कॅलक्युलेटेड रिस्क (भाग-तीन)

अगस्त्य-नक्षत्राची आगळीवेगळी प्रेमकथा
दुसऱ्या दिवशी सायंकाळी अगस्त्य आणि नक्षत्रा एका बागेत योगायोगाने भेटले. भेटीदरम्यान नक्षत्रा नीट काही बोललीच नाही त्यामुळे ती रुसल्याचा अगस्त्यला लगेच अंदाज आला. त्याने नानाविध प्रयत्न करून तिला बोलके केले. तिलाही फार काळ मौन धारण करता येतच नसायचे म्हणून त्याच निमित्ताने त्यांच्यातील वाद संपुष्टात आणण्यासाठी नक्षत्राने कालच्या चर्चेचा विषय काढला, तिच्या इच्छेचीही कल्पना दिली व त्याच्या आईच्या नकारामुळे तिच्या मनाचा जो हिरमोड झाला त्याचीही कल्पना दिली.

सगळं ऐकून घेतल्यावर अगस्त्यला नक्षत्राची चीडचीड पटत होती पण तो त्याच्या आईची बाजू उचलून धरत होता. ते पाहून नक्षत्रा थोडीशी चिडून म्हणाली, " तू का माझी बाजू घेत नाहीस? "

" अगं, अशी काय बोलतेस? आपल्याच माणसांविरुद्ध कुणी बोलतं का? मुळात या क्षणी तुमच्या दोघींचे विचार जुळत नाहीये, हे कळतंय मला पण आई तुझ्या भल्यासाठीच बोलतेय ना. पावसाळ्याचे दिवस आहे आणि तू चिखलदऱ्याला जाण्याचा हट्ट करतेय. तुला तुझी इच्छा पूर्ण करायची आहे, हे ही मी समजतो पण चिखलदऱ्याला बरेच नैसर्गिक अपघात होत राहतात या ऋतूत म्हणूनच आई नकार देतेय. तू चिडू नकोस आणि दुसरे एखादे सुरक्षित ठिकाण निवडून तिथे फिरायला जा हवं तर! " अगस्त्य सुवर्णमध्य साधत बोलला.

" तू जा रे. तू असाच डिप्लोमॅटिक बोलतोस नेहमी. तुझं प्रेमच नाहीये माझ्यावर कळलंय मला. " नक्षत्रा नाराजी व्यक्त करत म्हणाली.

" अगं... " अगस्त्यला सुचेनासे झाले.

" मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी आणि तुझं ऐकायचंही नाहीये. शिवाय तुझ्या माहितीखातर सांगतेय की मी चिखलदऱ्याला जाणार म्हणजे जाणार. तू आणि आईने नकार दिला तरीही! आय वोन्ट कॉम्प्रोमाईज. " नक्षत्राने रागातच निर्णय ऐकवला आणि ती तेथून जाऊ लागली.

तेवढ्यात तिला त्याने पाठीमागून मिठी मारली आणि लगेच तिची माफी मागत म्हणाला, " रुसू नकोस ना. ॲक्च्युली आईने तुला परवानगी दिली आहे, मी जस्ट मस्करी करत होतो. ॲक्च्युली तुझ्याविना मला इकडे करमणार नाही म्हणून मीच आईला नकार द्यायला सांगितला होता. "

" किती दुष्ट आहेस तू! तुझ्यामुळे काल मी आईवर चिडले. " अगस्त्यच्या दंडावर फटके मारत नक्षत्रा म्हणाली. त्यानंतर त्याने कान पकडून माफी मागितली आणि तिने लगेच हसून माफ केले.

कालांतराने एक आठवड्याची रजा घेऊन व अगस्त्य आणि त्याच्या आईचा निरोप घेऊन नक्षत्रा तिच्या कुटुंबासह चिखलदऱ्याला फिरायला गेली. ती सुखरूप चिखलदऱ्याला पोहोचली. चार-पाच दिवस तेथील वेगवेगळ्या ठिकाणांना त्यांनी भेट दिली. गोड आठवणी संकलित केल्या व सहाव्या दिवशी ते परतायला लागले परंतु नियतीने घात केला. एकाएकी दरड कोसळली आणि ज्या बसने नक्षत्रा तिच्या कुटुंबासह प्रवास करत होती त्या बसचा अपघात झाला.

