कॅलक्युलेटेड रिस्क (भाग-दोन)

प्रेमात पाडणारी अगस्त्य-नक्षत्राची प्रेमकथा
बराच वेळ शांत डोक्याने विचार करून झाल्यानंतर अगस्त्यने मनोमन निर्णय केला आणि नक्षत्राला साद देत म्हणाला, " नक्षत्रा, माझा निर्णय झालाय. "

" बरं. काय ठरवलंस तू? " नक्षत्राने नम्रपणे विचारले.

" मला माझ्या प्रेमावर पूरेपूर विश्वास आहे म्हणून मी हा कॅलक्युलेटेड रिस्क घ्यायला तयार आहे. मी तुझा प्रस्ताव स्वीकारतोय. वी विल स्टार्ट डेटिंग ॲन्ड विल हॅव लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. " अगस्त्यने त्याचा निर्णय सांगितला.

" ग्रेट! थॅंक्स विचारपूर्वक निर्णय घेतल्याबद्दल. सो, वी आर इन रिलेशनशिप फ्रॉम नाऊ ऑन? " नक्षत्राने गालातल्या गालात हसत ओशाळून विचारले.

" कदाचित. " अगस्त्य ओशाळून हसत उत्तरला.

" ह्म्म पण प्रियकर-प्रेयसी झाल्यावर आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी वागायचं नाही हं! विशेषत्वे बाबू-शोना सारखं क्रिंजी मुळीच नाही वागायचं, प्लीऽज. " नक्षत्राने लगेच अट घातली.

" हो गं. मलाही ते आवडत नाहीत निब्बा-निब्बीसारखं वागणं. आपलं फक्त नातं बदललंय स्वभाव तर तोच आहे ना! मग उगाच कशाला पाल्हाळपणाचा अंतर्भाव. त्यामुळे आपण आपली ओरिजनॅलिटी जपू. " अगस्त्य समजूतदारपणे बोलला.

" फेअर इनफ. आय थिंक, फ्रेंड्स या नात्याने आपल्या वाईब्स जुळल्या होत्याच आता पुढे प्रियकर-प्रेयसी असल्यावरही आपलं ट्युनिंग अप्रिशिएटीव्हच राहील. " नक्षत्रा डोळे मिचकावत म्हणाली.

" होप सो. " अगस्त्य हसत उत्तरला.

त्यानंतर ते दोघे काही वेळ टेकडीवर एकत्र होते. कालांतराने ते परतले. अगस्त्यने नक्षत्राला तिच्या घरी सोडले व तो स्वतःही त्याच्या घरी गेला. साधारण दोन-अडीच महिन्यांनी निकाल आला. मधल्या काळात अगस्त्य-नक्षत्रा एकमेकांना वेळ देत होते, भेटीगाठी घेत होते. तथापि, निकाल येताच दोघेही आपापल्या कामकाजात व्यग्र झाले. नक्षत्राने स्थानिक विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता; त्यामुळे ती प्रवेश प्रक्रियेत व्यग्र होती.

अगस्त्यही परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणार होता. ज्या विद्यापीठात त्याला शिक्षण घ्यायचे होते तिथे अगस्त्यची निवड झाली होती. त्यामुळे एव्हाना इतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती, आता फक्त त्याला मायदेशाचा निरोप घेऊन परदेश गाठायचा होता. खरंतर नक्षत्राला सोडून जाणे त्याच्यासाठी अवघड होते पण उज्ज्वल भवितव्यासाठी कठोर पाऊल उचलणे, नित्याचेच होते; म्हणून आप्तेष्टांचा व नक्षत्राचा निरोप घेऊन तो गेला.

पाहता पाहता काळ लोटू लागला. दोघेही त्यांचे नाते जपून आपले भवितव्य घडवत होते. हळूहळू नक्षत्राला अगस्त्यप्रती तिच्या मनात असणाऱ्या भावनांचे स्पष्टीकरण मिळायला लागले होते. तिला कळून चुकले होते की ती देखील अगस्त्यवर प्रेम करते पण अर्थातच तिला तिच्या भावनांची स्वीकृती व्हिडिओ कॉलद्वारे न देता प्रत्यक्ष आमोरासमोर द्यायची होती म्हणून तिने तात्पुरते मौन बाळगले होते व ती अगस्त्यच्या परतीची वाट पाहू लागली.

