Login

कॅनव्हास भाग ४

Healing of a Soul

कॅनव्हास भाग ४

©® सौ.हेमा पाटील.

आई बाबा येणार आहेत म्हणून दमयंती तयारीत आहे... शारीरिक आणि मानसिक. मागच्या वेळी आईशी लग्नावरुन वाद झाला होता म्हणून यावेळी आपण जरा सबुरीने घ्यायचे असे दमयंतीने ठरवले आहे. आता पुढे...

‌शनिवार उजाडला आणि सकाळी लवकरच आईबाबा आले. त्यांच्याशी गप्पा मारुन आनंद झाला. आईच्या हातचे तिने बनवून आणलेले भोपळ्याचे घारगे, अळू वडी खाण्यात किती तृप्तता आहे असे तिला वाटले.
' आपल्याला जीव लावणाऱ्या माणसांचे आपल्याभोवती असणारे अस्तित्व वातावरणात किती बदल घडवते ना!' असा विचार तिच्या मनात आला.
सर्वांचे खाणे आवरले की आईने तिला सांगितले,
"आपल्याला दोन तीन तासांसाठी बाहेर जायचे आहे. तयारी कर". खरे तर आता आई मुलांच्या फोटोंचा अल्बम मोबाईलवर दाखवेल व यातील कुठला आवडतोय का असे विचारेल असे नेहमीच्या अनुभवाने तिला वाटले होते.
" कुठे जायचेय आई?" तिने विचारले.
" माझी मैत्रीण आहे ना वैशाली, तिच्या मुलीकडे जायचे आहे."
"आता मधूनच तिकडे काय आहे आई?" तिकडे एखादा मुलगा वैगेरे प्रत्यक्षात दाखवायला ही घेऊन जाते की काय अशी शंका दमयंतीला आली होती.

आईने सांगितले,
" तुझ्याशी स्पष्टच बोलते. वैशालीची मुलगी मानसोपचार तज्ञ डॉक्टर आहे. तिच्याकडे येणाऱ्या रुग्णांना अगदीच गरज असेल तर ती त्यांचे आकाशिक रेकॉर्ड ओपन करुन त्यांच्या मागील जन्मातील काही अडचणी असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करते. तुला मी तिच्याकडे घेऊन जातेय कारण तुला बालपणापासून पुरुषांचा तिटकारा आहे. त्यामुळेच तू लग्नाला तयार होत नाहीयेस हे मागच्या वेळच्या आपल्या भांडणातून माझ्या लक्षात आले.
यावर काय उपाय करावा म्हणून मी आपल्या फॅमिली डाॅ. देशपांडे मॅडमना विचारले; तेव्हा त्यांनी हा उपाय सुचवला. मी गेल्या शनिवारी माहेरी नाशिकला गेले होते ना, तेव्हा वैशाली भेटली होती. तिने सांगितले होते की; तिचीही मुलगी मुंबईत रहाते व ती मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आहे. तेव्हा तुझ्या बाबतीत उलुपीशी वैशालीच्या फोन वरुन बोलणे झाले . तुला घेऊन या असे तिने सांगितले.
आजची दुपारची तुझी अपाॅईंटमेंट मी आधीच घेतली आहे. आपण दोघी तिकडे निघालो आहोत. गरज भासल्यास आकाशिक रेकॉर्ड ओपन करुन तुझ्या या पुरुषांविषयीच्या आकसाबाबत काही उपाय सापडला तर पाहूयात असे डॉ.उलुपीने सांगितले आहे."

दमयंती विचारात पडली. आजवर असा विचार तिच्या मनात कधीच आला नव्हता. आपल्या सभोवताली पाहिले तर आपली पुरुषांचा द्वेष करण्याची वृत्ती अनैसर्गिक आहे हे तिच्या लक्षात आले होते; पण याबाबत ती इतकी पझेसिव्ह होती की पुरुषांचा द्वेष करणे थांबवले पाहिजे असा विचार आजवर कधीच तिच्या मनात आला नव्हता. आज मात्र आईने जे सांगितले त्याला ती विचाराअंती तयार झाली. आईला आनंद झाला कारण ती तयार होईल का? अशी तिच्या मनात शंका होती.
दुपारी जेवण झाल्यावर बाबांना विश्रांती घ्यायला सांगून दोघीच घराबाहेर पडल्या. उलुपीकडे पोहोचेपर्यंत दोन वाजले होते. उलुपी यांचीच वाट पहात होती.

