अबोल राहायचे नाही. " अगस्त्य धाडसी वृत्तीने म्हणाला.

" बरं, बोल. " नक्षत्रा शांतपणे म्हणाली.

" नक्षत्रा, मला आवडतेस तू. फक्त एक मैत्रीण म्हणूनच नव्हे तर माझ्या मनात तुझ्याप्रती मैत्रीच्या पलिकडे भावना आहेत. माझं प्रेम आहे तुझ्यावर. आईनंतर माझ्या आयुष्यात एखाद्या स्त्रीला जर मी महत्त्व दिले असेल तर ती तूच आहेस. शब्दांत व्यक्त करण्यापलिकडे अन् कवितेत लिहिण्यापलिकडे माझं प्रेम आहे तुझ्यावर. अगदी ज्या क्षणी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाच ठरवलं होतं की मी फक्त तुझाच होणार आणि केवळ तुझ्यावरच प्रेम करणार.

गेले तीन वर्ष मी तुझ्यावर प्रेम करतोय. आजपर्यंत तुझ्यापुढे व्यक्त झालो नाही पण आजपासून सगळं चित्र बदलणार. आपले मार्ग बदलतील आणि गंतव्यस्थानही पण यशाची पायरी चढताना मला तुझी सोबत हवी आहे; त्यामुळे आज मी व्यक्त होण्याचा निर्णय घेतला. कदाचित आज व्यक्त झालो नसतो तर ही खंत आयुष्यभर माझ्या मनात राहिली असती म्हणून मला आज तुला सांगावेसे वाटतेय की आय लव्ह यु. आय लव्ह यु सो मच नक्षत्रा. डू यु लव्ह मी टू? " अगस्त्यने कुठलीही न अपेक्षा ठेवता स्वतःच्या प्रेमाची कबुली दिली आणि त्यानंतर तो तिच्या उत्तराची वाट पाहू लागला.

काही वेळ विचार करून नक्षत्रा दीर्घ श्वास घेत म्हणाली, " अगस्त्य, प्रामाणिक उत्तर द्यायचं झालं तर मलाही तू आवडतोस पण त्या भावना मैत्रीच्या तक्त्यात आहेत की त्यापलिकडे आहेत, ह्याची कल्पना मला नाही. आजपर्यंत मी प्रेमाचा अर्थ कधी जाणला नाही त्यामुळे प्रेमाची खरी व्याख्याही मी समजू शकले नाही म्हणून तुला काय उत्तर द्यावे, हेच कळेना; पण जर तुला एक संधी हवी असेल तर मी ती द्यायला तयार आहे कारण आपण कुणावर प्रेम करतो त्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो त्याला आपण महत्त्व द्यावं, मी या मताची पुरस्कर्ता आहे. त्यामुळे मी तुला एक संधी देण्याचा विचार करतेय. "

" संधी? कोणती संधी? " अगस्त्यने जरा गोंधळूनच विचारले.

" तू परदेशात जाणार आहेस तीन वर्षांसाठी तर या तीन वर्षांत आपण लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहू. या दरम्यान तू मला जमेल त्याप्रकारे तुझ्या प्रेमात पाडण्याचा प्रयत्न कर, मला इंप्रेस कर. अर्थात बळजबरी नाही पण तू तुझं प्रेम व्यक्त करू शकतोसच सोप्याप्रकारे कारण माझ्या आवडीनिवडी तुला ठाऊक आहेत. शिवाय माझ्यासाठी प्रामाणिकपणा सर्वोच्च आहे त्यामुळे या लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमधून मला तुझ्या प्रामाणिकपणाची शाश्वती पटेल.

राहिला प्रश्न लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप अयशस्वी ठरण्याच्या भीतीचा तर सगळं आपल्यावर आहे. प्रेम सच्चे आणि प्रामाणिक असेल तर दूर राहूनही मनातील प्रेमाला व नात्याला जपता येईलच. मुळात प्रेमाला खरंतर कसलेच अंतर नसते मग अंतराचे काय बंधन? आता महत्त्वाचा मुद्दा हा की आपण एकमेकांशी प्रामाणिक राहायचं म्हणजेच जर तुला कळत-नकळत कुणी दुसरे आवडायला लागले तर तू मला सांगायचं आणि माझ्या आयुष्यात कुणी आले तर मी ही तुला सांगणार पण एकमेकांपासून लपवून आपण काहीच करायचं नाही.

एकमेकांच्या विश्वासाला चुकूनही तडा द्यायचा नाही. जर तीन वर्षे तू माझ्याशी प्रामाणिक राहिलास तर आपण आपलं नातं कंटिन्यु करू कारण एवढा वेळ एकमेकांना जाणून घेण्यासाठी पुरेसा आहे, निदान मला तरी तुझे विविध पैलू उलगडता येईल आणि कदाचित मला तुझ्याप्रती जे वाटतं ते प्रेम आहे की नाही, हे ही कळेल. हा माझा प्रस्ताव आहे, बघ तुला काय पटतंय? आपण हा कॅलक्युलेटेड रिस्क घ्यायचा का? " नक्षत्राने शांत चित्ताने तिच्या प्रस्तावाची उकल केली आणि अगस्त्यलाच प्रतिप्रश्न केला.

" अं... " अगस्त्य काही क्षण चिडीचूप झाला.

त्याच्या मनातील विचारांचे द्वंद्व लक्षात घेत नक्षत्रा म्हणाली, " अगस्त्य, तू खूप चांगला मुलगा आहेस. तुला नकार देण्यासाठी माझ्याकडे कुठलेही वाजवी कारण नाही. शिवाय मला तर तू आवडतोसच, फक्त प्रेमाविषयी मी साशंक आहे म्हणून हा प्रस्ताव मांडलाय मी तुझ्यापुढे. मला माहीत आहे की मी सध्या ठामपणे तुझ्या 'आय लव्ह यु' या शब्दांचे उत्तर आय लव्ह यु टू देऊ शकणार नाही पण कदाचित वेळेपरत्वे परिस्थिती बदलू शकते, असा मला विश्वास आहे. त्यामुळे मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार करून ह्या प्रस्तावास्वरूप तुला एक संधी देतेय. आता पुढे तुझा निर्णय. "

प्रतिपादन करून झाल्यावर नक्षत्राने अगस्त्यला विचार करण्यासाठी थोडा वेळ दिला व ती स्वतः मात्र सभोवती नजर फिरवून टेकडीवरील परिसराला न्याहाळण्यात रममाण झाली.

क्रमशः


🎭 Series Post

View all