दरम्यान अगस्त्यच्या मनातले नक्षत्राप्रती असणारे प्रेम उत्तरोत्तर वाढत होते म्हणून तो नक्षत्राप्रती प्रामाणिक होता. तो अधुनमधून विनाकारण सहज औचित्य साधून नक्षत्राला भेटवस्तू पाठवत असायचा. तिच्या वाढदिवसाला आणि सणासुदीला ई-मेल्स आणि टेक्स्ट मॅसेजच्या काळात हस्तलिखित पत्र पाठवून तिला प्रभावित करायचा. अशाप्रकारे दोघेही एकमेकांचे मन जपत राहिले आणि कधी तीन वर्षे सरून गेले, ह्याची कल्पनाही आली नाही. मधल्या काळात शिक्षण घेताना नक्षत्राने इंटर्नशिप केली होती त्यामुळे त्या अनुभवाच्या आधारावर तिला लगेच उच्च पगाराची नोकरी लाभली.

दुसरीकडे अगस्त्य शिक्षण पूर्ण करून भारतात परतला. तथापि योग्य दिवस निवडून नक्षत्राने अंततः स्वतःच्या भावनांची त्याला कबुली दिली. तिची ती कबुली ऐकून अगस्त्यचा आनंद गगनात मावेनासा झाला. हळूहळू सर्वकाही रुळावर आल्यासारखे वाटत असतानाच एक विचित्र प्रकार घडला. अगस्त्य मायदेशी परतताच नोकरीकरिता खटाटोप करत होता परंतु उच्च शिक्षण घेऊनही कुठल्याही इंटर्नशिपचा अनुभव नसल्याने त्याला नोकरी मिळत नव्हती. बरेच प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते पण त्या परिस्थितीत नक्षत्रा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.

अगस्त्य जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार करून स्वतःला लाचार बोलून हिणवायचा अगदी तेव्हा तेव्हा नक्षत्रा त्याची समजूत काढायची आणि त्याला आधार द्यायची. कदाचित तिच्या प्रोत्साहनामुळेच त्याने हार मानली नव्हती. तसेच आईचे आशीर्वाद पाठीशी असल्यानेही त्याला लवकरच त्याच्या शिक्षणाचा मानसन्मान करणाऱ्या ठिकाणी नोकरी लाभली. त्यानंतर आनंदाचे पर्व सुरू झाले. पाहता पाहता सहा महिने सरून गेले.

नक्षत्रा आधीपासूनच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होती, अगस्त्यला नोकरी लाभताच तो ही आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाला होता; त्यामुळे त्या दोघांनीही एकमताने आपापल्या घरी त्यांच्या नात्याची कबुली देण्याचे ठरवले. दोन्ही कुटुंबाची एकत्रित बैठक घेऊन अगस्त्य व नक्षत्राने त्यांचे नाते जाहीर केले. दोन्ही कुटुंब मुक्त विचारांचे असल्याने सज्ञान मुलांच्या निर्णयाला त्यांनी पूर्णपणे पाठींबा दिला. त्यानंतर काही दिवसांनी साखरपुड्याचा आणि लग्नाचा मुहूर्त काढला.

साखरपुडा एक आठवड्यानंतर व लग्न दोन महिन्यानंतर करण्याचे ठरले. दोन्ही कुटुंबियांनी साखरपुड्याची खरेदी एकत्रच केली. कालांतराने साखरपुड्याचा दिवस उजाडला. मोजक्याच लोकांच्या साक्षीने साखरपुडा पार पडला. सगळं अगदी सुरळीत सुरू होतं. एके दिवशी नक्षत्रा रजेच्या दिवशी अगस्त्यच्या घरी सहज गेली. तिची ये-जा नेहमीचीच होती म्हणून त्यांच्यात नेहमीप्रमाणे चर्चा रंगली.

चर्चेदरम्यान लग्नापूर्वी नक्षत्राला तिच्या कुटुंबासोबत अर्थात फक्त वडील आणि धाकट्या बहिणीबरोबर फिरायला जाण्याची इच्छा असल्याचे तिने अगस्त्य आणि त्याच्या आईला सांगितले; परंतु कुठल्याशा अनामिक कारणामुळे त्याची आई तिला फिरायला जाण्यापासून परावृत्त करत होती अन् कारण विचारल्यावर नीट काहीच सांगत नव्हती. या प्रसंगामुळे नक्षत्रा आणि अगस्त्यच्या आईमध्ये खटके उडाले व ती तावातावाने तेथूनच आपल्या घरी निघून गेली पण नक्षत्रा नाराज झाल्याची कल्पना ना अगस्त्यला होती, ना त्याच्या आईला.

क्रमशः

🎭 Series Post

View all