डाॅ. उलुपीने आधी दमयंती व तिच्या आईशी सखोल चर्चा केली. दमयंतीला लग्न का नकोसे वाटते या अनुषंगाने प्रश्न विचारले. तिच्या बालपणी काही अघटीत घटना घडली होती का? याबद्दल विचारणा केली. दमयंतीला लग्न का नकोसे वाटते याचे उत्तर,
" किळस वाटते, पुरुषी स्पर्श होण्याची कल्पनाही करवत नाही" असे तिने दिले. खरे तर हे अनैसर्गिक होते. पिरियडस् नाॅर्मल येतात का? याची डाॅक्टरांनी विचारणा केली. आई व दमयंती दोघींनीही होकारार्थी उत्तर दिले.
" वयात येताना शरीरात होणारे बदल पाहून काय वाटले? पुरुषांविषयी आसक्ती वाटू लागली होती का? " या प्रश्नाशी दमयंती थबकली.
" नाही. आजपर्यंत कधीही मला पुरुषांविषयी ओढ वाटली नाही. शरीरात होणारे बदल पाहून मी स्वतःला जास्तच जपून लागले होते." असे दमयंतीने सांगितले.

" आपण आधी संमोहनशास्त्राच्या मदतीने दमयंतीच्या अनकाॅन्शस मनात काय साठलेले आहे ते शोधून पाहूया. कदाचित तिच्या बालपणी तिच्या बाबतीत काही घडलेला प्रसंग असेल किंवा तिने असा काही प्रसंग कुठेतरी पाहिला असेल ज्याचा तिच्या मनावर परिणाम झाला आहे. यातून जर समजले तर काही सीटींग्ज मधून ती मोकळी होत जाईल."
नलिनीताईंनी होकारार्थी मान हलवली. डाॅ. उलुपीने दमयंतीकडे पाहिले. तिनेही होकार दर्शवला. डाॅ. उलुपीने नलिनीताईंना बाहेर बसायला सांगितले. दमयंतीला खुर्चीवर बसवून लोलकाच्या सहाय्याने तिने दमयंतीला संमोहित केले. तिच्या बालपणी घडलेल्या घटनांबद्दल ती दमयंतीला विचारु लागली. खटकणारी कुठलीही आठवण दमयंतीने सांगितली नाही. मग तिच्या पौगंडावस्थेतील आठवणींबाबत डाॅ. उलुपीने विचारले, परंतु तेव्हाच्या आठवणींतही काही खटकण्यासारखे घडलेय असे डॉक्टर उलुपीला वाटले नाही.

" तुला पुरुषांचा तिटकारा का वाटतो?" असा थेट प्रश्न डाॅ. उलुपीने विचारला. यावर काहीच न बोलता दमयंतीने शहारल्यासारखे केले. तिच्या चेहऱ्यावर भीतीची भावना दाटून आली. तिने आपले अंग आकसून घेतले. तिचे डोळे बंद असूनही ते भीतीने गोठले असावेत असे डॉक्टर उलुपीला वाटले. घाबरुन तिने आपले दोन्ही हात छातीशी कवटाळून धरले. कुणीतरी पुरुष आपल्यासमोर उभा राहिला आहे आणि आपल्याला त्याच्यापासून आपला बचाव करायचा आहे असा तिचा एकूण पवित्रा होता. हे पाहून डॉक्टर उलुपी चक्रावली.

डाॅ. उलुपीने तिला रिलिज केले. हळूहळू ती संमोहनातून बाहेर आली. परंतु तिच्या चेहऱ्यावर ताण स्पष्टपणे दिसत होता. उलुपीने नलिनीताईंना आत बोलावले.

" मी आज तिला संमोहित करून प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. तिच्या चित्तावर कोरली गेलेली घटना शोधण्यासाठी आता आपल्याला तिचे आकाशिक रेकाॅर्डिंग तपासून पहावे लागेल. तुमची दोघींची याला तयारी आहे का? अगदीच आवश्यकता असेल तेव्हाच आम्ही याची मदत घेतो. आकाशिक रेकाॅर्ड तपासणे म्हणजे नियतीच्या मार्गात ढवळाढवळ करणे. दमयंतीच्या बाबतीत आपल्याला याची गरज आहे असे मला वाटते."
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

काय होईल पुढे? नलिनी ताई आणि दमयंती या गोष्टीला तयार होतील? याचा काही फायदा होईल? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
अष्टपैलू लेखक स्पर्धा -२०२५


🎭 Series Post

View all