कित्येक प्रवासी मृत्युमुखी पडले त्यात नक्षत्राचे वडील आणि धाकटी बहीण समाविष्ट होते. काही प्रवासी नक्षत्राप्रमाणे गंभीर जखमी झाले होते म्हणून त्यांना तेथील स्थानिक इस्पितळात भरती केले होते. नक्षत्राही तिथेच भरती होती. तिच्या पर्समधून पोलिसांना तपासात फोन मिळाला. अगस्त्य तिला फोन करत होता त्यामुळे पोलीस त्याच्याशी बोलले आणि त्याला संपूर्ण घटनेची माहिती दिली. ती माहिती ऐकून तो हादरून गेला होता पण त्याच्या आईने त्याला धीर दिला.

त्यानंतर ते दोघे तडकाफडकी त्या इस्पितळात गेले. नक्षत्राची भेट घेतली तेव्हा ती त्यांना गंभीर जखमी अवस्थेत आढळली. तिच्या तब्येतीची विचारणा केल्यावर तिच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्याने ती कोमात असल्याचे सांगितले गेले. ती वार्ता कळताच अगस्त्य सुन्न झाला होता. तो रात्रभर नक्षत्राचा हात हातात घेऊन तिथेच शून्यात नजर घालून बसला होता. दुसऱ्या दिवशी आईच्या सल्ल्याने काही औपचारिक प्रक्रिया आटोपून त्याने स्वहस्ते नक्षत्राच्या वडिलांचा व धाकट्या बहिणीचा अंत्यसंस्कार केला. साधारण दोन दिवसांनंतर विशेषज्ञांचा सल्ला घेऊन नक्षत्राला त्यांच्या मूळ शहरात स्थानांतरित केले.

मूळ शहरातील इस्पितळातही त्याने नक्षत्राला केवळ एक महिना भरती ठेवले. त्यानंतर तिची नीट देखरेख करण्यासाठी तो तिला स्वतःच्या घरी घेऊन गेला. तो दिवसभर नोकरी करायचा आणि रात्री नक्षत्राची काळजी करायचा. नक्षत्रासाठी तीळ तीळ मन तुटायचं त्याचं. त्याला एकांतात झुरताना पाहून त्याच्या आईलाही गहिवरून येत असायचे. नक्षत्राच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून अगस्त्यची आई व्रतवैकल्ये, नवस करायची पण अपेक्षित फलश्रुती होत नव्हती तरीही प्रयत्न सुरूच होते अन् अशा तऱ्हेने दोन वर्षे सरून गेले.

नक्षत्राच्या तब्येतीत काहीच सुधारणा न पाहता मनावर दगड ठेवून एकदा अगस्त्य जेव्हा रजेच्या दिवशी नक्षत्राचा हात हातात घेऊन पाणावलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत बसला होता तेव्हा त्याची आई म्हणाली, " सोडून दे तिला. तू तिच्याशी लग्न केलं नव्हतंस राजा. तिच्या तब्येतीत सुधारणा होत नाहीये आणि तू तिची वाट पाहत बसलाय. ती एक सजीव पार्थिव आहे सध्या. ती फक्त श्वास घेतेय पण जगत नाहीये म्हणून तू तुझं आयुष्य आणि वेळ वाया घालवू नकोस. तुझ्याकडे अजूनही वेळ आहे. तू लग्न कर एखाद्या दुसऱ्या मुलीशी आणि संसार थाट. "

आईचे शब्द ऐकून हळूच स्वतःचे अश्रू टिपून तो म्हणाला, " जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं तेव्हा तिने मला साथ दिली. तिच्या मनात माझ्याप्रती प्रेमभाव नव्हते पण माझ्या प्रेमाचा स्वीकार करून तिने मला एक संधी दिली. तीन वर्षे आम्ही एकमेकांपासून लांब राहिलो पण ती मात्र माझ्याशी एकनिष्ठ राहिली. भारतात परल्यावर मी बराच काळ बेरोजगार होतो पण तिने मला पाठिंबा देणे कधीच सोडले नाही मग आता या क्षणी मी का हार मानायची? हो, मान्य आहे मला की आमचं लग्न झालेलं नाहीये पण माझं प्रेम आहे तिच्यावर आजही आई.

मी जेव्हा माझ्या प्रेमाची कबुली दिली होती तिला अगदी तेव्हाच वचन दिले होते की मी फक्त तिचाच होणार आणि फक्त तिच्यावरच प्रेम करणार मग आता जेव्हा परमेश्वर माझी परीक्षा पाहतोय तेव्हा मी माझ्याच वचनांना कसा गं विसरून जाऊ? मुळात वचनांना महत्त्व मंगळसूत्राने वा सप्तपदींनी कधीच प्राप्त होत नाही. आपली निष्ठाच त्या वचनांना बलवत्तर ठरवते म्हणून मी पाठ फिरवणार नाही. " अगस्त्यचे शब्द ऐकून त्याची आई मात्र निशब्द झाली.

क्रमशः


🎭 Series Post

View all