Login

अभ्याची जिद्द भाग ३

दुरून डोंगर साजरे
जलदलेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025

अभ्याची जिद्द भाग ३


दुसऱ्या दिवशी मी उठले तेव्हा अंगणात अजूनही धुकं होतं. चहाचा वाफाळता वास, घराच्या ओसरीवर बसलेली आई, कोंबड्यांचा आवाज सगळं नेहमीसारखंच.

पण माझ्यात मात्र काहीच नेहमीसारखं नव्हतं.

मी आईला विचारलं,
“अभ्या पुण्याला केव्हा निघणार बोललंय का?”

आई थोडं हसली.
“काय गं तुला त्याचं एवढं काळजी? गावात सगळेच बोलताहेत त्याच्याबद्दल.”

मी काही उत्तर दिलं नाही.
पण आईला कळलं होतं कदाचित…

अभ्या सकाळीच दोन-तीन तरुणांना घेऊन घराघरातून स्वाक्षऱ्या गोळा करत फिरत होता.
मी दुरून त्याला पाहिलं.
त्याच्या चालण्यातच आत्मविश्वास होता.

पण त्याचवेळी काही लोक अडथळे आणत होते.

“कशाला ग बाई सही करायची? गेल्या वेळीही काही फायदा झाला नाही.”
“ते अधिकारी पाहतातही नाहीत आपल्या अर्जाकडे.”
“वीज शिवायही जगता येतं. आमचे बापजादेही जगले.”

अभ्या मात्र शांतपणे प्रत्येकाला समजावून सांगत होता,
“जगता येईल, पण जगण्यात उन्नती हवी ना? मुलं अभ्यास कशात करणार? रस्त्यावरील दिवे नसल्याने अपघात वाढलेत. बायका धुरात जगतात. आपण काही मिळवण्यासाठी झगडूच नये का?”

मी दुरून सगळं ऐकत होते, नि हळूहळू त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिले.
तो मला पाहताच हलकं हसला.

“अंजु , तुझ्या घरची सही घेतली.”
त्याने कागद पुढे केला.

माझ्या हाताला त्याच्या हाताची बोटं स्पर्शली…
आणि त्या क्षणी मला कळलं मी कशासाठी इथे उभी आहे.

दोन दिवसांनी अभ्या आणि गावातील आणखी तीन तरुण पुण्याला जाण्याची तयारी करत होते.
गावकरी चौकात जमले होते ज्यांच्यावर विश्वास नव्हता तेही त्यांना निरोप द्यायला उभे होते.

मी बाजूलाच उभी होते.
मनात भीती आणि अभिमान यांचं मिश्रण.

“अभ्या… सांभाळून जा.” मी हलक्या आवाजात म्हणाले.

तो जवळ आला.
“घाबरू नकोस. अर्ज देऊनच येणार.”

“जर कोणी ऐकलंच नाही तर?”
माझ्या आवाजात काळजी स्पष्ट होती.

तो निर्धाराने म्हणाला,
“एवढे प्रयत्न करूनही काही झालं नाही, तर पुढच्या वेळी आणखी मोठी तगादा लावू. पण थांबणार नाही.”

माझ्या डोळ्यांत अश्रू जमा झाले.
तो मला काही बोलणार इतक्यात इतर लोकांनी आवाज दिला.

अभ्या वळला, पण जाण्यापूर्वी अगदी हळूच म्हणाला,
“अंजु … आपले गाव नक्की उजळेल. वचन देतो.”

तो निघून गेला, पण त्याचे शब्द माझ्या मनात दिव्यासारखे पेटत राहिले.

अभ्या पुण्याला गेल्यानंतर गावात एक विचित्र शांतता होती.
जानकीकाकू सतत देवाजवळ दिवा लावत होती.
मुले तर जवळजवळ रोज विचारायची “वीज कधी येणार?”
पुरुष चौकात चर्चा करत.
बायका मात्र दडपलेल्या आशेने बघत होत्या.

मी दर संध्याकाळी वडाच्या झाडाखाली जाऊन बसायचे.
त्या ठिकाणी त्याचा आवाज अजूनही ऐकू येत असल्यासारखं वाटायचं.

“अंधारातही दिवा पेटवायला कुणीतरी लागतंच…”
तो म्हणत होता.

मी मनात म्हणायचे
“हो, आणि त्या दिव्याची वात मीही होऊ शकते…”

तिसऱ्या दिवशी दुपारी गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर धुळीचा गुडगुड आवाज आला.
लोक घराबाहेर आले.

“अभ्या आलाय बहुतेक!” कोणीतरी ओरडला.

माझं हृदय धडधडू लागलं.

अभ्या जवळ आला तसा मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं
दमलेला होता, पण चेहऱ्यावर एक चमक होती.

तात्याने विचारलं,
“काय रे? अर्ज दिला ना?”

अभ्या पुढे आला आणि मोठ्याने म्हणाला

“अर्ज फक्त दिला नाही… मान्यही झाला! पुढच्या दोन महिन्यांत आमच्या गावाची वीजपुरवठा कामं सुरू होणार आहेत!”

सगळे काही क्षण अवाक झाले.
मग जणू एखाद्या विस्मरणात गेलेल्या उत्सवाचा फुगवटा फुटावा तसं आनंद फुलला.

जानकीकाकू आनंदाने रडायला लागली.
मुले ओरडू लागली.
बायका एकमेकींना मिठ्या मारू लागल्या.
पुरुष अभ्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याचं अभिनंदन करत होते.

आणि मी?
मी त्याच्या डोळ्यात पाहत उभी होते
जे डोळे आता आमच्या गावाच्या पहिल्या उजेडाने भरलेले होते.

तो शांतपणे माझ्याजवळ आला आणि अगदी हलक्या आवाजात म्हणाला

“अंजु … मी म्हटलं होतं ना? नक्की आपले गाव उजळेलं ”

त्या क्षणी मला जाणवलं
उंबरगाव उजळणार होतं,
आणि त्यासोबत माझं हृदयही.

*भाग कसा वाटला हे कमेंट व रेटिंग देऊन प्रोत्साहन द्या*
*तुमच्या जान्हवी ला फोल्लो करा म्हणजे तुम्हला वेळेत नोटिफिकेशन येईल.*
*तुमचे मनोगत माझ्यासाठी खूप अमूल्य आहे.*


©®जान्हवी साळवे
0

🎭 Series Post

View all